रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

वर्तमान, अपुऱ्या मानवतावादाचे परिणाम

`साहित्यिकांची नाराजी' प्रकरण अजून सुरूच आहे. त्यातील राजकारण, पुरस्कार वगैरे परत करणाऱ्या साहित्यिकांचे हेतू, त्यांच्या मनातील आपपरभाव इत्यादी बाबी थोडा वेळ बाजूला ठेवून विचार केला तरीही एक गोष्ट जाणवते की, त्यांच्या भूमिकेचा पूर्ण प्रामाणिकपणा मान्य करूनही त्यांची भूमिका चुकीची आहे. कारण आपल्या कृतीसाठी त्यांच्याकडून जी कारणे दिली जात आहेत, त्याची जी विश्लेषणे व स्पष्टीकरणे दिली जात आहेत त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह लावले जाऊ शकेल. नव्हे ते तसे लावले जायला हवे. नाराज, निराश, राजीनामे देणारे साहित्यिक मानवतावादी आहेत. अन त्यांचं वैचारिक, भावनिक पोषण करणारा हा वर्तमान मानवतावाद मुळातच अपुरा, अर्धवट, चुकीचा आहे. त्याचा आधार, त्याची गृहितकं, त्याने जन्माला घातलेल्या कल्पना- संकल्पना, त्याने तयार केलेल्या मान्यता, त्याने रेखलेले चित्र; हे सारेच अपुरे व चुकीचे आहे.

सिग्मंड फ्रॉईडचे मानसशास्त्र हा त्याचा फार मोठा आधार आहे. एक तर मुळातच फ्रॉईडने त्याचे सगळे विचार, तर्क, सिद्धांत विकृत व्यक्तींच्या निरीक्षण, परीक्षणावरून काढलेले आहेत. त्यामुळेच ते एकांगी आहेत. त्याने केवळ जाणीवयुक्त बाह्य मन मान्य केले. नेणिवेतील अबोध मन फ्रॉईडला मान्यच नाही. त्यामुळेच तो माणसाची बहिर्मुखता फक्त मान्य करतो. केवळ बहिर्मुखता सत्य आहे अंतर्मुखता असत्य म्हणूनच त्याज्य आहे असे तो म्हणतो. शिवाय कामभावना या विश्वातील सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असल्याचा त्याचा सिद्धांत किती तकलादू आहे हे वरवर विचार केला तरीही लक्षात येते. गेल्या वर्षी नेपाळमध्ये महाविनाशकारी भूकंप झाला. तेव्हा सगळ्या जगाने त्याला जो प्रतिसाद दिला त्याच्या मुळाशी कुठे कामभावना होती? अन अशा व्यक्तिगत अन सामूहिक घटना अपवादात्मक नसून नियमित घडत असतात. शिवाय कामभावना ही मूळ बाब मानली तरीही केवळ दोन शरीरांचे मिलन यापलीकडे फ्रॉईड जाऊ शकलेला नाही. अस्तित्वाच्या सूक्ष्म स्तरांवरील कामभावनेचा विकास त्याच्या आवाक्यात येऊ शकलेला नाही. भारतीय तंत्रविचारात सुद्धा या विश्वाच्या मुळाशी कामभावना मान्य केली आहे. त्यातूनच शिव-शक्ती वा पुरुष-प्रकृती कल्पना आल्या. पण या कल्पना म्हणजे दोन शरीरांचे स्थूल मिलन नाही. मन, बुद्धी आणि चेतन पातळीवरील कामभावनेचे संवेदन आणि प्रकटीकरण स्थूल शारीर जाणीवांपेक्षा निश्चितच निराळे राहील. पण बहिर्मुखी जाणीवाच अंतिम सत्य मानल्याने फ्रॉईड त्या भावनांचा विकास करूच शकला नाही.

फ्रॉईडला त्याचाच सहकारी असलेल्या कार्ल जंगने आव्हान दिले होते. खरे तर दोघेही मित्र. दोघांनी मिळून १९११ साली आंतरराष्ट्रीय मनोविश्लेषण समिती स्थापन केली होती. पण अबोधात्मक मन हाच दोघांच्या मतभेदांचा मुद्दा झाला. वर्षभरातच फ्रॉईडने स्वत: त्यास वेगळे होण्याची विनंती केली आणि जंगने वेगळे होऊन आपले काम सुरु ठेवले. नंतर त्याने आपले `विश्लेषणात्मक मानसशास्त्र' मांडले. जाणीवेपलीकडील जीवनशक्तीचा सिद्धांत त्याने मांडला. जीवनातील द्वंद्व आणि संघर्ष त्या जीवनशक्तीतून उत्पन्न होतात, असे त्याचे मत होते. एवढेच नव्हे तर उपनिषदातील या विश्वाची मूळ शक्ती आणि आपण प्रतिपादन करीत असलेली जीवनशक्ती यातील साम्यही जंगने दाखवले आहे. त्याविषयी मतांतरे आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय चिंतनाने मनापलीकडील अस्तित्वाचे अनेक स्तरही सांगितले आहेत. हे स्तर अनुभवगम्य नसून अनुभूतीगम्य आहेत असे भारतीय चिंतन सांगते. मात्र, स्थूल इंद्रियगम्य बाह्य विश्व हेच एकमेव आणि अंतिम सत्य होय. तेच मानवाचे खरे रूप होय हा फ्रॉईडचा सिद्धांत मात्र भारतीय चिंतनाला आणि त्याचा सहकारी राहिलेल्या जंगलाही मान्य नाही.

दैनंदिन जीवनात सुद्धा फ्रॉईडच्या मान्यता अपुऱ्या असल्याचे प्रत्ययास येते. तरीही जगभर त्याच मान्यता उचलून धरण्यात आल्या. याची तीन कारणे असू शकतात- १) काळाचा महिमा, २) व्यापारी संस्कृतीचे/ जीवनपद्धतीचे हितसंबंध, ३) इंद्रियगम्य सुखाची मानवाची लालसा. परंतु कारण कोणतेही असले तरीही, केवळ बाह्य जगाच्या प्रेरणा माणसाचे व्यक्तिगत आणि सामूहिक जीवन सुखी, शांत, समाधानी बनवू शकत नाहीत. त्यातून केवळ तात्विक, वैचारिक, सैद्धांतिक, व्यावहारिक संघर्षच जन्माला येऊ शकतात. अन्यथा संभ्रम निर्माण होऊ शकतो. निराशा वाढू शकते. दुसरे काहीही नाही. आज जगभरात याचा प्रत्यय येऊ लागलेला आहे.

बहिर्मुखी इंद्रियगम्य विश्वच सत्य मानल्याने व्यक्ती वा समूहाच्या क्रिया अथवा विचार अथवा भावना यांचं मूल्यांकन दृश्य बाबींवरून केले जाते. तसेच त्यांच्या उगमाची, निर्मितीची चर्चा वगैरे करण्याची गरज उरत नाही. जसे प्रेम ही भावना समजून घ्यायची तर गोड आणि नाजूक वागणे-बोलणे हे त्याचे मापदंड. प्रेम हे एक जीवनमूल्य. त्यामुळे गोड-नाजूक वागणे-बोलणे आवश्यक. मग लहान मुलांना रागावणे किंवा शिस्त लावणे वगैरे मानवतावादात बसत नाही. त्यातून `दाग अच्छे है' ही भावना आकारास येते. अशा प्रकारच्या अयोग्य प्रतिमांचा मारा सुरु होतो. तो व्यावसायिक लाभ मिळवून देतो. त्यामुळे अशा प्रतिमा उचलून धरल्या जातात. दिसायलाही छान वाटतं. केवढं मानवतेचं दर्शन आहे, असं वाटतं. पण डाग पाडणे चुकीचे आहे, योग्य नाही; असे वळण लावायचे असेल तर थोडी कठोरता दाखवावी लागते. पण कठोरता म्हणजे प्रेमाचा अभाव, म्हणजे मानवतेच्या विरोधी. अशी ही शृंखला तयार होत जाते. मग बाह्य कठोरतेची उपयोगिता, आवश्यकता, अन त्यातील प्रेम आकलन करण्याची क्षमताच संपून जाते.

समस्यांच्या संदर्भातही हेच दिसते. हिंदू-मुस्लिम संबंधांचा विचार करायचा असेल तर गेल्या अनेक शतकांचा विचार आवश्यक ठरतो. पण तो करायचा म्हणजे काही कठोर गोष्टी बोलाव्या लागतील. कठोर विश्लेषण करावे लागेल. पण बाहेर दिसणाऱ्या कठोरतेचा अर्थ विरोध, दुष्टता, शत्रुता असा लावला गेल्याने; कठोर विश्लेषण होऊ शकत नाही. गोड गोड बोलणे हाच चांगुलपणाचा अन भलेपणाचा निकष ठरू लागल्याने समस्या जटील होत गेल्या. अगदी संयुक्त राष्ट्रसंघ देखील ठराव आणि निषेध यापलीकडे जगातील संघर्ष अन समस्या सोडवू शकलेले नाही. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे उदाहरण घेता येईल. मानवी संवेदना हा त्यांचा प्रांत. त्याचं चित्रण, वर्णन त्यांनी ताकदीने केलं. पण फाळणीच्या वेदना स्वत: भोगल्या असूनही फाळणीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी वा कमी करण्यासाठी ते काहीही करू शकले नाहीत. त्यासाठी काही कठोर गोष्टी कराव्या लागतील. पण कठोरता म्हणजे मानवतेला काळीमा अशी काहीशी धारणा झाल्याने त्यांचा नाईलाज असावा.

बाह्य गोष्टी प्रमाण मानल्याने, आत पाहण्याची, खोलात जाण्याची, कारणमीमांसा करण्याची गरज उरत नाही. अमुक घटना का घडली किंवा अमुक गोष्ट का करायची वा करायची नाही इत्यादीचा विचार अनावश्यक ठरतो. फक्त आपल्या कल्पनाचित्रानुसार गोष्टी घडाव्यात एवढे इच्छाचिंतन उरते. ते नियमित सुरुच राहते आणि समस्याही तशाच कायम राहतात. अमूर्त भावना आणि जाणिवांना दृश्य प्रतिकात बांधण्याचा प्रयत्न साहित्यिक अन कलाकार करतात. आपल्याला जाणवणाऱ्या जाणीवांचं नेमकं स्वरूप, तसेच त्या येतात कुठून याचा संभ्रम कायम राहतो आणि त्या संभ्रमित अवस्थेतच त्या त्या जाणीवांना एखाद्या आकारात, चौकटीत, प्रतिकात कोंबण्याचा प्रयत्न सुरु राहतो. त्या चौकटीत न बसणारी गोष्ट चुकीची ठरू लागते. सूत्ररुपात सांगायचे तर- बाह्य गोष्टी प्रमाण मानायच्या, त्याच्या व्यक्तीसापेक्ष चौकटी तयार करायच्या, सगळ्या घटना- विचार त्यात कोंबायचे, जे कोंबले जाऊ शकणार नाहीत ते चुकीचे अन त्याज्य ठरवायचे. हिंसा-अहिंसा, सुख-दु:ख, न्याय-अन्याय, खरे-खोटे, ज्ञान-अज्ञान, योग्य-अयोग्य, इष्ट-अनिष्ट, चांगले-वाईट, श्रेष्ठ-कनिष्ठ; या व अशा सगळ्या गोष्टींचे निकष म्हणजे चौकटी.

या जगातून दु:ख संपूर्ण नाहीसे होणे शक्य आहे का? या जगातून संघर्ष पूर्ण नाहीसा होणे शक्य आहे का? या जगातून विविधता नाहीशी होणे शक्य आहे का? मी आणि समूह यातील एकच या जगात राहील अशी स्थिती येऊ शकते का? स्वप्न आणि वास्तवाचा संबंध काय? सगळे गोडगोड, छानछान होऊ शकत नसेल तर कशासाठी धडपड करायची? अशा असंख्य प्रश्नांची मालिका उभी राहते, जिची उत्तरे बाह्य इंद्रिय अनुभवांनी मिळू शकत नाहीत. ती तशी मिळवण्याची साहित्यिकांची, कलाकारांची धडपड निष्फळ ठरते ती तेवढ्यासाठीच. केवळ बाह्य विश्वाच्या कसोट्या लावणे एकांगीच ठरणार. त्यातूनच चिंतनशीलतेचा अभाव निर्माण होतो आणि स्वप्नाळूपणाचा बुजबुजाट. साहित्यिकांचे राजीनामे आणि अन्य अशाच बाबी याच एकांगीपणाचा परिणाम आहेत. खरी समस्या हे राजीनामे वगैरे नसून, बाह्य आणि आंतरिक विश्वाचे संतुलन साधून या विश्व व्यापाराकडे पाहण्याची निकोप, सार्थ दृष्टी कशी विकसित करता येईल हा आहे. राजीनामे वगैरेसारख्या उठवळ समस्या त्याने आपोआपच नियंत्रित होतील. एकांगी असण्यापेक्षा एकात्म असणे, संतुलित असणे नेहमीच चांगले असते.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २५ ऑक्टोबर २०१५

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

नऊ दशकांची अमृतवर्षा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता अपरिचित राहिलेला नाही. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून संघ ओळखला जातो. तरीही संघाची ओळख पटलेली आहे का, असा प्रश्न विचारला तर तो वावगा ठरणार नाही. संघाचे समर्थक, संघाचे विरोधक, संघाबद्दल आस्था बाळगणारे, संघाला पाण्यात पाहणारे, एवढेच नव्हे तर संघाचे स्वयंसेवकही आपापल्या पद्धतीने संघाची ओळख पटवून देतात, संघाचे मूल्यमापन करतात किंवा संघाबद्दलचे आपले मत तयार करतात. त्यात काहीही तथ्य नसते असे नाही. परंतु ते परिपूर्ण असते असेही नाही. संघ स्वत:देखील स्वत:ची ओळख कधी कधी देतो. मात्र तीही पूर्ण ओळख असतेच असे नाही. विशिष्ट संदर्भ घेउन आलेले ते एक दर्शन असते. परिपूर्ण दर्शन मात्र नसते.

संघाचे भाष्यकार आणि थोर विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी संघाचे स्वरुप समजावून देताना भाषाशास्त्रातील अनन्वय अलंकाराचे उदहारण देत असत. अनन्वय अलंकार कसा असतो हे सांगण्यासाठी संस्कृत भाषेत एक श्लोक आहे.

`गगनं गगनाकारं, सागर: सागरोपमा:
रामरावणयोर्युद्धम, रामरावणयोरिव'
म्हणजे आकाश आकाशासारखंच आहे, सागर सागरासारखाच आहे आणि राम-रावण युद्ध हे राम- रावण युद्धासारखेच आहे. त्याप्रमाणेच संघही संघासारखाच आहे. तो नीट समजून घेण्यासाठी त्याचे विविधांगी, गुंतागुंतीचे स्वरुप समजून घेणे आवश्यक आहे. अर्थात संघाला अशा विश्लेषणाची गरज नाही. इ.स. १९२५ पासून आजतागायत संघ त्याच्या पद्धतीने चालत राहिला आहे आणि वाढत राहिला आहे. मात्र संघाला याची गरज नसली तरीही संघाला जे साध्य करायचे आहे त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून अशा विश्लेषणाची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यापुढे येते ती संघाची शाखा. एका मैदानावर भगवा ध्वज रोवलेला. त्यासमोर काही लोक एकत्र झालेले आणि त्यांचे काही कार्यक्रम. हे कार्यक्रम खेळ, नियुद्ध, संचलन, दंड, लेझीम, सूर्यनमस्कार, योगासने, व्यायामयोग, घोष, गीतगायन, कथाकथन, चर्चा, भाषण, प्रार्थना असे अनेक प्रकारचे असू शकतात. हीच सामान्यपणे समाजाला असलेली संघाची ओळख आहे. संघ काय करतो. तर शाखा चालवतो. या शाखांमध्ये येणाऱ्या लहानमोठ्या साऱ्यांना स्वयंसेवक म्हणतात. या स्वयंसेवकांचे वर्षभरात काही कार्यक्रम होतात. त्यावेळी ते विशिष्ट गणवेश घालतात. या कार्यक्रमांमध्ये भाषणे होतात आणि त्यातून संघाचा विचार सांगितला जातो. याहून अधिक फारसे कोणाला ठाऊक नसते. अगदी संघाच्या स्वयंसेवकाला किंवा कार्यकर्त्यालाही! संघाचे काम करायला त्याची फारशी गरजही नसते.

संघाची कार्यपद्धती, त्याची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती व रचना यांचा विकास, संघाचा इतिहास याविषयी अत्यल्प माहिती असते. संघाचे म्हणून काही साहित्य आहे, पुस्तके आहेत याची अनेकांना कल्पनाही नसते आणि तरीही एखादी व्यक्ती संघाचा कार्यकर्ता असते. एखादा महाविद्यालयीन विद्यार्थी, क्वचित शालेय विद्यार्थी सायं शाखेचा मुख्य शिक्षक वा कार्यवाह असतो. प्रभात शाखेचा एखादा स्वयंसेवक वा कार्यकर्ता निवृत्तीनंतरच संघाच्या शाखेत आलेला असतो. वयाच्या साठीत त्याने पहिल्यांदा संघाचा गणवेश घातलेला असतो. संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण कार्यकर्त्याने घेतलेलेच असते असे नाही. एक दिवस कधी तरी संघाच्या शाखेत आलेली व्यक्तीही आयुष्यभर संघाचा स्वयंसेवक असते. काही स्वयंसेवक काही दिवस, महिने वा वर्ष संघाचे काम करत असतात. तर काही आयुष्यभर संघाचे काम करतात. नवनवीन शाखा सुरू होत असतात. सुरू असलेल्या काही शाखा बंदही पडतात आणि पुन्हा सुरुही होतात. शाखा सुरू वा बंद करण्याचे आदेश निघत नाहीत. माणसांची उपलब्धता हाच एकमेव मुद्दा. माणूस उपलब्ध असेल तर शाखा चालते नाही तर बंद. शाखा चालवणाऱ्या या कार्यकर्त्यांना काहीही मिळत नाही. पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान एवढेच काय एखादे प्रमाणपत्रही नाही. प्रमाणपत्र मिळाले तरी त्याचा उपयोग तरी काय होणार, हा एक वेगळाच प्रश्न आहे. असे प्रश्न ज्याच्या मनात येतात तो आपोआपच कामापासून दूर होतो. कारण काही देण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही ही संघाची स्पष्ट भूमिका आहे. असे दूर झालेले लोकही संघाचे स्वयंसेवक मात्र राहतातच. त्यांच्या स्वयंसेवकत्वाला काहीही बाधा येत नाही. जसे काम करण्याच्या मोबदल्यात काहीही मिळत नाही. तसेच काम करण्यासाठी वा स्वयंसेवक होण्यासाठीही काहीही द्यावे लागत नाही. त्यासाठी नोंदणी, नोंदणी शुल्क वगैरे नसते. गणवेश, शिबिर, वर्ग, सहल यासाठीचा खर्च मात्र स्वत:च करावा लागतो. संघाचे काम चालवण्यासाठी स्वयंसेवक स्वत:च पैसा गोळा करतात. वर्षातून एकदा त्यासाठी गुरुदक्षिणेचा कार्यक्रम होतो. ज्याला जितके पैसे द्यायचे असतील तितके तो भगव्या ध्वजापुढे समर्पण करतो. कोण किती देतो याची ना चर्चा होत ना त्यासाठी काही बंधन आहे. गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे हेदेखील बंधन नाही. गुरुदक्षिणा न देता वा त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता सुद्धा एखादी व्यक्ती स्वयंसेवक राहू शकते.

गेली ९० वर्षे हा क्रम सुरू आहे. खरे तर आपण सारे हा एक चमत्कार घडताना पाहतो आहोत. काहीही आकर्षकपणा नाही, काहीही फायदा नाही, उलट तोटाच! आणि तरीही एखादे कार्य सतत चालूच राहते. विस्तारत राहते. समाजाला प्रभावित करीत राहते. याला आश्चर्य नाही तर काय म्हणणार? लोक संघाचे काम का करतात? संघ म्हणतो शाखा चालवा आणि लोक त्या चालवतात. हे कसे काय घडून येते? खरं तर यावर विश्वास बसणेही कठीण. पण जे प्रत्यक्ष दिसते ते नाकारणार तरी कसे? माणसे येतात- जातात, पिढ्या बदलतात, संकटे येतात, संघर्ष होतात, मतभेद होतात, तरीही सातत्य कायम राहते, ऊर्जा कायम राहते, प्रभाव कायम राहतो. हे कसे आणि का होते हा एक गूढ प्रश्नच आहे. याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाही. अगदी संघाकडेही नाही. खरे तर संघ याचा विचारही करीत नाही. सतत फक्त काम करीत राहायचे एवढेच संघाला माहीत आहे. असा सगळा `जर-तर'चा मामला असूनही, trial and error चे गणित असूनही, देशस्थ विस्कळीतपणाचा खाक्या असूनही संघ चालतो आणि वाढतो आहे. वयाची ९० वर्षे पूर्ण केल्यावरही गतार्थ न होता सार्थ ठरतो आहे. संदर्भहीन न होता सयुक्तिक ठरतो आहे. या पृथ्वीवर एक आश्चर्य घडताना आपण पाहतो आहोत.

समाजाला हलवून टाकणाऱ्या अनेक व्यक्ती, चळवळी, उपक्रम, विचार या जगाने पाहिले आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी प्रभाव निर्माण करीत खळबळ उडवून दिली आहे. मात्र थोड्याच अवधीत त्या इतिहास झाल्या आहेत. खळबळ निर्माण करणारी व्यक्ती, कार्यक्रम वा विचार संघाजवळ कधीच नव्हते. तरीही समाजाला हलवून टाकणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, विचार यांच्यापेक्षा संघ उजवा ठरतो. ९० वर्षे हा कालावधी खूप मोठा नाही, पण तो खूप लहानही खचितच नाही. सातत्य, विचारांची आणि कार्यपद्धतीची अखंडता, काळाबरोबर पावले टाकण्याची वृत्ती आणि क्षमता या साऱ्याच बाबतीत संघाचे आगळेपण ठळकपणे नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे हे सारे एवढ्या शांतपणे की काही घडते आहे हे कुणाला जाणवू सुद्धा नये. ढोल पिटणे, जाहिरातबाजी, आक्रस्ताळेपणा यापैकी काहीही नाही. बरे संत प्रवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीने हे केले तर समजून घेता येईल. परंतु संघाने मात्र सर्व प्रकारच्या गुणदोषांनी युक्त अशा लाखो सामान्य माणसांकडून ही मौन साधना करवून घेतली आहे. पिढी दर पिढी हजारो लोकांना टोकाच्या निरपेक्षपणे कार्याला प्रवृत्त करून कार्यरत ठेवण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे. पद, प्रतिष्ठा, पैसा, मानसन्मान तर नाहीच पण ईश्वरप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती वगैरे अभौतिक किंवा मानसिक समाधान, आत्मिक समाधान वगैरे भावनिक बाबीही नाहीत. आणि तरीही संघाची यशस्वी वाटचाल यथार्थपणे सुरूच आहे.

संघाचा हा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. संघ स्थापनेच्या वेळी संघाचे नावही ठरलेले नव्हते. समाजाला अपरिचित अशी ८-१० माणसे केवळ एकत्र झाली होती आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार नावाच्या एका राजकीय- सामाजिक कार्यकर्त्यावर असलेल्या प्रेमाखातर ती एकत्र झाली होती. त्यात विचार, ध्येयनिष्ठा वगैरे फारसे नव्हते आणि ९० वर्षांच्या वाटचालीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाव धारण करणारे काम दररोज देशभरात ५० हजार स्थानी चालते. यात ५० लाख स्वयंसेवक रोज एकत्र येतात आणि या मातृभूमीविषयीच्या आपल्या कर्तव्याचे स्मरण करून तिच्या उज्वल जीवनाविषयी प्रार्थना करतात. या व्यतिरिक्त हजारो स्थानांवर आठवड्यातून एकदा वा महिन्यातून एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून लाखो लोक एकत्र येउन या समाजाचा, देशाचा विचार करतात. त्यातील अनेक जण प्रत्यक्ष काही ना काही कामही करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे बिरुद न लावणाऱ्या परंतु संघ हीच प्रेरणा असलेल्या, तसेच वैचारिक आणि भावात्मक दृष्टीने संघाशी जोडल्या गेलेल्या आणि व्यवहारात संघाशी समन्वय राखून काम करणाऱ्या तीन-चार डझन अखिल भारतीय संस्था आहेत.

या संस्था समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. संघाप्रमाणेच त्यांचेही स्वरुप अखिल भारतीय असेच आहे. राष्ट्रीय, अखिल भारतीय, आदी विशेषणे लावणाऱ्या अन् एखाद्या वस्ती वा गावापुरत्या मर्यादित असणाऱ्या संस्थांसारखे हे स्वरुप नाही. तर या साऱ्या संस्था खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आहेत. संघाचे काम तर तालुका स्तरापर्यंत पोहोचले आहेच, पण अन्य संस्थांपैकी अनेक संस्थांचा पसाराही तालुका स्तरापर्यंत पसरला आहे, तर बाकीच्या संस्थांचे काम जिल्हा स्तरापर्यंत तरी पोहोचलेले आहेच. भौगोलिक दृष्टीने विचार केला तर संपूर्ण देश संघाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कामाने व्यापला आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांचा विचार केला तर बहुतेक साऱ्या क्षेत्रात संघाचे काम पोहोचले आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक स्थितीतील लोक या कामाशी जोडले गेले आहेत. सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक संघाशी संलग्नित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये केवळ पुरुष येत असले तरीही राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून महिलाही या कामात सक्रिय आहेत. अन्य संस्थांच्या कामातही महिलांचा सहभाग लक्षणीय असाच आहे. समाजाच्या प्रत्यक्ष सेवेची कामे दीड लाखाहून अधिक आहेत. लाखो स्त्री-पुरुष स्वत:साठी काहीही न मिळवता या सेवाकार्यांच्या माध्यमातून समाज सुशिक्षित, सुदृढ, सुसंस्कृत, आरोग्यसंपन्न व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नित्य आणि नैमित्तिक असे प्रत्यक्ष संघाचे काम, अन्य संस्था संघटनांचे काम, सेवाकार्य यासाठी माणसे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो स्त्री-पुरुष हुडकून काढणे हेच खरे तर एक अशक्य कोटीतील काम आहे. परंतु संघाने अशी माणसे नुसती हुडकून काढली नाहीत तर त्यांना कामाला लावले. कामांचे आणि माणसांचे नियोजन केले. व्यवस्था निर्माण केल्या आणि त्या सातत्याने पुढे सुरू ठेवल्या. लोक जुने होत असतात, निवृत्त होत असतात. हे अतिशय नैसर्गिक आहे. अशा लोकांच्या जागी नवीन माणसांना क्रियाशील करावे लागते. संघाने तेही यशस्वीपणे केले आहे. ही कामे करणारी माणसे शिकली सवरलेली आहेत. उच्चविद्या विभूषित आहेत. स्वत: कर्तृत्ववान आहेत. विचारी आहेत. अशा माणसांना थातुरमातुर वैचारिक वा भावनिक आवाहन बांधून ठेवू शकत नाही, सक्रिय ठेवू शकत नाही. एखादे साधे गणेशोत्सव मंडळ चालवणे आणि टिकवणे किती कठीण असते याचा अनुभव आपण सतत घेत असतो.

संघाने मात्र हे असाध्य, साध्य करून दाखविले आहे. इ. स. २००६ साली संघाचे दुसरे सरसंघचालक श्री. गुरूजी यांची जन्मशताब्दी होती. त्यासाठी देशभरात जे कार्यक्रम झाले त्यात ५ लाख गावातील लोक सहभागी झाले होते. देशात सुमारे ७ लाख गावे आहेत. म्हणजे ७० टक्केहून अधिक गावातील लोक यात सहभागी झाले होते. संघकार्याचा हा विस्तार केवळ देशातच झालेला आहे असे नाही, तर जगातील सुमारे ४० देशांमध्ये संघाचे काम चालते आणि सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी असे स्वरुप आता त्यास प्राप्त झाले आहे. ९० वर्षांचा हा प्रवास सरळ होता असेही नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करीत हा प्रवास झालेला आहे. हा संघर्ष बाह्य होता, आंतरिक होता, परक्यांशी होता, स्वकीयांशी होता, राजकीय होता, सामाजिक होता, आर्थिक होता, भावनिक होता, शारीरिक होता, बौद्धिक होता. अनेकदा तर संघाचे अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न झालेला जगाने पाहिला आहे. ज्या समाजासाठी संघ अव्याहत काम करतो आहे त्या समाजाने प्रदीर्घ काळ त्याला मनापासून स्वीकारलेही नव्हते. संपूर्ण विपरीत परिस्थितीचा सतत सामना करीत संघ इथवर पोहोचला आहे.

हे करताना त्यातील अखंडत्वही कायम आहे. एकच संघधारा वाहते आहे. त्याच्या शतधारा झाल्या नाहीत हीदेखील एक लक्षणीय बाब आहे. छोटी मोठी कामेदेखील एकसंध फार कमी काळ टिकतात. कधी नेतृत्वावरून वाद तर कधी तात्विक वाद!! कधी कार्यपद्धतीवरून मतभेद. परिणाम मात्र एकच. संघटनेत फाटाफूट. संघकार्याचे वैशिष्ट्य हे की, संघावर नाराज होउन बाहेर पडलेल्यांनी आपली वेगळी कामे सुरू केली पण पर्यायी वा समांतर संघ काढला नाही. ते शक्य झाले असते वा नाही हा मुद्दा वेगळा, पण कोणी पर्याय निर्माण करण्याचा गांभीर्याने विचारही केला नाही. याशिवाय जी कामे मूळ स्वरूपात टिकतात ती एका विशिष्ट मर्यादेतच काम करीत राहतात. सतत वर्धिष्णु राहूनही अखंडत्व कायम राखणे हेही एक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. संघाची स्थापना १९२५ सालाची. महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय, सामाजिक क्षितिजावर उदय झाला १९२० साली. कम्युनिस्ट पार्टीची स्थापनाही १९२० सालाचीच. म्हणजे सर्वोदय आणि कम्युनिझम यांच्यापेक्षा संघ ५ वर्षांनी लहान. कम्युनिस्ट पार्टीने सर्व प्रकारचे मार्ग आपल्या कार्यवाढीसाठी अवलंबिले. हिंसाचारही नाकारला नाही. अनेक वर्षे सत्ता उपभोगली. मोठा काळ सत्तेची सहानुभूती कम्युनिझमला मिळाली. गांधींच्या कार्याला तर देशात आणि जगातही अतिशय अनुकूलता होती व आहे. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही कामांची तुलना आज केली तर संघाचे यश आणखीनच ठळकपणे जाणवते.

केवळ विचार केला तरीही अंगावर शहारा यावा असा हा प्रवास आहे. जगाच्या इतिहासात क्वचितच एखाद्या संघटनेचा प्रवास एवढा रोमांचक आणि अद्भुत राहिला असावा. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल प्राशन करून भगवान शंकरांनी तांडव केले होते. संघाने मात्र शांतपणे हलाहल पचवून टाकले आहे आणि समाजावर मात्र शांती आणि सौहार्दाचा अमृतवर्षावच केलेला आहे. असे सारे असतानाही सर्वाधिक गैरसमज असणारी संघटनाही संघच आहे. मोठ्या प्रमाणावर हेटाळणी सहन करणारी संघटनाही संघच आहे. आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी झेलणारीही संघटना संघच आहे. संघाच्या वाट्याला एवढे शिव्याशाप, एवढे तर्ककुतर्क का आले वा येतात. संघाबद्दल एवढा गोंधळ का आहे? तरीही संघ का वाढला? तरीही संघ का काम करतो आहे? संघाला नेमके करायचे तरी काय आहे? कशासाठी एवढा सारा खटाटोप सुरू आहे? काय साध्य करायचे आहे? काय मिळवायचे आहे? संघाला स्वत:ची प्रतिमा आणि वास्तव याविषयी काय वाटते? आजवरचा प्रवास आणि विस्तार याविषयी संघाला काय वाटते?

या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, संघाबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि संघाविषयी सम्यक आकलन करून सारासार मत बनवण्यासाठी संघाची नीट ओळख करून घेणे गरजेचे आहे. साधारणपणे ६ वेगवेगळ्या दृष्टींनी संघ समजून घ्यावा लागेल.
१) संघाचे संघटनात्मक स्वरुप
२) संघ विचारधारा
३) संघ भावधारा
४) संघ- समाज परिवर्तनाचे माध्यम
५) संघाची ऐतिहासिक भूमिका
६) वैश्विक सभ्यतेच्या प्रवासातील संघाचे योगदान

संघाने अशी मांडणी आजवर केलेली नाही. हे हिन्दू राष्ट्र आहे, त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि या राष्ट्राने या जगातील आपला भार समर्थपणे वहन करावा एवढेच संघाने म्हटले आहे. या सहा कोनातून केलेले विश्लेषण परिपूर्ण असेल असेही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरीकडे वाटचाल करीत असताना त्याचा असा आढावा घेणे आवश्यक मात्र आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २१ ऑक्टोबर २०१५

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

महाकवीच्या गावाची सफर

प्रसिद्ध हिंदी छायावादी कवी सूर्यकांत त्रिपाठी `निराला' यांच्या पुण्यतिथीनिमित्त दीप्तीने काल त्यांची एक कविता टाकली आणि १०-१२ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. संस्कार भारतीच्या साहित्य विधेची एक अखिल भारतीय बैठक उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथे होती. तीन दिवसांची बैठक आटोपल्यावर परतीच्या आरक्षणाप्रमाणे लोक परतत होते. एक पूर्ण दिवस माझ्याकडे रिकामा होता. बाकीही काही मंडळी होती. दिवस कसा घालवायचा यावर चर्चा सुरु झाली. संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. अध्यक्ष पाटण्याचे डॉ. शैलेन्द्रनाथ श्रीवास्तव यांनी सुचवले- कवी `निराला' यांचे गाव इथून जवळ आहे. तिथे जाऊन येता येईल का पाहा. कार्यकर्त्यांनी विचारपूस केली तर ते शक्य होईल असे वाटले. मग काय? लगबग सुरु झाली. हिंदी साहित्य विश्वात ख्यातीप्राप्त डॉ. श्रीवास्तव यांच्यासह दुसऱ्या श्रेष्ठ साहित्यिकाच्या गावाची सफर म्हणजे आनंदच. डॉ. श्रीवास्तव, संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. संघटन मंत्री योगेन्द्रजी, अस्मादिक, अन्य दोन-तीन लोक असे `निराला' यांच्या `बैसवाडा' गावी निघालो. दीप्तीही होती सोबत.

दोनेक तासात उन्नाव वरून `बैसवाडा'ला पोहोचलो. प्रथम तेथील शाळेत गेलो. त्या शाळेला `निराला' यांचेच नाव आहे. शाळेचे मुख्याध्यापक, अन्य शिक्षक, कर्मचारी सगळेच आनंदून गेले होते. कवीचे गाव पाहायला आजकाल कोण जातात? पण ही देशभर फिरणारी बडी मंडळी (म्हणजे डॉ. श्रीवास्तव, योगेन्द्रजी) आपल्या छोट्याशा गावात आली याचं विलक्षण कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शिक्षक मंडळी आम्हाला शाळेच्या गच्चीवर घेऊन गेली. तिथे `निराला' यांची एक कविता कोरलेली होती. हे कवीवर आणि कवितेवर प्रेम करणारे लोक आहेत हे वेगळे सांगण्याची गरज उरली नव्हती. डॉ. श्रीवास्तव प्रत्येक गोष्ट टिपून घेत होते. शांतपणे ऐकत होते. पाहत होते.

शाळेतून आमची गाडी गावातल्या `निराला' यांच्या घराकडे निघाली. अन्य साधारण खेड्यांप्रमाणेच बैसवाडाही होते. छोट्या बोळात गाडी अडली. ना मागे, ना पुढे. डॉ. श्रीवास्तव अन योगेन्द्रजी उतरले अन चालू लागले. आम्हाला त्यांचे अनुकरण करणे भागच होते. पाचेक मिनिटात आमचा ताफा विश्वप्रसिद्ध हिंदी कवी `निराला' यांच्या झोपडीत पोहोचला. तेथे कोणीही राहत नव्हते. ओसाड. आजूबाजूचे लोक जमले. कोणी काही, कोणी काही सांगू लागले. कोणी सुसंगत, कोणी असंगत. त्यात एक विचित्र वाटावा असा माणूस होता. गावात बहुतेक अशी माणसे असतातच. पूर्ण खेडवळ, जरा स्क्रू ढिला आहे की काय असे वाटावे असा, गबाळ्या. जे बोलेल ते समजून घेण्यासाठी ऐकणाऱ्याने श्रम करायला हवेत अशी अपेक्षा करणारा. १०-१५ मिनिटे आम्ही तिथे घालवली. डॉ. श्रीवास्तव खाली वाकले त्यांनी त्या ओसाड झोपडीला नमस्कार केला. तिथली चिमूटभर माती कपाळाला लावली. अन आम्ही परत निघालो. दाराबाहेर पाऊल टाकले तर तो विचित्र माणूस डॉ. श्रीवास्तव यांच्याजवळ आला अन काही सांगू लागला. एका कार्यकर्त्याने त्याला हाडहुड करून बाजूला केले.

आम्ही परत शाळेत आलो. तिथे गाडी उभी होती. गाडीत बसून उन्नावचा रस्ता धरला. जसे आम्ही गाव सोडले, तसे तोवर शांत असलेले डॉ. श्रीवास्तव हाडहुड करणाऱ्या त्या कार्यकर्त्याकडे वळले. त्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले- `त्या माणसाला तू असे का घालवून दिले. अशाच माणसांकडे अनेकदा पुष्कळ काही असते. अशी माणसे विचित्र असंबद्ध बोलत असतील. कंटाळवाणे वाटेल आपल्याला पण ते नीट शांतपणे ऐकले, संगती लावण्याचा प्रयत्न केला तर खूप काही पदरात पडते. अन आपल्या हाती काही लागले नाही, तरीही काय होते? त्या माणसाने `निराला' यांच्यासोबत काळ घालवला असेल. त्यांना कधी काही हवे नको पाहिले असेल. त्यांच्यासोबत रागाचे, हास्यविनोदाचे क्षण घालवले असतील. ते सांगण्याची त्याला जी ऊर्मी असते तिचेही महत्व आहेच ना? अन काहीच नसेल तरीही आपल्याला ज्या महाकवीबद्दल विलक्षण आदर आहे, त्याच्यासह राहिलेला एक माणूस म्हणून तरी त्याच्याशी नीट वागायला हवे की नको?' तो कार्यकर्ता खजील होऊन बसला होता. पण गाडीतील बाकीच्यांनाही, म्हणूनच मलाही- जीवनाची किती विलक्षण जाण प्राप्त झाली होती.

रस्त्यात एक छोटे गाव लागले. तेथील टपरीवर चहाचा आस्वाद घेऊन उन्नावचा प्रवास सुरु झाला. पुढच्या तासभर डॉ. श्रीवास्तव महाकवी `निराला' आणि त्यांचे `राम कि शक्तीपूजा' यावर बोलत होते. ज्यांना डॉ. श्रीवास्तव माहिती आहेत, त्यांना ज्यांनी ऐकले आहे असे समजू शकतील, आम्हाला त्यावेळी मिळालेली मेजवानी. स्वत: उत्कृष्ट ख्यातीप्राप्त साहित्यिक, हिंदीचे प्राध्यापक, भाषेवर प्रभुत्व, भाषेचा गोडवा, विद्वत्ता, वक्तृत्व अन काय नव्हते त्यांच्याकडे. व्यक्तित्वही प्रभावी. व्यक्तित्व अन वक्तृत्व असे की, अगदी अटलजी मंचावर असतानाही श्रोत्यांच्या मनात रेंगाळणार ते डॉ. श्रीवास्तवच. उन्नाव कधी आले ते कळलेच नाही.

काही योग नियतीने लिहून ठेवलेलेच असतात. असाच त्या दिवशीचा योग होता. `निराला' यांच्या गावची निराळीच सफर कायमचे आनंदनिधान झाली आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

वैचारिक ओकाऱ्या

एका मित्राशी जरा वादावादी झाली. मग त्याने एका महान संपादकाने लिहिलेल्या लेखाची लिंक पाठवली. मी असल्या लिंक वगैरे वाचत नाही असा त्याला परतीचा संदेश दिला. तो लेख मी आधीच वाचलेला होता. त्यात त्या संपादकाने मांडणी केली आहे की, देशभरात सगळीकडे भाजपला सत्ता मिळवून देण्याचे रा.स्व. संघाने ठरवले आहे. त्यानंतर त्यांचा पूर्ण अजेंडा राबवला जाईल. मी लिंक वाचत नाही असे म्हटल्याने मित्राची पंचाईत झाली. पण त्याला अपेक्षित हेच होते की- बोला यावर. संघ अन तुम्हीही म्हणता की, संघाला राजकारण करायचे नाही. आता बोला. आहे ना गंमत? आमच्या भागात एक म्हण आहे- `बाजारात तुरी, अन भट भटणीला मारी.' म्हणजे संघाची किंवा माझी भूमिका काय आहे हे गेलं उडत. त्याबद्दल कोणी विद्वान काही म्हणतात त्यावर बोला...!! यालाच म्हणतात- जाणूनबुजून असेल तर तमाशा, अजाणता असेल तर बावळटपणा.

तथाकथित स्वातंत्र्य, समता, लोकशाही, जागतिकीकरण, ज्ञानयुग, तंत्रज्ञान युग वगैरेंनी बाकी काय चांगलं- वाईट  केलं ते थोडं बाजूला ठेवू, पण या गोष्टींनी सगळ्याच गोष्टींचं बेसुमार सुमारीकरण केलं हे मात्र निर्विवाद. कोणीही उठावे अन काहीही करावे, कोणीही उठावे अन काहीही लिहावे, कोणीही उठावे अन काहीही बोलावे; कशाला काही धरबंद नाही. बरं जे करायचं, लिहायचं, बोलायचं ते तरी सुसंगत, विचारपूर्वक, `अभ्यासोनि प्रकटावे' असे असते का? नाव नको. आधी जसं संघाबद्दल उदाहरण दिलं तशी उदाहरणं कुठेही पाहायला मिळतात. धर्म, देव, धार्मिकता, शास्त्र, रूढी, लोकाचार, समजुती, परंपरा, तत्वज्ञान यांच्याही बाबतीत. म्हणजे मोठ्याने कर्णकर्कश्श भोंगे कोणी वाजवतात म्हणून देव धर्म वाईट. का बुवा? ते नाही विचारायचं. एखाद्या कुठल्या देवदेवतेच्या आख्यायिका वगैरे थेट उपनिषदांच्या एखाद्या सिद्धांताशी झुंजवायच्या. का? आम्हाला वाटते म्हणून.

राजकारण, समाजकारण, चळवळी यातही तेच. आज हिंदुत्वाची शक्ती वाढली आहे. त्यामुळे अनेक हौशे, नवशे, गवशे स्वत:ला हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते म्हणवून घेतात. आपापल्या ठिकाणी ते त्यांना वाटेल ते करतात. अन सगळे तोंडसुख येते हिंदुत्वाच्या वाट्याला. यात केवळ समाजोपयोगी वा समाजविघातक एवढाच भेद असतो असे नाही. काही प्रामाणिक मतभेद सुद्धा असू शकतात. पण लगेच कावकाव सुरु होते- ते असे म्हणतात, ते तसे म्हणतात. अगदी स्वातंत्र्य चळवळीत किंवा ज्यांना आपण आदर्श म्हणतो अशा नेत्यांमध्येही मतभेद राहत होतेच ना? कॉंग्रेसमध्येही हिंदुत्ववादी होतेच. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातच नव्हे तर गांधीजी व रवींद्रनाथ टागोर यांच्यातही मोठे मतभेद होते. डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या रिपब्लिकन विचारांचे किती गट आहेत? किंवा कम्युनिस्ट विचारधारा किती धारांनी वाहते? पण त्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत. त्या चळवळी वा विचारधारा मानणाऱ्या व्यक्तींची कृत्ये त्यांच्या तत्वज्ञानाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी वापरली जात नाहीत. हिंदुत्व मात्र या साऱ्याला अपवाद.

सध्या साहित्यिक राजीनामे प्रकरण सुरु आहे. साहित्य आणि समाज यांचा खरंच कसा आणि किती संबंध असतो, यावर किती जण सखोल विचार करतात. साहित्याने जग बदलता आलं असतं तर आजवर काय कमी साहित्य निर्माण झालं आहे? असा प्रश्न समोर आला की दुसरे कुणी उठतात, अन साहित्य वगैरे झूठ आहे असा सूर आळवतात. साहित्याची अतिरेकी भलावण आणि साहित्य झूठ अशा भूमिका घेणारे दोघेही सारखेच उथळ आणि पोकळ. तेच सरकार आणि समाज यांच्या बाबतीत. एक तर सरकार सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार किंवा सरकार ही निरर्थक गोष्ट आहे. बस, दोनच भूमिका अन त्यांचे अभिनिवेश. घरात तरी आई वडिलांचे मुलांवर पूर्ण नियंत्रण असते का? म्हणजे काय त्यांचे काहीच नियंत्रण नसते?

मुळातच या जगातील बहुतेक सगळ्या गोष्टी multifaceted, multidimensional असतात. त्यातील जेवढे आपल्या शरीर-मन-बुद्धीच्या आवाक्यात आले ते लगेच त्रिकालाबाधित सिद्धांताच्या रुपात बाहेर टाकण्याची सवड आणि सोय सध्याच्या जीवन रचनेने आणि तंत्रज्ञानाने करून दिलेली आहेच. वरून या multifaceted, multidimensional जगातील असंख्य गोष्टी प्रत्येकाच्या मन-बुद्धीत इच्छेने वा अनिच्छेने कोंबत राहणारी प्रक्रिया आणि व्यवस्थाही आहेच. मग रोज अजीर्ण होईपर्यंत, प्रकृतीला झेपेल न झेपेल याकडे लक्ष न देता वेगवेगळी माहिती, मते इत्यादी कोंबत राहायचे. ते पचणे शक्यच नसते. कारण त्यासाठी मूळ पचनशक्ती आणि अवकाश लागतो. त्या दोन्हीचा अभाव. त्यामुळे जिकडे तिकडे बेसुमार वैचारिक, बौद्धिक, मानसिक, संकल्पनात्मक ओकाऱ्या. याच ओकाऱ्या कधी फेसबुकवरील चर्चा, कधी व्होट्स अॅपवरील पोस्ट, दूरचित्रवाणीवरील बडबडी, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, घराघरातील चर्चा-वादविवाद, चहाटपरी वा पानठेल्यावरील गप्पा यातून सांडत राहतात. याची कारणे काय वगैरे चर्चा करता येतील. पण बेसुमार सुमारीकरण याच्या मुळाशी आहे हे खरे.

पुढील काळ कसा राहील? कुणास ठाऊक?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १४ ऑक्टोबर २०१५

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

कांगावखोर बौद्धिक दहशतवादाची नवीन खेळी

साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणाऱ्यांची संख्या डझनाचा आकडा ओलांडून पुढे गेली. तिघांनी साहित्य अकादमीचे राजीनामेही दिले. स्वाभाविकच चर्चाही सुरु झाल्या. या चर्चांमध्ये दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांची नावे स्वाभाविकच आलीत. अन्य दंगलींचाही उल्लेख झाला. एका मराठी वाहिनीवर संचालन करणाऱ्यांच्या उल्लेखातून २००२ च्या गुजरात दंगलींचा उल्लेख सुटला. तेव्हा अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या एका व्यक्तीने ते लक्षात आणून दिले, एवढेच नव्हे तर आपण घाबरला आहात का? असा खोचक प्रश्नही केला. यातील हेतू कोणाच्याही सहज लक्षात येऊ शकतो. त्यावर संचालन करणाऱ्या व्यक्तीने आपण घाबरत नसल्याचे सांगून, २००२ चा उल्लेख आवर्जून अन जोरकसपणे केला. मला असल्या शहाण्यांची लाज वाटली अन मी टीव्ही बंद केला. आजवर या देशातील स्वनामधन्य विद्वान जे करत आले आहेत तेच अजूनही सुरु आहे. या देशात काय फक्त दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचीच हत्या झाली? पंडित दीनदयाळ उपाध्याय अन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी काय या देशातील नव्हते? नक्षलवादी नाव धारण करून डाव्या विचारसरणीचे गुंड या देशात रोज निष्पाप लोकांच्या हत्या करत नाहीत? पंजाबच्या मोगा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर हल्ला करून दोन डझन स्वयंसेवकांना मारून टाकण्यात आले नव्हते? ईशान्य भारतात रा. स्व. संघ आणि अन्य समविचारी संघटनांच्या किती कार्यकर्त्यांच्या निर्मम हत्या झाल्या आहेत? त्या काय देशाबाहेरच्या आहेत? केरळमध्ये कम्युनिस्टांनी किती हत्या केल्या यावर तर खुद्द त्यांचेच नेते आता बोलायला लागले आहेत? अरे कांगावखोरांनो अन त्यांच्या समर्थकांनो, द्या- हवे तेवढे राजीनामे द्या; पण मी उल्लेख केलेल्या बाबींचा किमान उल्लेख तरी करा. तुम्ही तर गेली कित्येक दशके या लोकांना अन विचारांना पाल झटकावी तसे झटकत आला आहात. त्यांना अस्पृश्यांसारखी वागणूक देत आला आहात. त्यांचे उल्लेखही टाळत आला आहात. अन तरीही स्वत:च्या सहिष्णुतेची टिमकी वाजवताना लाज वाटत नाही?

अन कोणत्या तोंडाने करता आहात सहिष्णुतेच्या गप्पा? तो अधिकार तरी आहे का तुम्हाला? रा. स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक स्व. सुदर्शनजी यांनी सरसंघचालक झाल्यावर पहिले काम केले होते, नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्याचे. त्यावेळी तुमच्याच पंथातल्या एका महान विचारवंताने अन त्याच्या साथीदारांनी जाऊन चक्क डॉ. आंबेडकरांचा तो पुतळा धुतला होता. तेव्हा कुठे गेली होती तुमची सहिष्णुतेची बांधिलकी? या देशातील सर्वोच्च न्यायालयाने रा. स्व. संघाला गांधी हत्येतून पूर्णत: मुक्त केले तरीही तुम्ही उठता बसता त्याला दूषणे देता, तेव्हा तुम्ही फारच सहिष्णू असता नाही का? शंकराचार्यांना ऐन दिवाळीच्या दिवशी बेड्या घातल्या होत्या तेव्हा तुमची सहिष्णुता झोपली होती का? अन ज्या नरेंद्र मोदींच्या नावापुढे पंतप्रधान हे विशेषण रोजच्या तुमच्या पोटदुखीसाठी कारणीभूत आहे, त्या मोदींना सतत एक तप तुम्ही ज्या पद्धतीने वागवले तेव्हा तुमची सहिष्णुता कुठे दडून बसली होती?

सहिष्णुतेच्या गप्पा कोणी कराव्यात? ज्यांच्या रक्तातून असहिष्णुता वाहते आहे त्या कम्युनिस्ट अन काँग्रेसवाल्यांनी? आणीबाणीनंतर शाह आयोगाने जेव्हा स्व. इंदिरा गांधींना दोषी ठरवले होते अन त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हा काहीच मिनिटात संघाच्या लोकांच्या घरांवर झालेले हल्ले तुम्हाला आठवतात तरी का? काँग्रेसी गुंडांनी केलेल्या दगडफेकीत फुटलेली माझ्या घराची काच अजूनही त्याची साक्ष देईल. याच हल्ल्यात हात तुटल्यामुळे वडिलांना चार महिने काय सोसावे लागले होते याची तुम्हाला कल्पना असण्याची शक्यताच नाही. कारण तुमची सहिष्णुता कायम सत्तेचे तळवे चाटण्यात व्यस्त राहत आलेली आहे. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात करण्यात आलेली ब्राम्हणांची कत्तल तुम्हाला माहितच नाही. कारण तुमच्या मते त्यावेळी महाराष्ट्र भारतात नसावाच.

भारतासहित जगभरातील पत्रकारांच्या हत्या, आयएसआयएसच्या कारवाया, पाकच्या कारवाया, कोरिया असो की सिरीया, अमेरिका असो की इराण... एकूणच मानवी जीवनातील हिंसा, त्याची कारणे, त्याचे परिणाम, त्यावरचे उपाय वगैरेंची चर्चा करण्याची तुमची क्षमता तरी आहे का? गोडगोड बोलणे वा इच्छाचिंतन यांच्या मर्यादांची चर्चा करण्याची तयारी आहे का तुमची? प्रत्येक घटना सरकारच्या इशाऱ्यानेच होते असे जे तुम्हाला तुमच्या राजीनामे देण्यातून सुचवायचे आहे त्याला तरी काय आधार? अशी बालिश कृती करून केवळ गोंधळ, अविश्वास माजवण्याचा तुम्हाला काय अधिकार? तुमची ही कृती बालिश तर आहेच, सोबतच बेजबाबदारदेखील आहे. तुमच्या बौद्धिक दिवाळखोरी शिवाय दुसरे काहीही यातून पुढे येत नाही.

नागपूरच्याच एका प्राध्यापक मित्राने, याच राजीनामा यादीत असलेल्या गणेश देवी यांना त्याने पाठवलेला मेसेज, सकाळी मला पाठवला. त्यात त्याने २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटात आपला भाऊ मरण पावल्याचा उल्लेख करून; गणेश देवींना प्रश्न केला आहे- त्याबद्दल साहित्यिकांनी काय केले होते? देवींची त्यावर काहीही प्रतिक्रिया नाही. आता सामूहिक बंडखोरी करणाऱ्या या साहित्यिकांनी समाजाच्या असंख्य गटांमध्ये ऐक्य, सहिष्णुता निर्माण करण्यासाठी काय केले आहे, या प्रश्नाचे उत्तर आधी द्यावे. मग सहिष्णुतेच्या वगैरे गप्पा माराव्यात. साहित्य अकादमीनेही दबावात येऊ नये. १०-१५ च नव्हे, आजवरच्या ११०० साहित्यिकांनी पुरस्कार परत केले तरीही घाबरू नये, दबावात येऊ नये. समाजात रुजलेल्या बौद्धिक दहशतवादाची ही नवीन खेळी सरकार, साहित्य अकादमी अन सामान्य माणसांनी ओळखण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १२ ऑक्टोबर २०१५

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

बेजबाबदार

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रदूषण इतकं वाढलं आहे की, येत्या २२ तारखेला `no car day' पाळण्याची तयारी सरकारने चालवली आहे. त्याला नायब राज्यपालांची परवानगीही मिळाली आहे. त्यावर एका बिझिनेस वाहिनीवर चर्चा झाली. बिझिनेस वाहिनी हे आवर्जून सांगण्याचे कारण म्हणजे, या विषयाचा थेट व्यवसायांशी असलेला संबंध. एक प्रकारे conflict of interest. असे असूनही हे विषय आता इतके महत्वाचे अन संवेदनशील होऊ लागले आहेत की त्याकडे दुर्लक्ष करणे कोणालाच शक्य नाही. तर या चर्चेत, नेहमीप्रमाणेच राजकीय नेतेही सहभागी झाले होते. कॉंग्रेसच्या रागिणी नायक या चर्चेत होत्या. त्यांनी सुरुवातीलाच एक भूमिका मांडली की, प्रदूषण दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्याची जबाबदारी लोकांवर टाकू नका. त्यांचे शब्द होते- dont shift the onus to peoples shoulder.

जी एक भयंकर मोठी चूक वर्षानुवर्षे चालत आलेली आहे, ती काल त्यांच्या मुखातून बाहेर पडली. आमचे एकूणच जगणे, त्यातील सुखदु:ख, त्रास अथवा सोयीसुविधा, समस्या वा त्या सोडवणे; या बाबी कोणत्याही एका घटकावर अवलंबून नसतात. त्याला अनेक पदर आणि अनेक कोन असतात. अनेकांची आपापली जबाबदारी असते. मात्र काहीही झाले की, सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची अतिशय घातक सवय आपल्याला लागलेली आहे. `चाहे जो मजबुरी हो, हमारी मांगे पुरी करो' हाच आपला जीवनमंत्र झाला आहे. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला आम्ही तयार नसतो. जबाबदारीविहीन जीवन आम्हाला हवे आहे. पण असे शक्य नसल्याने जबाबदारी ढकलायला सरकार ही एक चांगली गोष्ट आहे. काहीही झाले की सरकार काय करते? सरकार झोपले आहे का? असे प्रश्न विचारले की आमचे काम संपले.

पाश्चात्य सामाजिक विचारातील ही प्रचंड मोठी चूक आणि त्रुटी आहे. पण या पद्धतीने कोणतीही समस्या सुटणे हे मुळातच अशक्य असल्याने वाद, भांडणे आणि संघर्ष सुरु राहतात पण समस्या सुटत नाहीत. उलट समस्येच्या सोडवणुकीतून नवीन समस्या जन्माला येतात. सीसी कॅमेरे याचे उत्तम उदाहरण. चोऱ्या, दरोडे वगैरे होऊ नयेत यासाठी गेल्या काही वर्षात सीसी कॅमेरे आले. पण एकही दिवस असा जात नाही की, त्या कॅमेऱ्यात टिपलेला गुन्हा बातम्यात पाहायला मिळत नाही. समाजाने सुरक्षेसाठी पोलीस दल उभारले, पण पोलिसांवरील अत्याचार वा पोलिसांकडून होणारे अत्याचार; या रोजच्या बातम्या आहेत. सरकार ही गोष्ट सुद्धा चांगल्या सामाजिक व व्यक्तिगत जीवनासाठी निर्माण झाली. पण आज जी स्थिती त्या संबंधाने आहे त्याचे वेगळे वर्णन करण्याची गरज नाही. विद्यार्थांना शिक्षणासाठी पैसा मिळावा म्हणून बँकांनी कर्ज देणे सुरु केले. आज त्या कर्जातील पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बुडीत खाती आहे.

अक्षरश: असंख्य उदाहरणे देता येतील. एकांगी, बेजबाबदार विचारपद्धती, त्याला अनुसरून योजना, व्यवस्था अन विश्लेषणे; यांनी समस्या सुटत नाहीत. उलट त्यामुळे समस्यांचे डोंगर उभे होत राहतात. व्यक्तिगत जीवनातील एखाद्या क्षुल्लक घटनेपासून तर प्रदूषण वगैरेंसारख्या जगड्व्याळ समस्यांना अनेक पदर अन कोन असतात, अनेकांच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यातील प्रत्येकाने जबाबदारीने, विचारपूर्वक वागणे, विचार करणे आवश्यक असते. आम्हाला हे किमान मान्य तरी आहे का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ७ ऑक्टोबर २०१५

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

गांधी जयंतीचे अरण्यरुदन

२ ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी झाली. देशात अन जगभरातही. गेल्यावर्षीपासून देशात या दिवसाला वेगळा रंग चढलेला आहे. तो आहे स्वच्छतेचा. ही चांगलीच बाब आहे. संयुक्त राष्ट्रसंघ हा दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा करतं. जगातील हिंसाचार मात्र वाढतोच आहे. अगदी या अहिंसा दिनाच्या दिवशीच अमेरिकेतील एका महाविद्यालयात एका माथेफिरूने वर्गात घुसून, विद्यार्थ्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या आणि त्यात तब्बल १० विद्यार्थी जागीच मरण पावले. यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेतील शस्त्र परवाना कायद्यावर चर्चा सुरु झाली आहे.

दहशतवाद आणि हिंसा यांचा अतूट संबंध आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत असताना खुद्द संयुक्त राष्ट्रसंघालाच प्रश्न केला की, दहशतवादाची व्याख्या काय? म्हणजे ज्या गोष्टीचा मुकाबला करायचा आहे, त्यावर जो साधकबाधक विचार व्हायला हवा, तोही जगाने अद्याप केलेला नाही असेच म्हणावे लागेल. दहशतवाद म्हणा वा हिंसाचार म्हणा; जगाची चर्चा अजूनही कायदे, नियम, शस्त्रे, परवाने, शिक्षा, व्यवस्था, साधने याच वरवरच्या उथळ बाबींवर चालते. एखाद्याच्या हाती शस्त्र नसतानाही हिंसा होत नाही का? किंवा बॉम्बस्फोट वा सामुहिक हत्याकांड यापेक्षा वेगळा असा दहशतवाद नसतो का? कौटुंबिक हिंसा किंवा आर्थिक दहशतवाद यासारख्या बाबींचा विचार हिंसा आणि दहशतवादाच्या संदर्भात किती होतो?

मुळात हिंसेचे मूळ कुठे आहे? या जगातील बहुतेक सगळ्या कृतींमागे सत्ताकांक्षा ही प्रेरणा असते. कोणाला राजकीय मार्गाने, कोणाला आर्थिक मार्गाने, कोणाला ज्ञानमार्गाने, कोणाला माहितीच्या मार्गाने, कोणाला सौंदर्याच्या मार्गाने, कोणाला पद-प्रतिष्ठेच्या मार्गाने, कोणाला शस्त्राच्या मार्गाने, कोणाला संख्येच्या मार्गाने, कोणाला नीतीच्या मार्गाने, कोणाला अन्य विविध मार्गांनी सत्ता गाजवायची असते. अगदी व्यक्तिगत जीवनापासून जागतिक पातळीपर्यंत ही सत्ताकांक्षा दिसते. आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, आपल्या मार्गाने चाललं पाहिजे, आपली भाषा- आपली शब्दावली- वापरली पाहिजे; अशी त्याची खूप रूपं पाहायला मिळतात. आपल्याजवळ जे आहे त्याचा उपयोग करून सत्ता राबवणे किंवा नसलेल्या गोष्टींवर ताबा मिळवून सत्ता गाजवणे हे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात.

अनेकदा सत्ता गाजवण्यासाठी अतिरेकी आग्रह केला जातो. गंमत म्हणजे कधीकधी यात प्रामाणिक कळकळ देखील असते. पण म्हणून व्हायचे परिणाम टाळता येत नाहीत. ही सत्ताकांक्षा जशी स्वार्थाने बरबटलेली असते तशीच जगाच्या कल्याणाच्या करुणेतून सुद्धा आलेली असते. १- मी म्हणजे जग, २- मला जे आणि जसं समजतं ते आणि तेवढंच जग आहे, ३- जगाचं भलं करण्याची जबाबदारी माझीच आहे, ४- माझ्यासमोर जग म्हणजे `किस झाड कि पत्ती', ५- हे जग, येथील माणसे, येथील निसर्ग, येथील सारे काही माझ्यासाठी आहेत, ६- येथील जेवढ्या गोष्टी (पैसा, माणसे, जमीन, साधने, शस्त्रे, यंत्रे, ज्ञान) माझ्या ताब्यात तेवढा मी श्रेष्ठ, ७- अधिकाधिक ताबा म्हणजे अधिक सुख अन अधिक शक्ती; अशा अनेक प्रकारांनी ही सत्ताकांक्षा अभिव्यक्त होते. एकाने सांगितले की हिंसेचे ८१ प्रकार आहेत. या हिंसेलाच संघटीत शक्तीचे बळ लाभते तेव्हा त्यातून दहशतवाद जन्माला येतो. आयएसआयएसचा दहशतवाद तर आम्हाला समजतो, पण जगाच्या ७०० कोटी लोकसंख्येपैकी १२५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व न देण्याला आम्ही दहशतवाद म्हणत नाही.

पैशाचा लोभ, तो वाढवणाऱ्या बाबी (उदा. फोर्ब्सतर्फे प्रसिद्ध होणारी जगातील श्रीमंतांची यादी), श्रेष्ठत्वाची लालसा इत्यादी गोष्टी हिंसेचे मूळ आहेत. खुद्द गांधीजी म्हणत असत- poverty is the greatest violence. या दारिद्र्याची चिंता आज कोणाला आहे? गरिबी दूर करायला हवी, असे म्हणून गरिबी दूर होत नाही. नव्हे त्यासाठी जगभरात जे उपाय अवलंबिले जातात त्यानेही गरिबी दूर होत नाही. गेल्या कित्येक दशकांचा (शतकांचाही म्हणता येईल) हा अनुभव आहे. कारण गरिबी दूर करा म्हणताना, ती मुळात निर्माण का व कशी होते यावर विचार करायला कोणीही तयार नाही. उद्योग वाढवा, शेती वाढवा, रोजगार वाढवा, कौशल्य वाढवा, तंत्रज्ञान विकसित करा; अशी धावपळ कितीही केली तरीही गरिबी दूर होत नाही, होऊ शकत नाही. कारण गरिबी निर्माण होण्याचा संबंध मानसिकतेशी आहे. जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीशी आहे. बाकी साऱ्या बाबी पूरक आहेत. मानसिकता व जीवनदृष्टी योग्य असेल तरच त्यांचा उपयोग होईल, त्याचे अपेक्षित परिणाम मिळतील. आजचा खरा प्रश्न हा आहे. माणसाच्या मनातील ही सत्ताकांक्षा कशी कमी करता येईल? योग्य जीवनदृष्टी काय आहे अन ती कशी रुजवता येईल? हे मूळ प्रश्न आहेत. या प्रश्नांना भिडल्याशिवाय हिंसाचार काय वा अन्याय काय संपुष्टात येणे अशक्य आहे. कोणी अमुक म्हणाले, अमक्याने अमुक उपदेश केला आहे, अमक्याने अमुक विश्लेषण केले आहे, अमुक पुस्तकात अमुक सांगितले आहे, अमक्या संस्थेचा अमुक अहवाल आहे, अमक्या सर्वेक्षणात अमुक आढळले... यातील काहीही माणसाला त्याच्या व्यवहाराला प्रवृत्त करीत नाही. कोणीही काहीही सांगो, काहीही म्हणो; त्याने फरक पडत नाही. म्हणूनच दरवर्षी गांधी जयंती साजरी होते अन अरण्यरुदन करण्याशिवाय दुसरे काहीही माणूस करू शकत नाही.

काही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे बोलण्याचीही गरज आहे. मुळातच सत्ताकांक्षा माणसाच्या मनात असली तरीही सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या अलेक्झांडरच्या विश्वविजयाच्या प्रयत्नातून राजकीय सत्ताकांक्षा जगभरात पोसली गेली. क्रियाप्रतिक्रियातून त्याचे आजचे बीभत्स रूप आकारास आले. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या इस्लामच्या उदयाने धार्मिक सत्ताकांक्षा फोफावली. तिच्या क्रियाप्रतिक्रियातून आजची परिस्थिती उद्भवली. अन १६ व्या- १७ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीने आर्थिक सत्ताकांक्षा जन्माला घातली. त्यापाठोपाठच्या क्रियाप्रतिक्रियातून व तिच्या पोषणासाठी राबवण्यात आलेल्या युरोपीय प्रबोधनपर्वातून आजचे ताणतणाव जन्माला घातले आहेत. आजच्या स्थितीचे तात्विक, वैचारिक, व्यावहारिक संपूर्ण श्रेय पश्चिमेला आहे.

भारतीय औपनिषदिक चिंतन पूर्णत: वेगळी जीवनदृष्टी देते. गांधीजींनी देखील हेच म्हटले होते. ईशावास्योपनिषदाचा प्रथम मंत्र या जगात असेपर्यंत जगाला आशा आहे असे ते म्हणाले होते, तेव्हा त्यांना हेच अभिप्रेत होते. आजची सभ्यता, आजची जीवनशैली, आजची शब्दावली, आजची जीवनदृष्टी, आजची विचारपद्धती यात आमूलाग्र परिवर्तन होणे त्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम विश्वव्यापी अन समाजव्यापी वैचारिक मंथन सुरु व्हायला हवे. नियोजन, रचना, व्यवस्था, आकडेवारी वगैरे जंजाळ पूर्णत: बाजूला सारून मुळाशी भिडणारी, व्यवहाराला जोडून असणारी तत्त्वचर्चा ही प्राथमिक आवश्यकता आहे. हे झाले तर पुढील पाच-पन्नास वर्षात त्याचे चांगले परिणाम दिसतील. अन्यथा, `बापू असे म्हणाले होते अन आम्ही त्याला हरताळ फासला' असे अरण्यरुदन करत बसण्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ४ ऑक्टोबर २०१५

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

माणूस असा असतो?

दिनूकाका गेले. दिनूकाका म्हणजे दिनकरराव जोशी. भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. एकाच वेटाळात राहणारे, एकाच शाखेचे स्वयंसेवक, `national organisation of bank workers' (NOBW) या संघटनेत अन पर्यायाने भारतीय मजदूर संघात वडील अन ते दोघेही सक्रिय, दत्तोपंत ठेंगडी ही समान श्रद्धा; या कारणांमुळे दिनकरराव झालेत दिनुकाका. नागपूर शहर विस्तारू लागले आणि `महाल' या नागपुरच्या मूळ वस्तीतील लोक शहराच्या वेगवेगळ्या दिशांना नवीन वस्त्या वसवू लागले. दिनुकाका अन वडील दोघेही याच पद्धतीने `भगवाननगरात' आले. त्यावेळच्या भगवाननगराची आता फक्त कल्पनाच करायची. आजूबाजूला शेते पसरलेली, रस्ते नाहीत, वीज नाही, वाहने वगैरे तर कोणाकडेच नव्हती. वाहन म्हणजे सायकली. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घरे. पलीकडच्या मानेवाडा गावाच्याही पलीकडे घोगली नदी, जंगल वगैरे. त्या जंगलातील कोल्हे वगैरे प्राणी वस्तीपर्यंत येत असत असे त्यावेळचे जाणकार सांगतात. अशा या वस्तीत स्वाभाविकच सगळ्यांचा सगळ्यांशी घरगुती परिचय. सणवार, हळदीकुंकू अशा निमित्तांनी घरोघरी प्रत्येकाचे जाणेयेणे. त्यातच काही संघाची मंडळी. त्यांनी स्वाभाविकच शाखा सुरु केली. परस्पर संपर्क, सहयोग, आधार आणि परिचय यांना त्याचाही हातभार लागला. गेल्या शतकातील ६० च्या दशकाच्या उत्तरार्धाचा हा काळ. दिनुकाकांना तेव्हापासून पाहिलेले.

सुरुवातीला संघाची भगवाननगर शाखा आजच्या भगवाननगर चौकाच्या शेजारी लागत असे. आजचे शाखेचे स्थान आणीबाणीनंतरचे. तेव्हाच्या शाखेचे मैदान दिनुकाकांच्या घराच्या जवळ. त्यामुळे शाखेसाठी रोज लागणारे ध्वज, ध्वजदंड इत्यादी सामान त्यांच्याच घरी ठेवत असत. त्यामुळे रोज सायंशाखा आटोपल्यावर सगळेजण ते सामान परत ठेवण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी जात. तिथे पाणी वगैरे पिऊन मग घरी परतायचे. तासभर खेळ वगैरे झाल्याने तहान लागत असेच. इकडे आम्ही बच्चे कंपनी पाणी पीत असताना तिकडे गोठ्यातल्या गायींना ठेवलेली पाण्याची बादली उचलून ठेवून दिनुकाका सायकलने बाहेर पडत असत, भगवाननगरातून सीताबर्डीवरील NOBW च्या कार्यालयात जायला. हा त्यांचा रोजचा शिरस्ताच होता. सकाळी उठल्यावर प्रभात शाखा, नंतर चार घरी संपर्क करून आंघोळ- पूजा- जेवण करून सायकलने रिझर्व्ह बँकेत नोकरीसाठी जाणे, बँक आटोपल्यावर घरी परतताना घरच्या गायींसाठी कॅरियरवर बांधून चारा घेऊन येणे. घरी आल्यावर हातपाय धुवून गायींना चारापाणी करणे, दूध काढणे, जेवणे, तयार होऊन NOBW च्या कार्यालयात जाणे. रात्री १०-११ वाजता घरी परतणे.

कित्येक वर्षे हा क्रम होता. हळूहळू यात काही बदल झाले. सायकलची प्रथम व्हिकी झाली, मग बजाजची स्कूटर झाली, मग स्कुटी, मग अॅक्तिव्हा; असे बदल झाले. घरच्या गायीही कमी झाल्या, मग संपल्या. दिनुकाका हे त्यांच्या काकांजवळ राहिले. त्यांना सगळे रामभाऊ काका म्हणत. ते नवयुग विद्यालयात शिक्षक होते. त्यांना मुलगा नसल्याने दिनुकाका त्यांच्याजवळ राहिले. दिनुकाका हे रामभाऊ काकांच्या भावाचा मुलगा. रामभाऊ काकांना सात मुली. अन दिनुकाका त्यांचा एकुलता एक भाऊ. मात्र या कौटुंबिक वास्तवाचा कोणाला थांगपत्ताही लागू नये, असा सगळ्यांचा व्यवहार. अकृत्रिम, सहज, आतून आलेला. सगळ्या बहिणींची शिक्षणं, लग्न, संसार, काका-काकूंचा सांभाळ, तब्येती, त्यांचे स्वर्गवास असे सगळे इतक्या सहज, निर्व्याज, हसतमुख पद्धतीने की विचारता सोय नाही.

आणीबाणीच्या काळात रामभाऊ काका नागपूर कारागृहात होते. त्यामुळे पोलिसांची वक्रदृष्टी घरावर होतीच. दिनुकाका संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे त्यांच्यावर पण जबाबदारी होतीच. भूमिगत पत्रकांचे वितरण, कारागृहातील स्वयंसेवकांच्या कुटुंबांची जबाबदारी, त्या कुटुंबांची आर्थिक मदत- त्यांना धीर देणे- दुखणी- अडचणी- अशा अनेक गोष्टी; शिवाय बैठका वगैरे. हळूहळू दिनुकाकांचे घरचे व्याप आणि जबाबदाऱ्या कमी झाल्या, तशा बाहेरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. भारतीय मजदूर संघाच्या कामातील त्यांचा सहभाग आणि त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढत गेल्या. प्रथम विविध कामगार संघटना, नंतर भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रांताची जबाबदारी, मग क्षेत्राची जबाबदारी, मग अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य अशी ती चढती भाजणी होती. संघ आणि संघ परिवाराच्या रचनेनुसार वरचे पद म्हणजे मोठी जबाबदारी, अन मोठी जबाबदारी म्हणजे अधिक काम, अधिक वेळ देणे अन अधिक परिश्रम. त्यामुळेच दिनुकाकांचे वय वाढत होते तसेच परिश्रमसुद्धा. प्रवास, दौरे सतत सुरु असत. पण न थकता, न कुरकुरता, न तक्रार करता हे सगळे सुरु होते. अन हे सगळे करतानाच प्रभात शाखेत जाणेही थांबले नाही. भारतीय मजदूर संघाचे काम करतानाच संघातील सक्रियता भंगली नाही. त्यामुळेच संघ शिक्षा वर्गातही वर्ग कार्यवाह म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. संघाच्या शाखेत जाणे किंवा संघाचा गणवेश घालून घराबाहेर पडणे अतिशय कठीण असल्याच्या काळात अन नवीन, पूर्णत: प्रतिकूल असलेल्या वस्तीत पाय रोवून उभे राहणे सोम्यागोम्याचे काम नाही. संघाच्या सुरुवातीच्या काळात हजारो स्वयंसेवकांनी ते केले आहे. दिनुकाका त्यातीलच.

दिनुकाकांना मुलबाळ नव्हते. पण त्यांच्या व्यवहारात, विचारात, मानसिकतेत त्याचा कुठेही परिणाम जाणवला नाही. कधीही अन कोणालाही. तोंडाने आपल्या अभावांचा, त्रासाचा उच्चार करणे तर त्यांच्या स्वभावातच नव्हते. हा विलोप किती असावा? तर कालच्या त्यांच्या अंत्ययात्रेत डॉ. रामभाऊ तुपकरींनी मला हळूच विचारले- श्रीपाद, दिनूभाऊंना मुलबाळ काय? डॉ. रामभाऊ तुपकरींनी हे विचारणे याला खूप महत्व आहे. ज्याला रामभाऊ तुपकरी माहीत आहेत त्यालाच हे कळेल. संघातील एक अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व, तरुण भारतचे प्रकाशन करणाऱ्या नरकेसरी प्रकाशनाचे व्यवस्थापकीय संचालक, श्रीराम अर्बन बँकेचे संस्थापक संचालक, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रथम मेटॅलर्जी विभागाचे प्रमुख आणि नंतर अधिष्ठाता; असे रामभाऊ. संघ आणि परिवारातील अनेक वरिष्ठांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध. त्यात दिनुकाकाही आलेत. पण दिनुकाकांना मुलबाळ नाही हे त्यांनाही माहीत नव्हते. इतकी विलोपी वृत्ती. हे त्यांच्या व्यवहारातही दिसून येत असे. वयाच्या ८० पर्यंत सुद्धा घरची बिले भरणे आदी कामे ते स्वत: करत. घरातील हवेनको, भाजी-किराणा, औषधपाणी, दुरुस्ती-डागडुजी वगैरे सगळे. घरी येणाऱ्यांचा राबता तर होताच. काकू नेहमीच हसून स्वागत करीत. चहापाणी, खाणेपिणे करीत. पण काकूंचा चहा झाला की, स्वयंपाकघरात जाऊन तो बैठकीच्या खोलीत घेऊन येणे अन आलेल्याला देणे हे दिनुकाका करीत.

वृत्तीची ही सात्विकता नेहमीच अनुभवायला मिळत असे. दोन वर्षांपूर्वी, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतांचा एक कार्यक्रम भगवाननगरात झाला. कार्यक्रम अगदी घरगुती. नगराचे संघचालक डॉ. रमाकांत कापरे यांच्याकडे जेवण. त्यानिमित्ताने डॉ. कापरेंनी सगळ्या जुन्या, मोहनजींसोबत काम केलेल्या स्वयंसेवकांनाही भोजनाला बोलावले होते. सुरुवातीला एकत्र बसणे, गप्पा वगैरे अन मग भोजन असा कार्यक्रम. गप्पा वगैरे झाल्या. उपलब्ध जागेनुसार भोजनाची व्यवस्था दोन भागात झाली. सरसंघचालक, काही स्वयंसेवक, घरची मंडळी यांची पंगत डॉ. कापरेंकडे झाली, अन त्यांच्याच घरापुढील राचलवार यांच्या घरी बाकी लोकांची व्यवस्था. जेवणे वगैरे झाल्यावर सरसंघचालक थोडा वेळ डॉ. कापरे यांच्याकडे बसले. नंतर कार्यालयात परत गेले. दिनुकाका मात्र त्यावेळी समोरच्या घरी भोजन वगैरे आटोपल्यावर सरसंघचालकांना निरोप देण्यासाठी बाहेर उभे होते. आपण वयाने, अनुभवाने ज्येष्ठ आहोत, आत जाऊन बसलो तर कोण काय म्हणणार आहे? किंवा भोजन करून निघून गेलो तर काय होते? किंवा आपल्याला कोणी बसा वगैरेही म्हटले नाही; असे काहीही त्यांच्या मनाला शिवले सुद्धा नाही. लहान मोठ्या, मान अपमानाच्या कृतक कल्पना त्यांच्या जवळही फटकत नसत.

व्यक्तिगत अनुभवही असाच असायचा. वास्तविक मी म्हणजे त्यांच्यासमोर `पोर'. शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हापासून त्यांनी मला पाहिलेले. पण मोठा झालो, पत्रकारितेत आलो, त्यामुळे थोडीबहुत ओळख निर्माण झाली, थोडे लिहू बोलू लागलो; त्यानंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला. बोलताना एकेरी बोलत असले तरीही `पोर' म्हणून न वागता सन्मान राहत असे. आपल्यालाच ते बरं वाटत नसे. पण त्यांनी सहजपणे तो बदल केला. असा बदल करणे सोपे नसते. मनाचे उमदेपण आणि मोठेपण त्यासाठी हवे. एकदा स्व. दत्तोपंत ठेंगडी त्यांच्याकडे मुक्कामाला होते. त्यांनी मला भेटायला बोलावले. त्या भेटीच्या वेळीही त्यांचा हा विलोपीपणा पाहायला मिळाला. स्व. दत्तोपंत आणि मी जवळपास तीनेक तास बोलत होतो. काकूंच्या हातचा इडलीसांबार अन चहाचा आस्वाद घेत आमचे बोलणे सुरु होते. पण दिनुकाका तेथे येऊनही बसले नाहीत. ते माझ्यापेक्षा वयाने तर मोठे होतेच, भारतीय मजदूर संघात मोठे पदाधिकारी होते, त्यांचेच घर होते; ते आले असते, बसले असते, बोलले असते तर त्यात वावगे काहीच नव्हते. पण पंतांनी मला बोलावले होते अन आम्ही बोलत होतो, तेव्हा बाजूला राहण्यात त्यांना कसलाही अनमान वाटला नाही.

निरपेक्ष आत्मीयता हाही दिनुकाकांचा विशेष. त्यातून गोष्टीवेल्हाळ. जो दिसेल त्याच्याशी बोलणार, त्याची विचारपूस करणार, कोणी कधीही गेला तरी त्याला उपलब्ध असणार, त्याच्यासाठी वेळ देणार. म्हणूनच वस्तीत असो वा भारतीय मजदूर संघात त्यांचा लोकसंपर्क अन लोकसंग्रह अफाट होता. शाखेत येणारे स्वयंसेवक, त्यांचे घरचे लोक यांच्याशी तर त्यांचा संबंध होताच; पण शाखेत कधीही न येणाऱ्यांशीही त्यांचे जातायेता अनौपचारिक बोलणे, विचारपूस राहत असे. या लोकसंग्रहात उच्च जातींचे समजले जाणारे, खालच्या जातींचे समजले जाणारे, दलित, आदिवासी, मुसलमान, ख्रिश्चन, महिला असे सगळेच होते. अशा प्रकारच्या संबंधांचे अनेक हृद्य अनुभव त्यांच्या संग्रही होते. ते किस्से बरेचदा ऐकायलाही मिळत असत. गेली काही वर्षे त्यांच्या पायांनी त्यांच्याशी असहकार केला होता. दहापंधरा मिनिटे उभे राहणेही कठीण होत असे. पण फिरणे, गाडी चालवणे, प्रवास, संपर्क हे सारे सुरूच होते. कामाच्या निमित्ताने देशभर फिरून झाले होते. कामगार संघटनेचे काम केल्याने उद्योगपती, मालक, सरकार अशांशी देखील परिचय होता. विविध भाषा बोलत असत. सहज बोलताना मराठीवरून कधी हिंदीवर, तर कधी इंग्रजीवर जात असत. अन ते देखील धाराप्रवाही.

२३ ऑगस्टला त्यांनी घरी सत्यनारायण पूजा ठरवली होती. श्रावण मासानिमित्त. त्यासाठी सोवळे नेसून तयार असतानाच ते खाली पडले. लगेच दवाखान्यात भरती करण्यात आले. मेंदूतील रक्तस्रावाने ते कोसळले होते. त्याचेच रुपांतर अंग लुळे पडण्यात झाले. त्याउपरही उपचारांना प्रतिसाद देत होते. पण परवा, १ सप्टेंबरला संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला अन त्यांची प्राणज्योत मालवली. १२ ऑगस्ट रोजी त्यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली होती. एक कृतार्थ आणि सुदीर्घ आयुष्य जगून दिनुकाका गेले.

स्वत:साठी काही न मागता, कशासाठीही कुरकुर वा तक्रार न करता, अभावांचा वा कष्टाचा बाऊ न करता, आपला विचार कमी आणि बाकीच्यांचा विचार जास्त; असे जगता येते का? माणसे अशी जगतात का? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचे उत्तर `होय' असे आहे. दिनुकाका हे त्याचे उदाहरण आहे. त्यांच्यासारखी माणसे पाहायला, अनुभवायला मिळतात तेव्हा; साधेपणा, माणुसकी, आत्मविलोपी वृत्ती, कष्ट, निर्वैर या केवळ बोलण्याच्या गोष्टी नाहीत, जगण्याच्या गोष्टी आहेत यावर अविश्वास ठेवण्याचे कारण उरत नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ३ सप्टेंबर २०१५

बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

संघाच्या बैठका

(रा. स्व. संघाची एक समन्वय बैठक आजपासून दिल्लीत सुरु झाली. सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने प्रसार माध्यमात या बैठकीची चर्चा सुरु आहे. त्या निमित्ताने संघातील `बैठक' या प्रकाराची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.)

संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बैठक या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे. अनेक प्रकारच्या बैठकी सतत सुरू असतात. शाखा बैठक, गण बैठक, गटनायक बैठक, गणशिक्षक बैठक, आठवडी किंवा साप्ताहिक बैठक, मासिक बैठक, कार्यकर्ता बैठक, अधिकारी बैठक, श्रेणी बैठक, प्रांत बैठक, प्रचारक बैठक, शारीरिक बैठक, बौद्धिक बैठक, व्यवस्था बैठक, समन्वय बैठक, चिंतन बैठक, टोळी बैठक, कार्यकारिणी बैठक, अ. भा. कार्यकारी मंडळ बैठक, अ. भा. प्रतिनिधी सभेची बैठक... अशा अनेक बैठका सतत आणि विविध स्तरांवर होत असतात. कधी कधी `ती बैठक सोडून काही बोला बुवा' अशी टिप्पणीही ऐकायला मिळू शकते इतक्या विविध प्रकारच्या या बैठका असतात. मात्र असा बैठकांचा अतिरेक वाटत असला तरीही त्या आग्रहाने सुरू असतात आणि संघाच्या वाटचालीत, कार्यक्रमांच्या आयोजनात, सुसूत्रतेत, नियोजनात, अनुशासनात त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे.

शाखा स्तरावरील बैठकीत विशेषत: स्वयंसेवकांच्या याद्या तयार करणे, निरोप देण्याची व्यवस्था, पत्रिका वितरण, वस्तीतील संपर्क, मोठ्या कार्यक्रमांची माहिती, शाखेच्या कार्यक्रमांचे नियोजन वगैरे विषय असतात. मंडल, विभाग, नगर क्षेत्राची दर आठवडयाला बैठक होते. प्रत्येक क्षेत्राचा दिवस वेगवेगळा असू शकतो, वेळ वेगवेगळी असू शकते. स्थानिक कार्यकर्त्यांची सोय त्यासाठी लक्षात घेतली जाते. या बैठकीत त्या त्या क्षेत्रातील आठवडाभरातील कामाचा आढावा घेणे, पुढील आठवडयाचे नियोजन, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या शाखांना भेटींचे नियोजन, माहितीची देवाणघेवाण, प्रचार पुस्तिका, पत्रके यांचे वाटप वगैरे विषय असतात. याशिवाय प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांचा समन्वय, माहितीचे आदानप्रदान, प्रवास, नियोजन यासाठी बैठकी होत असतात.

संघातील शारीरिक कार्यक्रमांची रचना व नियोजन यासाठी शारीरिक प्रमुखांची बैठक होते. जसे, विजयादशमीच्या उत्सवात कोणते शारीरिक कार्यक्रम करायचे हे निश्चित करण्यासाठी शारीरिक प्रमुखांची बैठक होते. व्यायाम योग करायचे असतील तर ते करून पाहिले जातात. शाखांमधील वा उत्सवातील गीत, अमृतवचन, बोधकथा, बौद्धिकचे विषय, बौद्धिक वर्गांचे नियोजन आदीसाठी बौद्धिक प्रमुखांच्या बैठकी होतात. असेच अन्य विषयांचे. प्रत्येक बैठकीला ज्या स्तराची बैठक असेल त्यापेक्षा वरील स्तराचा एखादा तरी कार्यकर्ता उपस्थित असतो. तोही त्या विचारविनिमयात सहभागी होतो. कधी कधी मार्गदर्शनही करतो. बौद्धिक प्रमुख शारीरिक वा व्यवस्था बैठकीत मार्गदर्शन करू शकतो किंवा शारीरिक प्रमुख बौद्धिक वर्गही घेऊ शकतो.

नियमितपणे होणाऱ्या स्थानिक पातळीवरील बैठकी एखाद्या स्वयंसेवकाच्या घरी होतात. हा स्वयंसेवक बैठकीसाठी अपेक्षित असेलच असे नाही. तो बैठकीत अपेक्षित असला तर सहभागी होतो, नसेल तर तो बैठकीत सहभागी होत नाही. त्याच्याकडे जागा उपलब्ध आहे म्हणून तेथे बैठक. अशा बैठकी रात्री सुद्धा असू शकतात. सगळ्यांची सोय असेल त्याप्रमाणे रात्री ८-९ वाजता ही बैठक होते. अशी बैठक मग स्वाभाविकच रात्री ११ वाजेपर्यंत वा त्यापेक्षा थोडी अधिकही चालू शकते. आपापली कामेधामे उरकून, थकलेले असले तरीही रात्री उशिरा स्वयंसेवक संघाचा, समाजाचा, देशाचा विचार करतात असे चित्रही पाहायला मिळते. या गोष्टीचाही न सांगता सकारात्मक परिणाम होतो. ज्या ठिकाणी ही बैठक होते त्या कुटुंबातील सदस्य, आजूबाजूचे यांच्याही मनात यामुळे नकळत संघाबद्दल सहानुभूती आणि प्रेम उत्पन्न होते. अशा बैठकी रात्रीच होतात किंवा एखाद्या स्वयंसेवकाच्या घरीच होतात असे नाही. या एखाद्या मंदिरात, शाळेत वा चक्क शाखेच्या मैदानावरही होऊ शकतात. तसेच या बैठकी दुपारी वा सकाळीही होऊ शकतात. स्थान, वेळ अशा गोष्टी उपलब्धता आणि सोय यानुसार ठरत असतात.

जिल्हा, विभाग, प्रांत, क्षेत्र या स्तराच्या कार्यकर्त्यांचे, अधिकाऱ्यांचे सतत प्रवास सुरू असतात. या प्रवासाच्या व भेटींच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या बैठकी होतात. त्यात परिचय, वृत्तकथन, चर्चा, मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे असे स्वरूप असते. प्रत्येक बैठकीत परिचय ही आवश्यक बाब असते. संघ, समाजाची स्थिती, विविध घटना, सामाजिक परिवर्तन, तात्विक बाबी अशा अनेक प्रकारच्या औपचारिक व अनौपचारिक चर्चा यातून होत असतात. अखिल भारतीय अधिकाऱ्यांचे प्रवास असतील तेव्हाही अशा बैठका होतात. अगदी सरसंघचालक वा सरकार्यवाह यांच्यासोबत मुख्य शिक्षक, कार्यवाह, गणशिक्षक, गटनायक किंवा सामान्य स्वयंसेवकांच्या बैठकीही होतात. हे सर्वोच्च अधिकारी या बैठकांना पूर्ण वेळ उपस्थित राहतात. सामान्य स्वयंसेवकांचाही परिचय करून घेतात. परिचय म्हणजे केवळ नाव, व्यवसाय सांगणे नसते. त्या स्वयंसेवकाबद्दल माहिती करून घेतली जाते. कुटुंबाबद्दलही विचारपूस होते. स्वयंसेवकांच्या वेळेची उपलब्धता आदी गोष्टींचीही चर्चा होते. प्रार्थना कशी म्हणावी, प्रणाम कसा करावा, सूर्य नमस्काराच्या योग्य स्थिती हे सुद्धा सर्वोच्च अधिकारी सांगतात, कधी करूनही दाखवतात. हास्य-विनोदही होतात. प्रमुख व्यक्तीने थोडा वेळ यायचे, गंभीर चेहऱ्याने मोठ्या विषयांवर मार्गदर्शन करायचे आणि निघून जायचे हे साधारणपणे अन्यत्र दिसणारे दृश्य संघात दिसत नाही. त्याच्या पूर्णपणे विपरीत सहज, अनौपचारिक, समानतेचे चित्र पाहायला मिळते. याचा अर्थ मोठ्या विषयांवर चर्चा वा मार्गदर्शन होत नाही असे नाही. तेही होतेच. पण या साऱ्याचा एक अनोखा मेळ संघात पाहायला मिळतो. सर्वोच्च अधिकारी, अन्य स्तरांवरील कार्यकर्ते, सामान्य स्वयंसेवक यांच्यात औपचारिक, अनौपचारिक संवाद या बैठकांच्या माध्यमातून सतत होत असतो.

विविध स्तरावरील, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांची गुणवत्ता आणि कौशल्य वाढावे यासाठीही छोट्या वा दीर्घ बैठकांचे आयोजन होत असते. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या वा सामान्य लोकांच्याही बैठका होत असतात. जसे- डॉक्टर, अभियंते, वकील, उद्योजक. स्वयंसेवक असलेले डॉक्टर, स्वयंसेवक असलेले अभियंते, स्वयंसेवक असलेले वकील, स्वयंसेवक असलेले उद्योजक यांच्या बैठकी होतात, तसेच स्वयंसेवक नसलेल्या अशा लोकांशी संवाद साधण्यासाठीही बैठका होतात. धार्मिक, कृषि, शिक्षण, विद्यार्थी अशाही बैठका होतच असतात. विषय अर्थातच संघ. म्हणजे संघाच्या कामातील सहभाग, संघाच्या विचारांना पोषक काम कसे करता येईल, समाजात चांगले वातावरण कसे निर्माण करता येईल हेच.

समन्वय बैठक हाही महत्वाचा भाग. संघाच्या प्रेरणेने आज देशात अनेक संस्था काम करीत आहेत. त्यांचे स्वरुपही अखिल भारतीय आहे. त्या सगळ्या कामांमध्ये संघासोबत आणि परस्परात समन्वय व सहयोग राहावा यासाठी त्या त्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा परिचय, संवाद, विचारांची देवाणघेवाण, कार्यक्रमांची माहिती आवश्यक असते. त्यासाठी या समन्वय बैठकी विविध स्तरांवर आयोजित केल्या जातात. याशिवाय विविध ठिकाणी, विविध क्षेत्रात, वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करीत असलो तरीही एका विचाराने, एका उद्देशासाठी काम करणारे आपण एकच आहोत. आपले काम हा संघाच्या कामाचाच एक भाग आहे; संघाच्या कामाशी, विचारांशी सुसंगत असे आपले काम राहिले पाहिजे असा भाव उत्पन्न करण्याचा प्रयत्नही या समन्वय बैठकांमधून होत असतो. अर्थात त्या त्या संस्थांचे व्यवहार, हिशेब, सदस्यता, कार्यपद्धती, पदाधिकारी, कार्यक्रम याविषयी संघ कधीही आदेश देत नाही. संबंधित संस्थाच त्याविषयी निर्णय घेत असतात. चर्चा स्वाभाविकच सगळ्यांशी सगळ्या गोष्टींवर होत असते. कामाचा वाढता व्याप लक्षात घेऊन आणीबाणीनंतर संघाचे तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांनी या समन्वय बैठकींची सुरुवात केली.

वर्षातून दोनदा अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक होते. देशभरातील उन्हाळी संघ शिक्षा वर्ग आटोपल्यानंतर एकदा आणि दिवाळीपूर्वी एकदा. देशभर विविध स्थानांवर या बैठका होतात. देशभरातील कामाची स्थिती, कार्यक्रम, अधिकाऱ्यांचे प्रवास, वर्तमान घडामोडी, संघटनात्मक विषय यावर या बैठकीत विचार होतो. ज्या स्थानी ही बैठक असेल त्या स्थानी स्थानिक स्वयंसेवकांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो. त्या एकत्रिकरणात कोणी तरी अखिल भारतीय अधिकारी मार्गदर्शन करतात. अशा एकत्रिकरणाला सरसंघचालक, सरकार्यवाह हेदेखील पूर्ण वेळ उपस्थित असतात. अन्य एखाद्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा बौद्धिक वर्ग तेही ऐकतात. सर्वोच्च अधिकारी या कार्यक्रमात बोलतातच असे नाही. स्थानिक स्वयंसेवकांनाही अखिल भारतीय कार्यकर्त्यांना पाहण्याची, भेटण्याची, ऐकण्याची, चर्चा करण्याची संधी यानिमित्ताने मिळते. त्या-त्या गावाला व शहरालाही या निमित्ताने संघाचे दर्शन घडते. विविध विषयांचे प्रस्तावही कधी कधी या बैठकीत पारित केले जातात.

संघाची सर्वोच्च संस्था म्हणजे अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. ही प्रतिनिधी सभेची बैठक मात्र वर्षातून एकदाच होते. दर तीन वर्षांनी संपूर्ण देशभरात प्रतिनिधी निवडले जातात. ज्यावर्षी प्रतिनिधी निवडले जातात त्याच वर्षी सरकार्यवाहांची देखील निवड होते. आवश्यक असेल तर अखिल भारतीय कार्यकारिणीतही याच वर्षी बदल केले जातात. दर तिसरे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असते. देशभरातील सर्व प्रतिनिधी, वेगवेगळ्या अखिल भारतीय संस्थांचे निवडक राष्ट्रीय पदाधिकारी, अखिल भारतीय कार्यकारी मंडळ आणि निमंत्रित सदस्य अशी ही पूर्ण प्रतिनिधि सभा असते. प्रदीर्घ काळपर्यंत प्रतिनिधी सभेची ही बैठक मार्च महिन्यात नागपूरलाच होत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही बैठक तीन वर्षातून एकदा, म्हणजे निवडणूक असेल त्यावर्षी नागपुरात होते. त्यानंतरची दोन वर्षे देशात अन्यत्र होते. विविध ठिकाणच्या स्वयंसेवकांना अखिल भारतीय बैठकीचे आयोजन करण्याचा अनुभव मिळावा, विविध ठिकाणच्या स्वयंसेवकांना अखिल भारतीय कामाचे एकत्रित दर्शन व्हावे आणि संघाच्या कामात स्थानभेद वा स्थानमहात्म्य नसून देशाचा कोणताही प्रांत वा स्थान सारखेच आहे हा एकरस भाव जागवणे हा यामागचा उद्देश. अर्थात संघाची स्थापना नागपुरात झाली. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांची स्मारके नागपुरात आहेत. त्यामुळे त्याला एक महत्त्व संघात नक्कीच आहे. स्वयंसेवकांना प्रेरक होईल याप्रकारे ते जपलेही जाते. परंतु त्याचे अवाजवी स्तोम माजू नये याचीही काळजी घेतली जाते. ही अखिल भारतीय प्रतिनिधी सभा संघाच्या कामाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. याच बैठकीत देशभरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते एकत्रित होतात. त्यांच्यात माहितीची व विचारांची देवाणघेवाण होते. देशभरातील कामाचे प्रत्यक्ष चित्र काय आहे हे साऱ्यांना कळते. अनेक मोठ्या कार्यक्रमांची माहिती भारतभरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या माध्यमातून देशभरातील स्वयंसेवकांपर्यंतही! अनेक लहान पण प्रेरक, अनुकरणीय असे कार्यक्रम, प्रकल्प, घटना या माध्यमातून देशभर पोहोचतात. असे अनेक पथदर्शी प्रकल्प प्रथम या प्रतिनिधी सभेत सगळ्यांसमोर आले आणि नंतर त्याचे अनुकरण देशभरात झाले. अनेक प्रकारच्या वैचारिक, धोरणात्मक चर्चाही याच बैठकीत होत असतात. आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण, रामजन्मभूमी आंदोलन, काश्मीर समस्या, पंजाब समस्या, आसाम समस्या, नक्षलवादाची समस्या, सांस्कृतिक आक्रमण, आर्थिक समस्या, भ्रष्टाचार, मतांतरण, गणवेश वा अन्य संघटनात्मक बदल, एकात्मता स्तोत्रातील बदल या वा यासारख्या शेकडो विषयांवर या बैठकीत सखोल व विस्तृत चर्चा होते. अखेरीस सर्वसंमतीने एक भूमिका निश्चित केली जाते. ती संघाची अधिकृत भूमिका असते. विविध विषयांवर ठरावही पारित केले जातात.

संघाच्या आजवरच्या वाटचालीत संघाच्या चिंतन बैठकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. या चिंतन बैठकींचा निश्चित असा कालावधी नसतो. या बैठकींना कोण कोण उपस्थित राहणार याचा निर्णय त्या त्या वेळी घेण्यात येतो. या बैठकी प्रदीर्घ असतात आणि त्यात प्रत्यक्ष संघटनात्मक किंवा आंदोलनात्मक विषय न राहता तात्त्विक विषयांवर विस्ताराने व सखोल चर्चा होते. संघाचे संघटन आणि तत्त्वज्ञान यांना या बैठकांनीच आकार दिला आहे. अशा प्रकारची पहिली चिंतन बैठक डॉ. हेडगेवार यांच्याच काळात १९३९ साली नागपूर जवळच्या सिंदी या छोट्याशा गावी झाली. फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात झालेली ही बैठक १० दिवस चालली. सकाळी ८ ते ११, दुपारी ३ ते ६, रात्री ९ ते ११ अशी ८ तास रोज ही बैठक चालत असे. संघाचे काम बाल्यावस्थेत होते आणि हळूहळू देशभर त्याचा विस्तार होत होता. त्यात सुसूत्रता, एकसंधता राहावी यादृष्टीने या बैठकीत सखोल, विस्तृत, मनमोकळी चर्चा झाली. अनेकदा सहभागी कार्यकर्त्यांचा पारा आणि आवाजही चढत असे, असा उल्लेख डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रात वाचायला मिळतो. परंतु अशी कितीही खडाजंगी झाली तरीही डॉ. हेडगेवार ते सारे शांतपणे ऐकून घेत असत आणि समन्वयात्मक समारोप करीत असत. त्यांनी निर्णय दिला की, सारे काही शांत होऊन बैठक पुढील विषयाकडे वळत असे. डॉ. हेडगेवार यांच्या अद्भुत, अलोकसामान्य व्यक्तित्वाचाच हा परिणाम म्हणावा लागेल. या बैठकीत संघाची घटना, प्रार्थना, आज्ञा, कार्यपद्धती, प्रतिज्ञा यावर सखोल चर्चा होउन ते सारे निश्चित झाले. आज सर्व देशभर म्हटली जाणारी संस्कृत प्रार्थना, संस्कृतमधील आज्ञा याच बैठकीत निश्चित झाल्या. डॉ. हेडगेवार यांच्यासोबत त्यांच्यानंतर सरसंघचालक झालेले गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, आप्पाजी जोशी, तात्याजी तेलंग, विट्ठलराव पत्की, बाबाजी सालोडकर, नानासाहेब टालाटुले, कृष्णराव मोहरील ही मंडळी उपस्थित होती.

दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात झालेल्या तीन चिंतन बैठकी विशेष महत्वाच्या समजल्या जातात. १९४० साली गुरुजी सरसंघचालक झाले. त्यानंतर १९४७ पर्यंतचा काळ एकूणच धामधुमीचा गेला. त्यानंतर संघावरील बंदीचा काळ आला. तो संघर्षाचा काळ होता. बंदी उठल्यानंतरचा काळ झालेली पडझड सावरण्यात गेला. त्यामुळे संघाचे काम, संघाचे तत्त्वज्ञान याबद्दल चिंतन करायला अवकाशच मिळाला नाही. परंतु थोडे स्थिरस्थावर झाल्यावर १९५४ साली एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. ९ मार्च १९५४ ते १६ मार्च १९५४ या काळात झालेली ही चिंतन बैठक सिंदी या गावीच झाली होती. डॉ. हेडगेवार यांच्या काळातील आणि उपस्थितीतील संघाची पहिली चिंतन बैठक याच ठिकाणी झाली होती. १५ वर्षांनंतर अनेक महत्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि जीवनमरणाच्या संघर्षानंतर होणारी ही बैठक सिंदी येथेच व्हावी हे संघ कार्यातील सातत्य आणि भावप्रवाह या दृष्टीने लक्षणीय म्हणावे लागेल. ज्या स्थानी संघ संस्थापकांच्या मार्गदर्शनात संघाच्या कामाला विशिष्ट दिशा लाभली त्याच जागी ही चिंतन बैठक झाली. बंदीकाळात झालेली पडझड, आलेली निराशा, मरगळ या साऱ्यातून पुढे जाण्यासाठी, बैठकीतील चिंतनासोबतच त्या स्थानानेही नक्कीच योगदान दिलेले आहे. या बैठकीत जिल्हा वा त्याहून मोठ्या क्षेत्राची जबाबदारी असणारे ३०० प्रचारक सहभागी झाले होते. या बैठकीत गुरुजी पूर्ण वेळ उपस्थित होते आणि त्यांची पाच भाषणे झाली होती. ९ आणि १० मार्च १९५४ रोजी एकेक भाषण, १५ मार्च १९५४ रोजी दोन भाषणे आणि शेवटल्या दिवशी १६ मार्च १९५४ रोजी एक भाषण अशी एकूण पाच भाषणे झाली होती. संघकार्याची वैश्विक दिशा, धर्म म्हणजे काय, संघकार्याचे मूलभूत स्वरूप, संघाचे तत्त्वज्ञान, कार्यकर्त्यांचा व्यवहार, कार्याचे सातत्य, कार्याची प्रेरणा आणि या कामासाठी पूर्ण समर्पणाची किंमत मोजण्याची तयारी अशा विविध विषयांवर त्यांनी उपस्थित प्रचारकांना मार्गदर्शन केले होते.

१९६० च्या मार्च महिन्यात अशाच प्रकारची एक प्रदीर्घ चिंतन बैठक इंदोर येथे झाली. संघाचे विभागीय पातळीवरील आणि त्यावरील कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते. ५ मार्च १९६० ते १३ मार्च १९६० असे ९ दिवस ही बैठक चालली. सरसंघचालक गुरूजी देखील या बैठकीला पूर्ण वेळ उपस्थित होते. रोज दिवसभर होणारी चर्चा आणि विचारविनिमय याला अनुसरून गुरूजी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असत. संघाला अभिप्रेत असलेले संघटन, संघाला अभिप्रेत असलेले हिन्दू राष्ट्राचे स्वरुप, संघकार्याचे जागतिक लक्ष्य, समाज व्यवस्था, व्यक्ती व समाजाचे संबंध, स्वयंसेवकांचे जीवन अशा विविध विषयांवर सखोल मंथन व मार्गदर्शन या बैठकीत झाले. त्यानंतर १२ वर्षांनी १९७२ साली मुंबई जवळील ठाणे येथे चिंतन बैठक झाली. गुरुजींची प्रकृती यावेळी ठीक नव्हती. १ जुलै १९७० रोजी त्यांच्यावर मुंबईच्या टाटा रुग्णालयात कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली होती. तरीही त्यांचे प्रवास सुरूच होते. ठाण्याच्या या बैठकीलाही ते उपस्थित होते. परंतु त्यांचे भाषण मात्र बैठकीच्या समारोपाच्या वेळी ३ नोव्हेंबर रोजी झाले. पाश्चात्य आणि हिन्दू समाजरचनेतील मूलभूत फरक काय, याची त्यांनी या भाषणात विस्ताराने चर्चा केली. ५ जून १९७३ रोजी गुरूजींना देवाज्ञा झाली. परंतु त्यानंतरही साधारण दर १२ वर्षांनी संघाची चिंतन बैठक होत असते. अनेक प्रकारच्या वैचारिक, व्यावहारिक आणि संघटनात्मक विषयांवर यात सखोल विचार होतो आणि कार्यवाही संबंधीचे निर्णय घेतले जातात. प्राचीन काळी भारतातील ऋषीमुनी दर १२ वर्षांनी एकत्र येऊन देश, धर्म, समाज याबद्दल सखोल चिंतन करीत असत आणि त्या चिंतनाच्या आधारे समाजाचे मार्गदर्शन करीत असत. तीच पद्धत संघाने अवलंबिली आहे.

या औपचारिक बैठकांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या अनौपचारिक बैठकांचेही योगदान संघाच्या कामात मोठे आहे. अगदी सुरुवातीपासून या अनौपचारिक बैठका होत आल्या आहेत. संघाची सुरुवात डॉ. हेडगेवार यांच्या घरीच झाली. नागपूरच्या जुनी शुक्रवारी भागात असलेल्या या घरातल्या वरच्या मजल्यावरील मोठ्या दालनात अशा अनेक बैठकी झाल्या आहेत. डॉ. हेडगेवार सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने आणि त्यांच्या लोकसंग्राहक स्वभावामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा सतत राबता असे. डॉ. हेडगेवार यांनी देशकार्य हेच आपल्या जीवनातले एकमेव कार्य ठरवल्यामुळे ते लोकांना नेहमीच उपलब्ध असत. त्यामुळे त्यांच्या घरी गप्पांचा अड्डा नेहमीच रंगत असे. त्यात थट्टाविनोद, मस्करी यांच्यासह देश, समाज, आंदोलने, संघ यावरही सतत चर्चा, मंथन, माहितीची देवाणघेवाण होत असे. या सोबतच कामासाठी माणसेही मिळत असत. डॉ. हेडगेवार हे माणसांचे पारखी होते. प्रत्येकाचे गुण, अवगुण, क्षमता, आवडी-निवडी यावर त्यांचे बारीक़ लक्ष असे. त्यांच्या नजरेने सारे काही टिपले जात असे. शिवाय प्रत्येकाला प्रेरणा देण्याची त्यांची देवदत्त क्षमता होतीच. यातूनच ते सहज गप्पातून अनेक कामे करीत असत आणि प्रत्येक कामासाठी माणसे मिळवित असत.

संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची अनौपचारिक बैठक देखील उल्लेखनीयच म्हणायला हवी. सकाळ, संध्याकाळच्या शाखेनंतर होणारी गप्पांची अनौपचारिक बैठक. दुपारी पत्रलेखनाच्या वेळी जमून येणारी बैठक. दुपारच्या चहाच्या वेळी होणाऱ्या गप्पा हे सारे मोजमाप करण्याच्या पलीकडचे आहे. या बैठकीत साऱ्यांनाच मुक्तद्वार होते. लहान मुले, महिला, कार्यकर्ते, सामान्य स्वयंसेवक, अन्य क्षेत्रातले कार्यकर्ते, घरच्या कार्यक्रमांचे निमंत्रण द्यायला आलेले लोक असे सगळ्या प्रकारचे लोक असत. या बैठकींमधून कधी कधी सात मजली हास्याचे कारंजेही उसळत असे. तर कधी, अन्य काही कारणाने तेथे उपस्थित असलेल्यालाही सहजपणे वेदोपनिषदांबद्दल काही तरी ज्ञान मिळून जात असे. लोकप्रबोधन, चिंतन, लोकसंग्रह, कार्यकौशल्य अशा अनेक गोष्टी या अनौपचारिक बैठकीतून होउन जात असत.
तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा पिंड पहिल्या दोन सरसंघचालकांपेक्षा थोडा गंभीर वृत्तीचा होता. त्यामुळे सरसंघचालकांची अनौपचारिक बैठक थांबली. त्यातच १९९२ च्या अयोध्या प्रकरणापासून सुरक्षा आदी गोष्टी खूप वाढल्या. त्यातच संघ मुख्यालयावरील हल्ला हीदेखील महत्वाची बाब ठरली. त्यामुळे स्वयंसेवकांचे, लोकांचे कार्यालयात सहजपणे येणेजाणे थांबले. अन्य व्यापही खूप वाढले. त्यातील सरसंघचालकांची व्यस्तताही वाढली. त्यामुळे या अनौपचारिक बैठका संपल्या. सरसंघचालकांशिवाय अन्य ज्येष्ठ कार्यकर्ते, कार्यालयातील निवासी कार्यकर्ते यांच्याही अशा गप्पा व चर्चा बैठकी ही संघाची खासियत म्हणता येईल.

अन्य अधिकारी व कार्यकर्त्यांच्या अनौपचारिक बैठकाही संघवाढीसाठी तेवढ्याच महत्वपूर्ण ठरल्या आहेत. संघ शिक्षा वर्गात अशा बैठका  पाहायला मिळतात. संघस्थानाच्या आधी वा नंतर, बौद्धिक वर्गाला जाता-येताना, भोजनाच्या वेळी अधिकारी वा कार्यकर्त्यांच्या जमून येणाऱ्या बैठका कार्यकर्ता घडणित मोलाची भूमिका बजावतात. शाखेला भेट दिल्यानंतर मैदानावरच जमून येणारी गप्पाष्टके अनेक विषयांची उकल करून जातात. एखाद्या लग्न- मुंजीत चार कार्यकर्ते एकत्र झाले की झाली बैठक. या अशा बैठकींसाठी कार्यकर्तेच असले पाहिजेत असे नाही. दृष्टी असणारा आणि डोक्यात व मनात संघ असणारा कार्यकर्ता कोठेही गेला तरी चार लोक जमवून संघ, समाज, धर्म असं सारं त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. परिचय, संपर्क, माहितीची देवाण- घेवाण, उपक्रम, व्यवस्था, विचार, समस्या अशा अनेक गोष्टी या अनौपचारिक बैठकांतून मार्गी लागतात. विद्यमान सरसंघचालक डॉ. भागवत यांच्याही अशा अनेक अनौपचारिक बैठका आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २ सप्टेंबर २०१५

शनिवार, ४ जुलै, २०१५

भागीरथीच्या तीरी

इ.स. १९०० च्या नोव्हेंबर महिन्यात स्वामी विवेकानंद इजिप्तची राजधानी कैरो येथे होते. त्यांच्यासोबत त्यांची विदेशी शिष्य जोसेफाइन मॅक्लिऑड तसेच प्रसिद्ध गायिका मॅडम काल्व्हे या होत्या. एक दिवस स्वामीजी उदास असल्याचे जोसेफाइनच्या लक्षात आले. मॅडम काल्व्हे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या आल्यावर जोसेफाइन यांनी त्यांना आपले निरीक्षण सांगितले. त्या दोघींनी स्वामीजींना विचारले तेव्हा ते म्हणाले, `मला भारतात गुरुबंधुंच्या सहवासात जावयाचे आहे. भारतात जाऊन मला या जगाचा निरोप घ्यावयाचा आहे. त्यासाठी गुरुबंधुंकडे जावयाचे आहे.' त्यावर मॅडम काल्व्हे म्हणाल्या, `स्वामीजी तुम्ही असे करू नये. आम्हाला तुम्ही हवे आहात.' त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले, `चार जुलै या दिवशी माझं जीवन समाप्त होईल.' त्यानंतर सुमारे दीड वर्षांनी ४ जुलै १९०२ रोजी, वयाची ३९ वर्षे पाच महिने २४ दिवस पूर्ण करून स्वामीजींनी जगाचा निरोप घेतला.

इजिप्तची राजधानी कैरो येथून स्वामीजी सरळ कोलकात्याच्या बेलूर मठात परतले. त्यानंतरचा बहुतांश काळ ते तेथेच होते. अखेरच्या दिवसात देखील त्यांचा निवास बेलूर मठातच होता. शेवटल्या चार-पाच महिन्यात वेळ घालवण्यासाठी त्यांनी आपल्या खोलीत एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे २० खंड आणून ठेवले होते. एक दिवस त्यांचे शिष्य शरच्चंद्र चक्रवर्ती त्यांना म्हणाले, हे सगळे खंड वाचण्यासाठी एक आयुष्य देखील पुरणार नाही. त्यावर स्वामीजी म्हणाले, अरे काय म्हणतोस तू हे? माझे तर १० खंड वाचून सुद्धा झालेत. अन त्यांनी शिष्याला त्यावर प्रश्न विचारावयास लावले आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.

२८ जून १९०२ रोजी स्वामीजींनी स्वामी शुद्धानंद यांना पंचांग घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतरचे काही दिवस ते रोज पंचांग पाहत असल्याचे दिसत असे. बुधवार २ जुलै १९०२ रोजी एकादशी होती. स्वामीजींनी त्या दिवशी शास्त्रशुद्ध उपवास केला. भगिनी निवेदिता त्याच दिवशी त्यांना भेटायला मठात आल्या. दोघांमध्ये विविध विषयांवर बोलणं झालं. मग विवेकानंदांनी त्यांना खाऊपिऊ घातले. सगळे पदार्थ स्वहस्ते त्यांना दिले. निवेदितांचे खाणे आटोपल्यावर स्वामीजींनी स्वत: त्यांच्या हातावर पाणी घातले आणि त्यांचे हात पुसून दिले. निवेदितांना अवघडल्यासारखे झाले. त्या म्हणाल्या, `स्वामीजी खरे तर हे सारे मी आपणासाठी करायला हवे.' त्यावर स्वामीजी उद्गारले, `का? जिझसने तर आपल्या शिष्यांच्या पायावर पाणी घातलं होतं.' निवेदितांच्या मनात आलं- `पण ती त्यांच्या आयुष्यातील अखेरची वेळ होती.' मनातील ही भावना रुद्ध कंठामुळे मुखातून मात्र बाहेर पडली नाही. या घटनेच्या तीन दिवस आधी स्वामीजींशी कामाच्या संबंधात प्रदीर्घ चर्चा करून परतताना निवेदिता म्हणाल्या होत्या- `माझं एखादं म्हणणं मान्य नसेल तर तसं सांगा, पण आपलं मन माझ्यापासून दूर जाऊ देऊ नका.' अन २ जुलै रोजीच्या भेटीत त्यांनी निवेदितांच्या मनावरील मळभ दूर करून टाकले.

शुक्रवार ४ जुलै १९०२. स्वामी विवेकानंदांचा पृथ्वीतलावरील अखेरचा दिवस. स्वामीजी त्या दिवशी नेहमीपेक्षा थोडे लवकर उठले. चहा घेऊन ते पूजाघरात ध्यानासाठी गेले. कधी नव्हे ते खिडक्या, दारे बंद करून त्यांनी जवळपास तीन तास ध्यान केले. तीन तासांनंतर कालीमातेवरील एक भजन आपल्या मधुर आवाजात गुणगुणत ते बाहेर आले. सगळ्यांसह भरपूर नाश्ता केला. त्यानंतर मठापुढील मोकळ्या जागेत ते फेऱ्या घालू लागले. त्यावेळी स्वगत बोलल्यासारखे ते म्हणाले- `आज दुसरा विवेकानंद असता तर तोच समजू शकला असता की या विवेकानंदाने या जगासाठी काय केले.' काही क्षण गेल्यावर ते पुढे म्हणाले, `अशी वेळ येईल जेव्हा असे कैक विवेकानंद जन्माला येतील.' त्यांच्यासोबत फिरत असलेले स्वामी प्रेमानंद यांनी त्यांचे हे स्वगत नोंदवून ठेवले. आपल्या असामान्य कर्तृत्वाचं भान आणि नम्रतेची भावना असे दोन्ही त्यांच्या या उद्गारात प्रकट झाले आहे.

काही वेळाने त्यांनी शुद्धानंदांना शुक्ल यजुर्वेदाची पोथी आणायला सांगितले. पोथी आणल्यावर त्यातील सुषुम्नेचा उल्लेख असलेला मंत्र आणि त्यावरील टीका त्यांनी वाचून घेतली आणि शुद्धानंदांना म्हणाले, `टीकाकारांचे मत काहीही असो. तंत्रमार्गात सुषुम्ना नाडीचा जो अर्थ आणि तिचे जे महत्व सांगितले आहे, त्याचं बीज या वैदिक मंत्रात आहे असं माझं मत आहे. तुम्ही याचा शोध घ्या आणि काही नवीन प्रकाश टाकता आला तर पाहा.' त्यानंतर दुपारचे जेवण झाल्यावर त्यांनी मठातील ब्रम्हचाऱ्यांचा व्याकरणावरील वर्ग घेतला. सुमारे तीन तास त्यांनी ब्रम्हचाऱ्यांना लघुकौमुदी शिकवली. संध्याकाळ टळल्यावर स्वामी प्रेमानंदांना सोबत घेऊन ते बेलूर बाजारापर्यंत फिरून आले. परतल्यावर मठातील सगळ्यांशी बोलून ते आपल्या खोलीत गेले.

खोलीत गेल्यावर त्यांनी एक जपमाळ मागवली. शिष्याला दाराशी थांबायला सांगून तासभर ते जपमाळ ओढत ध्यानस्थ बसून होते. नंतर बिछान्यावर आडवे झाले. उकडत असल्याने शिष्याला खिडक्या उघडायला सांगितल्या आणि आपले तळपाय चोळायला सांगितले. शिष्य तळपाय चोळत होता. विवेकानंदांच्या हातात जपमाळ तशीच होती. एकदोनदा त्यांनी कूस बदलली. थोडा वेळ तसाच गेला. स्वामीजींनी एक दीर्घ श्वास घेतला. सुमारे मिनिटभराने पुन्हा तसाच एक दीर्घ श्वास घेतला. त्यानंतर काहीच हालचाल नाही. शिष्य घाबरतच खाली आला. विवेकानंदांना काहीतरी झाले असे त्याने सांगितले. प्रेमानंद आणि निश्चयानंद लगेच वर गेले. त्यांनी श्रीरामकृष्णांचे नाव घेण्यास प्रारंभ केला. समाधी लागली असल्यास उतरेल असा त्यांचा अंदाज. थोड्या वेळाने नाडी पाहिली तर ती लागत नव्हती. तेव्हा स्वामी अद्वैतानंदांनी निर्भयानंदांना डॉ. महेंद्रनाथ मुजुमदार यांच्याकडे पाठवले. डॉ. महेंद्रनाथ मुजुमदार रात्री साडेदहाच्या सुमारास बेलूर मठात पोहोचले. त्यांनी तपासणी केली आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी, स्वामीजींनी देहत्याग केल्याचे जाहीर केले.

डॉ. महेंद्रनाथ मुजुमदार यांच्या म्हणण्याप्रमाणे हृदयक्रिया बंद पडून स्वामीजींचे निर्वाण झाले. डॉ. बिपीनबिहारी घोष यांचे निदान मात्र थोडे वेगळे होते. विवेकानंदांच्या डोळ्यात रक्त साकळले होते आणि नाकातून व तोंडातून किंचित रक्तस्राव झाला होता. त्यावरून डॉ. घोष यांचे निदान असे की, मेंदूतील एखादी शीर तुटून प्राण गेला असावा. गुरुबंधुंच्या मते मात्र, डोळे, नाक आणि तोंडाशी रक्त होते म्हणजे प्राण समाधी अवस्थेत ब्रम्हरंध्राच्या द्वारे गेला. पाच जुलैची सकाळ उजाडली. सगळीकडे वार्ता पसरली. हजारो लोक अंत्यदर्शनासाठी लोटले. भगिनी निवेदिता देखील आल्या. पार्थिवाजवळ बसून त्या वारा घालू लागल्या. विवेकानंदांची आई भुवनेश्वरीदेवी यादेखील आल्या. जगद्वंद्य पुत्राचे अंतिम दर्शन घेताना त्यांनाही गलबलून आले. दुपारी दोन वाजता स्वामीजींचे पार्थिव खाली आणले गेले. त्यांच्या पूर्ण शरीरावर भगवे वस्त्र पांघरण्यात आले. निवेदितांच्या मनात आले, त्यांच्या अंगावरील हे वस्त्र आपल्याला आठवण म्हणून मिळाले तर जपून ठेवता येईल. त्यांनी एका संन्याशाला विचारले, `हे वस्त्र अग्नीला अर्पण करणार का?' संन्यासी हो म्हणाले. निवेदिता खट्टू झाल्या. सगळ्यांनी अंतिम नमस्कार केला. निरांजने लावण्यात आली, आरती झाली आणि शिष्यांनी विवेकानंदांचा तो निष्प्राण देह खांद्यावरून नियोजित जागेपर्यंत नेला. ही जागाही स्वामीजींनी स्वत:च सांगून ठेवली होती. पार्थिव चितेवर ठेवण्यात आले. मंत्र म्हटले गेले आणि पाहता पाहता एका योग्याचा, एका cyclonic hindu monk चा, एका युगपुरुषाचा, एका श्रेष्ठ आध्यात्मिक पुरुषाचा, हिंदू धर्माची- हिंदू समाजाची अन हिंदुस्थानची विजयध्वजा उत्तुंग उचलून धरणाऱ्या एका कर्मवीराचा पावन देह पंचत्वात विलीन झाला. गंगेच्या ज्या काठावर विवेकानंदांना अग्नी देण्यात आला, त्याच्या अगदी विरुद्ध टोकाला गंगेच्या दुसऱ्या तीरावर १६ वर्षे आधी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना अग्नी देण्यात आला होता. हळूहळू ज्वाला भडकत होत्या. सर्वत्र नि:शब्द शांतता होती. निवेदिता देखील निश्चलपणे त्या ज्वाळांकडे पाहत बसल्या होत्या. तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली आणि विवेकानंदांच्या शरीरावरील भगव्या वस्त्राचा एक जळालेला छोटासा तुकडा निवेदितांजवळ येउन पडला. त्या वातावरणातही त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. आठवण म्हणून वस्त्र मिळावे ही त्यांच्या मनीची हाक गुरूने ऐकली होती. त्यांनी चटकन तो तुकडा उचलून घेतला आणि अखेरपर्यंत जपून ठेवला.

आजही बेलूर मठात स्वामीजींची खोली आणि त्यांना अग्नी देण्यात आला त्याजागी त्यांचे मंदिर पाहता येते. बाजूनी वाहणारा, गंगासागराकडे निघालेला भागीरथीचा अथांग प्रवाह या विश्वप्रतापी पुत्राचा महिमा आल्यागेल्यांना अभिमानाने सांगत असतो.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार ४ जुलै २०१५

मंगळवार, १६ जून, २०१५

डाळींचा प्रश्न आणि विवेकानंद

सध्या डाळींचा विषय ऐरणीवर आला आहे. आपल्या राज्यकर्त्यांमधील दूरदृष्टीचा अभाव आणि कर्मदरिद्रीपणा यांचे हे उत्तम उदाहरण आहे. डाळींचा हा प्रश्न आजचा नाही, तर गेल्या चार-पाच दशकात तो विकसित झाला आहे. दुर्दैवाने आजही आमचे राज्यकर्ते त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत आणि त्यानुसार नियोजनाची योग्य ती दिशा स्वीकारताना दिसत नाहीत. डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या आपल्या देशाला आज डाळींच्या आयातीवर अवलंबून करण्यात आले आहे. आणि डाळींची निर्यात करून रोखीच्या रूपानेही देशाला संपन्न करण्याऐवजी ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांची अर्थव्यवस्था उंचावण्याला मदत करीत आहोत.

या डाळींच्या संदर्भात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी विचार केला होता आणि तो पाहिला की, आपले कर्मदरिद्रीपण अधिकच नजरेत भरते. आपल्या सगळ्या गुरुबंधूंना उद्देशून स्वामीजींनी स्वामी रामकृष्णानंद यांना १८९४ साली एक पत्र लिहिले होते. त्यात ते लिहितात- `उडीद किंवा इतर कोणत्याही डाळी इकडे नाहीतच. असल्या वस्तू असल्याचेही इकडच्या लोकांना माहीत नाही.' सुमारे वर्षभरानंतर स्वामी त्रिगुणातीतानंद यांना न्यूयॉर्क येथून १७ जानेवारी १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात पुन्हा याच विषयाची चर्चा करताना स्वामीजी लिहितात- `मुगाच्या, तुरीच्या डाळीचा व्यापार इंग्लंड व अमेरिकेत किफायतशीरपणे चालू शकेल, असे रामदयालबाबूंना कळवा. डाळींच्या वरणाचा जर योग्य रीतीने प्रचार झाला तर लोक त्या आवडीने वापरू लागतील. लहान लहान डब्यात घालून व त्यावर त्या कशा तयार करावयाच्या हे छापून जर डाळी घरोघर खपविल्या तर त्यांना खूप मागणी राहील. तसेच त्या येथे साठवून ठेवण्याचीही काही व्यवस्था करायला हवी. त्याचप्रमाणे मुगवड्या वगैरेसारख्या वस्तूदेखील येथे मोठ्या प्रमाणावर खपू शकतील. साहसयुक्त उद्योगाची आवश्यकता आहे.'

आज जगातील अनेक देश असे आहेत जे काहीही पिकवित नाहीत. आपल्या अन्नगरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असलेल्या या देशांना अन्न मिळणे बंद झाले तर काय होईल? माणूस, अन हो- केवळ भारतीयच नव्हे तर पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही माणूस अन्नाशिवाय राहू शकणार नाही. अगदी शुद्ध मांसाहारी माणूससुद्धा भाजीपाला, धान्य, डाळी, तेल, मसाले इत्यादींशिवाय राहू शकणार नाही. एवढेच नाही तर मांसाहारासाठी लागणाऱ्या प्राण्यांचे पोटसुद्धा वनस्पतींवरच अवलंबून असते. अन्न आणि अन्य वनस्पती यांच्यासाठी जमीन हवी, माती हवी. स्वत:ला `कोणीतरी' आणि `काहीतरी' समजून माणूस या मुलभूत गोष्टीकडे जे दुर्लक्ष करीत आहे ते त्याच्याच मुळावर यायला फार वेळ लागणार नाही.

अवघ्या काही दशकात येऊ घातलेल्या या परिस्थितीचा- संगणक, भ्रमणध्वनी, गाड्या आणि विकासाच्या कल्पनांमध्ये रममाण झालेला आणि `युवा'पणाची टिमकी वाजवणारा आजचा युवा कसा सामना करेल? की आमची मानसिक, बौद्धिक दृष्टीच अधू झालेली आहे? `आपला देश शेतीप्रधान आहे. शेतीतून किती रोजगार मिळणार? त्यासाठी शेतीवरील भार कमी करण्याची गरज आहे,' अशी वाक्ये आमचे नेतेच नव्हे तर तुम्ही आम्हीही अशा थाटात उच्चारतो की, शेती म्हणजे खूप काहीतरी वाईट गोष्ट आहे. शेतीवरील भार कमी करायला हवा याचा आमचा व्यवहारातील अर्थ शेती कमी करायला हवी हाच आहे. शेतीचा विचार अर्थकारणाच्या संदर्भात व्हावा की समग्र जीवनाच्या संदर्भात? आम्हाला जगायचे आहे की पैसा साठवायचा आहे? आम्हाला जगायचे आहे की विकास (?????) साधायचा आहे? शेतीप्रधान अर्थव्यवस्था शेतीविहीन करणे शहाणपणाला धरून होईल का? तरीही जमिनी अकृषक करण्याचा सपाटा लावायचा, त्यावर टोलेजंग व्यावसायिक वा निवासी इमारती बांधायच्या, आम्ही त्यामागे धावायचे, असेच चालू द्यायचे का?

स्वातंत्र्य मिळाले त्यावेळच्या लोकसंख्येत केवळ तिप्पट वाढ झाली आहे. इमारती मात्र त्याहून कितीतरी पटीने वाढल्या; संख्या आणि मजले या दोन्ही अर्थाने. तरीही आम्हाला घरे पुरत नाहीत. याचे गौडबंगाल काय आहे हा प्रश्नही न पडण्याइतके आंधळे झालो आहोत आम्ही? एकीकडे बाईचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तिची बाळंतपणे मर्यादित करण्याचा प्रयत्न करायचा आणि जमिनीतून वर्षाला तीन तीन पिके घेण्याचा खटाटोप करायचा? भूमाता म्हणून जाणीव वगैरे ठेवा बाजूला, पण जमिनीचाही कस वगैरे असतो हे तरी लक्षात घेणार की नाही? आपला स्वार्थ, हेकेखोरपणा, विक्षिप्तपणा, अफलातील कल्पना सोडण्यासाठी आम्हाला किती किंमत मोजायची आहे? किती किंमत मोजली म्हणजे आमचे समाधान होणार आहे तो निर्माताच जाणे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १६ जून २०१५

शुक्रवार, १२ जून, २०१५

पुलंची भाषणे- भावानंदाचे सचैल स्नान

(पुलंच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त लिहिलेला लेख)

पुलंची भाषणे- भावानंदाचे सचैल स्नान

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पु. ल. देशपांडे स्वर्गवासी झाल्याला एक वर्षं झालं. विनोदी लेखक, संगीतज्ञ, नट, वक्ता, नाटककार, चित्रपट अभिनेता, सामाजिक जाणीवा सतेज असणारा कार्यकर्ता अशा विविध नात्यांनी साऱ्यांना त्यांचा परिचय होता. परंतु या साऱ्या भूमिकांमधील विनोदी लेखक हीच त्यांची भूमिका जनमानसात अधिक दृढमूल झाली होती. मात्र, दर्जेदार विनोदनिर्मितीसाठी जीवनाचं सर्वगामी दर्शन घेण्याची प्रज्ञा असावी लागते. स्वत: पु. ल. याविषयी एका ठिकाणी म्हणतात की, `विनोदी लेखकालाही नुसतेच विसंगतीवर बोट ठेवून भागत नाही. त्यामागच्या कारुण्याचे दर्शन घडावे लागते.' त्यांना स्वत:ला जीवनातलं कारुण्याचं हे दर्शन घडलं होतं. त्यांचा निर्भेळ विनोद चिंतनशील आत्ममग्नतेतून प्रसूत झालेला असतो. पुलंची भाषणे त्यांच्या व्यक्तिमत्वातील या चिंतनशीलतेचा, परिपक्व जाणिवांचा, नीरक्षीरविवेकाचा व प्रसंगी निर्भयतेचाही मनोज्ञ साक्षात्कार घडवतात.

पु. ल. देशपांडे यांच्या भाषणांचे तीन संग्रह मुंबईच्या परचुरे प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेत. `श्रोतेहो!', `मित्रहो!', `रसिकहो!' अशा शीर्षकांनी प्रसिद्ध झालेल्या या तीन खंडांमध्ये त्यांची ४३ भाषणे संकलित करण्यात आलेली आहेत. या भाषणांच्या अनुक्रमणिकेवरून साधी नजर फिरवली तरीही आपण स्तिमित होऊन जातो.

`मित्रहो!' या पुस्तकात त्यांची साहित्यविषयक १४ भाषणे संकलित करण्यात आली आहेत. त्यात इचलकरंजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणापासून तो बडोद्याच्या मराठी वाड्ग्मय परिषदेतील अध्यक्षीय भाषणांपर्यंत व वाईच्या साहित्य संस्कृती मंडळापुढे केलेल्या भाषणापासून तर दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणांचा समावेश आहे. मॉरिशस व न्यू जर्सिच्या परदेशस्थ मराठी भाषिकांपुढील भाषणेही त्यात आहेत. या सर्वच साहित्य विषयक भाषणातून त्यांनी रसिक व समीक्षक या दोन्ही नात्यांनी मराठी साहित्य क्षेत्राचा विविधांगी आढावा घेतला आहे. साहित्यातील गहन प्रश्नांचा वेध घेण्यापासून त्यातल्या अनेक अंतर्विरोधांची चिकित्सा करण्यापर्यंतचा आवाका व पल्ला या भाषणांमधून दृग्गोचर होतो. साहित्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन आनंदवादी आहे. जुन्याचा अभिमान व नव्या जाणिवांचे मन:पूर्वक स्वागत यांचा नितांतसुंदर मिलाफ त्यांच्या साहित्यविषयक चिंतनातून जाणवतो. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत शांताबाई शेळके म्हणतात त्याप्रमाणे, `पुलंच्या वाड्ग्मय अभिरुचीची पाळेमुळे भूतकालीन साहित्यात रुजली आहेत, पण स्वागतोत्सुक दृष्टी मात्र भविष्यकाळाचा वेध घेत आहे.' साहित्यातील नवता, अभिव्यक्ती, विविध प्रवाह, त्यांची ताकद व त्यांच्या कमतरता, भाषा; याविषयीचे सखोल चिंतन पुलंनी या भाषणांमधून मांडले आहे.

`साहित्यात जसे असामान्य लेखक असतात तसे असामान्य वाचक हवेत,' असे ज्यावेळी पुलं आपल्या भाषणात म्हणतात त्यावेळी त्यांना साहित्याच्या व्यवहाराचीही डोळस जाण असल्याचे दिसून येते. पुलं जुन्या जमान्यात वावरतात असा आरोप त्यांच्यावर अनेकदा होत असे. त्याबद्दल ते म्हणतात, `आयुष्यात जिथे जिथे काव्य आढळलं ती स्थानं आणि ते प्रसंग विसरता येत नाहीत. मी मूर्तीपूजा करीत नाही, पण लहानपणी देवळात पंचारतीने उजळलेल्या गाभाऱ्याची पाहिलेली शोभा मी विसरू शकत नाही. मला विजेचा दिवा आवश्यक वाटतो, उपयुक्त वाटतो, पण समईची ज्योत जिवंत वाटते.' साहित्यातील सुगमता व दुर्बोधता यावरील चिंतन श्रोत्यांपुढे मांडतानाही पुलं एक सुवर्णमध्य साधतात. `सर्वांनीच अगदी शालोपयोगी लिहिले पाहिजे, असा आग्रह का असावा?' असा सवाल करतानाच, `एखाद्याला प्रसादयुक्त लिहिता येते हा मात्र त्याचा अवगुण ठरू नये !' असा इशाराही ते देतात. मानवी जीवनातल्या सुख व दु:ख या दोन्हींचे साहित्यात काय स्थान असते हा मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणतात, `ज्येष्ठ साहित्यिकांनी सुखाची व दु:खाची भव्य चित्रे काढली आहेत. डोतोव्हस्की सारख्यांनी अत्यंत दु:खमय जीवनातून ललितकृतींच्या सुवर्णमूर्ती निर्माण केल्या ! दु:खाचे चित्र रडके असते म्हणून कुणी सांगितले?'

साहित्याचा कस व साहित्याची प्रत यांचीही चर्चा पुलंनी आपल्या भाषणातून केली आहे. साहित्यातील अनेक निकृष्ट बाबींचेही विश्लेषण त्यांनी केले असून जागतिक रंगमंचावरील दोन महाभयंकर युद्धांचे परिणाम साहित्यावर कसे झाले आहेत याची त्यांनी फोड करून दाखवली आहे. साहित्य व साहित्य निर्मितीला अत्यंत उदात्त पातळीवर नेउन ठेवताना पुलं म्हणतात, `आजच्या भयग्रस्त जगाला, सामाजिक आणि राजकीय आपत्तींनी त्रस्त झालेल्या समाजाला धीर देण्याचे कामही द्रष्ट्या साहित्यिकाचेच आहे.'

नाट्य व संगीत विषयक चिंतन

`रसिकहो' या संकलनात पुलंची नाट्य व संगीत विषयक नऊ भाषणे संग्रहित केलेली आहेत. विषयांची विविधता हे याही भाषणांचे वैशिष्ट्य आहे. नागर रंगभूमी, तमाशाचा फड, अभिनयसाधना, नाट्य सादरीकरण प्रक्रिया, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिक्षणाचे तंत्रमंत्र आदी मार्गांनी त्यांचा चिंतनप्रवास उलगडत जातो. ही भाषणे निव्वळ तात्विक नाहीत व ती आपल्याला नाटकाकडे पाहण्याचा एक निकोप दृष्टीकोन देतात. नांदेडच्या अ.भा. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना पुलंनी आपली नाट्यविषयक भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, `माझी भूमिका ज्ञात्याची नसून भक्ताची आहे. साहित्य, संगीत, नाट्य हे माझ्या भक्तीचे विषय आहेत. कलेची गुढे चिकित्सक बुद्धीने उलगडण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. नाटके लिहिणे, नाटके करणे, नाटके पाहणे यात मी रमतो !' परंतु यात त्यांच्या विनयशीलतेचा भाग मोठा आहे. नाट्यकृतींचे वाड्ग्मयीन सौंदर्य, सादरीकरणाची प्रक्रिया, तसेच जातिवंत रसिकाची मनोभूमिका यांचे समरस होऊन विश्लेषण करतानाच, रंगभूमीवरील उणीवा व रसास्वादनातील विघ्ने यांचेही चित्र ते परिणामकारकपणे उभे करतात. नाट्यकला, नाट्यव्यवसाय, त्याची सांस्कृतिक व आर्थिक बाजू इत्यादी अनेक बारीकसारीक बाबींचाही उहापोह ते आपल्या भाषणांमधून करतात.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या शिक्षणावरील त्यांची दोन भाषणे या संग्रहात आहेत. शास्त्रीय संगीताचं त्यांचं ज्ञान वादातीत आहे. या क्षेत्रातील आव्हानांचीही त्यांना जाण आहे. पण शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाबद्दल त्यांनी व्यक्त केलेले विचार शिक्षण तज्ञान्नाही अंतर्मुख करणारे आहेत. नाट्याचार्य खाडिलकरांच्या नाट्यलेखनाचा परामर्श घेणारी तीन विस्तृत भाषणे `नाट्यतीर्थावरचा तपस्वी सेनापती' या शीर्षकाखाली समाविष्ट करण्यात आली आहेत. हा केवळ खाडिलकरांचा गुणगौरव नसून त्यांच्या लेखनातील सलग सूत्र शोधण्याचा प्रयत्न आहे. `लोकमान्य टिळक हे त्यांचे दैवत असून देशभक्ती हीच त्यांच्या नाट्यलेखनामागील प्रेरणा होती,' असा निष्कर्ष पुलं काढतात. मात्र, गद्य नाटकांमधून प्रखर व आवेशपूर्ण देशभक्तीचे धडे देणारे खाडिलकर संगीत नाटकांकडे वळल्यावर त्यांच्या नाटकातले ओज, तेज व आवेश हळूहळू मावळत गेल्याचेही ते तटस्थपणे मांडतात.

`रसिकहो' या संग्रहातील `स्निग्धच्छाया - रवींद्रनाथांची' हे अंतिम भाषण एकदम वेगळ्या धाटणीचे आहे. रवींद्रनाथ, शांतीनिकेतन, विश्वभारती याबाबत अत्यंत मृदू, तरल व काव्यमय शब्दात ते आप्तभाव व्यक्त करतात. शांताबाई शेळके म्हणतात त्याप्रमाणे, `साऱ्या निर्मितीकडेच एक अविभाज्य संपूर्णता म्हणून बघणाऱ्या आणि कवीच्या रसलीन वृत्तीतही एक सुंदर अलिप्तता सतत राखणाऱ्या टागोरांचे एक अगदी वेगळे आणि मनाला भारावून टाकणारे दर्शन पुलंच्या या भाषणातून होते.'

कोणत्याही कलेला ओंगळपणाचं वावडं असतं असं नमूद करतानाच `नाटकसुद्धा नाटकी वाटता कामा नये. ही तर या कलेची खरी गंमत आहे' याचं भान ते आणून देतात. नाजूक, सूक्ष्म, तरल संवेदना समजायला समाजाची संवेदनशीलता वाढावी लागते ही जाणीव ते साऱ्यांना करून देतात. `एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातील विसंगती दाखवून तात्पुरता हशा पिकवता येईल; पण प्रवृत्तीतली विसंगती दाखवून हशा निर्माण करणारं नाटक प्रेक्षकांना हसवतं आणि अंतर्मुख होऊन विचार करायलाही लावतं' असं पुलं म्हणतात, त्यावेळी या विनोदी लेखकाची उंची आपल्याला नतमस्तक करते.

विविधरंगी `श्रोतेहो'

`श्रोतेहो' हे पुलंच्या भाषणाचे तिसरे संकलन. यात विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, उपक्रम, समारंभ या निमित्तांनी केलेली २० भाषणे संकलित करण्यात आली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, बॅ. नाथ पै, न. चिं. केळकर, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गजाननराव वाटवे आदी महनीयांवरील पुलंची भाषणे या संग्रहात वाचायला मिळतात. नाट्य, साहित्य, संगीत, चित्रपट क्षेत्रातील हा बहुरूपी `खेळीया' ग्राहकपेठ पुणेने आयोजित केलेल्या समारंभात `सहकारी चळवळ' या विषयावर भाषण करतो हेदेखील या संग्रहातून वाचकांच्या लक्षात येते व आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. साने गुरुजींच्या `स्वप्न आणि सत्य' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीचे पुलंचे भाषणही असेच हृद्य आहे. साने गुरुजी `मातृधर्मी' होते असे सुंदर विशेषण पुलं त्यांना लावतात. नरहर कुरुंदकरांच्या `गोदातटीचे कैलासलेणे' या पुस्तकाचे प्रकाशन करताना केलेल्या भाषणात आजच्या वास्तवाचे परखड विश्लेषण करताना पुलं म्हणतात, `या जगात कोट्यधीशांचे ध्येय माणसांचे गिऱ्हाईक तरी बनवा किंवा मतदार तरी बनवा हेच असते.' याच उथळ प्रवृत्तीचा समाचार घेताना लोकमान्य सेवा संघाच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त केलेल्या भाषणात ते म्हणतात, `काळाबरोबर चालायचं म्हणजे काळातल्या कोठल्या प्रवृत्तीबरोबर चालायचं याचा विचार क्षणोक्षणी करण्याची पाळी आली आहे.'

वक्ता व श्रोता यांच्यातील अंतर कमी करून जणू काही श्रोत्यांशी साधलेला संवादच आहे असे पुलंची ही भाषणे वाचताना वाटत राहते. ते श्रोत्यांना सहजपणे आपलेसे करून घेतात. अत्यंत रसाळपणे, गोष्टीवेल्हाळपणे ते श्रोत्यांशी बोलतात. विविध वाड्ग्मयीन संदर्भ, अवतरणे, प्रसंग पेरत पेरत पुलं भाषणाची रंगत वाढवतात. चिंतनशीलता, बहुश्रुतता, गाढ व्यासंग यामुळे त्यांची भाषणे श्रवणीय व वाचनीय ठरतात. `विनोदी वक्ता' अशी त्यांची रूढ प्रतिमा असली तरीही विनोदाचा अंशही नसलेले त्यांचे भाषण श्रोत्यांना बसल्या जागी खिळवून ठेवते. गंभीर, भावनोत्कट, विचारांना प्रवृत्त करणारे भाषणही पुलं सारख्याच ताकदीने करू शकतात. विनोद हे श्रोत्यांना आपल्या काबूत आणण्याचे वक्त्याचे प्रभावी अस्त्र असते; परंतु वर्ण्य विषयाच्या गांभिर्यात किंवा उत्कटतेत ते विक्षेप आणून श्रोत्यांना विचलित करू लागले तर त्या अस्त्राचा अवलंब करू नये याची त्यांना सुयोग्य जाण आहे व विनोदाच्या अस्त्राचा त्यांनी याच पद्धतीने संयमित उपयोग केलेला आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणातून त्यांची चिंतनशीलता, बहुश्रुतता व गाढ व्यासंग डोकावतो. विविध विषयांवरील भरपूर ज्ञानभांडार ते श्रोत्यांपुढे खुले करतात. पण त्यात ज्ञातेपणाची आढ्यता नसते. प्रत्येक विषयाचा भरगच्च तपशील ते श्रोत्यांना पुरवतात.

संदर्भसंपन्नता हे पुलंच्या भाषणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कोणत्या काव्यपंक्ती, वचने, सुभाषिते, कथा, म्हणी, अनुभव श्रोत्यांच्या कानी केव्हा पडतील सांगता येत नाही. उपनिषदे, कालिदास, भवभूती, पतंजली, भरत मुनींपासून केशवसुत, कवी अनिल, कुसुमाग्रज यांच्यापर्यंत; स्टालिनवस्की, ओस्बोर्न, बेकेट, सार्त्र, कर्केगार्द, टॉलस्टॉय, चार्ली चॅप्लिन पर्यंत; तुकाराम, रामदास वा तुलसीदासांपर्यंत; भातखंडे, पलुस्करांपासून नत्थनखां पर्यंत; रागरागीण्यांपासून भजने, ठुमरी, कजरी, होली, कव्वालीपर्यंत अगणित प्रकारची संदर्भसंपृक्तता श्रोत्याला, वाचकाला प्रमुदित करते. कोट्या, विनोद, सुंदर काव्यपंक्ती यांची सतत उधळण सुरु असते. उपरोध, उपहास, अत्युक्ती, उनोक्ती, हजरजबाबीपणा, चतुरालाप यांचा सतत मारा सुरु असतो. देव, धर्म, भक्ती, आध्यात्म यापासून चार हात दूरच राहणाऱ्या पुलंना त्याचे सोवळे मात्र नव्हते. एवढेच नव्हे तर त्यापासूनचे दूरत्व जाणीवपूर्वक जोपासण्याचा बेगडीपणाही नव्हता. त्यातील सौंदर्याची आणि भावसंपन्नतेची तर त्यांना ओढ असावी असे म्हणता येईल. समाजवादी असूनही हिंदुत्वनिष्ठ सावरकरांचे गुणगान करण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. मुळातच वृत्तीतील कद्रूपणा सोडून देऊन मध गोळा करणाऱ्या मधमाशीप्रमाणे गुणग्राहकता, जीवनातलं सत्य- शिव- सुंदर टिपणारी विचक्षणता हाच पुलंचा स्थायी भाव, त्यांच्या सर्व भाषणांमधून डोकावतो. तीन संग्रहातील ही भाषणे हे माहितीचे जसे अफाट भांडार आहे, तसाच तो चिंतनशीलतेचा सुंदर प्रत्यय आहे. ही भाषणे श्रोत्याला, वाचकाला भावश्रीमंत करतात. पुलंच्या या भाषणांमध्ये टाळ्या घेणारी अनेक वाक्ये तर आहेतच, सुभाषिते वाटावीत अशीही वाक्ये जागोजागी आढळतात. एके ठिकाणी पुलं म्हणतात, `ज्यामुळे आपल्या मनाला स्नान घडतं ते तीर्थ असं मी मानतो.' पुलंची ही भाषणं आपल्या मनाला सचैल स्नान घालतात व म्हणूनच त्यांना तीर्थाचं पावित्र्य आलेलं आहे.

१२ जून २००१ रोजी पुलंच्या स्वर्गवासाला एक वर्षं झालं. आपल्या रावसाहेब या व्यक्तिचित्राचा समारोप करताना, रावसाहेबांच्या मृत्यूवर भाष्य करताना पुलं म्हणतात- `आमची लहानशी जीवनं समृद्ध करण्यासाठी परमेश्वरानं दिलेल्या या देणग्या; न मागताच दिल्या होत्या, न सांगताच परत नेल्या.' खुद्द पुलंबद्दल यापेक्षा वेगळं काय म्हणता येईल?

- श्रीपाद कोठे
नागपूर
(शुक्रवार, १५ जून २००१ रोजी लोकसत्तेत प्रकाशित)

शुक्रवार, ५ जून, २०१५

शेवटची विनवणी...

दि. ४ जून १९७३. रात्रीचे सुमारे ९.३० वाजले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील महाल मुख्यालयात- डॉ. हेडगेवार भवनात- दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या डोक्याला तेल लावण्यासाठी नागपुरातील ज्येष्ठ स्वयंसेवक बाबुराव चौथाईवाले यांनी बाटली हातावर आडवी केली. त्याच वेळी बाटलीतील तेल संपले. बाबुराव चौथाईवाले तेलाची दुसरी बाटली आणण्यासाठी वळले. त्यावर गुरुजी त्यांना लगेच म्हणाले- `तेल संपले? ठीक. आता उद्या कोण तेल लावतंय?' कालपुरुषच जणू त्यांच्या मुखाने बोलत होता.

त्यावेळी श्री गुरुजी साधारण तीन वर्षांपासून कर्करोगाने आजारी होते. तरीही अगदी तीन महिने आधीपर्यंत म्हणजे १९७३ च्या मार्च महिन्यापर्यंत त्यांचे देशभर प्रवास, भाषणे, बैठकी, पत्रलेखन, कार्यक्रम सुरूच होते. त्यानंतर मात्र त्यांना चालणे फिरणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे महालच्या डॉ. हेडगेवार भवनातील मागच्या बाजूची वरच्या मजल्यावरील खोली हेच त्यांचे विश्व झाले होते. त्याच ठिकाणी शेकडो लोक त्यांना भेटून जात होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापासून जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत; तसेच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका आणि प्रमुख संचालिका मावशी केळकर यांच्यापासून कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातील असंख्य लोक होते. संघ स्वयंसेवकांची तर मोजदादच नाही.

दि. ४ जून १९७३ ला डोक्याला तेल लावून झाल्यावर गुरुजी अंथरुणावर झोपले नाहीत. रात्रभर खुर्चीतच बसून होते. पहिल्यांदाच असे झाले होते. त्रास खूप वाढला होता. श्वास घेणे खूपच जड जात होते. त्यामुळे प्राणवायूचे सिलेंडर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरे दिवशी दि. ५ जून १९७३ रोजी सकाळी लवकरच त्यांचे स्नान उरकण्यात आले. स्नानानंतर नित्याप्रमाणे संध्या केली. गुरुजींचे स्वीय सचिव डॉ. आबाजी थत्ते त्यांना प्राणवायू देत होते, तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले- `अरे आबा, आज घंटी वाजणार असे दिसते. त्याची काळजी नाही. परंतु संघ शिक्षा वर्ग चालले आहेत. सर्व प्रवासात आहेत. त्यात व्यत्यय येऊ नये अशी इच्छा आहे.' जीवनाच्या शेवटच्या घटिकांमध्येही चिंता एकच होती, संघाच्या कामात व्यत्यय येऊ नये. त्याच दिवशी सकाळी ८.१५ वाजता अटलबिहारी वाजपेयी भेटायला आले. सकाळी स्नानापूर्वी गुरुजींनी हातापायाची नखे काढली. स्नानसंध्या झाल्यावर खुर्चीवर बसले अन कमंडलू उजवीकडे ठेवला. नेहमी कमंडलू डावीकडे ठेवीत असत. पण त्यावेळी उजवीकडे ठेवला. जणू प्रवासाला निघताना सोयीचे व्हावे म्हणून. दुपारी अगदी घोटभर चहा घेतला. उपस्थित डॉक्टरांनी नर्सिंग होममध्ये चलण्याचा आग्रह केला. त्यावर, `उद्या बघू' असे म्हणाले.

दुपार नंतर प्रकृती झपाट्याने घसरू लागली. त्यावेळी सरकार्यवाह बाळासाहेब देवरस यांना नागपूरला बोलावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांना फोन लावण्यात आला. त्यावेळी मोबाईल तर दूरच, साधे दूरध्वनीही सर्वत्र नव्हते. शिवाय, कोड नंबर फिरवून परगावी फोन लावता येत नसे. ट्रंक कॉल बुक करावा लागे. संघ कार्यालयात असलेल्या एकमेव दूरध्वनीवरून निरोपांची सगळी धावपळ कृष्णराव मोहरील करीत होते. संध्याकाळी डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. दम लागण्याचे प्रमाण वाढले होते. संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटे झाली. तेव्हा संघाच्या नित्य प्रार्थनेसाठी जाण्याची तयारी त्यांनी सुरु केली. तेव्हा, `आज इथूनच प्रार्थना करायची आहे' असे डॉ. आबाजी थत्ते म्हणाले. त्यानुसार तिथे उपस्थित सगळ्यांनी तिथेच ध्वज लावून प्रार्थना केली. नेहमीप्रमाणे उभे राहणे शक्यच नव्हते त्यामुळे बसूनच पण स्पष्ट स्वरात गुरुजींनी प्रार्थना म्हटली.

रोजच्याप्रमाणे संध्याकाळी ७.३० वाजता चहा आला. गुरुजींनी चहा घेतला नाही. डॉ. आबाजी थत्ते, बाबुराव चौथाईवाले, विष्णुपंत मुठाळ खोलीतच रेंगाळत होते. त्यांना गुरुजी थोडे रागावले. म्हणाले, चहा घेऊन या. एकेक करून तिघेही चहा घेऊन आले. आठच्या सुमारास दूरध्वनी आला म्हणून डॉ. थत्ते खाली गेले. गुरुजींना लघुशंका लागली. ते उठू लागले. बाबुराव म्हणाले, भांडे आणतो. उठू नका. पण गुरुजी म्हणाले, स्नानगृहातच घेऊन चल. लघुशंका झाल्यावर हातपाय धुतले. ११ चुळा भरल्या. जणू काही महाप्रवासासाठी संपूर्ण शुद्धता. स्नानगृहातून बाहेर पडण्यासाठी वळले आणि बाबुरावांच्या कमरेला धरून त्यांनी त्यांच्या खांद्यावर मान टाकली. विष्णुपंत मुठाळ स्नानगृहाच्या दाराजवळच उभे होते. दोघांनी मिळून त्यांना खोलीत आणून खुर्चीवर बसवले. डोळे बंद, चलनवलन बंद. श्वास मात्र संथ लयीत सुरु होता. बाबुराव पाय चोळू लागले. आबाजी धावत वर आले. त्यांनी प्राणवायू दिला. डॉक्टरांना दूरध्वनी केले. प्रथम डॉ. परांजपे पोहोचले. त्यांनी तपासले आणि म्हणाले, `सर्व संपत आले आहे. let him die peacefully.' पाठोपाठ डॉ. पेंडसे, डॉ. वेचलेकर, डॉ. शास्त्री, डॉ. पांडे, डॉ. इंदापवार आले. संघाचे अधिकारी बाबासाहेब घटाटे, बापूराव वऱ्हाडपांडे, विनायकराव फाटक हेदेखील पोहोचले. सगळे भोवती उभे होते. श्वास हळूहळू कमी कमी होत होता. रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी एक जोरदार श्वास बाहेर पडला आणि गुरुजींची कुडी निष्प्राण झाली.

श्री गुरुजींचे पार्थिव संघ कार्यालयाच्या खालील मोठ्या दालनात आणले गेले. गुरुजी गेल्याची वार्ता नागपुरात आणि देशभर वाऱ्यासारखी पसरली. काही मिनिटातच लोकांचे लोंढे महालच्या डॉ. हेडगेवार भवनाकडे लोटले. त्याचवेळी रेशीमबागेत सुरु असलेल्या संघ शिक्षा वर्गात हे वृत्त कळताच स्वयंसेवकांनी महाल कार्यालयाकडे धाव घेतली. आकाशवाणीने गुरुजींच्या महायात्रेचा कार्यक्रम जाहीर केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जून १९७३ ला सकाळपासून देशभरातील लोक येउन पोहोचू लागले. श्री. एकनाथजी रानडे, श्री. बाळासाहेब देवरस, श्री. लालकृष्ण अडवाणी, श्री. अटलबिहारी वाजपेयी, आचार्य दादा धर्माधिकारी, श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या. पाध्ये, न्या. चांदुरकर, राजे फत्तेसिंगराव भोसले, श्री. राजाराम महाराज भोसले, वसंतराव साठे, जांबुवंतराव धोटे, त्र्यं. गो. देशमुख, लोकमतचे संपादक पां. वा. गाडगीळ अशी अनेक मंडळी येउन गेली. गुरुजींच्या पार्थिवाजवळ अखंड गीतापाठ सुरु होता.

दुपारी चारच्या सुमारास ध्वनिवर्धकावरून शांततेचे आवाहन करण्यात आले. सगळीकडे शांतता पसरली. महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक बाबाराव भिडे यांच्या आवाजाने शांततेचा भंग केला. गुरुजींनी २ एप्रिल १९७३ रोजी लिहिलेल्या तीन ऐतिहासिक पत्रांपैकी पहिले पत्र ते वाचू लागले. संघकार्याची धुरा आपल्यानंतर सरसंघचालक म्हणून श्री. बाळासाहेब देवरस सांभाळतील असे त्यांनी पहिल्या पत्रात नमूद केले होते. त्यानंतरची दोन पत्रे नूतन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी रुद्ध कंठाने वाचली. तिसऱ्या पत्राचा समारोप करताना गुरुजींनी लिहिलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग तर बाळासाहेब वाचूच शकले नाहीत. त्यानंतर नूतन सरसंघचालकांनी महायात्रेला निघालेल्या द्वितीय सरसंघचालकांना पुष्पहार अर्पण केला. भगव्या वस्त्राने झाकलेला या अद्भुत संन्याशाचा पार्थिव देह फुलांनी सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आला आणि गुरुजींची अंत्ययात्रा सुरु झाली.

महालच्या डॉ. हेडगेवार भवनातून सुरु झालेली अंत्ययात्रा पाहण्यासाठी, गुरुजींचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी अफाट जनसंमर्द मार्गावर सगळीकडे जमला होता. संध्याकाळी पावणेसहाला सुरु झालेली ही अंत्ययात्रा दोन तासांनी पावणेआठ वाजता रेशीमबाग मैदानावर पोहोचली. जवळ जवळ तीन लाख लोक या महायात्रेत सहभागी झाले होते. गुरुजींचे पार्थिव रेशीमबाग मैदानात पोहोचल्यावर गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण झाले. त्याचवेळी श्री. माधवराव मुळे, राजमाता विजयाराजे शिंदे, नानाजी देशमुख आदी मंडळी पोहोचली. त्यांनी अंत्यदर्शन घेतल्यावर गुरुजींचे पार्थिव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आले. १९४० साली ज्या ठिकाणी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांना अग्नी देण्यात आला होता, त्याच स्थानाच्या बरोब्बर समोर पूर्वेला गुरुजींच्या चितेला अग्नी देण्यात आला. सरसंघचालकांना प्रणाम देण्यात आला. प्रार्थना झाली. आदल्या दिवशी, ५ जून १९७३ रोजी प्रार्थना म्हणून आणि शेवटी `भारत माता की जय' म्हणून गुरुजींनी पार्थिव देहाची शीव ओलांडली होती. ६ जून १९७३ रोजी तशीच प्रार्थना म्हणून आणि `भारत माता की जय' म्हणून त्यांच्या आत्म्याने पार्थिव विश्वाची सीमा ओलांडली.

स्वत:चे श्राद्धही स्वत:च्या हातांनी उरकून घेतलेल्या या वीतरागी संन्याशाने जाताना हात जोडून सगळ्यांची क्षमा मागितली होती. आपला स्वभाव, आपल्या त्रुटी, आपले दोष यामुळे कोणी दुखावला असेल तर क्षमा करावी अशी विनंती करून अखेरीस संत तुकाराम महाराजांचा अभंग उद्धृत केला होता-

शेवटची विनवणी, संतजनी परिसावी
विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हासी
आता फार बोलो कायी, अवघे पायी विदित
तुका म्हणे पडतो पाया, करा छाया कृपेची

त्यांची स्मृती म्हणून ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला त्याच ठिकाणी यज्ञकुंडाची एक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. राष्ट्रयज्ञात समिधेप्रमाणे आपले जीवन समर्पित करणाऱ्या गुरुजींच्या या समाधीवर तुकाराम महाराजांचा हाच अभंग गुरुजींच्या अक्षरातच लिहिण्यात आलेला आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ५ जून २०१५