गुरुवार, १० जून, २०२१

एकात्म मानववाद (१३)

 

शिक्षण आणि आरोग्य यासाठी शुल्क आकारण्याला दीनदयाळ उपाध्याय यांचा विरोध होता. झाड लावणे आणि जगवणे यासाठी आम्ही झाडाकडून पैसा घेत नाही. उलट आमचे कष्ट ही आमची गुंतवणूक असते. शिक्षण हीसुद्धा समाजाची गुंतवणूक आहे. मुलांना योग्य, चांगले, दर्जेदार शिक्षण मिळाले; तर मोठे होऊन ते समाजासाठी काम करतील; असा आशावाद व्यक्त करून ते म्हणतात; लहानपणापासूनच त्यांना व्यक्तीवादाचे शिक्षण मिळाले तर मोठेपणी ते समाजाचा विचार काय करणार? १९४७ पूर्वी भारतात कुठेही शिक्षणासाठी शुल्क घेतले जात नसे याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. आरोग्य आणि उपचारासाठी पैसा घेणेही अयोग्य असल्याचे मत व्यक्त करून, मंदिरात दर्शनासाठी पैसे घेण्याच्या वृत्तीवर त्यांनी आक्षेप नोंदवला होता. मग प्रश्न निर्माण होतो की, आरोग्य आणि शिक्षणाची सगळी व्यवस्था होणार कशी? त्याचे साधे उत्तर आहे; समाजाच्या परिश्रमांनी, कष्टांनी, उद्योगांनी ही व्यवस्था होईल. कोणी आकाशातून काही देणार नाही. मग पुढचा मुद्दा येतो की, समाजाला आपल्या पुरुषार्थासाठी वाव मिळायला हवा. सगळ्यांना त्याच्या योग्य काम मिळायला हवे. प्रत्येकाला काम हे अर्थव्यवस्थेचे मुलभूत उद्दिष्ट असायला हवे. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनी देखील आम्ही सगळ्यांना कामाची शाश्वती देऊ शकलेलो नाही. उलट अर्थकारणातील वाढत्या केंद्रीकरणामुळे आणि आत्यंतिक तसेच अंदाधुंद यांत्रिकीकरणामुळे बेरोजगारीचे संकट संपुष्टात येण्याचे नाव घेत नाही. यांत्रिकीकरणामुळे कामे कदाचित अधिक, अधिक गतीने, अधिक कुशलतेने, अधिक अचूकतेने होऊ शकतील. परंतु रिकाम्या माणसाचे काय? काम करणे ही यंत्राची गरज नसते, पण जिवंत माणसाची ती गरज असते. काम करणे ही त्याच्या शरीराची, मनाची, बुद्धीची गरज असते. काम करणे ही माणसाची अभिव्यक्ती आणि तो त्याचा विकास असतो. यंत्रांनी माणसाला बेकाम केले तर त्याने काय करायचे? यासोबतच त्याला लाभणाऱ्या रिकाम्या वेळेचे काय करायचे? माणूस कामात व्यस्त राहणे ही समाजाचीही गरज असते. रिकामी माणसे ही समाजावर भार तर असतातच सोबतच त्रासदायकसुद्धा असतात. ईश्वराच्या म्हणा किंवा निसर्गाच्या म्हणा; माणूस नावाच्या या कलाकृतीला काम मिळणे ही मुलभूत आवश्यकता आहे. कामे उरकण्याच्या आणि यंत्रसृजनाच्या बौद्धिक उन्मादात माणसाची हेळसांड, माणसाची अवहेलना, माणसाची उपेक्षा अजिबात अभिष्ट नाही. कामातील त्रुटी, मर्यादा, वेग यावर मात करण्यासाठी माणसाला प्रेरित करून मार्ग काढावा लागेल, प्रसंगी थोडी तडजोड करायलाही हरकत नाही; परंतु यंत्राने माणसाला बाजूस सारणे योग्य म्हणता येणार नाही. या संबंधात आपला अभिप्राय स्पष्टपणे नोंदवताना स्व. उपाध्याय म्हणतात, `यंत्र देश-काल-परिस्थिति निरपेक्ष नही, सापेक्ष है. विज्ञान की आधुनिकतम प्रगति की वह उपज है किन्तु प्रतिनिधि नही. ज्ञान किसी देश विशेष की बपौती नही किन्तु उसका प्रयोग प्रत्येक देश अपनी परिस्थितियों और आवश्यकताओं के अनुसार करता है. हमारी मशीन हमारी आर्थिक आवश्यकताओं के अनुकूल ही नही अपितु हमारे सांस्कृतिक एवं राजनीतिक जीवन मूल्यों की पोषक नही तो कम से कम अविरोधी अवश्य होनी चाहिए.’ (राष्ट्रीय जीवन के अनुकूल अर्थरचना, मुंबई, २५ एप्रिल १९६५)
आज तर आपण दीनदयाळ उपाध्याय यांच्या काळापासून खूप पुढे आलो आहोत. इंटरनेट, artificial intelligence आदी त्यावेळी नव्हते. या नवीन गोष्टींनी समस्या आणि गुंतागुंत आणखीन वाढवली आहे. artificial intelligence वरून तर आता मोठी चिंताही व्यक्त होऊ लागली आहे. दुसरीकडे या यंत्र संस्कृतीला मिळालेली व्यावसायिकतेची जोड हा एक वेगळाच पैलू आहे. स्वच्छता आणि कचरा वा मैला यांची विल्वेवाट लावणे; जोखमीची कामे किंवा शेतीची अनेक कामे; यंत्राच्या साहाय्याने प्रभावीपणे व्हावीत; मानवाचा त्रास, मानवी जीवनाला असलेला धोका कमी करण्याच्या अंगाने यंत्रांचा विकास, उपलब्धता आणि उपयोग वाढावा; याकडे फारसे लक्ष अजूनही दिले जात नाही. उलट मोबाईल, स्वयंचलित वाहने, विद्यमान विमाने किंवा रेल्वेगाड्या यांचा वेग वाढवत जाणे, वातानुकूलन यंत्रे, घरगुती कामांसाठी अधिक यंत्रे; यावरच भर दिला जातो. यंत्रे देश, काळ, परिस्थिती निरपेक्ष नसतात; हा दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार आजच्या कोलाहलात विरून गेला असला तरीही तो प्रस्थापित करण्याची गरज आहे.
प्रसिद्ध विचारवंत वि. वा. नेने यंत्रसंस्कृती संबंधात म्हणतात, 'नव्या यंत्रसंस्कृतीचे आक्रमण कोण्या एका विशिष्ट संस्कृतीवर नसून जगातील सर्वच संस्कृतीवरील आक्रमण आहे. या संस्कृतीने प्राचीन व अर्वाचीन अशा सर्व मानवी संस्कृतींच्या विकासाचा मार्ग अवरुद्ध करून टाकला आहे. एवढेच नव्हे तर त्यांची जीवनमूल्ये, आदर्श आचारविचार, धर्मकल्पना, व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक जीवन या सर्वांमध्ये आपला शिरकाव करून घेतला आहे. या सर्व गोष्टी संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने तिची घोडदौड सुरू आहे. दुसरा मुद्दा असा की, ही एखादी प्रादेशिक संस्कृती नसून जेथे जेथे विज्ञान व तंत्रज्ञान पोहोचले, तेथे तेथे ही यंत्रसंस्कृती पाऊस पडल्यावर तण आपोआप वाढावे अशी झपाट्याने वाढते. अठराव्या शतकात जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यावर औद्योगिक संस्कृतीची गतिमानता व आक्रमकता वाढली; तर विसाव्या शतकात विज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स यांच्या योगे या संस्कृतीने गरुडझेप घेतली. आज संपूर्ण जग या संस्कृतीच्या कवेत गेल्यासारखे असून, इतर सर्व संस्कृती तिच्या बटीक झाल्यासारख्या दिसत आहेत. बरे या संस्कृतीचा कोणी एक ऋषी, मुनि, आचार्य व तत्त्वज्ञ प्रणेता नाही आणि असे असूनही सर्वत्र जनसमुदाय तिच्याकडे वेगाने खेचला जात आहे. तेथे इच्छा अनिच्छेचा प्रश्नच नसतो. या यंत्रसंस्कृतीने राजकीय व आर्थिक साम्राज्यवादाला विस्तारासाठी मोठी संधी मिळवून दिली आहे. एकेकाळी ज्याच्या हाती तलवार त्याचे साम्राज्य अशी स्थिती होती. पुढे ज्याच्या हाती तागडी त्याचे साम्राज्य असा एक काळ होऊन गेला. आज ही यंत्रसंस्कृती तागडी आणि तलवार हे दोन्ही परजून सारे जग पादाक्रांत करावयास निघाली आहे. आतापर्यंत देशोदेशींची जनता जे अल्पस्वल्प सुख व शांति उपभोगीत होती ते यंत्रसंस्कृतीबरोबर येणारे औद्योगिकीकरण व शहरीकरण यांनी हिसकावून घेतले आहे. या संस्कृतीने जीवन गतिमान केले परंतु त्यातला जिव्हाळा आणि जिवंतपणा संपुष्टात आणला. नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचा ऱ्हास सुरू झाला. जीवन धर्मप्रवणतेऐवजी अर्थप्रवण बनले. जुनी गुलामगिरीची पद्धत विचारवंतांनी व सुधारणावाद्यांनी संपविली, पण या औद्योगिक संस्कृतीने नव्या गुलामांची वेतनभोगी दास संस्कृती निर्माण केली आहे. आपले भक्ष्य पकडण्यासाठी महत्प्रयासाने निर्माण केलेल्या जाळ्यात कोळी स्वतः अडकून गुदमरून जावा, तशी काहीशी अवस्था या यंत्रसंस्कृतीने मानवाची केली आहे.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन, खंड १, पृष्ठ १८६)
अर्थकारणात भांडवलाचेही वादातीत महत्व आहे. सृष्टीने दिलेल्या साधनांचा (अर्थकारणाच्या मर्यादित परिघात साधनांमध्ये माणूस देखील येईल. मात्र माणूस हा विशिष्ट गोष्ट साध्य करणारे साधन नाही. मानवाच्या मौलिकतेचा विचार व्हायलाच हवा.) उपयोग करून, स्वत:च्या पुरुषार्थाने केलेल्या उत्पादनातून भांडवल निर्मिती होते. या उत्पादनाचा पूर्ण उपभोग घेतला, त्यातून उद्यासाठी काही वाचवले नाही तर भांडवलनिर्मिती शून्य राहील. ही अतिशय स्वाभाविक अशी बाब आहे. मात्र आज तर स्थिती आणखीनच वेगळी आहे. आजच्या उत्पादनातून उद्यासाठी बचत करणे तर दूर मानवाला आजचे, उद्याचे, परवाचे आणि त्याही पलीकडचे आजच फस्त करण्याची सवय लागलेली आहे; लावण्यात येत आहे. उपभोगवादी मूल्ये रुजवून, मिळालेल्या या आयुष्याचा मस्त आनंदाने उपभोग घ्या असे त्याच्या कानीकपाळी ओरडत बचतशून्य समाज उभे केले जात आहेत. जगभरात लोकांनी क्रेडीट कार्डचा वापर कसा केला याची चर्चा आता नवीन राहिलेली नाही. याच वृत्तीतून देश देशोधडीला लागत आहेत. या उपभोगासाठी केंद्रीय बँका वाट्टेल तसे चलन छापतात. त्यातून चलनवाढीचा राक्षस उभा राहतो. पुढे जाऊन एकाधिकारशाही, शोषण, महागाई, टंचाई जन्म घेतात. हे टाळण्यासाठी आजच्या उत्पादनातून उद्यासाठी बचत करणे हा एकच भांडवलनिर्मितीचा मार्ग ठरतो. भांडवलशाहीत भांडवलदार या बचतीतून भांडवल उभे करतात. समाजवादी व्यवस्थेत सरकार बचतीतून भांडवल उभे करते. दोन्हीचा एकत्र प्रयोग केल्यास भांडवलदार आणि सरकार एकत्रितपणे भांडवलनिर्मिती करून त्यावर ताबा मिळवतात. आज हाच प्रकार पाहायला मिळत असून यालाच crony capitalism म्हटले जाते. दोन्ही पद्धतीत स्वतंत्रपणे किंवा दोन्ही पद्धतींचा संगम करूनदेखील भांडवलाचे स्वामित्व सामान्य समाजाच्या हाती नसते. जगातील संपत्तीचा मोठा वाटा निवडक लोकांच्या हाती असल्याची जी चर्चा अधूनमधून होते ती यामुळेच. उत्पादन पद्धतीच्या मोठ्या प्रमाणावरील केंद्रीकरणामुळे ही अवस्था ओढवते आणि त्या परिस्थितीत सामान्य समाजाच्या संयम आणि त्यागालाही अर्थ उरत नाही, असा दीनदयाळ उपाध्याय यांचा अभिप्राय आहे. यासाठी अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण हवे असे मतही त्यांनी मांडले आहे.
यासंदर्भात स्व. उपाध्याय म्हणतात, 'भांडवल निर्माण करण्यासाठी आवश्यक बाब म्हणजे, संपूर्ण उत्पादन वापरून संपविण्याऐवजी त्यातील काही थोडा भाग पुढील उत्पादनासाठी वापरला पाहिजे. कार्ल मार्क्स अतिरिक्त मूल्यांची चर्चा करतो ती मूल्येच भांडवलाचा आधार होत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्योगपती या अतिरिक्त मूल्यांच्या आधारे भांडवल निर्माण करतात. समाजवादी व्यवस्थेत हेच काम राज्यकर्ते करतात. दोन्ही पद्धतीत संपूर्ण उत्पादनमूल्याचे वितरण कामगारांमध्ये होतच नाही. जर उत्पादन पद्धत मोठ्या मापाची व केंद्रित असेल तर (आणि भांडवलवादी अर्थव्यवस्थेत आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत ती तशीच असते) भांडवल निर्मितीसाठी कामगारांनी केलेल्या त्यागाचे व संयमाचे चीज होत नाही. विकेंद्रीकरणाचा फायदा असा की, अतिरिक्त मूल्यांचा भांडवल म्हणून उपयोग करण्यात कामगारांचाही सहभाग राहतो.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन, पृष्ठ ४७२)
यावर उपाय काय याबद्दल आपले निर्णयात्मक मत देताना ते म्हणतात, 'मजुरांच्या शोषणाच्या दृष्टीने पाहता समाजवादी व भांडवलशाही दोन्ही अर्थरचना सारख्याच आहेत. अतिरिक्त मूल्यांच्या योग्य विभाजनासाठी व उत्पादनातील सहभागासाठी लघुयंत्राधिष्ठित, श्रमप्रधान, विकेंद्रित अर्थव्यवस्था आवश्यक आहे.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन, पृष्ठ ४७४)
आज मात्र बचतीऐवजी कर्जाची अर्थव्यवस्था जगात आकारास आली आहे. यातून भांडवल उपलब्ध होत असले तरीही ते कृत्रिम भांडवल असते. मानवी उद्योग आणि पुरुषार्थ यातून उत्पन्न झालेले ते भांडवल नसते. निर्मितीच्या आधीच भांडवलाची कल्पना करून त्याचा वापर केला जातो. यातून तयार होणाऱ्या कर्ज-व्याज या साखळीत माणूस व्यक्तिशः आणि सामूहिक रूपाने सुद्धा अक्षरशः गुरफटून जातो. शिक्षणासाठीही मोठी कर्जे दिली जातात आणि व्यक्ती पैसा कमावणे सुरू करण्याआधीच कर्ज डोक्यावर घेऊन बसतो. या चक्रात फिरत राहणे हेच त्याचे जीवन होऊन जाते. जगण्यातील आनंद, कर्तव्ये, अवकाश आणि अंतरंग समृद्धी यासाठी त्याच्या जीवनात फार कमी जागा उरते. वेळेची उपलब्धता या चक्रात फिरत राहिल्याने कमी होते. या कर्जाच्या अर्थकारणाला आज वैधता आणि प्रतिष्ठा लाभलेली आहे. त्यावर पुनर्विचार व्हायला हवा हेही खरे आहे. या व्यवस्थेने ज्यांना लाभ झाला त्यांची उदाहरणे देऊन चर्चा करण्याऐवजी; गांधीजी म्हणत त्याप्रमाणे समाजातील शेवटच्या व्यक्तीला डोळ्यापुढे ठेवून या अर्थकारणाचा विचार व्हायला हवा.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'अर्थचिंतन' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा