रविवार, १३ जून, २०२१

एकात्म मानववाद (१६)

 

व्यक्तीची आणि समाजाची आध्यात्मिक मूल्यव्यवस्था घडवण्यात शिक्षण आणि संस्कारांचा वाटा मोठा असतो. स्व. दीनदयाळ उपाध्याय यांनी याबाबतीतही त्यांचे चिंतन मांडलेले आहे. शिक्षण आणि समाज यांचा अनुबंध स्पष्ट करताना पंडित दीनदयाळ उपाध्याय लिहितात - `शिक्षणाचा संबंध जितका व्यक्तीशी आहे त्यापेक्षा जास्त तो समाजाशी आहे. ज्याला कोणत्याही प्रकारचे शिक्षण मिळालेले नाही आणि जो केवळ आपल्या सहज प्रवृत्तींच्या आधारावर जीवनाचे व्यवहार करीत असतो, अशा मानवाची कल्पना आपण करू शकतो. परंतु शिक्षणाशिवाय समाज मात्र संभवत नाही. एखाद्या मानव समूहाला काही विशिष्ट काळापुरती समाज ही संज्ञा दिली जात नसते. त्या समूहात प्रत्येक क्षणाला काही व्यक्तींचा जन्म व काहींचा मृत्यू चालू असतो. एका माणसाच्या आयुर्मर्यादेचा विचार करता एका विशिष्ट कालावधीत मानव समूहाच्या सर्वच्या सर्व घटकांमध्ये भौतिक बदल होत असतो. परंतु असे असूनही जर त्या मानव समूहाचे व्यक्तित्व आणि चेतना जागृत असेल, नवीन घटकांना जुन्या घटकांशी असलेल्या आपल्या संबंधांचे ज्ञान असेल आणि जुन्या घटकांच्या जीवनाच्या अनुभूतीला ते आपली अनुभूती समजून पुढे जात असतील तर त्या समूहाला समाज ही संज्ञा प्राप्त होते. जेव्हा मनुष्य आपल्या मागून जन्मलेल्या माणसांना विभिन्न क्षेत्रातील सारभूत अनुभव प्रदान करतो, तेव्हा त्या प्रक्रियेतून निरंतर गतिमान अशा मानव समूहाची निर्मिती होते. त्यालाच समाज म्हणतात आणि अनुभव प्रसारणाच्या या प्रक्रियेलाच शिक्षण म्हणतात. शिक्षणाशिवाय समाजाचा जन्मही असंभव आहे. म्हणून शिक्षणाचा प्रश्न मूलतः सामाजिक दृष्टीकोनातून पाहिला पाहिजे. आपल्या शास्त्रानुसार हे एक ऋषीऋण आहे. ते प्रत्येकाने फेडले पाहिजे. म्हणून जेव्हा आम्ही भावी संततीच्या शिक्षणाची व्यवस्था करतो तेव्हा तिच्यावर काही उपकार करीत आहोत अशी भावना असू नये. जो एक अमोल ठेवा आपल्याला पूर्वजांपासून प्राप्त झाला, तो भावी पिढीच्या हातात देऊन पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा एक प्रयत्न होय, हाच भाव असला पाहिजे. हाच भाव जॉन बुकनने असा व्यक्त केला आहे- `जर आम्ही भविष्यकाळाला ऋणी बनवू तरच भूतकाळाच्या ऋणातून मुक्त होऊ शकू.' (पं. दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रचिंतन, शिक्षण)
समाजाचे, ज्ञानाचे आणि शिक्षणाचे सातत्य, अन शिक्षण संस्थांचे प्रयोजन यांची चर्चा करताना स्व. उपाध्याय लिहितात - `शिक्षणाची जेवढी व्यापक आणि सखोल व्यवस्था होईल तेवढा समाज अधिक पुष्ट आणि गंभीर बनेल. नवीन पिढीच्या जितक्या अधिक लोकांना जितक्या अधिक प्रमाणात मागचा ज्ञाननिधी प्राप्त होईल, तेवढ्या प्रमाणात नवीन पिढी तो ठेवा घेऊन जीवनाच्या कार्यक्षेत्रात उतरेल. मिळालेल्या ज्ञानाच्या ठेव्यात आपले प्रयत्न व अनुभव यांच्या आधाराने नवीन पिढी वाढ करेल. अशा प्रकारे हा ज्ञाननिधी वाढत राहील. परंतु यासाठी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा ज्ञाननिधी जात असताना, सर्वच्या सर्व, निदान जास्तीत जास्त दिला जावा. यासाठी ज्याप्रमाणे शिक्षणाची व्यापक व विविधतापूर्ण योजना करावी लागेल त्याचप्रमाणे `प्रदेय' ज्ञानातील असारभूत अंगांचा त्याग आणि सारभूत तत्वांचे संरक्षण कुशलतेने केले पाहिजे. यासाठी पूर्वजांकडून आलेल्या संचित ज्ञानाला आत्मसात करून सुबोध बनवतील अशा तज्ञांची आवश्यकता असते. याचमुळे व्यापक अर्थाने समाजातील प्रत्येक घटक शिक्षक असला तरीही शिक्षण संस्थांचा उदय झाला.' (पं. दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रचिंतन, शिक्षण)
समाजातल्या शिक्षणाच्या विविध प्रक्रियांची चर्चा करताना श्री. उपाध्याय लिहितात - `शिक्षणाची तीन माध्यमे आहेत. १- संस्कार, २- अध्यापन, ३- स्वाध्याय. माणसाला समजत नसते तेव्हापासून तो समाजाकडून सर्व बाजूंनी संस्कार ग्रहण करीत असतो. या प्रक्रियेत समाजातील प्रत्येक घटक शिक्षकाचे काम करीत असतो. संस्कार ही दोन्ही बाजूंनी होणारी प्रक्रिया असली तरीही, मनाच्या अनुकरण, संवेदना आणि सूचना या प्रवृत्तीनुसार समर्थ कर्त्याच्या क्रियाच प्रभावी ठरतात. स्वभावतः पूर्वीच्या पिढीच्या आचारविचारांचा संस्कार नवीन पिढीवर होतो. आई वडील, शेजारी पाजारी, गुरुजन, मित्र, सहपाठी, अग्रपाठी, पुढारी हे सर्व विभिन्न प्रकारचे संस्कार समाजावर नित्य करीत असतात. आपल्या क्रियांचा इतरांवरही परिणाम होणार आहे याची त्यांना कल्पना नसते. पण आपल्या कृतीने ते आपल्याबरोबर इतरांनाही प्रभावित व संस्कारित करीत असतात.' (पं. दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रचिंतन, शिक्षण)
शिक्षणाच्या अध्यापन या घटकाची व्याप्ती उलगडून दाखवताना ते लिहितात - `अध्यापन हे शिक्षणाचे सर्वसामान्य साधन आहे. साधारणपणे अक्षरज्ञान आणि पाठ्यपुस्तके किंवा तत्संबंधी पाठ्यक्रम यांचे अध्यापन म्हणजेच `खरे अध्यापन' समजले जाते. परंतु वास्तविक याचा विस्तार मोठा आहे. मानवाच्या ज्ञानातील फारच थोडा अंश भाषेतून व्यक्त केला जातो. त्यातील काहीच भाग लिपीबद्ध केला जातो. म्हणून केवळ लिपी व भाषा यांच्या ज्ञानामुळे शिक्षणाचा उद्देश पुरा होत नाही. व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह आपल्याजवळील ज्ञान दुसऱ्याला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ज्या ज्या क्रियांद्वारे करतो, त्या त्या सर्व क्रियांचा अध्यापनात समावेश होतो. हे अध्यापन शाळा महाविद्यालयातूनच नव्हे तर; घरे, कलाभवने, व्यायामशाळा, क्रीडांगणे, कारखाने, दुकाने, रस्ते, शेते, इत्यादी सर्वत्र होत असते. त्याचप्रमाणे जीवनाच्या केवळ पहिल्या आश्रमातच नव्हे, तर आयुष्यभर निरनिराळ्या प्रकारे अध्यापन चालू असते. प्राचीन काळची कथाकीर्तने आणि हल्लीची चित्रपट, रेडीओ, वृत्तपत्रे इत्यादी सर्व साधने यांचा यात समावेश आहे.' (पं. दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रचिंतन, शिक्षण)
शिक्षणाच्या संदर्भात अध्यापन आणि अध्ययन यांच्यासोबतच स्वाध्याय या अंगाचेही महत्व आहे. श्री. उपाध्याय त्याबद्दल लिहितात - `स्वाध्याय म्हणजे माणसाने स्वत:ला केलेले अध्यापन. स्वाध्यायासाठी लिपीज्ञान आवश्यक असते. पठण, मनन आणि चिंतन यांच्याद्वारा मनुष्य ज्ञान आत्मसात करतो. स्वाध्याय नसेल तर प्राप्त ज्ञान टिकणार नाही. वाढणार नाही. स्वाध्यायावाचून ज्ञान हे जीवनाचे तेजस्वी अंग बनणार नाही. म्हणूनच आपल्याकडे कुलपती दीक्षांत समारंभानंतर स्नातकाला `स्वाध्यायान्मा प्रमद' `स्वाध्यायात खंड पडू देऊ नको' असा उपदेश करीत असत. ग्रंथालय आदींची व्यवस्था स्वाध्यायाला आवश्यक आहे. व्यक्ती स्वाध्यायशील झाली नाही तर, समाजाचा जिवंत व प्रभावी घटक होण्याऐवजी समाजापासून अलग आणि मृतप्राय होऊन समाजाला अहितकर होईल.' (पं. दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रचिंतन, शिक्षण)
याच अनुषंगाने त्यांनी स्वभाषेचे महत्वही विशद केले आहे. ते लिहितात - `केवळ शालेय शिक्षण माणसाची घडण करीत नाही. संस्कारांचे व अध्यापनाचे पुष्कळसे क्षेत्र असे आहे की जे शालेय क्षेत्राबाहेर आहे. जर या दोन क्षेत्रात विरोध उत्पन्न झाला तर विद्यार्थ्याच्या जीवनात एक अंतर्द्वन्द्व निर्माण होते. त्यातून एक समन्वित, एकसंध, सर्वांग परिपूर्ण व अखंड व्यक्तिमत्वाचा विकास होण्याऐवजी त्याच्या प्रकृतीत परस्पर विरुद्ध निष्ठांचा समावेश होतो. व्यक्ती आणि समाज यात एक प्रकारची दरी निर्माण होते. या दृष्टीकोनातून विचार करता शिक्षणाचे माध्यम स्वभाषाच होऊ शकते. भाषा ही केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून ती स्वत: एक अभिव्यक्ती आहे. भाषेतील एकेक शब्द, एकेक वाक्यरचना, म्हणी इत्यादींच्या मागे समाजजीवनाची अनुभूती आणि राष्ट्राच्या घटनांचा इतिहास लपलेला असतो. तसेच स्वभाषा व्यक्तीची निरनिराळ्या कप्प्यातून वाटणी करीत नाही.' (पं. दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रचिंतन, शिक्षण)
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'समाजचिंतन' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा