मंगळवार, ८ जून, २०२१

एकात्म मानववाद (११)

 

अर्थ ही मानवी जीवनातील एक अपरिहार्य आणि आवश्यक बाब. पैसा (चलन) आणि चल-अचल संपत्ती या प्रकारांनी प्रत्येकाला अर्थाचा परिचय असतो. मानवी जीवनात चलन ही बाब येण्याच्या आधी सुद्धा अर्थ ही बाब होतीच. प्रारंभिक आणि प्राथमिक स्वरुपात असली तरी साधनसामुग्री, त्याची देवाणघेवाण होत असणारच. मानवी जीवन त्याशिवाय चालणेच अशक्य. अगदी पुरातन काळापासून या विषयाकडे माणूस गंभीरपणे पाहत आला आहे आणि त्याने त्यासंबंधात सुसूत्रपणे विचारही केला आहे. भारताचा विचार केला तर येथेही हजारो वर्षांपासून अर्थ हा समाजधुरीणांच्या चिंतनाचा विषय राहिला आहे. अगदी रामायण, महाभारतापासून; चाणक्य, विक्रमादित्य, शिवाजी करत करत; आजवर त्याचा प्रवास झाला आहे. उपनिषदात सुद्धा अर्थविचार पाहायला मिळतो. ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्या मंत्रातच `मा गृध: कस्यस्विद धनम’ म्हणजे कोणाच्याही धनाचा अपहार करू नका, असा आदेशच आहे. संत तुकाराम महाराज संत असूनही सांगतात - `जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी’. भारताने मानवी जीवनाच्या ज्या चार पुरुषार्थांची कल्पना केली त्यात अर्थ या विषयाला एक पुरुषार्थ म्हणून स्थान दिले आहे. हजारो वर्षे भारताने अमाप संपत्ती निर्माण केली आहे. सोबतच त्यासंबंधीचे जीवनसापेक्ष चिंतनही केले आहे. गेल्या काही शतकात भारतावरील आक्रमणांनी भारताच्या संपत्तीला ओहोटी लावली तरीही आजसुद्धा पद्मनाभ मंदिर आदीसारख्या ठिकाणी जुन्या संपत्तीच्या खुणा पाहायला मिळतात. मानवी जीवन या पृथ्वीवर राहील तोवर अर्थ ही बाब त्याच्यासोबत राहणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीही या अर्थ पुरुषार्थाबद्दल चिंतन मांडलेले आहे.
इंग्रजांच्या दीड शतकांच्या राज्य कारभारानंतर १९४७ साली भारताने स्वतंत्र होणे हे अनेक अर्थांनी आणि अनेक अंगांनी निराळे होते. भारताने हजारो वर्षांच्या भूतकाळाशी नाते तोडलेले नव्हते आणि त्याच वेळी आपल्या मर्यादांचा त्याग करून एका नवीन युगात, नवीन जगात प्रवेश केला होता. हा प्रवेश कसा होणार, कसा राहणार, कसा राहावा; भविष्याची वाटचाल कशी राहावी यावर समाजधुरिणांनी त्या पारतंत्र्याच्या काळातही चिंतन मांडलेले होते. यासंबंधातील त्यांचा विचारविनिमय आणि प्रयोग गुलामीच्या काळातही सुरूच होते. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोन शीर्षस्थ नेत्यांमध्येही याविषयी विचारविनिमय होत राहिला होता. यासंबंधाने दोघातील मतभेदही व्यापक, मोठे आणि तीव्र होते. भारतीय जनतेने आणि काँग्रेस पक्षाने, एवढेच नव्हे तर खुद्द नेहरूंनीदेखील ज्या गांधीजींना अपार मोठेपण दिले; त्या जनतेने, काँग्रेस पक्षाने आणि नेहरूंनी; गांधीजींचा नैतिक, वैचारिक प्रभाव झुगारून दिला होता. जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले होते. ते त्यांच्या भूमिकांशी प्रामाणिक राहून देश चालवीत होते. अर्थकारणातील उत्पादन, वितरण आणि उपभोग यांचे स्वरूप पूर्णतः बदलू लागले होते. सामाजिक स्वरूप, मान्यता बदलू लागल्या होत्या. जीवनाच्या कल्पना, जीवनाची दृष्टी बदलू लागली होती. भारताबाहेरील जगाच्या कल्पना, प्रयोग, दृष्टी, विचार भारतात शिरत होते. भारताबाहेरील जगाचे अनुभव आणि स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकांचा भारताचा अनुभव; हेदेखील गाठीशी होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी या पार्श्वभूमीवर आपले अर्थचिंतन देशासमोर मांडले. `एकात्म मानववाद’ विशद करण्यासाठी १९६५ साली त्यांची मुंबईत जी चार भाषणे झाली त्यातील चौथे भाषण अर्थ या विषयावरच होते. `राष्ट्रीय जीवन के अनुकूल अर्थरचना’ या शीर्षकाने ते प्रसिद्ध आहे.
या भाषणाच्या सुरुवातीलाच अर्थव्यवस्था कशी असायला हवी यावर भाष्य करताना ते म्हणतात - `अर्थव्यवस्था कैसी हो? हमे ऐसी व्यवस्था चाहिये जो हमारे मानवत्व को विकसित कर सके. हमारे मानव्य को समाप्त न करे. उसके उपर प्रतिकूल प्रभाव न डाले और जिसके द्वारा हम मानव से उपर उठकर देवत्व को प्राप्त कर सके, क्योंकी हमारे यहां मानव जीवन का पूर्ण विकास उसका देवत्व के रूप मे आविर्भाव ही माना गया है. इस उद्देश्य की सिद्धी के लिये अर्थव्यवस्था की क्या मर्यादाए होनी चाहिये इसका विचार करे.’ त्यांच्या समग्र आर्थिक चिंतनाचा गोषवारा यात आलेला आहे. अर्थव्यवस्थेशिवाय मानवी जीवन चालू शकत नाही. मानवी जीवनासाठी अर्थव्यवस्था आवश्यक बाब आहे. मात्र त्याच्या मर्यादाही आहेत. या मर्यादांचा विचारही आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेने मानवाच्या मानवत्वावर विपरीत परिणाम करता कामा नये. उलट ती त्यासाठी सहाय्यक असायला हवी. मानवाचा प्रवास देवत्वाकडे व्हावा ही अर्थव्यवस्थेची दिशा असायला हवी. दुसऱ्या शब्दात अर्थव्यवस्थेने मानवाला पशु बनवू नये. अर्थव्यवस्थेच्या विविध अंगांचा, तपशीलाचा, योजनांचा, व्याप्तींचा, मर्यादांचा, वाढीचा, वेगाचा, स्वीकार अथवा नकारांचा विचार करताना आणि निर्णय करताना; त्यांच्या भाषणातील वर उद्धृत केलेल्या चार ओळी मार्गदर्शक या स्वरूपाच्या आहेत. अमुक विषयाबाबत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे चिंतन काय राहिले असते याची कल्पना या चार ओळींवरून करता येऊ शकते.
लोकांचे भरणपोषण, जीवनाचा विकास, तसेच राष्ट्राची धारणा आणि विकास; यासाठी आवश्यक अशा गोष्टींचे उत्पादन हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक लक्ष्य असायला हवे असे त्यांचे मत होते. अर्थात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा; या गोष्टींना सर्वोच्च प्राथमिकता त्यांना अपेक्षित होती. सगळ्यांच्या या सगळ्या गरजा पूर्ण करणे हे अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवे यावर त्यांचा भर होता. इच्छा वाढवीत जाणे आणि मग त्या पूर्ण करण्याची धावाधाव त्यांना अपेक्षित नव्हती. स्वाभाविक गरजा आणि इच्छा यांच्या पूर्तीसाठी उत्पादन करणे योग्य; तर उद्योगांनी त्यांना वाटते म्हणून तयार केलेल्या उत्पादनांसाठी इच्छा तयार करणे अयोग्य, असा दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार होता. बाजारासाठी उत्पादन करणे ठीक पण उत्पादनासाठी बाजार नको अशी त्यांची भूमिका होती. त्यांचा हा विचार हास्यास्पद वाटू शकतो. दीनदयाळ उपाध्याय भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाचे नेते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. हिंदुत्व विचारांचे पाईक आणि मार्गदर्शक होते. परंतु भारतीय जनसंघाचा आजचा अवतार असलेली भारतीय जनता पार्टी, तसेच रा. स्व. संघ आणि हिंदुत्वाचे समर्थक यांनासुद्धा त्यांचा हा विचार कितपत रुचेल हा प्रश्नच आहे. मात्र आज जगभर सुरु असलेल्या पर्यावरण चळवळी; जगासमोर उभे राहिलेले पर्यावरण संकट, हवामान बदलाचे विषय, मानवी आरोग्याचे विषय, मनोरोगांचे प्रमाण, मानवाला व्यापू लागलेली निरर्थकता यांनी; जबरदस्तीने का होईना; अनिच्छेने का होईना; इच्छांच्या, उत्पादनांच्या आणि उपभोगांच्या निरंतर वाढीचा पुनर्विचार करायला मानवाला भाग पाडले आहे.
स्व. उपाध्याय यांच्या दृष्टीला मात्र हे सारे त्याच वेळी स्पष्ट झाले असावे. त्यामुळेच याच मुंबईतील भाषणात स्वाभाविक इच्छानुगामी उत्पादनाचा विचार मांडल्यानंतर त्यांनी प्रकृतीची चर्चा केली आहे. उत्पादनाचा संबंध प्राकृतिक संसाधनांशी आहे. त्यांचा अंदाधुंद वापर किती दिवस चालू शकेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. प्रकृतीत उपलब्ध असलेले एक साधन संपल्यास दुसरे साधन शोधून काढता येईल. पर्याय विकसित करता येतील असा तर्क उपभोगवादी देत असतात. या तर्काचाही समाचार त्यांनी या भाषणात घेतला आहे. या तर्कातील शक्ती मान्य करूनही, प्रकृतीची काही ना काही मर्यादा असणारच याकडे दुर्लक्ष करता येणार नाही याकडे लक्ष वेधून, संसाधनांच्या अनावश्यक वापराने एक दिवस पश्चात्ताप करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला होता. आज आम्ही त्या पश्चात्तापाच्या बिंदूशी आलो आहोत. त्यामुळेच, विकसनशील देशातील लोक जास्त खाऊ लागल्याने जगात अन्नसमस्या निर्माण झाल्यासारखी विधाने जाणतेही करू लागले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा यांचीही पूर्तता करताना आज सगळ्यांची दमछाक होते आहे. पाण्याची समस्या ज्या अक्राळविक्राळ स्वरुपात आज जगापुढे उभी झाली आहे; तिने संसाधनांचे पर्याय शोधण्याचा मानवी उन्मत्ततेचा दांभिक तर्क पार हवेत भिरकावून दिला आहे.
परंतु दीनदयाळ उपाध्याय यांचे द्रष्टेपण इथेच संपत नाही. याच विषयाचे विवेचन पुढे नेताना ते म्हणतात - `प्रकृती की संपदा की मर्यादा की चिंता न भी करे तो कम से कम इतना तो हमे मानना ही पडेगा कि प्रकृती मे विभिन्न वस्तूओं के बीच एक परस्परावलंबी संबंध है. आज की अर्थव्यवस्था और उत्पादन की पद्धती इस सामंजस्य को बडी तेजी से बिगाडती जा रही है. परिणामत: जहां एक ओर हम नयी नयी इच्छाओं की पूर्ती के लिये नये नये साधन ढुंढ रहे है वहां दुसरी ओर नये नये प्रश्न हमारी संपूर्ण सभ्यता और मानवता को समाप्त करने के लिये पैदा होते जा रहे है. यह विनाशलीला कब तक चलती रहेगी?’ दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्या परस्परावलंबीत्वाकडे या ठिकाणी लक्ष वेधले आहे; ते आज त्यानंतर ५० वर्षांनी अधिक स्पष्टपणे जाणवू लागले आहे. हे परस्परावलंबीत्व केवळ माणूस आणि निसर्ग एवढेच नाही, तर मानवाचे स्वत:चे एकूण मानवी विश्व आणि व्यक्तीव्यक्तीचे स्वतंत्र बाह्य आणि आंतरिक विश्व; यांचेही परस्परावलंबीत्व बिघडून गेलेले आणि त्याच्या अस्तित्वालाच आव्हान देत असलेले प्रत्ययाला येते आहे. देशादेशांच्या सुरक्षेपासून, सायबर घोटाळे आणि सायबर गुन्ह्यांपर्यंत; कौटुंबिक आणि व्यावसायिक सुरक्षेपासून, आत्महत्या आणि हत्यांपर्यंत; मनोविकृतींपासून, विकृत, अतिरेकी आणि ओहोटीला लागणाऱ्या कामभावनेपर्यंत; अक्षरश: मानवी जगण्याच्या सगळ्या अंगांमध्ये, सर्व स्तरावर हे परस्परावलंबन बिघडलेले पाहायला मिळते. त्यातील दुर्दैवाचा भाग हा की, या अर्थव्यवस्थेचे उत्पादन आणि उपभोग घेणाऱ्या; या उत्पादन आणि उपभोगाची कमतरता नसलेल्या लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर केवळ हे परस्परावलंबन नाही, तर आत्मावलंबन देखील वेगाने ढळल्याचा आणि ढळत असल्याचा अनुभव आज सगळे घेत आहेत. त्यामुळेच नाईलाजाने का होईना, हास्यास्पद वाटणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे.
नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत ते लिहितात, 'वास्तविक निसर्गापासून आपण एवढीच साधनसामुग्री व तीही अशाप्रकारे घ्यावी, की झालेली झीज निसर्ग स्वतःच भरून काढू शकेल. उदाहरणार्थ - झाडापासून पाने घेतल्याने झाडाची हानी होत नाही उलट लाभ होतो. परंतु जमिनीपासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या लोभापायी आपण असे प्रयोग करीत आहोत, की ज्यामुळे काही काळानंतर जमिनीची उत्पादनक्षमता संपून जाईल. कारखानदार मशीन वगैरेसाठी घसारा निधीची व्यवस्था करतात. निसर्गाच्या या कारखान्यासाठी मात्र आपण कसल्याही घसार्याची तजवीज करीत नाही. हे कसे चालेल? यादृष्टीने विचार केला तर असे म्हणावे लागेल की, आपल्या अर्थव्यवस्थेचा उद्देश अमर्याद उपभोग हा न ठेवता, संयमित उपभोग हाच असला पाहिजे. निसर्गाच्या स्तनातून दोहन करून आपण जगावे, शोषण करून नव्हे.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन, पृष्ठ ४५७)
दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्या घसाऱ्याची चर्चा केली त्या दिशेने काही प्रयत्न त्यांच्या नंतरच्या काळात झाले. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, मानवी अर्थव्यवस्थेचा घसारा आणि निसर्गाचा घसारा वेगळा राहील. पैसा ही व्यवहार चालवण्यासाठीची मानवनिर्मित गोष्ट आहे. झालेले नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न आणि पर्याय माणसाला पैशाच्या साहाय्याने प्राप्त होऊ शकतात. यंत्रसामुग्रीची दुरुस्ती वा नवनिर्मिती पैशाच्या साहाय्याने होऊ शकते. परंतु निसर्गाचे नुकसान आणि झीज पैशाच्या साहाय्याने भरून निघू शकत नाही. एखादा मोठा वृक्ष तोडल्याने होणारे फळांचे, सावलीचे, प्राणवायूचे, जमिनीची धूप थांबवण्याचे, कार्बन डाय ऑक्साईडच्या शोषणाचे होणारे नुकसान; पैसा वा पैशाने लावलेल्या छोट्या रोपांनी होऊ शकत नाही. निसर्गाचे काही ना काही नुकसान केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे खरे आहे. परंतु हे नुकसान निसर्गाचा अंगभूत वेग आणि नुकसान भरून काढण्याची अंगभूत प्रक्रिया यांच्याशी मेळ खाणारे असले पाहिजे. निसर्गाचा अंगभूग वेग आणि निसर्गाची अंगभूत प्रक्रिया माणसाला अजून फारशी आकलन सुद्धा झालेली नाही. त्यामुळे आपला उपभोगाचा वेग कमी करणे, आपली उपभोगाची इच्छा आणि पद्धत निसर्गाच्या अनुषंगाने बेतणे; हाच पर्याय मानवाला खुला आहे. भौतिक सुखसोयी आणि साधने ज्यांना उपलब्ध नाहीत वा किमान प्रमाणात उपलब्ध नाहीत, त्यांचा विचारही क्रमप्राप्त ठरतो. अशा कोट्यवधी लोकांना चांगले मानवीय जीवन जगता यायलाच हवे. त्यासाठी जमिनीसह अन्य नैसगिर्क साधनांचा वापर करावाच लागेल. या दोहोंचा मेळ कसा घालायचा? यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे - साधनसंपन्न मानवांनी आपल्या इच्छा आणि गरजा नियंत्रित करणे आणि आपल्याकडील अधिकची साधने आणि संपत्ती यांच्यावरील आपला हक्क सोडणे. ती साधने आणि संपत्ती ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे. विविध सामाजिक व्यवस्था आणि सरकारे यांनी साधनांची नासाडी थांबवण्याला प्राधान्य देणे. यात विविध देशांच्या सुरक्षेचा प्रश्नही अंतर्भूत करावा लागेल. साधनसंपत्तीची नासाडी थांबवणे आणि त्यांचे योग्य वितरण आणि विभाजन यासाठी नवीन मानवी मूल्ये प्रस्थापित करावी लागतील. असा सर्वंकष विचार केल्याशिवाय निसर्गाचे रक्षण, संवर्धन आणि सातत्य साध्य करता येणार नाही.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'अर्थचिंतन' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा