समस्या असंख्य आहेत. त्या पुरुषांच्या आहेत अन स्त्रियांच्याही आहेत. केवळ स्त्रियांच्या अशाही आहेत. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, लैंगिक, मानसन्मानाच्या अशा अनेक आहेत. चौकट राजा नावाचा चित्रपट बहुतेक मराठी लोकांनी पाहिलेला असेल. त्या अपघात झालेल्या पुरुषाची समस्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक जशी आहे तशीच लैंगिक पण आहे. वेडे लोक, अपघातग्रस्त लोक, शारीरिक- मानसिक- बौद्धिक- कमतरता असलेले लोक; अन अशा खूप वेगवेगळ्या लोकांच्या असंख्य समस्या आहेत. स्त्रिया आणि पुरुषांच्या लोकसंख्येचे असंतुलन हाही महत्वाचा प्रश्न आहे. ज्या भारतीय संस्कृतीने काम हा एक पुरुषार्थ मानला त्या भारतीय समाजात अनेक स्त्रीपुरुषांना विविध कारणांनी त्या पुरुषार्थापासून वंचित राहावे लागते. ज्यांनी असे जीवन स्वतःहून स्वीकारलेले असते त्यांची गोष्ट वेगळी पण ज्यांना नाईलाजाने त्यापासून दूर राहावे लागते त्यांचे काय? त्यांच्या सर्वांगीण विकासावर त्याचा विपरीत परिणाम होतो त्याचे काय? काही लोक हा नाईलाज निभावून नेतील पण मानवी जीवनाचा विचार करता असे लोक कमीच राहणार. बाकीच्यांच्या व्यक्तिमत्वाचे खुरटलेपण, त्याचे सामाजिक परिणाम आणि याविषयी समाजाची जबाबदारी हेही मोठ्या चिंतनाचे विषय आहेत. यात स्त्री आणि पुरुष असे करता येत नाही. एवढेच नाही तर काहीही कमतरता नसलेल्या लोकांच्या समस्या असतात त्यातही स्त्री वा पुरुष असा भेद करता येत नाही. एक लग्न की अधिक लग्न, समलैंगिकता योग्य की अयोग्य, तृतीय पंथीयांचे काय, ईश्वर आदी मानायचे की नाही; अशा अनेक गोष्टींकडे उपेक्षा अथवा मस्करीपेक्षा आस्थेने पाहायलाच हवे. कामभावना या शब्दाने दचकून जाण्याचे कारण नाही. भारतीय विचार परंपरेने याचा विचारही केलेला आहे आणि स्वीकारही. एकात्म मानववादाचे भाष्यकार, प्रख्यात चिंतक श्री. दत्तोपंत ठेंगडी याविषयी म्हणतात, `मनुष्य आर्थिक प्राणी से उपर भी कुछ है. वह शरीरधारी, मनोवैज्ञानिक, राजनीतिक, सामाजिक, धार्मिक प्राणी भी है. उसके व्यक्तित्व के अनेकानेक पहलू है. अत: यदि संपूर्ण व्यक्तित्व के सभी पहलुओं का संगठित और एकात्म रूप से विचार न हुआ तो उसको सुख समाधान की अवस्था प्राप्त नहीं हो सकती. अपने यहां इस दृष्टी से संगठित एवं एकात्म स्वरूप का विचार हुआ है. व्यक्ति की भौतिक, आर्थिक आवश्यकताओं को ध्यान में रख कर यह कहा गया है कि इन वासनाओं की तृप्ति होनी चाहिए, लेकिन यह भी कहा गया कि उन पर कुछ वांछनीय मर्यादा भी आवश्यक है. केवल फ्राइड ने ही काम का विचार अत्यंत गंभीरता से किया है ऐसी बात नहीं है. हमारे यहां भी काम को मनुष्य के अपरिहार्य आवेग के रूप में स्वीकार कर उस पर गंभीरता से विचार किया गया है.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)
स्वतः पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीही कामभावनेच्या संदर्भात दिशासंकेत केलेला आहे. ते म्हणतात, `काम का भी इसी प्रकार विचार किया गया है. काम पुरुषार्थ की ओर किंचित भी ध्यान नहीं दिया गया तो धर्म की हानी होगी. बिना भोजन के धर्म नहीं चल सकता. मन को संतोष देनेवाली ललित कलाओं, यज्ञयागादी कर्मों की अवहेलना हुई तो धर्म का पालन करनेवाले संस्कार नहीं होंगे. मानस विकृत रहेगा तथा धर्म की हानी होगी. दूसरी ओर रोम के ग्लटन्स की भांति हम पेटू और विलासी बन गए अथवा ययाति की भांति काममोहित होकर अपने सभी कर्तव्यों को भूल गए, तो भी धर्म की हानी होगी. अत: धर्म अविरोधी काम पुरुषार्थ का अवश्य निर्वाह करना चाहिए.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, एकात्म मानववाद- २३ एप्रिल १९६५)
अर्थात हे केवळ संकेतमात्र आहे. कामभावना या विषयाचा सखोल विचार आणि मांडणी होणे गरजेचे आहे. त्यासोबत हेही ध्यानात घेणे आवश्यक आहे की, हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे, चवचालपणा करण्याचा नाही. त्यासाठी धाडस, मोकळेपणा, आस्था, समज, स्पष्टता या आवश्यक बाबी आहेत. जसे चवचालपणा नको तसेच सोवळेपणाही उपयोगाचा नाही. वर्तमानात या संदर्भात माहिती आणि अभिव्यक्तीचा जो स्फोट झालेला आहे आणि मोकळेपणा आलेला आहे; त्या पार्श्वभूमीवर तर या विषयाची सशक्त मांडणी गरजेची झालेली आहे. या संदर्भात विचार करताना याकडेही दुर्लक्ष नको की; अन्य विषयांप्रमाणेच या विषयातही; पिंड, वृत्ती, गरज, इच्छा, आकांक्षा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तर आणि समज, कौशल्य, स्वभाव, परिस्थिती, योग्य-अयोग्यता, compatibility, परंपरा, कल्पना, जुन्यातून बाहेर पडण्याची वृत्ती, जुने टाकून देण्याच्या नावाने अयोग्य किंवा अनावश्यक गोष्टींना मिळणारे पोषण, संधी, आर्थिक- सामाजिक व्यवस्था, जीवनशैली, अपेक्षा, अवास्तव अपेक्षा, अपेक्षापूर्ती, अपेक्षाभंग, अनुभव, छुपे वा उघड हेतू, आग्रहीपणा; असे अक्षरशः असंख्य कंगोरे असतात. या सगळ्यांचा घाऊक विचार करणे, घाऊक सिद्धांत मांडणे, अमुक विरुद्ध अमुक असा रंग देणे, न्यायअन्यायाचे स्वरूप देणे; हे शहाणपणाचे नक्कीच म्हणता येणार नाही. आजच्या प्रचलित अर्थाचे स्वातंत्र्य आणि सुख मिळवणारे सुद्धा किती विविध प्रकारे जीवनाला कंटाळतात, जीवन संपवण्याचे पाऊल उचलतात हे आता नव्हाळीचे राहिलेले नाही. आर्थिक स्वावलंबनाच्या विचाराने आता लग्न जुळवतानाच `तुझे तू, माझे मी’ हे स्वरूप घेतलेले आहे; अन पुरुषी अत्याचाराच्या खऱ्याखोट्या मांडणीने पुरुषविहीन जीवनाचा पुरस्कार करण्यासाठी फेसबुकचे प्रोफाईल काळे ठेवण्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. आम्हाला हेच हवे आहे का यापेक्षाही, यातून सगळ्यांचे कल्याण किंवा आमचे व्यक्तिगत सुख, समाधान, शांति तरी प्राप्त होईल का; हा कळीचा प्रश्न आहे. मानवीय आणि दैवी म्हणून जे जे गुण, प्रतीके, पद्धती विकसित झाल्या वा करण्यात आल्या त्यांचा साधकबाधक विचार करण्याचे नाकारणे हा करंटेपणा म्हणावा लागेल.
भारतीय विचार हा आजच्या ultra liberal विचारांपेक्षाही अधिक super ultra liberal आहे. खाणेपिणे, वस्त्रप्रावरणे, नातीगोती, नीतीनियम, उपासना अशा सगळ्याच गोष्टीत. पण दोहोत एक मुलभूत फरक आहे आणि तोच सगळ्यात महत्वाचा अन मोठा आहे. आजच्या ultra liberal विचारांची दृष्टी ऐहिक, मृण्मय, लौकिक, जड, मूर्त, साकार यांच्याकडे आहे. ते धरून ठेवून, त्यात काडीचाही बदल होऊ नये असा प्रयत्न ultra liberal करतात. तर, भारतीय super ultra liberal विचारांची दृष्टी चिन्मय, चेतन, अमूर्त, निराकार याकडे आहे. ऐहिकाला घट्ट बिलगून liberation चा प्रयत्न अधिकाधिक गुंतागुंत, संघर्ष आणि शेवटी सर्वनाश यांना कारणीभूत ठरतो. त्यामुळेच असा प्रयत्न करणारे बहुतांशी अखेर निराश झालेले आढळतात. उलट ऐहिकाचा त्याग करत करत संपूर्ण liberation साठी प्रयत्न करणारी यशस्वी, सार्थक जीवने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ऐहिकाला धरून ठेवून संपूर्ण liberation तत्त्वतः, कागदावर सुद्धा शक्य नाही. उलट चिन्मयाचा वाटसरू संपूर्ण liberation चा स्वाभाविक स्वामी होतो. ऐहिक न सोडता संपूर्ण liberation हे- तत्व, तर्क आणि व्यवहार या तिन्ही दृष्टीने अशक्य आहे. भारतीय विचार मात्र जसजसे लौकिक कमी होईल तसतसे liberation वाढवीत जाणारा आहे. जो लौकिकासाठी जगतो त्याला किमान liberation आणि जो लौकिक पूर्ण सोडून देतो त्याला संपूर्ण liberation. जैनांचा दिगंबर पंथ, शेगावचे गजानन महाराज किंवा संजीवन समाधी घेणारी ज्ञानेश्वर माऊली यांची उदाहरणे सांगता येतील. म्हणूनच संन्याशाला कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय बंधने राहू नयेत अशी धारणा आहे. ही super ultra liberal मंडळीच `स्वदेशो भुवनत्रयम' ही भावना चरितार्थ करू शकतात. त्यासाठीच त्यांना संपूर्ण liberation. सगळ्यांना एकच फुटपट्टी लावणाऱ्या वर्तमान सामाजिक सिद्धान्तांपेक्षा भारतीय समाजशास्त्र वेगळे आहे. त्याचा विविध अंगाने साक्षेप ही वर्तमानाची गरज आहे.
भारताचे काय होईल? हिंदूंचे काय होईल? आध्यात्माचे काय होईल? हे प्रश्नच गैरलागू आहेत. त्यांचे काय होईल याची चिंता करण्याची गरज नाही. इहवादी भोगवादाने, सत्तावादाने या साऱ्याची राखरांगोळी केली आणि ते भस्म फासून विश्वविजयाचे कितीही तांडव केले तरीही त्या राखेतून पुन्हा भारत, हिंदू आणि आध्यात्माचा फिनिक्स भरारी घेईल. प्रश्न हा आहे की, आम्हाला मर्यादित का होईना जे समजते त्याकडे दुर्लक्ष करून आजवरचे सारे शुभ, मंगल, कल्याणकारी आम्हीच उधळून टाकण्याचा नतद्रष्टपणा करणार आहोत का? Geneticaly modified माणूस जन्माला घातल्याचा दावा आज शास्त्रज्ञ करीत आहेत. येणाऱ्या भस्मासुराला ओळखण्याची गरज आहे. स्त्रीत्वाच्या किंवा अन्य कोणत्याही भावुकतेच्या प्रवाहात वाहून जाणे योग्य ठरणार नाही. Jack Dorsey प्रकरणाचा एवढा अन्वयार्थ आहे. हे एकच प्रकरण आहे असे नाही. अशी अनेक प्रकरणे, अनेक घटना, अनेक मते वारंवार समोर येत असतात. त्यांचा सखोल आणि साधकबाधक विचार मात्र जेवढ्या प्रमाणात व्हायला हवा तेवढा होताना दिसत नाही.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'समाजचिंतन' या प्रकरणातील एक अंश.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा