भारताची ही विशेषता आहे की, भारताने या धर्मविचाराला नेहमीच प्राधान्य दिले, उचलून धरले. अन्य जगाच्या तुलनेत भारताचे हे वेगळेपण आणि आगळेपण आहे. व्यक्तीचा, समाजाचा, जीवनाच्या सगळ्या अंगांचा विचार भारताने या धर्मविचाराने तोलून धरलेला आहे. म्हणूनच पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात - `भारताचा आत्मा ज्याला समजून घ्यावयाचा असेल, त्याने राजकीय अथवा अर्थनीतीच्या चष्म्यातून भारताकडे पाहून चालणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. भारतीयत्वाची अभिव्यक्ती राजकारणामधून होत नसून संस्कृतीद्वारा होत असते. संपूर्ण विश्वाला जर आम्ही कोणती गोष्ट शिकवू शकणार असू तर ती, आमची सांस्कृतिक सहिष्णूता आणि आमच्या कर्तव्यप्रधान जीवनाची शिकवण हीच होय. अर्थ आणि काम यांच्यातून भोग, अधिकार, असहिष्णूता इत्यादी भावना प्रकट होत असतील; तर धर्माच्या भावनेने भोगाऐवजी त्याग, अधिकाराऐवजी कर्तव्य आणि संकुचित असहिष्णुतेच्या जागी विशाल एकात्मता प्रकट केली जाते.' (पं. दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रजीवनातील समस्या)
धर्म या शब्दाचा भारतीय परंपरेने स्थापित केलेला हा जीवनव्यापी आशय मुळातच न समजल्यामुळे आणि नंतर चूक लक्षात आल्यावर तो समजून घेण्यास टाळाटाळ किंवा हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे अनेक गोंधळ, वाद, गैरसमज तर निर्माण झालेच; शिवाय मानवी जीवनाची नीट घडी बसवण्यातही अपयश आले. यातीलच एका गैरसमजाचा परामर्श घेताना ते म्हणतात - `एक ओर तो हम रिलिजन को धर्म के पर्यायवाची शब्द के रूप में प्रयोग करने लगे तथा दूसरी ओर अपने धर्म और जीवन का अज्ञान तथा यूरोपीय जीवन का अधिकाधिक ज्ञान हमारी शिक्षा का विषय बन गया. फलत: रिलिजन के जितने सहचरी भाव है, वे हमने धर्म पर आरोपित किए. यदि यूरोप में रिलिजन के नाम पर अन्याय, अत्याचार, संघर्ष और युद्ध हुए तो वे सब हमारे यहां भी धर्म के खातेनामे में चढ़ा दिए गए. हमे लगने लगा कि धर्म पर भी लड़ाई हो सकती है; परंतु धर्म की लड़ाई दूसरी है और रिलिजन की लड़ाई दूसरी होती है. रिलिजन यानि मत, पंथ, मजहब. वह धर्म नहीं.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, व्यष्टि, समष्टि में समरसता - २४ एप्रिल १९६५)
धर्माचा असा सगळ्या अंगांनी विचार केला तरीही असे लक्षात येते की, अनेकदा अडचणीचे प्रसंग उभे राहतात. व्यावहारिक निर्णय नेमके काय घ्यावे असा प्रश्न निर्माण होतो. एखाद्या तत्त्वाचे, विषयाचे, सिद्धांताचे प्रतिपादन करताना बौद्धिक कोंडी निर्माण होते. शिवाय दोन गोष्टींची धारणा करताना दोन्ही गोष्टींना काही तरी सोडावे लागते, काही बदल स्वीकारावा लागतो; हा बदल कोणी आणि किती स्वीकारायचा? का स्वीकारायचा? त्याचे प्रमाण कसे ठरवायचे? माघार घ्यायची असेल तर कोणी आणि का? पुढाकार घ्यायचा असेल तर कोणी आणि का? त्याग करायचा तर कोणी आणि का? शक्तिमान बाजूचा कमी शक्ती असलेल्या घटकावर अन्याय होऊ नये याची काळजी कशी घ्यायची? असे अनेक पण-परंतु धर्मनिर्णय करताना उत्पन्न होतात. यातून मार्ग काढण्यासाठी काय करायचे? कसा मार्ग काढायचा? पंडित दीनदयाळ उपाध्याय या संदर्भात म्हणतात- `वास्तविक धर्माचे कार्य काय आहे? धारणा करणे आणि शरीर, मन व बुद्धी यात मेळ घालणे. सामंजस्य निर्माण करणे. सामंजस्य दोन प्रकारचे असते. काही वेळा सामंजस्य निर्मिण्यासाठी नियम केले जातात आणि काही वेळा असे होते की कितीही नियम केले तरी काहीही परिणाम होत नाही. कितीही नियम केले तरी ते जीवनाच्या संपूर्ण अंगांना स्पर्श करू शकत नाहीत. अशा अनेक स्थिती आहेत जेथे नियम काम करू शकत नाहीत. आपल्याकडेही स्मृती, शास्त्र, कृती इत्यादी सर्व आहे, पण जर अशी स्थिती आली तर काय करणार? अशा वेळी आपले मन सांगेल तसा व्यवहार करायचा. म्हटलेच आहे- मन:पूतं समाचरेत !! परंतु याप्रमाणे मनाच्या आज्ञेने सर्वजण व्यवहार करू शकणार नाहीत. ज्याचे मन ठीक निर्णय घेऊ शकेल त्यालाच हे शक्य आहे.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय, धारणा करतो तो धर्म)
अन्यत्र ते म्हणतात - `धर्म के मूलभूत तत्व सनातन और सर्वव्यापी है. उनका व्यवहार देश, काल, परिस्थिति सापेक्ष होता है. शरीर धारण करने के लिए भोजन करना चाहिए यह शाश्वत नियम है. किंतु व्यक्तिविशेष को कब, कैसा और कितना भोजन करना चाहिए यह परिस्थितिसापेक्ष होगा. कभी कभी ऐसा भी हो सकता है कि भोजन नही करना. कभी उपवास भी आवश्यक होगा. इस प्रकार धर्म का व्यवहार समय के साथ, युग के साथ बदलता रहता है. देश-काल के आधार पर उनका पालन करना पड़ता है.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, व्यष्टि, समष्टि में समरसता- २४ एप्रिल १९६५)
नीतिशास्त्र, विज्ञान, प्रकृती यांच्या नियमांची चर्चा करताना ते लिहितात - `नीतिशास्त्र के कुछ नियम होते है. ये नियम कोई तय नहीं करता. जैसे क्रोध आने पर हमें क्रोध को प्रकट नहीं करना चाहिए, बल्कि शांत रहना चाहिए. क्रोध को पी जाना चाहिए. ऐसे जो नियम है, ये नीतिशास्त्र के नियम है. ये कोई बनाते नहीं, ढूंढे जाते है. जैसे न्यूटन ने गुरुत्वाकर्षण का नियम बनाया नहीं, ढूंड निकाला वैसेही. इस प्रकार ढूंड कर निकाले हुए जो नियम है उनको हमारे यहाँ धर्म कहा गया है. मानव जीवन को स्थिर रखनेवाले, मानव जीवन की धारणा करनेवाले जितने नियम है वे सब धर्म है. उस धर्म का आधार लेकर हम संपूर्ण जीवन का विचार करें.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, एकात्म मानववाद- २३ एप्रिल १९६५)
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी धर्माची ही जी अगम्यता अधोरेखित केली ती अतिशय महत्वाची आहे. कशी आहे ही अगम्यता? चलनी नाण्याचं उदाहरण घेता येईल. नाण्याच्या चित आणि पट या दोन बाजूंच्या मध्ये काय असतं? नाही सांगता येत. पण काहीतरी असतं हे नक्की. ते कळतं, आकळतं. आकलन, समज, अनुभूती, अनुभव; हे शब्दसुद्धा समजावून सांगता येत नाहीत. मग ज्या गोष्टी आकलन, अनुभूती, समज यांच्या कक्षेतील आहेत; त्या शब्दबद्ध कशा करणार?समजावून कशा देणार किंवा घेणार? धर्म ही अशीच बाब आहे. चित आणि पट यांना धरून ठेवणारं अप्रमेय तत्त्व म्हणजे धर्म. दोन श्वासांच्या मधल्या मोकळ्या वेळात `मी'ला धरून ठेवतो तो धर्म. लौकिक आणि अलौकिक यांना धरून ठेवतो तो धर्म. दिवस आणि रात्र यांना धरून ठेवतो तो धर्म. समजणे आणि न समजणे यांना एकत्र ठेवतो तो धर्म. जड आणि चेतन यांना एकत्र धरून ठेवतो तो धर्म. यातील चित आणि पट हे एकच आहेत आणि त्यांना धर्माने धरून ठेवले आहे हे आपल्याला कळतं कारण आपण त्या नाण्याचा भाग नसतो. त्या नाण्याच्या बाहेर असतो. त्यामुळे पूर्णांशाने त्याचं आकलन होऊ शकतं. या संपूर्ण अस्तित्वाची धारणा करणारा धर्म जाणून घ्यायचा असेल तर या अस्तित्वाचं एक असणं समजायला हवं. अन ते समजायचं असेल तर या अस्तित्वाच्या बाहेर, अस्तित्वाच्या अतीत जायला हवं. या अस्तित्वापासून वेगळं व्हायला हवं. तोच साक्षात्कार, तीच समाधी अवस्था, तीच आत्मतत्त्वाची उपलब्धी, तेच धर्माचे आकलन. धर्म ही बौद्धिक चर्चेची नव्हे सायासाची आणि अनुभूतीची बाब आहे. भक्ती, उपासना, साधना, ध्यान इत्यादी त्यासाठीचे प्रयत्न. धर्माचं हे आकलन होईपर्यंत चित किंवा पट यातील काहीतरी एकच कळू शकतं, समजू शकतं. त्याला धरूनच आपले व्यवहार चालतात. धर्माचं आकलन झालं की व्यवहाराचं स्वरूप बदलून जातं. या सनातन धर्मातूनच व्यक्तीधर्म, समाजधर्म, राजधर्म, युगधर्म, आपद्धर्म, स्थितीधर्म प्रसूत होतात. म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय जेव्हा म्हणतात की, ठीक निर्णय घेऊ शकणारं मनंच धर्माचा उलगडा करू शकतं; त्यावेळी त्याचा अर्थ होतो की, समाजात संपूर्ण अस्तित्वाच्या ठायी असलेल्या सनातन धर्माची अनुभूती घेणाऱ्या व्यक्तींची पुरेशी उपलब्धता असायला हवी. या जगाच्या पसाऱ्यात न अडकलेल्या, त्यातून सायासाने बाहेर पडलेल्या व्यक्ती, व्यक्तीधर्मापासून युगधर्मापर्यंत दिशा दाखवण्यात साहाय्य करू शकतात.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'धर्मसंकल्पना' या प्रकरणातील एक अंश.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा