शुक्रवार, ११ जून, २०२१

एकात्म मानववाद (१४)

 

आर्थिक स्वातंत्र्याबद्दल श्री. उपाध्याय म्हणतात, 'अजस्त्र यंत्रसामुग्रीचा सोस असलेल्या लोकांच्या मते आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ अमाप उत्पादनवाढ एवढाच असतो. परंतु हा दृष्टिकोन एकांगी व हानिकारक आहे. आपण अशी खबरदारी घेतली पाहिजे की, एकाच्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याचे स्वातंत्र्य बाधित होणार नाही. अमाप उत्पादनाच्या एकाच्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याच्या पानातील भाकरी हिरावून घेतली जाता कामा नये. कुठल्याही केंद्रीकरणात नेमके हेच घडते.' (पंडित दीनदयाल उपाध्याय विचारदर्शन, पृष्ठ ४४९)
विकेंद्रीकरण हा स्व. उपाध्याय यांच्या आग्रहाचा विषय होता. अर्थकारण नीट चालायचे असेल, सगळ्यांना संपन्न आणि सुरक्षित आर्थिक जीवन प्राप्त व्हायचे असेल तर विकेंद्रीकरणाला पर्याय नाही अशी त्यांची भूमिका होती. मात्र विकेंद्रीकरण म्हणजे फक्त गावोगावी कारखाने उभारणे, अशी त्यांची कल्पना नव्हती. उत्पादन आणि वितरण यांची शक्य तेवढी लहान केंद्रे, अशा केंद्राचे गावोगावी जाळे, निर्णय आणि कार्यवाही त्या त्या स्तरावर होणे, एक व्यक्ती आणि त्याचे कुटुंब हे उत्पादनाचे केंद्र होणे, सगळ्या गोष्टींसाठी सरकार वा नोकरशाही यांच्यावर अवलंबून राहण्याची गरज न पडणे, रोजीरोटीच्या कामाशिवाय मोकळा वेळ उपलब्ध होणे; अशा खऱ्याखुऱ्या विकेंद्रीकरणाची त्यांची कल्पना होती. गावोगावी उत्पादन किंवा विक्रीची काही केंद्र उभी करायची, त्याचे निर्णय आणि अधिकार कोणत्या तरी केंद्रीय व्यवस्थेकडे ठेवायचे, काय पिकवायचं, काय उत्पन्न करायचं, कोणत्या वस्तू तयार करायच्या, पैशाची व्यवस्था कशी करायची, किमती कशा ठरवायच्या, यंत्रे कोणती वापरायची, यंत्रे कुठून आणायची; इत्यादी सगळ्या गोष्टी दुसऱ्याच कोणी ठरवायच्या आणि लोकांनी फक्त गावात राहून जे काही करायला मिळेल ते करायचे अशी त्यांची विकेंद्रीकरणाची कल्पना नव्हती. प्रत्येक व्यक्तीची सक्रियता, प्रत्येक व्यक्तीची कल्पनाशक्ती, प्रत्येक व्यक्तीचा पुढाकार, प्रत्येक व्यक्तीचे चिंतन, प्रत्येक व्यक्तीचे नियोजन, प्रत्येक व्यक्तीचा पुरुषार्थ; यातून अनेक केंद्री उत्पादन, वितरण पद्धती विकसित व्हावी हा त्यांच्या विकेंद्रीकरणाचा आशय होता. यासाठी शासन, प्रशासन या केंद्रित व्यवस्थांनी facilitator चे काम करावे; सगळी सूत्रे हाती घेऊ नयेत; असा त्यांचा अभिप्राय होता. सामान्य माणसाला मिंधे करण्याला त्यांचा विरोध होता.
अर्थात, समाजाला असंख्य गोष्टी लागतात. त्यातील काही गोष्टी मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या कारखान्यांमध्येच तयार होऊ शकतात. काही मध्यम आकाराच्या उद्योगात तयार होऊ शकतात. या बाबीला त्यांचा विरोध नव्हता. परंतु वेळोवेळी अशा गोष्टींचा आढावा घेऊन अधिकाधिक छोट्या केंद्रात; विशेषतः गृहोद्योग व कुटीरोद्योग यात बहुतांश उत्पादन व्हावे; जेणेकरून मानवाचे मानव्य जपले जाईल आणि केंद्रीकरणाने उत्पन्न होणारे दोष कमी करता येतील; अशी त्यांची दृष्टी होती. उत्पादन छोट्या केंद्रात व्हावे याचा अर्थ यंत्रांचा वापर नसावा असे नाही तर, उत्पादनाच्या लहान केंद्रांना उपयोगी आणि सोयीची ठरतील अशा यंत्रांचा विकास व्हावा, असे त्यांचे म्हणणे होते.
अतिशय स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडताना ते म्हणतात, 'सर्व कारणमीमांसा तपासल्यावर आपल्याला असे म्हणावे लागेल की, वरील समस्या अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण करूनच सुटू शकतील. व्यक्ती व कुटुंब हे या आर्थिक विकेंद्रीकरणाचे मूलभूत घटक आहेत. व्यक्तीच्या प्रयत्नातून आणि कुटुंबाच्या स्वामीत्वाच्या आधारावर जर संपत्ती निर्माण झाली तर, आर्थिक विषमतेचा व आर्थिक शोषणाचा प्रश्नच उरणार नाही. जेव्हा मनुष्य उत्पादनाच्या या मर्यादांचा भंग करून पुढे गेला वा रशियाप्रमाणे सामूहिक पद्धतीवर किंवा अमेरिकेप्रमाणे मोठमोठ्या कार्पोरेशन द्वारे उत्पादन करून अधिकाधिक आर्थिक शक्ती आपल्या हाती केंद्रित करीत गेला, तेव्हाच आर्थिक विषमतेच्या आणि आर्थिक शोषणाच्या प्रवृत्ती बळावू लागल्या. या प्रवृत्ती अगदी मुळापासून नाहीशा करावयाच्या असतील तर, सर्वसामान्यपणे व्यक्ती व कुटुंब या दोन घटकांना उत्पादनाचे मूलभूत निर्माते घटक समजून उत्पादन करावयास हवे. हे सर्व प्रत्यक्षात आणण्यासाठी कुटुंबाच्या आधारावर चालणाऱ्या उत्पादन प्रणालीचाच अवलंब करावा लागेल.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन, पृष्ठ ४७८)
क्रोनी कॅपिटॅलिझम हा शब्द अलिकडे बराच वापरला जातो. पंडित दीनदयाळ उपाध्याय तो शब्द न वापरताही त्यासंबंधाने म्हणतात, 'भौतिक सुखांचा अमर्याद उपभोग, तसेच राजकीय सत्तेचा अनियंत्रित वापर या गोष्टी, व्यक्तीच्या व समष्टीच्या मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक अवनतीला व ऱ्हासाला कारण होत असतात. अर्थ व राजकीय सत्ता जेथे हातात हात घालून चालतात, तेथे तर हा ऱ्हास भयानक स्वरूप धारण करू शकतो.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन, पृष्ठ ४५१)
राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता यांचे साटेलोटे, त्यांचे परस्पर संबंध, त्यांचे परस्परावलंबन; आज लपून राहिलेले नाही. कर्जापासून तर आयात निर्यात धोरणांपर्यंत असंख्य गोष्टींसाठी उद्योग आणि व्यापार विश्व राजकीय सत्तेवर अवलंबून असते. दुसरीकडे, पक्षनिधी, निवडणूक खर्च, आलिशान जगणे यासाठी राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष, राजकीय सत्ता उद्योग, व्यापार विश्वावर अवलंबून असतात. हा संबंध तोडण्यासाठी निवडणूक सुधारणा, राजकीय सुधारणा, विकेंद्रीकरण, समाजाचा सांस्कृतिक स्तर उंचावणे, आदर्शवादी समाज, मानवीय मूल्यांची प्रतिष्ठापना; या गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न आवश्यक आहेत. परंतु अर्थसत्ता आणि राजसत्ता यांचा संबंध तोडल्याशिवाय अनेक समस्यांना उत्तरे देता येणार नाहीत हेही खरे आहे. स्व. दीनदयाळ उपाध्याय यांनी या दोन शक्तींच्या एकीकरणाने ज्या अवनतीचा व ऱ्हासाचा इशारा दिला होता, ती अवनती व तो ऱ्हास आज सर्वत्र पाहायला मिळतो आहे.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'अर्थचिंतन' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा