मंगळवार, १ जून, २०२१

एकात्म मानववाद (४)

 

भारतात `राष्ट्र’ कल्पनेचा विचार सध्या प्रचलित राष्ट्र कल्पनेपेक्षा वेगळ्या रीतीने केला गेला आहे. वेद वाङ्गमयात `राष्ट्र’ असा स्पष्ट उल्लेख पुष्कळदा आलेला आहे. अथर्ववेदातील, `भद्रमिच्छन्त ऋषयः स्वर्विदस्तपोदीक्षामुपनिषेदुरग्रे, ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं तदस्मै देवा उपसंनमन्तु’ ही ऋचा तर प्रसिद्ध आहे. `ऋषींनी विश्वकल्याणाच्या इच्छेने दीक्षापूर्वक केलेल्या तपश्चर्येतून राष्ट्र निर्माण झाले, राष्ट्राचे बळ आणि ओजही उत्पन्न झाले. त्यामुळे सगळ्यांनी या राष्ट्रापुढे नम्र होऊन त्याची सेवा करावी,’ असा त्याचा अर्थ आहे. भारतात आणि भारताबाहेर राष्ट्राचा जो विकास झाला त्यातील फरक येथे स्पष्ट होतो. विश्वकल्याणाची भावना आणि त्यासाठी ऋषींची तपश्चर्या यातून भारतात राष्ट्र विकसित झाले; तर भारताबाहेर राजे, महाराजे, नेते यांच्या सत्ताकांक्षेतून राष्ट्र निर्माण करण्यात आले. परंतु `राष्ट्र’भावना, `आम्ही एक आहोत’ ही भावना अशी निर्माण करता येते का? आणि करता येत असेल तर कशाच्या आधारे करता येते? याच प्रश्नांच्या भोवती `राष्ट्र’ कल्पनेचा विचार फिरत राहतो. भारतीय चिंतन परंपरेचे याला स्पष्ट उत्तर आहे की, राष्ट्र स्वयंभू असते. ते बाह्य घटकांनी निर्माण करता येत नाही. या संबंधात पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात- `कोणतेही राष्ट्र म्हणजे केवळ माणसांचा समुदाय नसून ती एक चैतन्यमय एकात्मता आहे. या एकात्मतेला आपली स्वत:ची अशी विशेष प्रकृती असते. ती प्रकृती केवळ ऐतिहासिक क्रिया-प्रक्रिया, सामाजिक संस्कार किंवा वातावरण यांचा परिणाम नसते, तर त्याहून मूलगामी स्वरुपाची असते. शास्त्रकारांनी यालाच `चिती' असे म्हटले आहे. या `चिती'मुळेच राष्ट्राच्या विकासाचा मार्ग निश्चित होतो. या मार्गाने वाटचाल करून राष्ट्र आपला जीवनोद्देश सफळ करून साऱ्या मानवांच्या एकतेच्या दिशेने प्रगती करू शकते. योगी अरविंद यांनी हा सिद्धांत सांगताना म्हटले आहे- Each Nation is a Shakti or power of the evolving spirit in humanity and lives by the principles which it embodies. (प्रत्येक राष्ट्र हे विकासोन्मुख मानवात्म्याची एका शक्तीच्या स्वरूपातील अभिव्यक्ती आहे आणि राष्ट्र हे ज्या तत्वांचे साक्षात रूप आहे त्या तत्वांच्या आधारावर ते जगत असते.' (पं. दीनदयाल उपाध्याय, स्वातंत्र्याची साधना आणि सिद्धी)
राष्ट्राचे हे स्वयंभूत्व सांगताना पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात- `राष्ट्रांचा आविर्भाव कोण्या ऐतिहासिक संयोगामुळे नव्हे, तर दैवी प्रकृतीच्या मूळ योजनेमुळे झाला आहे. कोट्यवधी मानव कृत्रिमरीत्या एकत्र येऊ शकत नाहीत. त्यांच्या जीवनातील एकसूत्रता, मातृभूमीवरील समान प्रेमभाव, शत्रुत्व वा मित्रत्वाची सारखीच भावना, श्रेष्ठ जीवनाच्या इतिकर्तव्यासंबंधी एकच भाव; हे सारे बाह्य प्रचारतंत्राद्वारे उत्पन्न करता येत नाही. राष्ट्राच्या जीवनामध्ये दिसणारी समानता ही अंतर्निहित चेतनतत्त्वाची अभिव्यक्ती होय. ही राष्ट्राचे लक्षण होय कारण नव्हे. पाश्चात्य विद्वान लक्षणालाच कारणे मानतात व कृत्रिमरीत्या राष्ट्रनिर्मितीची कल्पना करतात. पहिल्या महायुद्धानंतर वॉर्सा तहाद्वारे युरोपात अशी अनेक राष्ट्रे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु दुसऱ्या महायुद्धानेच त्यातील फोलपणा सिद्ध झाला. कुंभमेळ्यासारखी अनेक पर्वे व उत्सव राष्ट्राच्या अस्तित्वाचाच परिणाम आहेत, कारण नव्हेत.' (पं. दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रात्मा व विश्वात्मा)
अतिशय स्पष्टपणे श्री. उपाध्याय यांनी भारतबाह्य राष्ट्र निर्माणाची कल्पना बाजूस सारली आहे. आजच्या राज्यशास्त्राची व समाजशास्त्राची राष्ट्र कल्पना त्यांनी सपशेल नाकारली आहे. राष्ट्राचे घटक म्हणून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी या राष्ट्राचे घटक नसून त्याची लक्षणे आहेत. ही लक्षणे असली, नसली, कमीअधिक असली तरीही राष्ट्र असतेच. या बाह्य गोष्टींच्या आधारे मानव समूहात ऐक्य भावना निर्माण करता येत नाही; तर मानव समूहातील ऐक्य भावनेतून त्या समूहाची भाषा, भूषा, रीतीरिवाज, श्रद्धा, जीवनपद्धती, जीवनमूल्ये, शत्रू मित्र भाव, सुखाची वा दु:खाची अनुभूती; हे सारे आकारास येते; असा दीनदयाळ उपाध्याय यांचा अभिप्राय आहे.
अथर्ववेदात ऋषींच्या तपश्चर्येचे `विश्वकल्याणाची इच्छा’ हे जे कारण सांगितले आहे तोच भाव व्यक्त करताना पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात- `राष्ट्र या कल्पनेमध्ये देशभक्तीचे रहस्य लपलेले आहे. आपण एका व्यक्तीऐवजी संपूर्ण राष्ट्राची चिंता का करतो? एकेकट्याच्या प्रयत्नाऐवजी सर्व मिळून प्रश्न सहजपणे सोडवू शकू म्हणून का? राष्ट्राच्या वैभवाची चिंता एवढ्याचसाठी आहे का, कारण त्यात आमचे व्यक्तिगत वैभवही अंतर्भूत आहे? जर हाच स्वार्थी विचार आमच्या मनात असेल तर आमचे राष्ट्रीयत्व केवळ चोर व डाकू यांच्या टोळीप्रमाणेच राहील. चोर डाकू देखील खांद्याला खांदा लावून काम करतात. एकमेकांचे संरक्षण करतात. आपल्या नेत्याची आज्ञा पाळतात. अन टोळीच्या स्वार्थासाठी स्वत:च्या स्वार्थाला तिलांजली देतात. सगळ्या चांगल्या गोष्टी असूनसुद्धा चोर डाकूंची संघटना चिरंतन असत नाही व ते मानवतेचे कल्याणही करू शकत नाहीत. एक तर लुटीची वाटणी करताना आपसात झगडे होऊन त्यांच्यात फूट पडते किंवा ते सर्व मिळून दुसऱ्यांना लुटत राहतात. दोन्ही गोष्टी हानिकारकच असतात. राष्ट्रीयत्व हे जर अशाच आर्थिक प्रेरणांच्या पायावर उभे राहिले तर, व्यक्तिगत आणि वर्गस्वार्थामुळे आपसात भांडणे होतील. किंवा ते राष्ट्रीयत्व काही पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे पीडित मानवाच्या उद्धाराची भाषा बोलत, आपला राष्ट्रीय स्वार्थ साधण्यासाठी, इतर राष्ट्रांना गुलाम बनवून मानवतेला निरंतर विश्वयुद्धाच्या खाईत लोटण्यास कारणीभूत होईल. अशा प्रकारची राष्ट्रभावना सत्य नाही, शिव नाही, सुंदरही नाही.' (पं. दीनदयाल उपाध्याय, चिति १)
स्वार्थासाठी गट तयार करणारे मानव समूह आणि राष्ट्र यातील फरक स्पष्ट केल्यानंतर; ही बाह्य कारणे नाहीत तर राष्ट्राचा आधार काय आहे? यावर अभिप्राय देताना याच लेखात ते म्हणतात- `देशाबद्दलच्या भक्तीचे आणि समाजाबद्दलच्या सहानुभूतीचे कारण आमची स्वार्थांध एकता नाही किंवा शत्रू वा मित्रत्व नाही. आमची देशभक्ती आमच्या राष्ट्रातील संपूर्ण समाजाबद्दल असणाऱ्या ममतेच्या पोटी निर्माण झालेली आहे. ही ममता आमच्या एकात्मतेचे प्रतिक आहे. व्यक्तीप्रमाणेच राष्ट्रालाही आत्मा असतो. त्यामुळेच राष्ट्रात एकात्मता निर्माण होते. राष्ट्राच्या या आत्म्यालाच आमच्या शास्त्रकारांनी `चिति' संबोधिले आहे. निरनिराळ्या राष्ट्रांची चिति निरनिराळी असते. या चितिभिन्नतेमुळेच एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या आधिपत्याखाली आल्यावर स्वत:ला परतंत्र समजते.' (पं. दीनदयाल उपाध्याय, चिति १)
या चितीचं आणखीन विवरण करताना ते म्हणतात- `चिति ही राष्ट्रीयत्वाची द्योतक आहे. चिति जनसमूहाच्या विशिष्ट भूभागावरील सततच्या वास्तव्यामुळे, त्याच्या संस्कृती, साहित्य व धर्मामधून व्यक्त होते. या चितिच्या एकतेमुळेच समान परंपरा, इतिहास व सभ्यता निर्माण होते. तेव्हा कुठल्याही राष्ट्राच्या एकतेचे मूळ कारण त्याची संस्कृती, सभ्यता, धर्म वा भाषा नाही. या सर्व गोष्टी केवळ त्या चितिचीच अभिव्यक्ती आहे. म्हणून वरवरचे प्रयत्न करून भिन्नभिन्न चिति असलेल्या लोकांमध्ये भाषा, धर्म व सभ्यतेच्या आधारावर एकता निर्माण करून सुद्धा राष्ट्रीय ऐक्य निर्माण होऊ शकत नाही. शरीराच्या विविध अवयवांना एकत्र केल्याने जीवन निर्माण होत नाही, तर त्या शरीरातील आत्म्याच्या अस्तित्वामुळेच शरीराला चैतन्य प्राप्त होते. व्यक्तीचा हा आत्माच त्या व्यक्तीच्या वैशिष्ट्यातून व क्रियाप्रतिक्रियातून व्यक्त होत असतो. शरीर व अवयव यांचा परस्पर संबंध, एकेका अवयवाने संपूर्ण शरीरासाठी काम करणे व त्याचा परिणाम म्हणून शरीराबरोबरच प्रत्येक अवयवाचेही पालनपोषण होणे ही समष्टी जीवनाची भावना आत्म्यामुळेच निर्माण होते. कोणतीही स्वार्थी भावना त्यामागे नाही. याचप्रमाणे संपूर्ण राष्ट्राची एकता व समष्टीजीवन त्या राष्ट्राचा आत्मा जी `चिति' तिच्यामुळेच निर्माण होतात.' (पं. दीनदयाल उपाध्याय, चिति १)
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'राष्ट्रचिंतन' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा