गुरुवार, ३ जून, २०२१

एकात्म मानववाद (६)

 

`राष्ट्र’ या विषयाप्रमाणेच `धर्म’ हा विषयही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या चिंतनाचा मध्यवर्ती विषय होता. धर्म हीच भारतीय राष्ट्राची चिती (कारक शक्ती) आहे आणि धर्म हाच सार्थक मानवी जीवनाचा, सार्थक सामाजिक व्यवस्थेचा आधार आहे; हे त्यांनी वेळोवेळी आग्रहाने प्रतिपादन केले आहे. इतका महत्वाचा असलेला हा धर्म ही नेमकी काय वस्तू आहे? धर्म म्हणजे काय? नुसता धर्म शब्द उच्चारला की मनात त्याची सुयोग्य प्रतिमा उभी राहते का? जी प्रतिमा मनात उभी राहते ती मूळ धर्मकल्पनेशी जुळणारी असते का? पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना धर्म म्हणजे काय अभिप्रेत होते? हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत. आज तर धर्म ही अतिशय धूसर, काळवंडलेली, विवादित, तिरस्कृत गोष्ट झालेली आहे. social media आणि मुद्रित व इलेक्ट्रॉनिक mainstream media यातही `धर्म' हा चर्चेचा मोठा विषय असतो. यातील चर्चांचा रोख पाहता, हिंदूंच्या धर्मकल्पनेला `इस्लाम' व `ख्रिश्चन' या ऐहिक जडवादी संप्रदायांच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न कळत वा नकळत होताना दिसून येतो. हे फार घातक आहे. अगदी हिंदू समाजावरील विविध आक्रमणांपेक्षा घातक. कारण यात हिंदूंची धर्मकल्पनाच बदलून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. `धर्म' हीच हिंदूंची आणि पर्यायाने जगाची आध्यात्मिक शक्ती आहे. त्यावर आघात हिंदूंसह सगळ्यांसाठी घातक आहेत. या सगळ्या प्रयत्नात प्रामाणिक सत्प्रवृत्त देवभोळे हिंदूदेखील हातभार लावताना दिसून येतात. छोट्या पडद्यावर येणारे धर्माचे ठेकेदारदेखील हातभार लावतात. कारण ते `धर्म' कल्पना नीट समजून घेत नाहीत.
- आम्हाला आता देव आणि माणूस यांच्यामध्ये कोणाही मध्यस्थाची गरज नाही.
- धार्मिक संस्था वा व्यक्तींना पैसा देणे बंद करा.
- धर्माला राजकारणापासून दूर ठेवा.
- धर्म व धार्मिक संस्था यांचे नियंत्रण व नियमन आवश्यक आहे.
इत्यादी मते जोरकसपणे मांडली जात आहेत. धर्माच्या नावाने जगभर थैमान घालत असलेला कडवेपणा, असहिष्णूता, दहशतवाद आणि धर्माच्या नावाने सामान्य भोळ्या लोकांची फसवणूक करणारे पाताळयंत्री स्वार्थी लुटारू; यांच्यामुळे धर्म या विषयाबद्दल नकारात्मक भावना मूळ धरू लागली आहे. दुसरीकडे विज्ञानाची प्रगती, तंत्रज्ञानाचा विकास, त्याच्या मदतीने मानवाच्या सुखसाधनात झालेली वाढ, कळसावर पोहोचलेला भोगवाद आणि त्यासाठी धर्माची अनावश्यकता; यांनी मानवाला धर्मापासून दूर नेले आहे. प्रसार माध्यमातील कथित विद्वतचर्चांनी तर मानवाची विचारशक्ती पोषित करण्याऐवजी; विचारांची-भावनांची जी काही सुव्यवस्था, सुसूत्रता, शहाणपण शिल्लक राहिले आहे, तेही लयाला जाईल की काय असे वाटू लागले आहे. मानवी जीवन, त्यातील अनेक गंभीर विषय चवचाल चर्चांनी समजून घेता येत नाहीत. त्यासाठी व्यासंग आणि सायास लागतात. वेळ द्यावा लागतो. बुद्धीची मशागत करावी लागते. एक एक पदर उलगडावा लागतो याचे भान हरवत चाललेले आहे. यातून `विचारकोष्ठता' वा `विचारषंढता' निर्माण होऊ शकेल. अगदी रोज मंदिरात जाणारे किंवा घरी गणपती, महालक्ष्मी, सत्यनारायण करणारे अशांनाही अनेकदा यातील बारकावे कळत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे खालील गोष्टी मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे.
१) धर्म कल्पनेची सखोल, व्यापक, विस्तृत चर्चा घडवून आणणे.
२) हिंदूंचे धर्म (रूढ अर्थाने) आणि इस्लाम व ख्रिश्चन यांची तुलनात्मक मांडणी मोठ्या प्रमाणात करणे.
३) देव कल्पनेची सखोल चर्चा व मांडणी होणे.
४) देव आणि धर्म यांच्या संबंधांवर सखोल चर्चा.
५) भारतीय भक्तीकल्पना, तिचा विस्तार, तिची विकासावस्था आणि भारतेतर भक्तीकल्पना यांची तुलनात्मक मांडणी.
६) भारतीय देवकल्पना आणि भारतेतर देवकल्पना.
७) `धर्माच्या' सार्वकालिक, सार्वत्रिक, सर्वव्यापी स्वरुपाची चर्चा.
८) भारताचा `धर्मइतिहास' आणि भारतेतर `धर्मइतिहास' यांची तुलनात्मक चर्चा.
९) धर्मशून्यतेचे परिणाम.
१०) अध्यात्मातील ऐहिकता आणि ऐहिकतेतील आध्यात्म.
हे सगळे विषय समाजापुढे समर्थपणे येणे गरजेचे आहे. भक्तीपंथी व्यक्ती आणि संस्थांनी सुद्धा अधिक सखोल, व्यापक, चिरंतन तत्वांची चर्चा आणि रुजवणूक करण्यात पुढे आले पाहिजे. भक्तीचा पारमार्थिक आशय रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चैतन्यशक्तीला जडाच्या पातळीवर आणण्याचे भक्तीमार्गी प्रयत्न किंवा कला, साहित्य आदी क्षेत्रातील असे प्रयत्न; नेहमीच अनिष्ट गोष्टी जन्माला घालतात. जडाच्या साहाय्याने चैतन्याचा वेध इष्ट परिणाम देतात. गांभीर्याने विचार करणाऱ्या साऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक वाटते.
या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी धर्मकल्पनेचा जो विचार मांडला आहे त्याचा आढावा घेणे आवश्यक ठरते. धर्म म्हटल्यानंतर व्यक्तीच्या मनात सर्वसाधारणपणे ईश्वराची उपासना, भक्ती करण्याचा मार्ग असाच भाव उत्पन्न होतो. त्याबाबत पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात, `धर्म शब्दाचा नेमका अर्थ काय याची कल्पना असली पाहिजे. या शब्दाचा इतका प्रयोग होतो की, कित्येक वेळेला मूळ शब्दाच्या विरुद्ध अर्थ लावला जातो. पुष्कळ वेळेला धर्मात अंतर्भूत नसलेल्या गोष्टी धर्मात समाविष्ट केल्या जातात. यामुळे धर्म व्यापक असूनही कित्येक वेळा लहान लहान गोष्टीलाच धर्म समजले जाते. कित्येक वेळा मंदिर, मशीद, चर्च यांनाच धर्म म्हटले जाते. वेगवेगळ्या प्रार्थनागृहात जाणाऱ्या लोकांचे धर्म भिन्न आहेत असे म्हटले जाते. मंदिरात जाणारा मोठा धर्मात्मा आहे असे समजले जाते. मंदिरात जाणे योग्य आहे. तो धर्माचा पूरक भाग आहे. पण मंदिरात जाणे म्हणजेच धर्म नव्हे. धर्मासाठी इंग्रजी भाषेतला religion हा शब्द आहे असे सांगून इंग्रजांनी मोठी चूक करून ठेवली. आम्ही जेव्हा हिंदू धर्माचे रक्षण करायचे असे म्हणतो, तेव्हा ते कोणत्याही religion चे नसते. वैष्णव, शीख, लिंगायत, शैव असे पुष्कळ religion आहेत. हे सगळे religion हिंदू धर्माच्या अंतर्गत येतात.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय, धारणा करतो तो धर्म)
धर्म म्हणजे काय नाही हे सांगितल्यानंतर त्याचा आशय स्पष्ट करताना ते म्हणतात, `व्यक्तीच्या जीवनात शरीरधारणेपासून संपूर्ण सृष्टीपर्यंत जितकी निरनिराळी नाती आहेत त्या सर्व नात्यांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचे काम म्हणजेच `धर्म' होय. याचा साकल्याने विचार करूनच आमच्याकडे धर्माची पुढील लक्षणे सांगितली आहेत. क्षमा, अस्तेय (चोरी न करणे), शौच, इंद्रियनिग्रह, सत्य, बुद्धी, विद्या इत्यादी गुणांवर धर्म अधिष्ठित आहे. याच्या आधारे नियम व व्यवस्था वेळोवेळी कालमानानुसार व स्थानमानानुसार निर्माण होतात.' (पं. दीनदयाल उपाध्याय, धारणा करतो तो धर्म)
दोन भिन्न गोष्टींचा मेळ घालणे, त्यांना एकत्रित बांधून ठेवणे, त्यांच्यात सामंजस्य राखणे, संवाद राखणे, विस्कळीत होऊ न देणे; अशा सगळ्या गोष्टींचा निर्देश एकाच शब्दात करायचा असेल तर तो शब्द आहे `धारणा’. ही धारणा ज्या तत्त्वाने होते त्या तत्त्वाला म्हणतात धर्म. व्यक्तीचा विचार करताना पहिला विचार येतो तो त्याच्या शरीराचा. या शरीराच्या माध्यमातूनच व्यक्तीची ओळख होते. एवढेच नाही तर त्याच्या सर्वोच्च आत्मस्वरुपाची ओळख होण्यासाठी सुद्धा या शरीररुपी साधनाची आवश्यकता असते. आपली कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी यांच्याद्वारेच मानवाला कोणत्याही गोष्टीचे आकलन होते. शरीर नि:शेष करून होणारा आत्मबोध आणि त्यात अवस्थित असण्याची स्थिती ही विकासाची पूर्णावस्था असली तरीही त्याची सुरुवात शरीरापासूनच होते. शरीरबोध विकासाच्या प्रक्रियेत हळूहळू कमी होत जातो. परंतु आत्मस्थिती अशी काही वस्तू असते याची जाणीव होण्यासाठी सुद्धा शरीर आवश्यक असते. म्हणूनच शरीर महत्वाचे. या शरीराचीही धारणा व्हायला हवी. शरीराची इंद्रिये, शरीराची रचना, शरीराच्या प्रकट व अप्रकट शक्ती; या सगळ्याची धारणा होणे, त्यांचा मेळ राखला जाणे, त्यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक ठरते. म्हणूनच ही धारणा करणाऱ्या बाबी धर्म ठरतात. पंडित दीनदयाळ उपाध्याय याबद्दल म्हणतात - `धर्म हा धारणेमुळे आहे. ज्या गोष्टींमुळे, शक्तीमुळे, भावामुळे, नियमामुळे एखादी गोष्ट टिकेल तो धर्म आहे. याचप्रमाणे संपूर्ण समाज किंवा त्याही पुढे जाऊन संपूर्ण सृष्टीचे संचालन धर्मामुळे होते. ज्यामुळे यांचे रक्षण होईल, अस्तित्व टिकेल त्याचे नाव धर्म. जर धर्म बाजूला झाला, विस्मृत झाला तर ती गोष्ट टिकणार नाही. धर्म म्हणजे धारणा. शरीरधारणेसाठी सुद्धा निरनिराळ्या अवस्थात निरनिराळे धर्म आवश्यक असतात. सर्व धर्म एकाच वेळेला लागू नसतो. कोणत्या वेळी कोणता व्यवहार करायचा याचा विवेक करावा लागतो. शरीराच्या धारणेचे नियम असतात. त्यात कालमानानुसार बदल होतो. स्थितीप्रमाणे बदल होतो. मनातील अनेक गोष्टी त्यानुसार बदलतात. ऋतूंप्रमाणे बदल होतो. त्यात स्थिरता नाही. शरीराबरोबरच मन असते, बुद्धी असते. त्यांची पण धारणा झाली पाहिजे. त्यांच्यात मेळ घातला गेला पाहिजे.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय, धारणा करतो तो धर्म)
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'धर्मसंकल्पना' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा