बुधवार, २ जून, २०२१

एकात्म मानववाद (५)

 

ही चिती म्हणजे काय? हा एक शास्त्रीय शब्द आहे. परंतु त्याचा अर्थ काय? तो समजून कसा घ्यायचा? चिती म्हणजे त्या राष्ट्राच्या जिवंतपणाची कारक शक्ती. ही कारक शक्तीच त्या राष्ट्राला जिवंत आणि कार्यरत ठेवते. या कारक शक्तीविना, या चितीविना राष्ट्र जिवंत राहू शकत नाही. ही कारक शक्तीच त्या त्या राष्ट्राचा जीवनोद्देश निश्चित करते. ही कारक शक्ती, ही चिती, उत्पन्न करता येत नाही. या अनादी, अनंत, अगम्य विश्वजाणीवेतूनच चितीचा आविर्भाव होतो. ही चिती, ही कारक शक्ती राष्ट्र जन्माला घालते, राष्ट्राचे जीवन चालवते. ज्या हेतूने ते राष्ट्र जन्माला येते त्यासाठी आवश्यक अशी माणसे, संस्था, यंत्रणा, परिस्थिती; असे सारे घडवत राहते. त्यात बिघाड झाला, त्यावर बाह्य आक्रमण झाले किंवा ही माणसे, संस्था, यंत्रणा, परिस्थिती यांची जीवनशक्ती संपली की त्यांच्या जागी दुसऱ्या गोष्टी उभ्या करते. चितीमध्ये, या कारक शक्तीमध्ये यासाठीची शक्ती आणि यंत्रणा अंगभूत असते. त्याचप्रमाणे त्या राष्ट्राचा जीवनहेतू पूर्ण झाला की चितीचा, या कारक शक्तीचा लोप होतो आणि राष्ट्र लयाला जाते. भारतीय राष्ट्राची चिती काय आहे याची चर्चा करताना पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात –
`आमच्या राष्ट्रजीवनाची चिति काय आहे? आमच्या आत्म्याचे स्वरूप काय आहे? या स्वरुपाची व्याख्या करणे कठीण आहे. त्याचा साक्षात्कारच झाला पाहिजे. तो साक्षात्कार न झाला तरीही, ज्या महापुरुषांना राष्ट्राच्या आत्म्याचा पूर्ण साक्षात्कार झाला आहे, ज्यांच्या जीवनात चितिचा प्रकाश प्रज्वलित झाला आहे, त्यांच्या जीवनाकडे पाहून आणि त्यांच्या जीवनातील घटनांचे व कृतींचे विश्लेषण करण्याने आपण चितिच्या स्वरूपाचे काहीसे दर्शन करू शकतो. प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेल्या राष्ट्रपुरुषांच्या परंपरेमध्ये लपलेले सूत्र शोधण्याचा प्रयत्न केला तर चितिच्या दृश्य परिणामाची मीमांसा करून तिच्या अव्यक्त स्वरुपाची अनुभूती आपल्याला होईल. ज्या महापुरुषांच्या केवळ नामस्मरणानेही आम्ही आमच्या जीवनातील दुर्बल क्षणी शक्तीचा अनुभव घेतो, भिरुतेच्या ठिकाणी शौर्याचा संचार होतो, त्यांच्या जीवनात अशी कुठली गोष्ट आहे की जी आमच्यामध्ये सामर्थ्य निर्माण करते? आम्ही त्यांच्यासमोर श्रद्धेने नतमस्तक का होतो? असे कोणते ध्येय आहे की ज्याच्याभोवती आमचे सारे राष्ट्रजीवन गुंफले गेले आहे? आमच्या राष्ट्राच्या कोणत्या तत्त्वासाठी आम्ही मोठमोठी युद्धे केली? कशासाठी आम्ही लक्षलक्ष लोकांचे बलिदान दिले? या प्रश्नांचे उत्तर देता येईल- भारतभूमीसाठी. परंतु भारतासाठी म्हणजे काय या जड भूमीसाठी? आम्ही काय केवळ हिमालयातील दगडांचे व गंगेच्या पाण्याचेच रक्षण केले? आपल्या अवतारी पुरुषांनी कशासाठी जन्म घेतला? या प्रश्नांचे उत्तर आपण देऊ शकलो तर आपल्याला चितिचे ज्ञान होऊ शकेल. शास्त्रकारांनी यालाच `धर्म' म्हटले आहे. आज धर्म शब्दाचे अनेक भ्रमपूर्ण अर्थ प्रचलित झालेले आहेत. इंग्रजीतील religion ला पर्यायवाची मानून; तसेच religion आणि दीन या शब्दांसाठी युरोप व अन्य देशांमध्ये जे अमानुष अत्याचार झाले त्याचा संबंध जोडून लोक धर्म शब्दावर चिडू लागले आहेत. ते धर्म नष्ट करू पाहत आहेत किंवा त्यांच्यातील सौम्य लोक धर्म ही एक व्यक्तिगत बाब समजू लागले आहेत. राष्ट्र व समाजाचा धर्माशी काहीही संबंध नाही असे ते मानतात. जेथवर धर्म शब्दाचा religion असा अर्थ घेतात तेथवर ते ठीक असू शकेल. परंतु धर्म शब्दाचा जो व्यापक अर्थ आहे आणि त्या व्यापक अर्थामागे जी भावना आहे; ती समजून घेणे महत्वाचे आहे. धर्म हाच आमच्या राष्ट्राचा आत्मा आहे. धर्माशिवाय राष्ट्रजीवनाला काही अर्थच उरत नाही. भारतीय राष्ट्र हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भूखंडाने किंवा पन्नास कोटी लोकांच्या जमावाने होत नाही. राष्ट्राच्या निर्माणासाठी एक असे सूत्र पाहिजे की, जे कोटीकोटी लोकांना परस्परांशी बांधून त्या सर्वांना या भूमीशी बांधू शकेल. ते सूत्र आमचा धर्म हेच आहे.' (पं. दीनदयाल उपाध्याय, चिति २)
ही जी चिती आहे, राष्ट्राची कारक शक्ती आहे ती त्या मानव समूहाच्या संस्कृतीतून अभिव्यक्त होते. त्या अर्थाने संस्कृती हाही राष्ट्राचा आत्माच समजला पाहिजे. संस्कृती म्हणजे केवळ कला, रीतीरिवाज किंवा जीवनपद्धती नाही. संस्कृती म्हणजे कला, रीतीरिवाज किंवा जीवनपद्धती यातून व्यक्त होणारी जीवनमूल्ये. ही जीवनमूल्ये शाबूत राहणे त्या राष्ट्रासाठी आवश्यक असते. यासंबंधात दीनदयाळ उपाध्याय म्हणतात- `संस्कृती हा कोणत्याही राष्ट्राचा आत्मा असतो आणि कोणतेही राष्ट्र तोपर्यंतच जिवंत मानले जाते जोपर्यंत त्यात हा आत्मा नांदत असतो. केवळ बाह्य साधनांनी राष्ट्र जिवंत राहू शकत नाही. राष्ट्रात येणारी माणसे येतात व जातात. त्यांची संख्या कमी अधिक प्रमाणात असते. राष्ट्राची भूमीसुद्धा राष्ट्रातील व्यक्तींच्या सामर्थ्यानुसार कधी त्यांच्याजवळ राहते, तर कधी दुसऱ्यांच्या अधिकाराखाली जाते. भूमी आणि व्यक्ती या दोन्ही घटकात वाढ आणि घट चालू असूनही राष्ट्राच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नाही. परंतु एकदा जर राष्ट्रातील संस्कृती समाप्त झाली तर वरील दोन्ही घटक असूनही राष्ट्रजीवनाचा अंत झाला असेच समजावे. ज्याप्रमाणे एकदा आत्मा निघून गेल्यावर चांगला धट्टाकट्टा देह असला तरी त्याला काही किंमत नसते. त्याचप्रमाणे राष्ट्रातील संस्कृती समाप्त झाल्यावर इतर तत्वे विद्यमान असूनही राष्ट्र नष्ट झाले असेच म्हटले पाहिजे. आपण म्हणतो की, प्राचीन ग्रीस राष्ट्र नष्ट झाले. काय नष्ट झाले? ग्रीसची भूमी अजून तशीच आहे. आजसुद्धा नकाशात तिला स्थान आहे. त्या भूमीवर माणसे राहतात. असेही झाले नाही की भूकंप होऊन एकाएकी सगळे लोक नष्ट झाले आणि नवीन लोक तेथे येऊन स्थायिक झाले. जुन्याच लोकांची प्रजा आजही तेथे राहत आहे. परंतु जुन्या लोकांची संस्कृती नष्ट झाली, त्यांची जीवनप्रणाली नष्ट झाली. म्हणून म्हटले जाते की पुरातन ग्रीस राष्ट्र नष्ट झाले. त्याच प्रकारे इजिप्त राष्ट्र संपले, रोम समाप्त झाले. त्यामुळे संस्कृती हे असे महत्वपूर्ण तत्व आहे की, त्याच्या नष्ट होण्याने राष्ट्रजीवनाचा प्रवाह खंडित होतो. म्हणून संस्कृतीच्या मूळ रूपाचे विवेचन आवश्यक आहे.' (पं. दीनदयाल उपाध्याय, योग्य शब्द योग्य अर्थ)
विशिष्ट राष्ट्र एका अगम्य विश्वजाणीवेतून जन्माला येत असले तरीही ते या जगात एकमेव नसते. विविध राष्ट्रांशी, `आम्ही एक आहोत’ या भावनेने युक्त मानव समूहांशी त्याचा संबंध येतो. हा संबंध समन्वय आणि संघर्ष अशा दोन्ही स्वरूपाचा राहतो. त्याचे दोन्ही समूहांवर परिणाम होतात. राष्ट्र ज्या एका मूळ जीवनहेतूने वाटचाल करीत असते, जगत असते; त्यात या बाह्य संबंधाने व्यत्यय येतो. संस्कृतीच्या माध्यमातून जीवनहेतूला पोषण मिळणे कमी वा बंद होते. राष्ट्राचा जीव गुदमरतो. बाह्य संबंधांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आणि त्या संबंधांनी केलेल्या परिणामातून बदललेल्या, भंग पावलेल्या वा खंडित झालेल्या सांस्कृतिक प्रवाहाला; पुन्हा जीवनहेतूचे पोषण करणारे स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा लागतो. याचाच परामर्श घेताना पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात- `जेव्हा एखादे राष्ट्र पारतंत्र्यात असते त्यावेळी त्या राष्ट्राच्या राष्ट्रीयत्वाचे व त्या देशाच्या नागरिकांच्या देशभक्तीचे एकमेव ध्येय, परसत्तेला दूर करणे हेच असते. जो परकीय सत्तेला विरोध करतो तो देशभक्त गणला जातो. अन ज्या मार्गांनी परकीय सत्ता नष्ट होण्यास मदत होते त्या मार्गांना देशभक्तीचे मार्ग म्हटले जाते. अशा वेळी राष्ट्रभक्तीचे असे विरोधात्मक स्वरूपच सामान्य माणसाच्या मनात राहते. अशा अभावात्मक कल्पनेच्या आधारावर काम करणारे आपली बाजू बळकट करण्यासाठी; ज्यांचा ज्यांचा त्या सत्तेशी शत्रुत्वाचा संबंध असेल अशा सर्वांशी ऐक्य साधण्याची इच्छा बाळगतात. समान शत्रुत्व व समान संकटाची ही भावनाच त्यांच्या एकतेचे एकमेव सूत्र राहते आणि त्याच आधाराने अनेक वेळा राष्ट्रीय आंदोलने चालवली जातात. परंतु चितिचा आत्मसाक्षात्कार हेच राष्ट्रजीवनाचे मुख्य ध्येय असते. राष्ट्राला या आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर घेऊन जाणाराच खरा देशभक्त होय. केवळ परकीयांचा विरोध करणारा देशभक्त नव्हे. भारताच्या समोरही हीच समस्या आहे. आजपर्यंत झालेल्या राष्ट्रीय आंदोलनांचे स्वरूप इंग्रजविरोधी होते. सर्व प्रकारची कारणे पुढे करून एक सामूहिक चळवळ करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात भारतातील अधिकाधिक जनसमूहांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये समान राष्ट्रीय भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या प्रयत्नांना चितिचा आधार नसल्यामुळे या राष्ट्रीयतेचे रचनात्मक स्वरूप दृढ झाले नाही हे आजही स्पष्ट दिसत आहे. केवळ बाह्यांगांनी आत्म्याचे सृजन होत नाही.' (पं. दीनदयाल उपाध्याय, चिति १)
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'राष्ट्रचिंतन' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा