(`भारतीय शिक्षण' मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख. `व्यक्तिमत्व विकास' असा या अंकाचा विषय आहे.)
`व्यक्तिमत्व विकास' हा २१ व्या शतकाचा परवलीचा शब्द बनला आहे. लहान लहान बालकांसाठी उन्हाळ्याच्या सुटीत आयोजित करण्यात येणाऱ्या `व्यक्तिमत्व विकास शिबिरां'पासून अगदी पंतप्रधान म्हणून व्यक्तिमत्वाच्या grooming पर्यंत याची अनेक रूपे पाहायला मिळू शकतात. `व्यक्तिमत्व विकास' या संकल्पनेत दोन गोष्टी अंतर्भूत आहेत- एक म्हणजे व्यक्तिमत्व आणि दुसरे म्हणजे त्याचा विकास. थोडक्यात म्हणजे प्रत्येकाला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्व आहे अन त्याचा विकास घडवायचा आहे. याचे व्यवहारातील स्वरूप मात्र अनेक प्रश्न निर्माण करते. मुळात आज लावण्यात येणारा व्यक्तिमत्व विकासाचा अर्थ, एका साच्यातून काढावयाची माणसे असा होत असून; प्रत्येकाचे म्हणून काही स्वतंत्र व्यक्तिमत्व असते याचा जणू विसरच पडून गेलेला दिसतो. समाजात चांगल्या किंवा आदर्श व्यक्तिमत्वाचे एक कल्पनाचित्र तयार करण्यात आले आहे. वेशभूषा, भाषा, शरीराचे सुशोभन, वागण्या-बोलण्याच्या, खाण्या-पिण्याच्या लकबी, क्रिया-प्रतिक्रियांचे संकेत, वापरावयाच्या किंवा बाळगावयाच्या वस्तूंचे ब्रांड, पैशाची मालकी, अशा काही गोष्टींचे मापदंड विविध माध्यमातून प्रतिष्ठित करण्यात आले असून, त्याला अनुरूप असे शिक्षण-वळण देणे आणि घेणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास असा अर्थ आज सर्वत्र प्रचलित आहे.
मुळात व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ज्या व्यक्तीचा विकास करायचा, ज्या व्यक्तीला समजून घ्यायचे, ज्या व्यक्तीला फुलवायचे; त्या व्यक्तीबद्दलच तोकडी समज ही फार मोठी अडचण आहे. आपण समजून चालतो की, सगळी माणसे सारखीच आहेत. खरे तर `सगळी माणसे सारखी आहेत' हे एक भाववाक्य आहे. भाव या अर्थाने, आध्यात्मिक अर्थाने ते खरे आहे. परंतु व्यावहारिक अर्थाने ते अतिशय असत्य कथन आहे. व्यवहारात आपण पाहतो की माणसांमध्ये असंख्य विविधता आहे, विषमता आहे. जिकडे पाहावे तिकडे विविधता किंवा विषमताच नजरेस पडते. रंग, रूप, स्वभाव, आवडी-निवडी, गरजा, इच्छा-आकांक्षा, वृत्ती, कल, बुद्धिमत्ता, कौशल्य; सगळ्यातच वेगळेपणा. समानता कुठेच नाही. एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्म घेणारी मुलेही सारखी नसतात. पुराणांपासून तर इतिहासातही अशी अनेक उदाहरणे आहेत. हिरण्यकश्यपु आणि प्रल्हाद असो की, महात्मा गांधी आणि हरीलाल; प्रत्यक्ष पिता आणि मुलगा यात केवढा तरी भेद. भारतीय उपखंडातील सगळ्यांचा डीएनए सारखा असल्याचे म्हणतात, तरीही एवढा भेद आहे. म्हणजेच प्रत्येकाचे व्यक्तिमत्व सारखे नाही. तरीही व्यक्तिमत्व विकास करताना विशिष्ट साच्याचा विचार करूनच घडण करण्याचा प्रयत्न होतो. ही ओढाताण कितपत योग्य म्हणता येईल?
व्यक्तिमत्व विकासाच्या आजच्या प्रयत्नातील दुसरी मोठी गफलत म्हणजे- स्पर्धेची प्रेरणा. व्यक्तिमत्व चांगले व विकसित आहे, म्हणजे काय तर, ती व्यक्ती अन्य कोणापेक्षा तरी पुढे आहे, आघाडीवर आहे. हे पुढे असणे वा आघाडीवर असणे देखील भोंगळ पद्धतीच्या मापदंडांनीच निश्चित होणार. क्षणभर तो मुद्दा बाजूस ठेवला तरीही, एक बाब नक्की की- कोणाला तरी वाईट/ अपूर्ण/ चुकीचे/ कमअस्सल दाखवणे म्हणजे स्वत: विकसित होणे. अन्य साऱ्यांबद्दल असा दूषित भाव ठेवून होणारा व्यक्तिमत्वाचा विकास खरा विकास म्हणावा का? फुलाचे फुलणे हे जसे स्वयंभू असते तसे स्वयंभूपणाने फुलणे म्हणजे विकास होय. एक फुल दुसऱ्याशी आकार, रंग, रूप, गंध, याची तुलना करत नाही किंवा त्यासाठी दुसऱ्या फुलाचा दुस्वास करीत नाही. निसर्गात सगळीकडे हे पाहायला मिळते. झाडे एका जागी उभे राहायला नकार देत नाहीत आणि नदी सतत वाहत राहण्याचा कंटाळा करीत नाही. त्यातच त्यांचे सौंदर्य, सफलता आणि इतिकर्तव्यता. माणूस मात्र एकाला दुसऱ्याच्या तुलनेत आणि स्पर्धेत उभे करण्यातच धन्यता मानतो. प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व असून ते फुलवणे, विकसित करणे आवश्यक असते. अन्यथा ते व्यक्तिमत्व खुरटून जाते. कोणी खेळ खेळेल, कोणी वाद्य वाजवील, कोणी गाणे म्हणील, कोणी लिखाण करेल, कोणी प्रयोग करेल, कोणी वस्तू तयार करेल, कोणी स्वयंपाक करेल, कोणी सजावट करेल, कोणी चिंतन करेल, कोणी ध्यान करेल, कोणी जपजाप्य करेल. ती व्यक्ती जे काही करते ते चांगले, सकस, परिपूर्ण, आनंददायी होते आहे की नाही एवढेच पाहायला हवे. अन त्याची मुक्त हस्ते अन्य साऱ्यांसाठी, हातचे काहीही राखून न ठेवता, उधळण करण्याची मानसिकता हवी. नदी पाणी देऊन टाकते, स्वत: पीत नाही. झाडे आपली फळे-फुले सगळी देऊन टाकतात; स्वत:चा शृंगार करीत नाहीत किंवा स्वत: खात नाहीत. व्यक्तिमत्व विकासाची ही दिशा असायला हवी.
तिसरी भ्रामक समजूत अशी की, प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट करू शकतो. एखाद्या चांगल्या तत्वाचे किती विडंबन होऊ शकते याचा हा उत्तम नमुना आहे. निराश, हताश, अकर्मण्य मनुष्याला उभे करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी, विश्वास देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या तत्वाचा अर्थ मर्यादित असून, आपल्या त्या-त्या वेळच्या स्थितीत आपल्या आवाक्यात असणाऱ्या गोष्टी प्रयत्नसाध्य असतात हा त्याचा आशय आहे. हा नीट लक्षात न घेता नुसती धावपळ सुरू असते. त्यामुळे अखेर हाती काहीच लागत नाही.
या सगळ्याचा परिणाम एक तर शून्य असतो आणि दुसरे म्हणजे हास्यास्पद असतो. शिवाय त्याने त्या-त्या व्यक्तीला समाधान, शांती लाभत नाही ते वेगळेच. व्यक्तिमत्व विकासाच्या या कृत्रिम, चुकीच्या खटपटीचाच परिणाम म्हणून आज आपल्याला ६०-६०, ७०-७० वर्षांचे वयोवृद्ध स्त्री-पुरुष फॅशनेबल कपडे घालून रॅम्पवर चालताना पाहायला मिळतात आणि आई-वडील मुलांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गात ने-आण करण्याची अखंड धावपळ करताना दिसतात. तबला-तबला करत एखाद्या मुलाची काही वर्षे वाया घालवली जातात आणि मग तो आयुष्यात कधीही तबल्याला हात लावत नाही. आपल्या मुलाला सगळं आलं पाहिजे- तो अभ्यासात/ खेळात/ सगळ्या कलांमध्ये/ पोहण्यात/ अन्य उपक्रमात पुढे असलाच पाहिजे असा ध्यास घेतलेले पालक आणि शेजारणीकडे अमुक वस्तू आहे त्यामुळे तिचं स्टेटस वाढतं आणि म्हणूनच ती वस्तू आपल्याकडेही असलीच पाहिजे; शिवाय तिच्यापेक्षा महाग असली पाहिजे; असा विचार करणाऱ्या महिला अन याला माना डोलावणारे पुरुष; व्यक्तिमत्व विकासाच्या कोणत्या इयत्तेतले म्हणावेत? पडद्यावर आदर्श व्यक्तित्व साकारणारे नट वा नट्या, प्रत्यक्ष आयुष्यात ते आदर्श उतरविण्याचा आग्रह दूरच प्रयत्नही करताना दिसत नाहीत. किंवा संपूर्णतेचा आग्रह असा विकृत झालेला दिसतो की, भूमिका म्हणून कोणती भूमिका स्वीकारावी याचेही तारतम्य ठेवले जात नाही. आपण सगळ्याच भूमिका करू शकतो हे दाखवणे एवढेच ध्येय उरते, त्याचा स्वत:च्या व्यक्तिमत्वावर किंवा समाजावर काय परिणाम होईल वगैरे विचार करण्याची गरज वाटेनाशी होते. चित्रपट वा नाटक लिहिणे किंवा करणे काय किंवा एखाद्या विषयावर लिहिणे काय; परिणामांचा विचार करण्याची गरज वाटत नाही. अगदी खेड्यापाड्यात सुद्धा तरुण मुली वर्तमानपत्र किंवा पुस्तके वाचणार नाहीत पण ब्युटी पार्लरमध्ये जायला चुकणार नाहीत. असंख्य लोक अतिशय चुकीचे बोलतील पण इंग्रजीतच बोलतील. व्यक्तिमत्व विकासाच्या एकांगीपणाचेच हे परिणाम म्हणायला हवेत.
छोट्या पडद्यावर या विकृतीचे अनेक नमुने पाहायला मिळतात. लहान मुलांचे रिअॅलिटी शो हे एक उत्तम उदाहरण ठरावे. जसे परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरती तयारी विद्यार्थी करतात तशी तयारी या मुलांकडून करून घेतली जाते. त्यात काही यशस्वी ठरतात तर काही अपयशी. अहंकार मात्र दोघांचेही अतोनात वाढतात. यशस्वी होणारे तर हरभऱ्याच्या झाडावर चढतातच, पण अयशस्वी होणारेही आम्ही तिथपर्यंत पोहोचलो या गुर्मीत असतात. अशी मुले अनेकदा कौतुक म्हणून घरगुती कार्यक्रमात काही करायला किंवा म्हणायला सांगितले तरीही त्याला नकार देतात. यश, स्वार्थ, स्पर्धा याखाली या मुलांमधील निरागसता ठेचली जाते. महिलांच्या कार्यक्रमातही हेच दिसते. अनेकदा महिला प्रश्नांची चुकीची उत्तरे देतात अन तरीही त्यांना काही ना काही मिळतेच. म्हणजे माहिती असो की नसो, वेळ मारून नेली की काम संपले. ज्ञानसाधनेचा एवढा उथळ अधिक्षेप याआधी क्वचितच झाला असेल. एखाद्या कलेसाठी, कौशल्यासाठी झोकून देण्याची, गाडून घेण्याची, परिश्रम करण्याची ऊर्मी आणि प्रेरणाच खुडून टाकली जाते. दुसरा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे कोणतीही गोष्ट आनंदासाठी करण्याऐवजी पैसा वा अन्य काहीतरी मिळवण्यासाठी करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे.
मनुष्याचं बाह्य व्यक्तिमत्व महत्वाचं असतं. प्राथमिक परिणाम त्याचाच होतो. ते चांगलं, नीटनेटकं असलं पाहिजे, त्याचा समतोल विकास झाला पाहिजे. व्यावहारिक जीवन जगताना त्याचा उपयोग असतो. परंतु हे बाह्य व्यक्तिमत्व हाच व्यक्तिमत्वाचा एकमेव निकष मानल्याने संपत्ती, सौंदर्य, सत्ता, स्पर्धा, यशस्वीता, सारखेपणा, पोशाखीपणा, कृत्रिमता यांना अवास्तव महत्व प्राप्त झाले. त्याने व्यक्तिमत्वाचा विकास तर झाला नाहीच, उलट व्यक्तीजीवनात आणि सामाजिक जीवनात देखील अशांती, उद्वेग, अस्वस्थता, बकालपणा, दु:ख, वेदना निर्माण केले. व्यक्तिमत्वाला एक आंतरिक बाजूही असते याचा विसर पडल्याने किंवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनवस्था स्थिती उत्पन्न झाली.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसिद्ध प्रसंग आहे. अमेरिकेत असताना त्यांना एकाने विचारले- `तुम्ही असा विचित्र पोशाख का करता? सभ्य पोशाख का करीत नाही?' स्वामीजींनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले- `तुमच्या देशात पोशाखावरून माणसाची सभ्यता ठरते आणि आमच्या देशात त्याच्या चारित्र्यावरून.' व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा हा मुलभूत फरक आहे. स्वामीजींनी ज्या चारित्र्याचा उल्लेख केला तोच आंतरिक व्यक्तिमत्वाचा विकास. मनुष्याला बाह्य जीवन असते तसेच आंतरिक जीवनही असते. माणसाला वित्तेषणा आणि पुत्रेषणा यासोबतच लोकेषणाही असते. म्हणूनच पैसा मिळाला पाहिजे, सगळे उपभोग मिळाले पाहिजेत, सुंदर दिसले पाहिजे, लोकांनी सुंदर म्हटले पाहिजे; या गोष्टींसोबतच लोकांनी आपल्याला चांगले म्हटले पाहिजे, आपल्यावर प्रेम केले पाहिजे, आपले ऐकले पाहिजे, आपला आदर केला पाहिजे, असेही त्याला वाटते. लोकांचे हे प्रेम आणि आदर मिळवायचे असेल तर व्यक्तिमत्वाच्या आंतरिक गुणांचा विकास करावा लागतो. दुसऱ्यांना घेऊन चालणे, दुसऱ्यांच्या गुणांचा गौरव करणे, दुसऱ्यांच्या चुकांना माफ करणे, स्वत:ची टिमकी न वाजवणे; अशा अनेक गोष्टींची गरज असते. या साऱ्या गोष्टी नीतीच्या कक्षेत येतात. आणि नीती म्हणजेच आपला क्षुद्र- देहबोधात्मक- इंद्रियबद्ध- `मी' दूर सारणे. या लहान `मी'पासून जेवढे दूर तेवढे नीतीच्या दृष्टीने उच्च स्थानी. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर; या सहा विकारांपासून दूर जाणे; अहंकार आणि स्वार्थापासून दूर जाणे म्हणजे, लहान `मी'पासून दूर जाणे. लहान `मी'पासून दूर होऊन विश्वव्यापी व्यापक `मी'कडे जाण्यासाठी अभ्यासाची, प्रयत्नांची, साधनेची गरज असते. व्यक्तिमत्वाच्या या आंतरिक विकासाची ही प्रक्रिया जीवनभर चालणारी अखंड प्रक्रिया असते. आंतरिक व्यक्तिमत्वाचा हा विकास एका अर्थाने बाह्य व्यक्तिमत्वाचा विनाश असतो.
ज्ञानयोगाच्या आपल्या विवेचनात स्वामी विवेकानंद स्पष्टपणे म्हणतात- `नीतिशास्त्र नेहमी सांगत असते- मी नव्हे तू. त्याचे ब्रीद असते- मी नव्हे तर माझ्याखेरीज इतर. म्हणजेच स्वार्थीपणा नाही तर नि:स्वार्थता. याचेच नाव नीती. ती अनंत शक्ती किंवा तो अनंत आनंद इंद्रियांद्वारा मिळविण्याच्या प्रयत्नात माणूस व्यक्तित्वाच्या ज्या साऱ्या फोल कल्पनांना बिलगत असतो त्या टाकून दिल्या पाहिजेत, असे नीतिशास्त्राचे सांगणे आहे. आधी इतरांचे आणि नंतर मागाहून माझे अशी तुमची वृत्ती असावयास हवी. इंद्रिये म्हणत असतात- आधी मी. नीतिशास्त्र म्हणत असते- मी सगळ्यात शेवटी. याप्रमाणे नीतीचे सर्व नियम त्यागावर आधारलेले आहेत. भौतिक पातळीवर व्यक्तित्वाचा विनाश करणे, परिपोष करणे नव्हे. ते अनंत कधीच भौतिक पातळीवर व्यक्त व्हावयाचे नाही. ते शक्य नाही. तशी कल्पनाही करता यावयाची नाही. म्हणून त्या अनंताच्या अधिकाधिक सूक्ष्म अभिव्यक्तीसाठी माणसाने भौतिक पातळी सोडून वर उच्च उच्च स्तरांवर जावयास हवे. नीतीचे निरनिराळे नीतीनियम अशा रीतीने घडविले जात असतात. परंतु त्या सर्वात एकच एक मध्यवर्ती भावना असते आणि ती म्हणजे आत्मत्यागाची. संपूर्ण आत्मविलय हेच नीतिशास्त्राचे ध्येय आहे. स्वत:च्या व्यक्तित्वाचा विचार करू नका असे म्हटल्यास लोकांना धक्का बसतो. ज्याला ते स्वत:चे व्यक्तित्व म्हणतात ते हरविण्याची त्यांना भयंकर भीती वाटत असते. परंतु त्याचबरोबर हीच माणसे नीतीचे सर्वोच्च आदर्श अगदी बरोबर असल्याचे मान्य करतील. त्यांच्या हे मुळीच लक्षात येत नाही की, समस्त नीतीनियमांचे एकमेव कार्य, एकमेव लक्ष्य, एकमेव ध्येय आहे- व्यक्तित्वाचा विनाश, त्याची उभारणी नव्हे.'
स्वामीजींनी केलेले हे विवेचन मानवी जीवनाच्या अंतिम थांब्याचे विशाल चित्र रेखाटणारे आहे. पूर्णता हा मानवी जीवनाचा, मानवी व्यक्तित्वाचा सर्वोच्च बिंदू आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची अवस्था निराळी असते. त्या अवस्थेला अनुसरून त्याचा विकास व्हावा. त्याची वाटचाल मात्र पूर्णतेच्या दिशेने व्हायला हवी. कोणी या पूर्णतेच्या प्रवासाची नुकतीच सुरुवात केली असेल, तर कोणी अखेरच्या टप्प्यावर पोहोचला असेल. सहज जाता जाता सांगण्यासारख्या, समजण्यासारख्या या गोष्टीही नसतात. सतत निरीक्षण, आढावा घेणे, परीक्षण करणे व्हायला हवे. कोणाची बाह्य जीवनाची गरज अधिक असेल. त्याला हरकत असण्याची गरज नाही. मात्र सोबतच आंतरिक गुणांचे संगोपन, संवर्धन होईल याकडे लक्ष दिले जायला हवे. जसजसा हा आतला विकास अधिक होत जाईल तसतसे बाह्य आवरण गळत जाईल. ही चारआठ दिवसांची किंवा चारआठ महिन्यांची नव्हे तर आयुष्यभराची प्रक्रिया आहे. त्यासाठी विवेकाची गरज असते. केवळ बाह्य गोष्टी म्हणजेच व्यक्तिमत्व विकास नव्हे तर त्याला आंतरिक बाजूही आहे याचे भान सतत जागृत हवे. बाह्य व्यक्तिमत्वाचा सुयोग्य, सार्थक उपयोग हेही त्याचे महत्वाचे अंग आहे याचीही जाणीव असायला हवी. आजकाल अब्जावधींची धनसंपदा बाळगणाऱ्या धनकुबेरांच्या याद्या प्रसिद्ध होत असतात. तरीही जगातील अर्धी लोकसंख्या विपन्नावस्थेत आहे. व्यक्तिमत्वाच्या विवेकहीन, एकांगी बाह्य बाजूच्या विकासाचे हे एक उदाहरण म्हणता येईल. अनेक क्षेत्रात, अनेक ठिकाणी त्याचा प्रत्यय घेता येईल. हे एकांगीपण समाजात खोलवर झिरपले आहे. ते दूर करून व्यक्तिमत्व विकासाचे संतुलन निर्माण करण्याचे आज जगापुढे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यात भारताची विशेष जबाबदारी आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २० सप्टेंबर २०१४