रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

black money phenomenon - 1

काळा पैसा'. सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय. काल टीव्हीवर एक प्रहसन पाहिलं. नवरा बँकेत जायला निघतो तेव्हा बायको एक डबा घेऊन येते आणि त्याच्या हाती ५०० व हजार रुपयांच्या नोटा देऊन म्हणते- या खात्यात भरून टाका. त्यावर नवरा घाबरतो. तो म्हणतो, असे नाही करता येणार. कुठून आणले हे पैसे? ती म्हणते- तुम्ही घरखर्चाला जे देता त्यातूनच जमवले आहेत. नवरा म्हणतो- अगं हा काळा पैसा आहे. असा पैसा जवळ ठेवता येत नाही. इत्यादी इत्यादी. मुद्दा आहे असा जमवलेला पैसा काळा पैसा म्हणता येईल का? त्याचे नि:संदिग्ध उत्तर असायला हवे- नाही. हा काळा पैसा नाही. कर भरल्यानंतर जो पैसा उरतो त्यातून साठवलेला पैसा हा नक्कीच काळा पैसा नाही. परंतु आज सगळीकडे गोंधळ दिसतो. मुळात आपल्या देशातच नव्हे तर जगभरात सुद्धा `काळा पैसा' कशाला म्हणायचे यावर एकमत नाही. दुसरी गंमत म्हणजे- ज्या पैशावर कर भरलेला नाही तो काळा पैसा असे साधारण समजले जाते. दुसरीकडे अमली पदार्थ, दारू, सिगारेट यासारखे पदार्थ, सट्टेबाजी (काही देशात याला अधिकृत मान्यता आहे), शस्त्रास्त्रांचा व्यापार, दलाली (यालाही काही देशात मान्यता आहे) यातील पैसा कर भरलेला असेल तर काळा पैसा समजण्यात येत नाही. म्हणजे जो पैसा वाईट गोष्टींना प्रोत्साहन देतो, समाजाला व्यसनाधीन करतो असा पैसा काळा पैसा नसून कर न भरलेला पैसा काळा पैसा म्हटला जातो. थोडक्यात - भाजीविक्री, किराणा विक्री, शैक्षणिक वर्ग, वैद्यकीय सेवा इत्यादी गोष्टीतून मिळवलेला पण कर न भरलेला पैसा हा काळा पैसा; परंतु अमाप दारू विकून आणि कर चुकता करून मिळवलेला पैसा हा काळा पैसा नाही. हे जरा गमतीचं वाटेल पण ते तसंच आहे. यासाठी black money phenomenon चा थोडा विचार करावा लागतो. एक नोंद लक्षात ठेवून विचार केल्यास सोपे जाईल. नोंद अशी की, भारतातील काळा पैसा हुडकून काढण्यासाठी पहिली समिती नेमण्यात आली ती १९३६ साली. म्हणजे भारत इंग्रजांच्या सत्तेखाली असताना. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ११ वर्षे. त्यावेळी ना निवडणुका होत्या, ना उद्योगधंद्यांचे आताचे स्वरूप. मग काळा पैसा कुठून आला होता? उघड आहे की, इंग्रज सरकारजवळ ज्या पैशाची नोंद नव्हती तो काळा पैसा. या देशात पैसा होताच. त्याचे व्यवहार पण होत होते. मात्र तो पैसा सरकारच्या ताब्यात नव्हता. तो ताब्यात असण्यासाठी त्याची माहिती हवी, नोंद हवी. त्यामुळे सरकारकडे नोंद असलेला पैसा हा पांढरा (वैध) पैसा आणि नोंद नसेल तो काळा पैसा. देश, देशातील पैसा, त्याचे व्यवहार, परदेशाशी व्यापारी व अन्य संबंध, सुरक्षा या बाबी ताब्यात असण्यासाठी काळा व पांढरा पैसा असा भेद करण्यात येतो.

अगदी फार मागे न जाताही काही गोष्टींचा विचार करता येईल. दोन जागतिक महायुद्धांच्या आधीचा मानव समाज आणि दोन महायुद्धांच्या नंतरचा मानव समाज. या युद्धांच्या आधीही जनता, समाज, देश, राजे, महाराजे, सत्ता इत्यादी होतेच. परंतु सत्ता सत्तांचे संबंध, सत्ता व समाज यांचे संबंध वेगळे होते. दोघांचे परीघ एकमेकांना छेदत असले तरीही त्यांचा त्यांचा स्वतंत्र अवकाश होता. सत्ता समाजाची किंवा समाज सत्तेचा बटीक नव्हते. परस्परांना गरजेपुरती मदत करणे एवढाच भाग होता. स्वभाव, गुणदोष यांच्यानुसार चांगली, वाईट परिस्थिती राहत असे. नैसर्गिक वा मानवी संकटे यात एकमेकांशी हिशेबी देवाणघेवाण होत असे. परंतु दोन्हीचे स्वतंत्र अस्तित्व ठळक होते. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची चरित्रे वाचताना लक्षात येतं की; त्यांचे विदेशात जाणे, तेथील निवास, त्यांचे आर्थिक व्यवहार इत्यादी गोष्टींमध्ये त्या त्या सरकारांची दखल नव्हती. साधे पासपोर्ट वा व्हीसा यांचेही उल्लेख कुठे नाहीत. स्वामी विवेकानंद सरळ अमेरिकेत गेले. पहिल्याच प्रवासात त्यांना भेटलेल्या अनोळखी महिलेने त्यांना मदतीचे आश्वासन दिले, घरी बोलावले अन नंतर अडचणीत त्यांना स्वत:च्या घरी ठेवून मदतही केली. त्यासाठी त्या महिलेला पोलीस चौकीत वगैरे जावे लागले नाही. अमेरिकेत मिळालेल्या व्याख्यानांचे पैसे स्वामीजी सहजपणे भारतात पाठवू शकत. गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले तेव्हा दुसऱ्या वेळी प्लेगच्या तपासणीसाठी त्यांना थांबवण्यात आले होते. अन्यथा कुठे आडकाठी नव्हती. एकूणच वातावरण, समाजाची घडी, व्यवस्था अधिक मोकळ्या होत्या.

मात्र, सत्ताकांक्षेतून जगावर लादल्या गेलेल्या महायुद्धांनी संपूर्ण मानवजातीला भयाक्रांत केले. या महायुद्धांनी घडवलेल्या सामुहिक संघटीत विनाशाने संपूर्ण मानवता भयग्रस्त झाली. त्यातूनच माणूस अधिकाधिक सत्तोन्मुखी होत गेला. सुरक्षिततेसाठी एखाद्या प्रबळ सत्तेची मानवाची गरज वाढत गेली. जगभरातले विविध मानव समूह अधिकाधिक संघटीत होऊ लागले. आपापल्या अस्तित्वाच्या चिंतेतच त्यांचे जीवन व्यतीत होऊ लागले. आपले अस्तित्व याचा अर्थ आपले शारीरिक अस्तित्व, आपला पैसा, आपली भाषा, आपले रीतीरिवाज, आपले उपासना पंथ, आपली जीवनशैली असे सगळेच. यावर आघात होऊ नयेत, हे सुरक्षित राहावे यासाठी प्रत्येक गोष्टीत सत्तेची मदत, सत्तेचे sanction, सत्तेचे कवच मिळवण्याचा प्रयत्न होऊ लागला. सुरक्षेच्या संदर्भातील भयग्रस्तता आणि गरज यांचे स्वरूप बदलून सत्ताकांक्षेने संपूर्ण मानवी जीवन कधी व्यापून टाकले ते कळलेही नाही. परस्पर विश्वास या गोष्टीला तडा जाऊन सगळ्या गोष्टींकडे संशयाने पाहणे सुरु झाले. मार्क्स आणि विज्ञान यांनी मानवाच्या संघर्ष आणि संशयाला बळ पुरवले तरीही त्याचा व्यापक आविष्कार होण्याला आणि त्याचे सिद्धांत होण्याला जागतिक महायुद्धे कारणीभूत झालीत. यातून सत्ता अधिकाधिक पुष्ट, अधिकारसंपन्न, शक्तिशाली होत गेल्या आणि समाज अधिकाधिक दुबळे, अधिकारविहीन आणि निर्बल होत गेले. यानंतर सत्ता समाजाला वेठीला धरू लागल्या आणि समाज सत्तेला नाचवू लागले. अगदी वर्तमानातील जगभरातील अनेक उदाहरणे यासाठी देता येतील.

समाजाने कोणाला तरी सत्ता सोपवायची आणि सत्तेने त्याबदल्यात समाज चालवायचा असे सुरु झाले. मग समाज चालवायचा तर त्याची सगळी मालकी सत्तेकडे हवी. सगळी माहिती, सगळ्या कामांची माहिती, कामांना परवानग्या, जमिनी असं जे जे काही असेल त्याची मालक सत्ता झाली. नाही म्हणायला समाज हाच मालक अशी भाषा वापरण्यात येते. पण समाजाची मालकी indirect असते. या मालकी हक्काच्या संघर्षातून खूप सारे bargaining होते. या सगळ्या सव्यापसव्यात माणूस, त्याचं जगणं, त्याचं स्वरूप या साऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं. याचा आणि black money phenomenon चा काय संबंध? ते पुढच्या भागात.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २८ नोव्हेंबर २०१६


संपूर्ण समाज सत्तेच्या आणि राजकारणाच्या दावणीला किती बांधला जातो आहे हे कुणालाही कळत नाही की कळूनही वळत नाही. राजकारणाकडे दुर्लक्ष हाही यावरील उपाय नाही. उलट त्याने सत्ता आणि राजकारणाची पकड घट्टच होत जाईल. पंथ-संप्रदायांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आदी जन्मास आले. यानंतर सत्ता आणि राजकारणाचा विळखा सोडवायला अशाच एखाद्या युगांतराची गरज नक्कीच भासणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा