रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

ध्यास

असाच मनाने ध्यास घेतला, मीठ आणि साखर एकत्र करण्याचा. एका वाटीत मीठ आणि साखर सारख्या प्रमाणात काढून ठेवले. वाट पाहिली आठवडाभर. काहीच झाले नाही. मन म्हणालं- ते आपोआप एकत्र होत नाहीत. काहीतरी करावं लागेल. मग विड्याचे पान कुटण्याच्या खलबत्त्यात टाकून दोन्ही कुटले एकत्र. ते मिश्रण ठेवलं पुन्हा वाटीत काढून. आठवडाभरासाठी. तरीही नाहीच झाले दोघे एक. मग ती वाटी ठेवली देवापुढे. बाबा रे, आता तू तरी काहीतरी कर. माझी एवढी इच्छा पूर्ण कर. आठवडा लोटला. काहीच घडलं नाही. एक दिवस सचिंत बसलेले असताना एक कुणी आला. सचिंत पाहून विचारता झाला- काय झाले. मनाने सगळा प्रकार सांगितला. एक कुणी म्हणाला- वाटी आण. वाटी आणली. मग एक कुणी म्हणाला, पेलाभर पाणी मिळेल का? पाणी आणले. एका कुणाने ते पाणी वाटीत टाकले. अन म्हणाला- राहू दे असेच. मिसळून जातील दोघेही. मन पाहत राहिलं वाटीकडे. काही वेळ गेला अन मन हसू लागलं- वाटीतील साखर आणि मीठ मिसळून गेले होते. एक झाले होते.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

असेच दिवस जात होते. मनाने पुन्हा ध्यास घेतला. यावेळी ध्यास होता- साखर आणि वाळू एक करण्याचा. देव, दैव, स्वप्रयत्न हे सगळं बाजूला सारून; मनाने ठरवलं- कुणी एकाने सांगितलेला उपाय चांगला आहे. रामबाण आहे. तोच करायचा. वाटीत साखर आणि वाळू सारख्या प्रमाणात घेतले. त्यात पाणी टाकले अन वाट पाहू लागलं मन, त्यांच्या एक होण्याची, मिसळून जाण्याची. दिवस गेले, आठवडे उलटले. काहीच झाले नाही. मन सचिंत बसले होते. पुन्हा एकदा मागचाच कुणी एक आला. सचिंत पाहून कारण पुसले. मनाने वृत्तांत सांगितला. कुणी एक फक्त हसला. अन निघून गेला.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मनाला एवढंच कळलं- वाळू अन साखर एक होऊ शकत नसतील किंवा कुणा एकाला त्यांना एक करण्याचा उपाय माहीत नसेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, २९ नोव्हेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा