शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

सेवा

'हे काका या मुलांना एक रुपयात जेऊ घालतात. किती लाईक मिळणार यांना?' असं एक चित्र नजरेवर आदळलं. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या एका नेत्याने/ मंत्र्याने, गरीब मुलांना दिवाळीनिमित्त पंचतारांकित हॉटेलात जेऊ घातल्याची बातमी वाचण्यात आली होती. दोन्ही बातम्या चांगल्या आहेत, पण...

हा पणच महत्वाचा आहे. 'सेवा' या गोष्टीचं माणसाला एक सुप्त आकर्षण असतं. 'सेवा' म्हणजे तरी काय? कोणासाठी काहीतरी करणे. ते बरोबरीच्या नात्याने असेल तर त्याला सेवा म्हणत नाहीत. कोणी तरी मोठा अन कोणी तरी लहान, कोणी तरी अभावग्रस्त आणि कोणी तरी संपन्न; अशा स्थितीत जेव्हा कोणासाठी काही केले जाते तेव्हा त्यास सेवा म्हणतात. मग ही सेवा नावाची गोष्ट चांगली म्हणता येईल का? ती अपरिहार्य असू शकते पण चांगली असू शकेल? आज मात्र त्या सेवेला एक वलय प्राप्त झालं आहे. वास्तविक सेवाशून्य असं जीवन असावं, असा समाज असावा. अभाव असू नये, जीवनाला अडथळा करेल एवढं लहान मोठेपण असू नये; ही चांगली स्थिती म्हटली पाहिजे. परंतु सेवेला आज मिळालेल्या प्रतिष्ठेमुळे असा विचारच केला जात नाही. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात सुद्धा सेवा वा सेवासदृश आश्वासने असतात, पण सेवेची गरजच पडणार नाही असा काही कार्यक्रम, अशा काही योजना, अशी व्यवस्था; याबद्दल सारेच मौन. मोठमोठ्या कंपन्यांना सुद्धा social responsibility cause असतो, पण त्यांची धोरणे, उत्पादने, किमती, जबाबदाऱ्या, विस्तार हे सारे सेवेची गरजच संपुष्टात आणणारे असावे, असा विचार मात्र मांडला जात नाही. वर्तमान जीवनविषयक कल्पनांनीच खरे तर सेवेची गरज निर्माण केली आहे. केंद्रीकरण, विषमता, अभाव ही आजच्या जीवनविषयक कल्पनांची देण आहे. जीवनाची दिशा आणि कल्पना बदलली की, सेवेची गरजच संपेल. तसा विचार मात्र केला जात नाही.

सेवेचे आणखीन काही पैलू आहेत ज्यांचा विचार व्हायला हवा. आज सेवा म्हटले की - शिक्षण, आरोग्य, भोजन या तीन गोष्टींचा विचार समोर येतो. पण माणसाच्या गरजा काय एवढ्याच आहेत? विचार, भावना, संस्कार, प्रबोधन, मनोरंजन अशाही त्याच्या गरजा आहेतच. माणूस गरीब असो की श्रीमंत, शहरातील असो की खेड्यातील, स्त्री असो की पुरुष; या सगळ्या त्याच्याही गरजा आहेतच. Hard आणि soft हे जसे शिक्षण, कौशल्य, वृत्ती यासाठी असते तसेच गरजांच्या बाबतीतही असते. Hard गरजांची पूर्ती ही जशी सेवा, तशीच soft गरजांची पूर्ती हीदेखील सेवाच. आज तसे समजले जात नाही. आपल्या दृष्टीत तसा बदल व्हायला हवा.

सेवा करणाऱ्यांची वृत्ती हादेखील एक पैलू आहे. सेवा ही आज मोठ्या प्रमाणात पैसा कमावण्याचे साधन झालेली आहे. सेवा हाच अनेकांचा व्यवसाय झालेला आहे. त्यावर थोडेफार बोलले जाते. ही वृत्ती निषेधार्ह आहेच. मात्र खऱ्या अर्थाने सेवा करणारे, सेवेचा व्यवसाय न करणारे देखील लोक समाजात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची एक मानसिकता सुद्धा फारशी योग्य म्हणता येत नाही. ती म्हणजे श्रेष्ठत्व गंड.  Superiority complex. आपण सेवा करतो म्हणजे महान आहोत किंवा जे लोक अशी सेवा वगैरे करत नाहीत ते कुचकामी, बेजबाबदार, निरर्थक आहेत; असा मनोभाव पुष्कळदा पाहायला मिळतो. ही विकृती म्हटली पाहिजे. एक तर सेवा करा असे काही कोणी सांगितलेले नसते. ज्याला वाटते तो करतो. हे वाटणं मनातून असेल तर बाकीचे काय करतात याकडे लक्ष जाऊ नये. तसे लक्ष जात असेल तर त्या सेवेमागे दुसरा काही उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरे म्हणजे, काही लोकांची वृत्ती सेवेची असते तर काही लोकांची नसते. याचा अर्थ ते वाईट असतात असा होत नाही. शिवाय सेवाकार्यातील आपला वाटा गुपचूप उचलणारेही पुष्कळच असतात. सेवा हा काही जीवनाचा एकमेव पैलू नाही. मुळातच सेवा ही गरजेपोटी निर्माण झालेली कृत्रिम बाब आहे. ती अधिकाधिक कमी व्हावी यासाठी काय काय करता येईल याचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. त्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी ही सुद्धा एक वेगळी सेवाच समजायला हरकत नसायला हवी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ६ नोव्हेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा