शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

सहिष्णुता अन रा. स्व. संघ - १

सहिष्णुता...! व्यक्तीजीवनात किंवा सामाजिक जीवनात आवश्यक असलेली मुलभूत अशी बाब. पण तिचेही राजकारण होऊ शकते हे भारतीय जनतेने आणि जगानेही नुकतेच अनुभवले. अपघात, वादळ, भूकंप हे जसे संबंधित आणि संबंधित नसलेले दोघांनाही फटका देतात, तसेच राजकारणाचे असल्याने त्यात संबंधित असलेले अन नसलेले सगळे भरडले जातात. सहिष्णुतेचे जे राजकारण नुकतेच झाले त्यात रा.स्व. संघाला उगाचच सोसावे लागले. अर्थात रा.स्व. संघाला यात नवीन काही नाही. असे सोसणे त्याच्या जणू पाचवीलाच पूजले आहे. तो स्वतंत्र विषय आहे. पण सहिष्णुतेच्या संदर्भात संघाचा इतिहास काय सांगतो?

१९२५ च्या विजयादशमीला रा.स्व. संघाची स्थापना करतानाच संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी सांगितले होते- `सर्वेषां अविरोधेन' असे संघाचे काम आहे. ते कोणाच्याही विरोधातले काम नाही. अमुक समस्या आहे, तमुक समस्या आहे म्हणून संघाचे काम नाही. किंवा अमक्याचा किंवा तमक्याचा विरोध करण्यासाठी संघाचे काम नाही. तर आपले दोष दूर करणे, आपल्या त्रुटी दूर करणे, आपला दुबळेपणा दूर करणे, लाचारी दूर करणे, पुरुषार्थी बनणे; अन हे करून स्वत: चांगले जीवन जगून जगाला आदर्श जीवन जगण्यासाठी जी करता येईल ती मदत करणे. जगासाठी स्वत:ला संपवून टाकणे किंवा स्वत:साठी जगाला संपवून टाकणे हे दोन्हीही त्या विचारात न बसणारे. अशा रीतीने संघाच्या स्थापनेपासूनच संघाचा सहिष्णुतेचा इतिहास सुरु झाला. तो आजतागायत सुरु आहे.

रा. स्व. संघावर पहिला मोठा आघात झाला तो स्वातंत्र्यानंतर काहीच महिन्यात. महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा. त्या सबंध पर्वत संघाने जी सहिष्णुता दाखविली त्याला तोड नाही. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली. ३१ जानेवारीला त्यांचा अंत्यसंस्कार झाला अन त्याच दिवशी रात्रीपासून संघाला चिरडून टाकण्याचे उपद्व्याप सुरु झाले. नागपुरात रा. स्व. संघाचे महाल भागातील मुख्यालय, रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार यांची समाधी आणि सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे नागोबा गल्लीतील निवासस्थान यांच्यावर शेकडो लोक चालून आले. गुरुजींच्या घराच्या संरक्षणाची व्यवस्था बाळासाहेब देवरस जातीने पाहत होते. मुख्यालयाची सुरक्षा पंडित बच्छराजजी व्यास यांच्याकडे होती. डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांकडे होती. जमावाच्या हल्ल्यात समाधी उद्ध्वस्त झाली. तिथे मोकळे मैदान असल्याने हल्लेखोरांना फारसे कठीण गेले नाही. गुरुजींचे घर त्याच्या अडचणीच्या जागेमुळे हल्लेखोरांच्या तडाख्यातून वाचले. मुख्यालयात थोडी हाणामारी झाली. काही जणांना जखमाही झाल्या. पण सुदैवाने पोलीस आले. त्यांनी मुख्यालयाला वेढा घातला आणि फार मोठा अनर्थ टळला.

१ फेब्रुवारी १९४८ तणावात गेला. संध्याकाळी गुरुजींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिटणीस पार्कमध्ये जंगी सभा भरली. त्यात संघावर गरळ ओकणारी आणि चिथावणीखोर भाषणे झाली. तेथे असलेला हजारोंचा जमाव त्याने बिथरला. तरीही घराची रचना आणि पोलिसांचा घरावरील पहारा यामुळे अनुचित काही घडले नाही. त्याच दिवशी रात्री, म्हणजे २ फेब्रुवारीच्या पहाटे २ वाजता गुरुजींना अटक करण्यात आली. कलम लावले होते ३०२ म्हणजे खुनाचे. जणू त्यांनीच सुरा हाती घेऊन गांधीजींना मारले होते. चारच दिवसांनी हे कलम मागे घेतले गेले, हा भाग वेगळा. परंतु एखाद्या अट्टल गुंडाला द्यावी तशी वागणूक गुरुजींना देण्यात आली. त्या वेळपर्यंत संघावर बंदीही घालण्यात आलेली नव्हती. संघावर ४ फेब्रुवारी रोजी बंदी घालण्यात आली. गुरुजींनी लगेच कारागृहातून पत्रक काढून संघाच्या शाखा बंद करण्याच्या सूचना दिल्या. संघाच्या व्यवस्थेतून त्या देशभर पोहोचल्या. पण संघाने पाठवलेले ते पत्रक नागपूरचे दैनिक `हितवाद' वगळता कोणीही छापले नाही. त्यानंतर `हितवाद'लाही पत्रक का छापले म्हणून तंबी मिळाली.

या काळात गुरुजींची, संघाची भूमिका, वर्तणूक कशी होती? गुरुजींनी स्वयंसेवकांना सांगितले - `मी ज्या समाजासाठी काम करतो, त्या समाजबांधवांचे रक्त माझ्यासाठी सांडलेले मला आवडणार नाही. शांत राहा. आपलीच जीभ दाताखाली येते तेव्हा आपण जीभ तोडत नाही किंवा दात पाडत नाही.' अन स्वयंसेवकांनीही संयम बाळगला. २० हजार स्वयंसेवकांच्या घराच्या अन संघाच्या कार्यालयांच्या झडत्या घेण्यात आल्या. काहीही मिळाले नाही. ६ ऑगस्ट १९४८ रोजी गुरुजींची सुटका करण्यात आली. तब्बल सहा महिने गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तीला विनाकारण तुरुंगात डांबले होते. सरसंघचालकांची सुटका झाली तरीही संघावर बंदी कायम होती आणि गुरुजींना नागपूर सोडण्यास बंदी होती. त्याला अनुसरून गुरुजींनी पंतप्रधान नेहरू आणि गृहमंत्री सरदार पटेल यांना पत्रे लिहिली. त्याला नेहरूंचे उत्तर आले नाही. पटेलांचे आले. गुरुजी दिल्लीला गेले अन १७ ऑक्टोबर १९४८ आणि २३ ऑक्टोबर १९४८ रोजी त्यांची गृहमंत्री पटेल यांच्याशी भेट झाली. ३० ऑक्टोबरला गुरुजींना गृहमंत्र्यांचा तोंडी निरोप मिळाला की, आपण नागपूरला निघून जावे. गुरुजींनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि २ नोव्हेंबर रोजी दिल्लीत पत्रपरिषद घेऊन संघाची भूमिका स्पष्ट केली. सरकारने संघावर लावलेले आरोप अतिशय हास्यास्पद होते. राज्यघटना तयार व्हायची असूनही; संघ घटनाविरोधी आहे असा केंद्र सरकारचा आरोप होता. या पत्र परिषदेनंतर १३ नोव्हेंबर १९४८ रोजी गुरुजींना पुन्हा अटक करून नागपूरला पाठवण्यात आले. तेथून त्यांची रवानगी शिवनी तुरुंगात करण्यात आली.

गुरुजींना पुन्हा झालेली अटक आणि संघावरील बंदी उठत नाही हे पाहून, संघाने देशव्यापी सत्याग्रहाचा निर्णय घेतला. गुरुजींनी त्या आशयाचे पत्रक काढले आणि तेव्हाचे सरकार्यवाह भय्याजी दाणी यांनी तो निर्णय जाहीर केला. ९ डिसेंबर १९४८ पासून सत्याग्रह सुरु झाला. ८० हजार स्वयंसेवकांनी सत्याग्रह केला. पंजाब आणि तामिळनाडू प्रांतात सत्याग्रहींवर पोलिसांनी अत्याचार केले. याचे वृत्त वाचल्यावर तामिळनाडूचे माजी advocate general टी. आर. व्यंकटराम शास्त्री यांनी सरकारच्या निषेधाचे एक पत्र `हिंदू' दैनिकात प्रसिद्ध केले. सत्याग्रहामुळे अन त्याच्या विशाल अन संयमित स्वरूपामुळे समाजातील विचारी लोक याबद्दल बोलू लागले. यातूनच पुण्याच्या `केसरी' दैनिकाचे तेव्हाचे संपादक ग. वि. केतकर पुढे आले आणि त्यांनी शिवनी कारागृहात गुरुजींची भेट घेऊन सत्याग्रह स्थगित करण्याची विनंती केली. तसे झाल्यास चर्चा सुरु होऊ शकेल असे ते म्हणाले. गुरुजींनी ती विनंती मान्य केली. २२ जानेवारी १९४९ पासून सत्याग्रह थांबविण्यात आला. त्यानंतर व्यंकटराम शास्त्री पुढे आले. त्यांनी गुरुजींची व सरदार पटेल यांची भेट घेतली. संघाची लिखित घटना नाही हा नवाच आरोप सरकारने केला आणि घटनेची मागणी केली. संघावरील बंदी या कारणाने घालण्यात आलेली नाही याकडे गुरुजींनी लक्ष वेधले. तरीही श्री. शास्त्री यांनी केलेली विनंती त्यांनी मान्य केली. त्यानुसार श्री. शास्त्री यांनीच संघाच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून घटना लिखित केली अन सरकारला सादर केली. सरकारने घटना गुरुजींकडून यावी असा आग्रह धरला. त्यानुसार गुरुजींनी घटना पाठवली.

नंतर सरकारने संघाच्या घटनेत त्रुटी काढण्याचा वेळकाढूपणा सुरु केला. त्यालाही गुरुजींनी स्पष्टीकरणाचे उत्तर पाठवले. त्या परखड उत्तराने सरकार चिडले. त्याने उलट पत्र पाठवले. त्यातून सरकारचा आकस आणि भावना स्पष्ट झाली. त्यानंतर गुरुजींनी पत्रव्यवहार बंद केला. महिनाभर काहीच झाले नाही. अचानक पंडित मौलीचंद्र शर्मा या प्रकरणात सहभागी झाले. त्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला. संघाने मात्र शर्मा यांना स्पष्टपणे सांगितले की, गुरुजी सरकारला काहीही लिहून देणार नाहीत. त्यावर असा मार्ग सुचवण्यात आला की, गुरुजींनी श्री. शर्मा यांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट करावी. त्यानुसार १० जुलै १९४९ रोजी गुरुजींनी मौलीचंद्रांना व्यक्तिगत पत्र लिहिले. अन १२ जुलै १९४९ रोजी संघावरील बंदी बिनशर्त उठविण्यात आली. या निर्णयाची घोषणा आकाशवाणीने संध्याकाळी केली. उल्लेखनीय म्हणजे- त्याच दिवशी सकाळच्या वृत्तपत्रात; आपली मध्यस्थी सरकारच्या आडमुठेपणाने अयशस्वी झाल्याचे श्री. व्यंकटराम शास्त्री यांचे निवेदन प्रसिद्ध झाले होते.

संघावरील बंदी उठवण्याच्या संदर्भात १४ ऑक्टोबर १९४९ रोजी मुंबई विधानसभेत प्रश्नोत्तरे झाली. त्यात गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी संघावरील बंदी बिनशर्त उठविण्यात आली असून संघाने त्यासाठी काहीही आश्वासन सरकारला दिले नसल्याचे सांगितले होते. जनसंघ त्यावेळी स्थापन झालेला नव्हता, तसा विचारही झालेला नव्हता. त्यामुळे संघाच्या बाजूने विधानसभेत कोणी असण्याचा प्रश्नच नव्हता. याउपर गृहमंत्र्यांनी दिलेले उत्तर पुरेसे स्पष्ट आणि लक्षणीय आहे. यानंतर श्री. गुरुजींचा संपूर्ण देशभर व्यापक प्रवास झाला. शेकडो सभा, बैठका, चर्चा, प्रश्नोत्तरे, पत्र परिषदा असे सगळे झाले. त्या सगळ्यातून गुरुजींनी सातत्याने एकच विचार मांडला- `वयं पंचाधिकम शतम्'. आपसात आम्ही शंभर व पाच असू, पण देश म्हणून आपण एकशेपाच आहोत. कोणतेही किल्मिष ठेवू नका. जीभ दाताखाली येते तसेच समजा अन भारतमातेच्या सेवेच्या कामाला लागा.

संघाच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न होऊनही; अतिशय अपमानास्पद, अन्यायपूर्ण वागणूक मिळूनही संघाची भूमिका, व्यवहार आणि प्रतिसाद  संयमित होते. पण दुसरी बाजू काय आहे? या साऱ्याचा फायदा घेऊन जाळपोळ, मारहाण, हिंसाचार, शिव्याशाप, अपप्रचार यांचा कळस गाठला गेला. संघ ब्राम्हणांचा म्हणून ब्राम्हणांना तर लक्ष्य केले गेलेच, पण अब्राम्हण स्वयंसेवकांनाही संघाचे म्हणून लक्ष्य केले गेले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अन्य विविध प्रकारे सहनशीलतेची परीक्षा पाहण्यात आली. परिणामी स्वयंसेवकच संघावर रुष्ट झाले. अनेकांनी संघ सोडला. १९२५ पासून जोडलेली माणसे विविध कारणांनी दुरावली. त्यांना पुन्हा जोडण्याचे नवेच आव्हान संघापुढे उभे राहिले. संघाने तेही यशस्वीपणे पेलले. मात्र तरीही संघ महात्मा गांधीजींचा हत्यारा आहे हा आरोप अजूनही उगाळला जातो. मी-मी म्हणणारे विद्वान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवीत तेच आरोप उगाळत राहतात. आपण न्यायव्यवस्थेचा अपमान करीत आहोत हेही त्यांच्या गावी नसते. या सगळ्या प्रकारानंतर अनेक वर्षांनी हाच आरोप करण्यासाठी काँग्रेसचे अ. भा. अध्यक्ष सीताराम केसरी यांना जाहीर माफी मागावी लागली होती. तरीही सोनिया अन राहुल गांधी यांच्यापासून कुमार केतकर यांच्यापर्यंत अनेक लोक हाच आरोप बेछूटपणे करत सुटतात. हे सारे वर्षानुवर्षे, दशकानुदशके शांतपणे ऐकून घेणारा संघ `असहिष्णू' ठरवण्याचा प्रयत्न तथाकथित विद्वान करतात आणि अत्यंत खोटारडेपणाने संघाला चिरडून टाकण्याची प्रतिज्ञा करणारे नेहरू ते राहुल पर्यंतचे सारे छोटेमोठे प्रवाह `सहिष्णू' असल्याचे ढोल पिटले जातात हे आपले सामाजिक दुर्दैव आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, १४ नोव्हेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा