शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

विनोबांचे गांधी - २

विनोबांनी गांधीजींच्या विभूतीकरणाचा स्पष्ट विरोध केलेला आहे. याविषयी ते म्हणतात - 'पुष्कळ लोक त्यांना राम व कृष्ण यांच्या कोटीत नेऊन बसवतात. हे बरोबर नाही. पुराण काळापासून अनेक कवी कल्पनांनी समृद्ध बनलेल्या राम कृष्णांच्या चरित्र कोटीत ते टिकू शकणार नाहीत. त्यांच्या तुलनेत हे फिक्के पडतील. शिवाय विज्ञानाच्या युगात असा प्रयत्न हास्यास्पदही होईल. भारताला स्वतंत्र करण्यासाठी भगवंताचा जन्म झाला, अशा दृष्टीने आपण गांधीजींचे चरित्र लिहायला बसू तर ती भागवताची हास्यास्पद नक्कल करण्यासारखे होईल. तो एक विनोद ठरेल.'

गांधीजी मानव होते आणि मानवच राहिले पाहिजेत, असे मत मांडून ते म्हणतात, त्याने आपलाच लाभ आहे. त्यामुळे जगाला गरज असलेला एक नैतिक आदर्श आपल्याला मिळेल. त्यांना देव बनवल्यास आपण मानवतेचा एक आदर्श गमावून बसू, असा इशाराही विनोबा देतात. आज आपल्याला नव्या देवाची नव्हे तर जीवनशुद्धीच्या एका पवित्र दृष्टांताची गरज आहे असे मतही ते ओघात व्यक्त करतात.

शुकदेव जन्मापासून ज्ञानी होते, कपिल महामुनी जन्म होताक्षणीच मातेला उपदेश करू लागले, शंकराचार्य आठव्या वर्षीच वेदाभ्यास पूर्ण करून भाष्य लिहायला बसले; हे नमूद करून विनोबा म्हणतात - 'गांधीजी अलौकिक पुरुष म्हणून जन्मास आले नाहीत ही कृपाच समजावी. त्यामुळे त्यांचे जीवन आपल्यासाठी जास्त अनुकूल होईल.'

गांधीजी रोजच्या रोज बदलत राहिले. क्षणा क्षणाला विकसत राहिले. आज ते असते तर कसे वळण घेते हे कोणी सांगू शकणार नाही, असा अभिप्राय व्यक्त करताना विनोबा म्हणतात, आपण महापुरुषांच्या वचनांचे चिंतन केले पाहिजे, त्यांच्या स्थूल चरित्राचे नाही. हेच विवेचन पुढे नेताना त्यांनी अतिशय परखड शब्दात मत व्यक्त केले आहे. विनोबा म्हणतात - 'आजच्या विज्ञान युगात पुराण काळचा मनू आणि जुना मार्क्स चालणार नाही. आणि मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की, गांधीही आज जसाच्या तसा चालणार नाही.'

या विवेचनानंतर अनेकांच्या मनात उद्भवणारा प्रश्न विनोबा स्वतःच उपस्थित करतात आणि त्याचे उत्तरही देतात. ते विचारतात - तुम्ही म्हणाल तुम्ही गांधींपेक्षाही पुढे गेलात काय? अन उत्तर देतात - आपल्यात नम्रता पूर्वक असे सांगण्याची शक्ती असली पाहिजे की, गांधीजींच्या काळाहून आपण पुढेच आहोत. यात गांधीजींपेक्षा मोठे होण्याचा प्रश्न नाही पण आपल्यासमोर नवी नवी क्षितिजे उभी राहिली आहेत हे आपल्याला समजले पाहिजे.

गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मारकाची चर्चा सुरू झाली. त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना विनोबा म्हणतात - 'या सगळ्या स्थूल स्मारकांनी त्यांच्या खऱ्या स्मृतीचे काम साधणार नाही. उलट अशा स्मारकांमुळे मुख्य गोष्ट नजरेआड होण्याची भीती आहे. लोक विटा चुना दगडाने सामान्य घरे बनवतात आणि त्यावर लिहितात 'गांधीघर'. पण खरे गांधीघर असे बनत नाही. ते सत्य, प्रेम, करुणेने बनते; असा विनोबांचा अभिप्राय आहे.

गांधीजी क्रांतदर्शी होते असे मत व्यक्त करून विनोबा म्हणतात - 'स्वराज्य मिळाल्यानंतर स्वराज्य हा शब्द लोकांना पुन्हा प्रेरणा देऊ शकणार नाही, उत्साहित करू शकणार नाही. त्यांच्यासमोर दुसरा संकल्प नसेल तर त्यांची शक्ती क्षीण होईल हे गांधीजी जाणत होते. म्हणून त्यांनी स्वराज्यानंतरचे ध्येय लोकांसमोर ठेवले आणि त्यासाठी शब्द दिला सर्वोदय. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय.' हा सर्वोदयाचा संकल्प देशव्यापी होईल तेव्हाच बापूंचे खरे स्मारक उभे केले असे म्हणता येईल, असाही विनोबांचा अभिप्राय आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २० नोव्हेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा