बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

लाचारांचा सत्तायोग

सप्टेम्बरपासून गायब झालेली राजस्थानातील भंवरीदेवी पुन्हा एकदा राजस्थानच्या राजकारणावर स्वार झाली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ झाला, पण अजूनही  भंवरीदेवीचा पत्ता लागलेला नाही. तिच्या नवर्याने ती गायब झाल्याची तक्रार केली तेव्हापासूनच हे प्रकरण गूढ़ बनलेले आहे. या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, त्या स्वत: राजस्थानच्या राज्यपाल राहिलेल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष महिला आहेत, सत्तारूढ आघाडीच्या प्रमुख महिला आहेत, विरोधी पक्षनेत्या महिला आहेत. तरीही भंवरीदेवीचे अपहरण झाले की नाही, ती सध्या कुठे आहे, ती जिवंत आहे वा तिचे काही बरेवाईट झाले काहीही ठावठिकाणा नाही. राजस्थानच्या एका मंत्र्याचे, महिपाल मदेरणा यांचे भंवरीदेवीशी अंतरंग संबंध होते आणि या प्रकरणात ते गुंतलेले आहेत असा आरोप गेले दोन महीने होत होता. ते मात्र हा आरोप फेटाळत होते. परंतु आता सीबीआयच्या चौकशीत त्यांनी आपण भंवरीदेवीला ओळखत होतो अशी कबूली दिली आणि प्रसार माध्यमांनी तर त्या दोघांच्या संबंधांची सीडीच शोधून काढली आहे. 

हा सारा प्रकार राजस्थानचे मुख्यमंत्री गेहेलोत यांना माहीत होता. परंतु त्यांनी काहीही कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मदेरणा हे ताकतवर जाट नेते आहेत आणि जाट मतांवर राजस्थानची सत्ता समीकरणे अवलंबून असल्याने त्यांना हात लावणे कठीण आहे असे विश्लेषण ऐकू येत आहे. दिल्लीतील कोँग्रेस नेतृत्वाने गेहेलोत यांना कारवाईसाठी बाध्य न करण्यापाठीही हाच तर्क दिला जात आहे. असा तर्क देणारे आणि असे विश्लेषण करणारे कथित विश्लेषक आणि विचारवंत यांचीही लाचारी लपून न राहणारी आहे. सत्य समोर आले आणि त्याची पाठराखण केली तर फार फार तर काय होईल? सत्ता गमवावी लागेल, पण सत्य, मूल्य आणि मानवता यासाठी सत्ताही गमवावी लागली तरी हरकत नाही अशी कणखर वृत्ती आज जिवंत तरी आहे का? जात, सेक्स, गुंडगिरी या सार्याचा वाट्टेल तसा बेधुंद वापर करायचा, कशाबद्दलही काहीही तमा बाळगायची नाही, सत्तेचे लक्ष्य दृष्टीआड होऊ द्यायचे नाही आणि हाती आलेली सत्ता सोडायची नाही हाच आजचा प्रघात झाला आहे. 

सत्तेसाठी वाट्टेल ती लाचारी करायला कोणालाही काहीही वाटेनासे झाले आहे. भंवरीदेवी देखील यासाठी जबाबदार नाही का? एवढ्या मोठ्या नेत्याशी खुलेआम लैंगिक संबंध ठेवणार्या या महिलेच्या राजकीय आकांक्षा लपून राहिलेल्या नव्हत्या. उलट त्या अडचणीच्या ठरल्यामुळेच तिच्या वाट्याला हे भोग आले. दुसर्या बाजूने विचार केला तर सत्तेसाठी आपल्या स्त्रीत्वाचा वापर करण्याची लाचारी तिनेही स्वीकारलीच होती. यातील कोणती लाचारी समर्थनीय ठरेल? खरे तर कोणतीही नाही.

सत्तेसाठी ही लाचारी एवढ्यापुरतीच मर्यादित आहे का? या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर, `नाही' असे आहे. बंगालचे राजकारण करणार्या तृणमूल कोँग्रेसच्या ममता बनर्जी यांनी पेट्रोल दरवाढीवरून नुकताच केलेला तमाशा दुसरे काय आहे? सामान्य माणसासाठी कोलकात्यात मगरीचे अश्रू ढाळणार्या तृणमूल कोँग्रेसचे अश्रू दिल्लीत सुकून गेले. कित्येक महिन्यांपासून पोटची पोर तुरुंगात असूनही द्रविड मुन्नेत्र कळघमचे करूणानिधी दिल्लीतल्या खुर्च्या सोडायला तयार नाहीत. लाचारी लाचारी म्हणजे यापेक्षा दुसरे काय असते? आपले हात दगडाखाली सापडले असले की अशी लाचारी अपरिहार्य ठरते. आज तीच पाहायला मिळत आहे. `कर नाही त्याला डर कशाचा?' अशी एक म्हण आहे. परंतु सर्व प्रकारची मस्ती करण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत, असे वाटणार्याँना मग सत्तेसाठी लाचारी पत्करावीच लागते.

आज महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते काय आहे? सत्तेत सहभागी असलेल्या दोन्ही पक्षातून विस्तव जात नाही. भर मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री दुसर्या पक्षावर थेट आरोप करतात. कोंगेसची राष्ट्रवादीबद्दलची नाराजी उघड आहे. सत्ता मात्र कोणालाही सोडायची नाही. भारतीय जनता पार्टी ही याला अपवाद समजण्याचे कारण नाही. कर्नाटकात येडीयुरप्पांचे उदाहरण ताजे आहे. ही लाचारी तर एवढी की, पक्षाच्या अध्यक्षांनी नैतिकता आणि कायदेशीरपणा असा नवाच वाद जन्माला घातला. असेच असेल तर नैतिकतेला काही स्थान नाही, किमान राजकारणात नैतिकता आणू नये असे एकदाचे जाहीर करून टाकावे. पण सत्तेची लाचारी एवढी की, नैतिकतेचा जप करीत सत्तेवर यायचे आणि अनीतीने ती घट्ट धरून ठेवायची. आघाडी सरकारच्या मर्यादा, आघाडी सरकारच्या मर्यादा असे गळे काढत राहायचे पण सत्तेच्या गुळाला मात्र चिकटून राहायचे. आपल्याला जे बोलायचे त्यापेक्षा वेगळेच बरळून जाणारे परराष्ट्रमंत्री वय उलटून गेल्याचे वास्तव स्वीकारुन सत्ता सोडायला मात्र तयार नाहीत. आपण किती अगतिक आहोत हे रोज सांगत आणि दाखवून देत आपली हतबलता प्रदर्शित करणारे पंतप्रधान लाचार नाही तर दुसरे काय म्हणावे? मनमोहनसिंग असोत, एस. एम्. कृष्णा असोत, शरद पवार असोत, करूणानिधी असोत, की अडवाणी असोत... हे नेते घरी बसले तर काय देश थांबून जाईल? ईश्वराचे अवतार काय की संत काय, मोठमोठे राजे महाराजे काय की योद्धे काय, मी मी म्हणणारे उद्योगपती, संशोधक, वैज्ञानिक, समाजसुधारक... आले आणि गेले, समाज चालतोच आहे. जशी वेळ येईल तसा मार्ग काढत पुढे जातोच आहे. हे नेते, अभिनेते तर `किस झाड की पत्ती'? पण सत्तेचा लोभ सुटत नाही आणि लाचारी कमी होत नाही. म्हटलेच आहे ना, `सत्तातुराणां न भयं न लज्जा'. सत्तेचा आणि भलेपणाचा, नैतिकतेचा, जनतेच्या कल्याणाच्या कळकळीचा संबंध केव्हाच संपुष्टात आलेला आहे हेच खरे.

दिल्लीपासून गावपातळीपर्यंत पसरलेल्या लक्षावधी कार्यकर्ता नामक प्राण्याच्या लाचारीबद्दल तर न बोललेलेच बरे... नाही का?

-श्रीपाद कोठे, नागपूर

गुरुवार, १० नोव्हेंबर २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा