आपलं conditioning किती असतं, नाही का? पाहा- एखादी व्यक्ती कामात आहे, एखाद्याला काम आहे, एखादा कोणी काम करत असतो, एखाद्याला काम हवे आहे; अशासारखी वाक्ये कानावर पडली की आपल्या मनात एक चित्र तयार होते. हातापायांची हालचाल, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, वाकणे, बसणे, उभे राहणे, बोलणे, वाचणे, खेळणे, खाणे, पिणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे; असं काही ना काही- क्रियात्मक असं चित्र. पण यातील काहीही न करता, शारीरिक हालचाल न करता, काम केल्या जाऊ शकतं किंवा कोणी तसं काही काम करत असेल ही कल्पनासुद्धा करणं कठीण असतं. मग प्रत्यक्ष तसं काम करणं ही तर दूरचीच गोष्ट. वास्तविक प्रत्येक जण कधी ना कधी, क्षण दोन क्षण का होईना असं काम करतच असतो. काळ, वेळ, स्थळ या गोष्टी महत्वाच्या नसतातच अशा कामासाठी. कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण ही कामे अशीच निष्क्रियतेच्या सदरात मोडतात. प्रत्येक जण यातील काही ना काही, कधी ना कधी करतोच. मात्र तरीही कोणी शांत, निष्क्रिय दिसला रे दिसला की आपण विचारतोच काय आराम चाललाय? एखाद्याची वृत्ती खोचक आणि उथळ असेल तर हाच प्रश्न- काय, काही काम नाही का? किंवा काय रिकामेच? अशा शब्दात व्यक्त होतो. कारण कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण; अशा गोष्टी म्हणजे काम असतं हेच आपण मानत नाही. इतक्या ढोबळ, व्यावहारिक स्तरावर ही स्थिती असते, तर प्रतिभावंत कवी, लेखक, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, चिंतक; हे सारे बिनाकामाचे वाटावेत यात नवल करण्याचे कारण नाही. मन आणि बुद्धी दिसत नाही. त्यामुळेच मन, बुद्धीच्या स्तरावर या प्रतिभावंतांचे जे प्रचंड काम सुरु असते ते सामान्य व्यक्तीला आकलन होऊच शकत नाही. त्या अमूर्त कामाचा काही प्रत्यक्ष मूर्त परिणाम पुढे आला तर हे धुके थोडे दूर होऊ शकते. परंतु पोळ्या लाटण्यापूर्वी केले जाणारे कणिक मळण्याचे काम जसे दिसते तसे मूर्त अभिव्यक्तीच्या आधीचे मन-बुद्धीचे मळणे दिसू शकत नसल्याने आणि प्रत्यक्ष ते काम करणारी व्यक्तीही त्याचे वर्णन करण्यास असमर्थ असल्याने त्यांच्याबद्दल असलेला `रिकामटेकडे' हा भाव बहुश: कायम राहतो. मन-बुद्धीच्या पलीकडील असे आणखीन एक क्षेत्र आहे जेथून प्रतिभेचा उगम होतो, त्या क्षेत्रातील निष्क्रियता, शांतता, तरंगशून्यता, विकल्पहीनता, शरीराची- मनाची- बुद्धीची- आंदोलने नसण्याची स्थिती ही जाणीवेतून आणि प्रयत्नपूर्वक येणारी स्थिती आहे. ती स्वनियंत्रित स्थिती आहे. प्रतिभावंताची सहज निष्क्रियता आणि ही स्वनियंत्रित निष्क्रियता यात थोडा भेद आहे. मात्र प्रतिभावंताला या स्वनियंत्रित निष्क्रियतेची कल्पना येऊ शकते कारण त्याने स्वत: अशा प्रकारच्या निष्क्रियतेचा अंशत: का होईना अनुभव घेतलेला असतो. सर्वसामान्य व्यक्तीसाठी मात्र या साऱ्यासाठी एकच शब्द असतो- `रिकामटेकडे'. आपलं जग आणि जगणं अशा रिकामटेकड्या लोकांच्याच उपकाराखाली दबलेलं आहे हे मात्र सत्य आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ नोव्हेंबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा