रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

विनोबांचे गांधी

गेल्या २ ऑक्टोबर रोजी गांधीजींच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण झाली. योगायोग म्हणजे, त्यांचे वारसदार म्हणून ओळखले जाणारे आचार्य विनोबा भावे यांच्या जन्माचे हे १२५ वे वर्ष सुरू आहे. ही दोन्ही व्यक्तिमत्वे वेगळी असली, त्यांचा कार्यकाळ स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा असला, त्यांच्या कामाचे स्वरूप आणि धाटणी वेगळी असली; तरी जनमानसात ही दोन नावे एकत्रितपणे नांदतात.

विनोबांनी गांधीजींबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल, गांधीजींच्या नावे चालणाऱ्या कामांबद्दल; आपली मते, विचार, निरीक्षणे नोंदवलेली आहेत. ती समजून घेणे हा मानसिक आणि बौद्धिक असा दोन्ही खुराक आहे.

गांधीजी हे देशाचे राजकीय स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक विकास दोन्ही बरोबरच साधू पाहणारे महापुरुष होते, असे विनोबांचे मत होते. ७ जून १९१६ रोजी कोचरब आश्रमात त्यांनी सर्वप्रथम गांधीजींना पाहिले. आपण गांधीजींची पुष्कळ परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत ते कमी पडले नाहीत म्हणून आपण त्यांच्याजवळ टिकलो, असेही त्यांनी स्वच्छपणे सांगितले आहे. 'मी अपूर्ण आहे पूर्ण नाही असे गांधीजी नेहमी म्हणत. त्यांचे हे म्हणणे खरे होते,' असा विनोबांचा अभिप्राय आहे. विनोबांनी गांधींचे विभूतीकरण केलेले नाही हे विशेष.

गांधीजींबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणतात - '१९१६ मध्ये जेव्हा मी त्यांच्याजवळ पोहोचलो तेव्हा २१ वर्षाचा पोर होतो. जिज्ञासू मुलाची वृत्ती घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. सभ्यता, शिष्टता माझ्यात फारच कमी होती. मी जंगली प्राण्याप्रमाणे राहिलो आहे. माझ्यातील क्रोधाच्या ज्वालामुखीला आणि दुसऱ्या अनेक वासनांच्या वडवाग्निला शांत करणारे बापूच होते. आज मी जो काही आहे तो बापूंच्या आशीर्वादाचा चमत्कार आहे. त्यांनी माझ्यासारख्या असभ्य माणसाला सेवक बनवले.'

गांधीजींकडे आल्यानंतरची ३२ वर्षे व्यक्तिगत साधनेत गेली आणि त्या काळातील सर्व चिंतन मनन आध्यात्मिक होते, असेही विनोबांनी सांगितले आहे.

गांधीजींबद्दल अतीव श्रद्धा असली तरीही ते त्यांना भारताच्या महापुरुष मालिकेतून वेगळे काढत नाहीत. अनादि काळापासून आजवर झालेल्या महापुरुषांच्या मालिकेतील गांधीजी आहेत असाच त्यांचा अभिप्राय आहे. गांधीजी हा भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा आहे असे मत व्यक्त करताना विनोबा म्हणतात - प्राचीन परंपरेचे फळ आणि नवीन परंपरेचे बीज एकत्र घेऊन येणाऱ्या विरळा महापुरुषांपैकी गांधीजी होते.

धर्माचा प्रचार ही निराळी गोष्ट आहे आणि काळाची गरज ओळखून त्याच्याशी धर्मविचार जोडून देणे ही अगदी निराळी गोष्ट आहे. आंतरिक धर्मविचाराचे बळ आणि बाह्य परिस्थितीचे बळ या दोहोंना जोडून दाखवतो तो फक्त धर्मपुरुष किंवा सत्पुरुष राहत नाही तर युगपुरुष बनतो. गांधीजी तसे युगपुरुष होते, असे विनोबा म्हणतात. मनू आणि याज्ञवल्क्य या स्मृतिकारांच्या रांगेत त्यांनी गांधीजींना बसवले आहे. परंतु गांधीजी कर्मप्रधान होते हा त्यांच्यातील फरक असल्याचेही ते म्हणतात. शेक्सपिअर आणि मिल्टन यांचे जीवन त्यांच्या ग्रंथापेक्षा खुजे वाटते, तर गांधीजींचे जीवन मात्र त्यांच्या ग्रंथांपेक्षा अधिक उच्च व उन्नत वाटते, असाही विनोबांचा अभिप्राय आहे.

आपल्याला गांधीजी कसे दिसले हे सांगताना विनोबा म्हणतात - 'प्रत्येक जण त्यांना आपला जिवलग मानीत होता.  ते सामान्य माणसाबरोबर त्याच्या भूमिकेवर राहून बोलत. एखाद्याच्या पोटात दुखत असले तर गांधीजी इलाज सांगत. एखाद्या पती पत्नीमध्ये बेबनाव झाल्यास ती दोघे गांधीजींकडे सल्ला घ्यायला येत. आपल्या कामातून ते यासाठी वेळ काढत असत. मुलांना ते मुलांसारखेच वाटत. प्रत्येकाला हा आपल्या कुटुंबातील मनुष्य आहे असेच वाटत असे. त्यांच्यामध्ये पितृत्वाप्रमाणे मातृत्वही प्रकट होत असे. त्यांच्या सर्व गुणात त्यांची वत्सलता आणि करुणा मुख्य होती.' (क्रमशः)

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा