मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

किराणा म्हणजे काय?

लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणालाही विचारले, येथे किराण्याचे दुकान आहे का? तर कोणीही जवळच्या किराणा दुकानाचा रस्ता दाखवेल. किराणा दुकान ही गोष्टच माहीत नाही, अशी व्यक्ती सापडणे कठीण. पण एखाद्याला विचारा- किराणा म्हणजे काय? तो तुम्हाला वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाही. किराणा म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर बहुधा कोणाकडेही नसेल. किराणा दुकानाचे वर्णन आपण करू शकू. तेथे तेल, तिखट, मीठ, गूळ, साखर किंवा दुसऱ्या अनेक गोष्टी मिळू शकतात. धान्य मिळतं, पावडरी मिळतात, फिनाईल मिळतं, चोकोलेट मिळतात, पतंगी मिळतात... काहीही मिळू शकतं. किराणा दुकानात तेल मिळतं पण ती तेलाची घाणी नाही. तिथे सौंदर्य प्रसाधने मिळतात पण ते जनरल स्टोर्स नाही. असं बरंच काही. किराणा दुकानात मिळणाऱ्या मालात काहीही भर घालता येते किंवा त्यातून काहीही कमी करता येतं; अन भर घातल्याने वा कमी केल्याने काहीही बिघडत नाही. ते सारखेच किराणा दुकान राहते. किराणा नावाची वस्तूच अस्तित्वात नाही, तरीही किराणा दुकान हे सत्य आहे, वास्तव आहे. दुकानात येणाऱ्या व्यक्तीची गरज पूर्ण करणे हेच त्या दुकानाचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण.

`हिंदू' ही सुद्धा अशीच प्रत्यक्ष दाखवता न येणारी, सांगता न येणारी- अस्तित्व नसणारी, पण सत्य आणि वास्तव गोष्ट आहे. ईश्वर आराधना म्हटली तर कोणत्याही प्रकारे करायला हरकत नाही. आजवर अस्तित्वात आलेल्याच नव्हे, असंख्य नवीन पद्धतींना सुद्धा आडकाठी नाही. रोज भर पडली तरीही हरकत नाही. समाजव्यवस्था म्हटली तरी- समाज व्यवस्थित, सुरक्षित, सुखी ठेवण्यासाठी हवी असेल तशी व्यवस्था स्वीकारायला किंवा नव्याने तयार करायला काहीही हरकत नाही. मुले किती असावीत, बायका किती असाव्यात, नवरे किती असावेत, कोणाचे अधिकार अन कर्तव्ये काय असावीत, अंत्यविधी कसे करावेत, कुटुंब व्यवस्था की आश्रम व्यवस्था; त्या-त्या वेळेचा, परिस्थितीचा विचार करा आणि ठरवा. हेच राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था यांच्याही बाबतीत. `हिंदू'मध्ये अमुक चालते किंवा चालत नाही असे काहीही नाही. फक्त एकच- सगळ्यांचा विचार करून त्या त्या स्थितीत ठरवायचे. अन हे ठरवणे `भद्र' इच्छेतून असावे. जगातील सगळ्या विचारांचे स्वागत आहे. वेद म्हणतात- `आ नो भद्रा:, क्रतवो यन्तु विश्वत:' विश्वातून सगळ्या दिशांनी विचार आमच्याकडे येवोत, पण कसे? `भद्रा:' - मंगल, कल्याणकारी, शुद्ध. अमंगल, अशुद्ध, स्वार्थी, दमनकारी, उच्छ्रुंखल, एकांगी, असभ्य नकोत. सगळ्यांचे मंगल व्हावे हे एकच व्यवच्छेदक लक्षण. चौकटीत बंदिस्त विचार करण्याची आपल्याला लागलेली सवय, आपल्याला हे समजू देत नाही. अडचण तिथे आहे.

`माणूस' हीदेखील अशीच अमूर्त गोष्ट आहे. माणसासाठी आपण सतत जगत असतो, धडपडत असतो. आपला प्रत्येक श्वास आणि प्रत्येक क्षण माणसासाठी असतो. पण विचारले- माणूस म्हणजे काय? उत्तर नसते. अन तरीही निश्चित, निश्चयात्मक असं वागणं बोलणं सुरु असतं. ज्याचं स्वरूपंच ठाऊक नाही त्यासाठी केवढी आटाआट, केवढा संघर्ष, केवढी यातायात. याआधी जे काही अनुभवाला आलेलं आहे, प्रत्ययाला आलेलं आहे, समजलेलं आहे, दिसलेलं आहे; तेच पुन्हा होऊ शकेल किंवा पूर्णत: नवीन असंही काही समजू शकेल, प्रत्ययाला येऊ शकेल, दिसू शकेल. कशाचाच काही भरवसा नाही. अशा वेळी एकच करता येऊ शकते- `माणूस' नावाच्या अमूर्त गोष्टीची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणे. पण त्यासाठी अवकाश हवा. तो आहे का आमच्याकडे?

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा