बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

मृत्यूचा विचार

मृत्यूचा विचार म्हणजे काय? आजकाल बरेचदा ऐकायला मिळतं की, मृत्यूचा विचार केला पाहिजे. हे अगदी खरं आहे. मृत्यूचा विचार केलाच पाहिजे. पण म्हणजे काय याची मात्र फारशी स्पष्टता दिसत नाही. केवळ एकच विचार दिसतो- मृत्यू अपरिहार्य आहे. तो टाळणे शक्य नाही. त्यामुळे तोवर सुख मिळवा, आनंदात राहा (म्हणजे हसणे, खेळणे, खाणेपिणे इत्यादी), सगळ्यांशी चांगलं वागा. झालं? हाच आहे मृत्यूचा विचार. वास्तविक आपले खुजेपण लपवून आपण किती महान आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न असतो.

मृत्यूचा विचार याचा अर्थ- स्वत:च्या मरणाचा आणि मृत्यूला सामोरे जाताना काय कमावले, गमावले याचा विचार; एवढाच मर्यादित अर्थ नाही. मृत्यू या प्रक्रियेचा, मृत्यू या संकल्पनेचा, मृत्यूच्या अनेकानेक पैलूंचा विचार असायला हवा. मृत्यूची अनिश्चितता, सार्वत्रिकता, सार्वलौकिकता, सार्वदेशिकता, त्याचे स्वरूप, त्याचा आशय, त्याचा अर्थ, त्याची व्याप्ती, त्याची सखोलता या साऱ्यांचा विचार. केवळ माझा मृत्यू होणार आहे एवढेच नाही तर सगळ्यांचा, अन केवळ सगळ्यांचा नाही तर सगळ्याच गोष्टींचा- सगळ्या गुणांचा, कल्पनांचा, प्रयत्नांचा, सद्गुणांचा, दुर्गुणांचा, अंधाराचा, उजेडाचा; जे जे म्हणून आमच्या कक्षेत येतं त्या साऱ्याचा मृत्यू होणार हे अपरिहार्य. मृत्यूच्या विचाराची ही कक्षा जसजशी वाढते तेव्हा लक्षात येतं- अरे, सुखाचाही मृत्यू आहे तर त्यासाठी किती राबायचं, किती खपायचं, त्याची किती आस धरायची? दु:खाचाही मृत्यू आहे तर त्यासाठी किती झुरायचं? सद्गुणांचा मृत्यू आहे तर सद्गुणी का व्हायचं? दुर्गुणांचा मृत्यू आहे तर दुर्गुणी का व्हायचं नाही? माणसांचा मृत्यू आहे, संबंधांचा मृत्यू आहे तर, माणसे जोडायचा अट्टाहास किती करायचा? नाती जपायची म्हणजे काय? वाईट वाटू नये म्हणून खोटं वागणं, बोलणं, खोट्या समजुती, आग्रह किती बाळगायचे? भीती, गरजा, सुव्यवस्था यासाठी सत्याकडे किती दुर्लक्ष करायचं? सत्याचा आग्रह धरताना व्यवहार कसा करायचा? व्यवहार, प्रयत्न, भावभावना, इच्छा, आकांक्षा यांचं व्यवस्थापन. असंख्य प्रतलांवर सतत नर्तन करणाऱ्या या जगात, या माणसांमध्ये कसं वागायचं? किती मिसळायचं, किती अलिप्त राहायचं? किती पुढे जायचं, किती मागे यायचं? मेळ घालणे, जमवून घेणे याची गरज आणि सोबतच मर्यादा. अशा असंख्य गोष्टींचा विचार, त्यांचं व्यवस्थापन म्हणजे मृत्यूचा विचार.

मरायचंच आहे तर सुख ओरबाडत किंवा खोटं जगत किंवा अनाकलनीय चांगुलपणा वगैरे गोंजारत जगणं नाही. जो परमात्मा प्रेम करण्याची शक्ती, वृत्ती अन परिस्थिती देतो; तोच भांडणेही करवतो, वादही करवतो; जो सृजन करतो, गोड, कोमल, निर्मळ, नाजूक जन्माला घालतो; तोच विनाश, कडू, कठोर, क्रूर, गढूळ, हेही जन्माला घालतो. या दोन्हीकडे सारख्या दृष्टीने बघण्याची आणि त्यांना योग्य तो प्रतिसाद देण्याची तयारी करणं म्हणजे मृत्यूचा विचार करणं. अन हे सगळं करतानाच, हेही क्षणिक आहे; जिथे चांगलं आणि वाईट यांना अस्तित्वच नाही; सृजन आणि विनाश यातील काहीही नाही; मिळवणं आणि गमावणं काहीच नाही; वास्तविक काही आहे वा नाही ही जाणीवदेखील नाही; अशा पाशहीन, आलंबनविरहीत परिपूर्ण `मीत्वा'त विरून जाणं, म्हणजे मृत्यूचा विचार करणं. मृत्यूचा विचार करणं म्हणजे आपला `छोटासा मी' अधिकाधिक सुखावण्यासाठी, गोंजारण्यासाठी काय करता येईल याचा विचार नाही. मृत्यूचा विचार म्हणजे `छोट्याशा मी'च्या सुखाचा विचार नाही. मृत्यूचा विचार म्हणजे `परिपूर्ण मी' या सत्याचा विचार. हा विचार फारसा सुखदायी नाहीच. हां, शाश्वत शांततादायी मात्र नक्की आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, ४ नोव्हेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा