मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

किराणा म्हणजे काय?

लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणालाही विचारले, येथे किराण्याचे दुकान आहे का? तर कोणीही जवळच्या किराणा दुकानाचा रस्ता दाखवेल. किराणा दुकान ही गोष्टच माहीत नाही, अशी व्यक्ती सापडणे कठीण. पण एखाद्याला विचारा- किराणा म्हणजे काय? तो तुम्हाला वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाही. किराणा म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर बहुधा कोणाकडेही नसेल. किराणा दुकानाचे वर्णन आपण करू शकू. तेथे तेल, तिखट, मीठ, गूळ, साखर किंवा दुसऱ्या अनेक गोष्टी मिळू शकतात. धान्य मिळतं, पावडरी मिळतात, फिनाईल मिळतं, चोकोलेट मिळतात, पतंगी मिळतात... काहीही मिळू शकतं. किराणा दुकानात तेल मिळतं पण ती तेलाची घाणी नाही. तिथे सौंदर्य प्रसाधने मिळतात पण ते जनरल स्टोर्स नाही. असं बरंच काही. किराणा दुकानात मिळणाऱ्या मालात काहीही भर घालता येते किंवा त्यातून काहीही कमी करता येतं; अन भर घातल्याने वा कमी केल्याने काहीही बिघडत नाही. ते सारखेच किराणा दुकान राहते. किराणा नावाची वस्तूच अस्तित्वात नाही, तरीही किराणा दुकान हे सत्य आहे, वास्तव आहे. दुकानात येणाऱ्या व्यक्तीची गरज पूर्ण करणे हेच त्या दुकानाचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण.

`हिंदू' ही सुद्धा अशीच प्रत्यक्ष दाखवता न येणारी, सांगता न येणारी- अस्तित्व नसणारी, पण सत्य आणि वास्तव गोष्ट आहे. ईश्वर आराधना म्हटली तर कोणत्याही प्रकारे करायला हरकत नाही. आजवर अस्तित्वात आलेल्याच नव्हे, असंख्य नवीन पद्धतींना सुद्धा आडकाठी नाही. रोज भर पडली तरीही हरकत नाही. समाजव्यवस्था म्हटली तरी- समाज व्यवस्थित, सुरक्षित, सुखी ठेवण्यासाठी हवी असेल तशी व्यवस्था स्वीकारायला किंवा नव्याने तयार करायला काहीही हरकत नाही. मुले किती असावीत, बायका किती असाव्यात, नवरे किती असावेत, कोणाचे अधिकार अन कर्तव्ये काय असावीत, अंत्यविधी कसे करावेत, कुटुंब व्यवस्था की आश्रम व्यवस्था; त्या-त्या वेळेचा, परिस्थितीचा विचार करा आणि ठरवा. हेच राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था यांच्याही बाबतीत. `हिंदू'मध्ये अमुक चालते किंवा चालत नाही असे काहीही नाही. फक्त एकच- सगळ्यांचा विचार करून त्या त्या स्थितीत ठरवायचे. अन हे ठरवणे `भद्र' इच्छेतून असावे. जगातील सगळ्या विचारांचे स्वागत आहे. वेद म्हणतात- `आ नो भद्रा:, क्रतवो यन्तु विश्वत:' विश्वातून सगळ्या दिशांनी विचार आमच्याकडे येवोत, पण कसे? `भद्रा:' - मंगल, कल्याणकारी, शुद्ध. अमंगल, अशुद्ध, स्वार्थी, दमनकारी, उच्छ्रुंखल, एकांगी, असभ्य नकोत. सगळ्यांचे मंगल व्हावे हे एकच व्यवच्छेदक लक्षण. चौकटीत बंदिस्त विचार करण्याची आपल्याला लागलेली सवय, आपल्याला हे समजू देत नाही. अडचण तिथे आहे.

`माणूस' हीदेखील अशीच अमूर्त गोष्ट आहे. माणसासाठी आपण सतत जगत असतो, धडपडत असतो. आपला प्रत्येक श्वास आणि प्रत्येक क्षण माणसासाठी असतो. पण विचारले- माणूस म्हणजे काय? उत्तर नसते. अन तरीही निश्चित, निश्चयात्मक असं वागणं बोलणं सुरु असतं. ज्याचं स्वरूपंच ठाऊक नाही त्यासाठी केवढी आटाआट, केवढा संघर्ष, केवढी यातायात. याआधी जे काही अनुभवाला आलेलं आहे, प्रत्ययाला आलेलं आहे, समजलेलं आहे, दिसलेलं आहे; तेच पुन्हा होऊ शकेल किंवा पूर्णत: नवीन असंही काही समजू शकेल, प्रत्ययाला येऊ शकेल, दिसू शकेल. कशाचाच काही भरवसा नाही. अशा वेळी एकच करता येऊ शकते- `माणूस' नावाच्या अमूर्त गोष्टीची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणे. पण त्यासाठी अवकाश हवा. तो आहे का आमच्याकडे?

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १ डिसेंबर २०१५

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

संघ परिचय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता अपरिचित राहिलेला नाही. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून संघ ओळखला जातो. तरीही संघाची ओळख पटलेली आहे का, असा प्रश्न विचारला तर तो वावगा ठरणार नाही. संघाचे समर्थक, संघाचे विरोधक, संघाबद्दल आस्था बाळगणारे, संघाला पाण्यात पाहणारे, एवढेच नव्हे तर संघाचे स्वयंसेवकही आपापल्या पद्धतीने संघाची ओळख पटवून देतात, संघाचे मूल्यमापन करतात किंवा संघाबद्दलचे आपले मत तयार करतात. त्यात काहीही तथ्य नसते असे नाही. परंतु ते परिपूर्ण असते असेही नाही. संघ स्वत:देखील स्वत:ची ओळख कधी कधी देतो. मात्र तीही पूर्ण ओळख असतेच असे नाही. विशिष्ट संदर्भ घेउन आलेले ते एक दर्शन असते. परिपूर्ण दर्शन मात्र नसते.

संघाचे भाष्यकार आणि थोर विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी संघाचे स्वरुप समजावून देताना भाषाशास्त्रातील अनन्वय अलंकाराचे उदहारण देत असत. अनन्वय अलंकार कसा असतो हे सांगण्यासाठी संस्कृत भाषेत एक श्लोक आहे.

`गगनं गगनाकारं, सागर: सागरोपमा:

रामरावणयोर्युद्धम, रामरावणयोरिव'

म्हणजे आकाश आकाशासारखंच आहे, सागर सागरासारखाच आहे आणि राम-रावण युद्ध हे राम- रावण युद्धासारखेच आहे. त्याप्रमाणेच संघही संघासारखाच आहे. तो नीट समजून घेण्यासाठी त्याचे विविधांगी, गुंतागुंतीचे स्वरुप समजून घेणे आवश्यक आहे. अर्थात संघाला अशा विश्लेषणाची गरज नाही. इ.स. १९२५ पासून आजतागायत संघ त्याच्या पद्धतीने चालत राहिला आहे आणि वाढत राहिला आहे. मात्र संघाला याची गरज नसली तरीही संघाला जे साध्य करायचे आहे त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून अशा विश्लेषणाची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यापुढे येते ती संघाची शाखा. एका मैदानावर भगवा ध्वज रोवलेला. त्यासमोर काही लोक एकत्र झालेले आणि त्यांचे काही कार्यक्रम. हे कार्यक्रम खेळ, नियुद्ध, संचलन, दंड, लेझीम, सूर्यनमस्कार, योगासने, व्यायामयोग, घोष, गीतगायन, कथाकथन, चर्चा, भाषण, प्रार्थना असे अनेक प्रकारचे असू शकतात. हीच सामान्यपणे समाजाला असलेली संघाची ओळख आहे. संघ काय करतो तर शाखा चालवतो. या शाखांमध्ये येणाऱ्या लहानमोठ्या साऱ्यांना स्वयंसेवक म्हणतात. या स्वयंसेवकांचे वर्षभरात काही कार्यक्रम होतात. त्यावेळी ते विशिष्ट गणवेश घालतात. या कार्यक्रमांमध्ये भाषणे होतात आणि त्यातून संघाचा विचार सांगितला जातो. याहून अधिक फारसे कोणाला ठाऊक नसते. अगदी संघाच्या स्वयंसेवकाला किंवा कार्यकर्त्यालाही! संघाचे काम करायला त्याची फारशी गरजही नसते.

संघाची कार्यपद्धती, त्याची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती व रचना यांचा विकास, संघाचा इतिहास याविषयी अत्यल्प माहिती असते. संघाचे म्हणून काही साहित्य आहे, पुस्तके आहेत याची अनेकांना कल्पनाही नसते आणि तरीही एखादी व्यक्ती संघाचा कार्यकर्ता असते. एखादा महाविद्यालयीन विद्यार्थी, क्वचित शालेय विद्यार्थी सायं शाखेचा मुख्य शिक्षक वा कार्यवाह असतो. प्रभात शाखेचा एखादा स्वयंसेवक वा कार्यकर्ता निवृत्तीनंतरच संघाच्या शाखेत आलेला असतो. वयाच्या साठीत त्याने पहिल्यांदा संघाचा गणवेश घातलेला असतो. संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण कार्यकर्त्याने घेतलेलेच असते असे नाही. एक दिवस कधी तरी संघाच्या शाखेत आलेली व्यक्तीही आयुष्यभर संघाचा स्वयंसेवक असते. काही स्वयंसेवक काही दिवस, महिने वा वर्ष संघाचे काम करत असतात. तर काही आयुष्यभर संघाचे काम करतात. नवनवीन शाखा सुरू होत असतात. सुरू असलेल्या काही शाखा बंदही पडतात आणि पुन्हा सुरुही होतात. शाखा सुरू वा बंद करण्याचे आदेश निघत नाहीत. माणसांची उपलब्धता हाच एकमेव मुद्दा. माणूस उपलब्ध असेल तर शाखा चालते नाही तर बंद.

शाखा चालवणाऱ्या  या कार्यकर्त्यांना काहीही मिळत नाही. पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान एवढेच काय एखादे प्रमाणपत्रही नाही. प्रमाणपत्र मिळाले तरी त्याचा उपयोग तरी काय होणार हा एक वेगळाच प्रश्न आहे. असे प्रश्न ज्याच्या मनात येतात तो आपोआपच कामापासून दूर होतो. कारण काही देण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही ही संघाची स्पष्ट भूमिका आहे. असे दूर झालेले लोकही संघाचे स्वयंसेवक मात्र राहतातच. त्यांच्या स्वयंसेवकत्वाला काहीही बाधा येत नाही. जसे काम करण्याच्या मोबदल्यात काहीही मिळत नाही. तसेच काम करण्यासाठी वा स्वयंसेवक होण्यासाठीही काहीही द्यावे लागत नाही. त्यासाठी नोंदणी, नोंदणी शुल्क वगैरे नसते. गणवेश, शिबिर, वर्ग, सहल यासाठीचा खर्च मात्र स्वत:च करावा लागतो. संघाचे काम चालवण्यासाठी स्वयंसेवक स्वत:च पैसा गोळा करतात. वर्षातून एकदा त्यासाठी गुरुदक्षिणेचा कार्यक्रम होतो. ज्याला जितके पैसे द्यायचे असतील तितके तो भगव्या ध्वजापुढे समर्पण करतो. कोण किती देतो याची ना चर्चा होत ना त्यासाठी काही बंधन आहे. गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे हेदेखील बंधन नाही. गुरुदक्षिणा न देता वा त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता सुद्धा एखादी व्यक्ती स्वयंसेवक राहू शकते.

गेली ८९ वर्षे हा क्रम सुरू आहे. खरे तर आपण सारे हा एक चमत्कार घडताना पाहतो आहोत. काहीही आकर्षकपणा नाही, काहीही फायदा नाही, उलट तोटाच! आणि तरीही एखादे कार्य सतत चालूच राहते. विस्तारत राहते. समाजाला प्रभावित करीत राहते. याला आश्चर्य नाही तर काय म्हणणार? लोक संघाचे काम का करतात? संघ म्हणतो शाखा चालवा आणि लोक त्या चालवतात. हे कसे काय घडून येते. खरं तर यावर विश्वास बसणेही कठीण. पण जे प्रत्यक्ष दिसते ते नाकारणार तरी कसे? माणसे येतात- जातात, पिढ्या बदलतात, संकटे येतात, संघर्ष होतात, मतभेद होतात, तरीही सातत्य कायम राहते, ऊर्जा कायम राहते, प्रभाव कायम राहतो. हे कसे आणि का होते हा एक गूढ प्रश्नच आहे. याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाही. अगदी संघाकडेही नाही. खरे तर संघ याचा विचारही करीत नाही. सतत फक्त काम करीत राहायचे एवढेच संघाला माहीत आहे. असा सगळा `जर-तर'चा मामला असूनही, trial and error चे गणित असूनही, देशस्थ विस्कळीतपणाचा खाक्या असूनही संघ चालतो आणि वाढतो आहे. वयाची ८९ वर्षे पूर्ण केल्यावरही गतार्थ न होता सार्थ ठरतो आहे. संदर्भहीन न होता सयुक्तिक ठरतो आहे. या पृथ्वीवर एक आश्चर्य घडताना आपण पाहतो आहोत.

समाजाला हलवून टाकणाऱ्या अनेक व्यक्ती, चळवळी, उपक्रम, विचार या जगाने पाहिले आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी प्रभाव निर्माण करीत खळबळ उडवून दिली आहे. मात्र थोड्याच अवधीत त्या इतिहास झाल्या आहेत. खळबळ निर्माण करणारी व्यक्ती, कार्यक्रम वा विचार संघाजवळ कधीच नव्हते. तरीही समाजाला हलवून टाकणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, विचार यांच्यापेक्षा संघ उजवा ठरतो. ८९ वर्षे हा कालावधी खूप मोठा नाही, पण तो खूप लहानही खचितच नाही. सातत्य, विचारांची आणि कार्यपद्धतीची अखंडता, काळाबरोबर पावले टाकण्याची वृत्ती आणि क्षमता या साऱ्याच बाबतीत संघाचे आगळेपण ठळकपणे नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे हे सारे एवढ्या शांतपणे की काही घडते आहे हे कुणाला जाणवू सुद्धा नये. ढोल पिटणे, जाहिरातबाजी, आक्रस्ताळेपणा यापैकी काहीही नाही. बरे संत प्रवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीने हे केले तर समजून घेता येईल. परंतु संघाने मात्र सर्व प्रकारच्या गुणदोषांनी युक्त अशा लाखो सामान्य माणसांकडून ही मौन साधना करवून घेतली आहे. पिढी दर पिढी हजारो लोकांना टोकाच्या निरपेक्षपणे कार्याला प्रवृत्त करून कार्यरत ठेवण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे. पद, प्रतिष्ठा, पैसा, मानसन्मान तर नाहीच पण ईश्वरप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती वगैरे अभौतिक किंवा मानसिक समाधान, आत्मिक समाधान वगैरे भावनिक बाबीही नाहीत. आणि तरीही संघाची यशस्वी वाटचाल यथार्थपणे सुरूच आहे.

संघाचा हा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. संघ स्थापनेच्या वेळी संघाचे नावही ठरलेले नव्हते. समाजाला अपरिचित अशी ८-१० माणसे केवळ एकत्र झाली होती आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार नावाच्या एका राजकीय- सामाजिक कार्यकर्त्यावर असलेल्या प्रेमाखातर ती एकत्र झाली होती. त्यात विचार, ध्येयनिष्ठा वगैरे फारसे नव्हते आणि ८९ वर्षांच्या वाटचालीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाव धारण करणारे काम दररोज देशभरात ५० हजार स्थानी चालते. यात ५० लाख स्वयंसेवक रोज एकत्र येतात आणि या मातृभूमीविषयीच्या आपल्या कर्तव्याचे स्मरण करून तिच्या उज्वल जीवनाविषयी प्रार्थना करतात. या व्यतिरिक्त हजारो स्थानांवर आठवड्यातून एकदा वा महिन्यातून एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून लाखो लोक एकत्र येउन या समाजाचा, देशाचा विचार करतात. त्यातील अनेक जण प्रत्यक्ष काही ना काही कामही करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे बिरुद न लावणाऱ्या परंतु संघ हीच प्रेरणा असलेल्या, तसेच वैचारिक आणि भावात्मक दृष्टीने संघाशी जोडल्या गेलेल्या आणि व्यवहारात संघाशी समन्वय राखून काम करणाऱ्या ३६ अखिल भारतीय संस्था आहेत.

या संस्था समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. संघाप्रमाणेच त्यांचेही स्वरुप अखिल भारतीय असेच आहे. राष्ट्रीय, अखिल भारतीय, आदी विशेषणे लावणाऱ्या अन् एखाद्या वस्ती वा गावापुरत्या मर्यादित असणाऱ्या संस्थांसारखे हे स्वरुप नाही. तर या साऱ्या संस्था खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आहेत. संघाचे काम तर तालुका स्तरापर्यंत पोहोचले आहेच, पण अन्य ३६ संस्थांपैकी अनेक संस्थांचा पसाराही तालुका स्तरापर्यंत पसरला आहे, तर अन्य संस्थांचे काम जिल्हा स्तरापर्यंत तरी पोहोचलेले आहेच. भौगोलिक दृष्टीने विचार केला तर संपूर्ण देश संघाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कामाने व्यापला आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांचा विचार केला तर बहुतेक साऱ्या क्षेत्रात संघाचे काम पोहोचले आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक स्थितीतील लोक या कामाशी जोडले गेले आहेत. सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक संघाशी संलग्नित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये केवळ पुरुष येत असले तरीही राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून महिलाही या कामात सक्रिय आहेत. अन्य संस्थांच्या कामातही महिलांचा सहभाग लक्षणीय असाच आहे. समाजाच्या प्रत्यक्ष सेवेची कामे दीड लाखाहून अधिक आहेत. लाखो स्त्री-पुरुष स्वत:साठी काहीही न मिळवता या सेवाकार्यांच्या माध्यमातून समाज सुशिक्षित, सुदृढ, सुसंस्कृत, आरोग्यसंपन्न व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नित्य आणि नैमित्तिक असे प्रत्यक्ष संघाचे काम, अन्य संस्था संघटनांचे काम, सेवाकार्य यासाठी माणसे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो स्त्री-पुरुष हुडकून काढणे हेच खरे तर एक अशक्य कोटीतील काम आहे. परंतु संघाने अशी माणसे नुसती हुडकून काढली नाहीत तर त्यांना कामाला लावले. कामांचे आणि माणसांचे नियोजन केले. व्यवस्था निर्माण केल्या आणि त्या सातत्याने पुढे सुरू ठेवल्या. लोक जुने होत असतात, निवृत्त होत असतात. हे अतिशय नैसर्गिक आहे. अशा लोकांच्या जागी नवीन माणसांना क्रियाशील करावे लागते. संघाने तेही यशस्वीपणे केले आहे. ही कामे करणारी माणसे शिकली सवरलेली आहेत. उच्चविद्या विभूषित आहेत. स्वत: कर्तृत्ववान आहेत. विचारी आहेत. अशा माणसांना थातुरमातुर वैचारिक वा भावनिक आवाहन बांधून ठेवू शकत नाही, सक्रिय ठेवू शकत नाही. एखादे साधे गणेशोत्सव मंडळ चालवणे आणि टिकवणे किती कठीण असते याचा अनुभव आपण सतत घेत असतो.

संघाने मात्र हे असाध्य, साध्य करून दाखविले आहे. इ. स. २००६ साली संघाचे दुसरे सरसंघचालक श्री. गुरूजी यांची जन्मशताब्दी होती. त्यासाठी देशभरात जे कार्यक्रम झाले त्यात ५ लाख गावातील लोक सहभागी झाले होते. देशात सुमारे ७ लाख गावे आहेत. म्हणजे ७० टक्केहून अधिक गावातील लोक यात सहभागी झाले होते. संघकार्याचा हा विस्तार केवळ देशातच झालेला आहे असे नाही, तर जगातील सुमारे ४० देशांमध्ये संघाचे काम चालते आणि सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी असे स्वरुप आता त्यास प्राप्त झाले आहे. ८९ वर्षांचा हा प्रवास सरळ होता असेही नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करीत हा प्रवास झालेला आहे. हा संघर्ष बाह्य होता, आंतरिक होता, परक्यांशी होता, स्वकीयांशी होता, राजकीय होता, सामाजिक होता, आर्थिक होता, भावनिक होता, शारीरिक होता, बौद्धिक होता. अनेकदा तर संघाचे अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न झालेला जगाने पाहिला आहे. ज्या समाजासाठी संघ अव्याहत काम करतो आहे त्या समाजाने प्रदीर्घ काळ त्याला मनापासून स्वीकारलेही नव्हते. संपूर्ण विपरीत परिस्थितीचा सतत सामना करीत संघ इथवर पोहोचला आहे.

हे करताना त्यातील अखंडत्वही कायम आहे. एकच संघधारा वाहते आहे. त्याच्या शतधारा झाल्या नाहीत हीदेखील एक लक्षणीय बाब आहे. छोटी मोठी कामेदेखील एकसंध फार कमी काळ टिकतात. कधी नेतृत्वावरून वाद तर कधी तात्विक वाद!! कधी कार्यपद्धतीवरून मतभेद. परिणाम मात्र एकच. संघटनेत फाटाफूट. संघकार्याचे वैशिष्ट्य हे की संघावर नाराज होउन बाहेर पडलेल्यांनी आपली वेगळी कामे सुरू केली पण पर्यायी वा समांतर संघ काढला नाही. ते शक्य झाले असते वा नाही हा मुद्दा वेगळा, पण कोणी पर्याय निर्माण करण्याचा गांभीर्याने विचारही केला नाही. याशिवाय जी कामे मूळ स्वरूपात टिकतात ती एका विशिष्ट मर्यादेतच काम करीत राहतात. सतत वर्धिष्णु राहूनही अखंडत्व कायम राखणे हेही एक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. संघाची स्थापना १९२५ सालाची. महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय, सामाजिक क्षितिजावर उदय झाला १९२० साली. कम्युनिस्ट पार्टीची स्थापनाही १९२० सालाचीच. म्हणजे सर्वोदय आणि कम्युनिझम यांच्यापेक्षा संघ ५ वर्षांनी लहान. कम्युनिस्ट पार्टीने सर्व प्रकारचे मार्ग आपल्या कार्यवाढीसाठी अवलंबिले. हिंसाचारही नाकारला नाही. अनेक वर्षे सत्ता उपभोगली. मोठा काळ सत्तेची सहानुभूती कम्युनिझमला मिळाली. गांधींच्या कार्याला तर देशात आणि जगातही अतिशय अनुकूलता होती व आहे. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही कामांची तुलना आज केली तर संघाचे यश आणखीनच ठळकपणे जाणवते.

केवळ विचार केला तरीही अंगावर शहारा यावा असा हा प्रवास आहे. जगाच्या इतिहासात क्वचितच एखाद्या संघटनेचा प्रवास एवढा रोमांचक आणि अद्भुत राहिला असावा. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल प्राशन करून भगवान शंकरांनी तांडव केले होते. संघाने मात्र शांतपणे हलाहल पचवून टाकले आहे आणि समाजावर मात्र शांती आणि सौहार्दाचा अमृतवर्षावच केलेला आहे. असे सारे असतानाही सर्वाधिक गैरसमज असणारी संघटनाही संघच आहे. मोठ्या प्रमाणावर हेटाळणी सहन करणारी संघटनाही संघच आहे. आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी झेलणारीही संघटना संघच आहे. संघाच्या वाट्याला एवढे शिव्याशाप, एवढे तर्ककुतर्क का आले वा येतात. संघाबद्दल एवढा गोंधळ का आहे? तरीही संघ का वाढला? तरीही संघ का काम करतो आहे? संघाला नेमके करायचे तरी काय आहे? कशासाठी एवढा सारा खटाटोप सुरू आहे? काय साध्य करायचे आहे? काय मिळवायचे आहे? संघाला स्वत:ची प्रतिमा आणि वास्तव याविषयी काय वाटते? आजवरचा प्रवास आणि विस्तार याविषयी संघाला काय वाटते?

या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, संघाबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि संघाविषयी सम्यक आकलन करून सारासार मत बनवण्यासाठी संघाची नीट ओळख करून घेणे गरजेचे आहे. साधारणपणे ६ वेगवेगळ्या दृष्टींनी संघ समजून घ्यावा लागेल.

१) संघाचे संघटनात्मक स्वरुप

२) संघ विचारधारा

३) संघ भावधारा

४) संघ- समाज परिवर्तनाचे माध्यम

५) संघाची ऐतिहासिक भूमिका

६) वैश्विक सभ्यतेच्या प्रवासातील संघाचे योगदान

संघाने अशी मांडणी आजवर केलेली नाही. हे हिन्दू राष्ट्र आहे, त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि या राष्ट्राने या जगातील आपला भार समर्थपणे वहन करावा एवढेच संघाने म्हटले आहे. या सहा कोनातून केलेले विश्लेषण परिपूर्ण असेल असेही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरीकडे वाटचाल करीत असताना त्याचा असा आढावा घेणे आवश्यक मात्र आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ९ नोव्हेंबर २०१४

रिकामटेकडे

आपलं conditioning किती असतं, नाही का? पाहा- एखादी व्यक्ती कामात आहे, एखाद्याला काम आहे, एखादा कोणी काम करत असतो, एखाद्याला काम हवे आहे; अशासारखी वाक्ये कानावर पडली की आपल्या मनात एक चित्र तयार होते. हातापायांची हालचाल, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, वाकणे, बसणे, उभे राहणे, बोलणे, वाचणे, खेळणे, खाणे, पिणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे; असं काही ना काही- क्रियात्मक असं चित्र. पण यातील काहीही न करता, शारीरिक हालचाल न करता, काम केल्या जाऊ शकतं किंवा कोणी तसं काही काम करत असेल ही कल्पनासुद्धा करणं कठीण असतं. मग प्रत्यक्ष तसं काम करणं ही तर दूरचीच गोष्ट. वास्तविक प्रत्येक जण कधी ना कधी, क्षण दोन क्षण का होईना असं काम करतच असतो. काळ, वेळ, स्थळ या गोष्टी महत्वाच्या नसतातच अशा कामासाठी. कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण ही कामे अशीच निष्क्रियतेच्या सदरात मोडतात. प्रत्येक जण यातील काही ना काही, कधी ना कधी करतोच. मात्र तरीही कोणी शांत, निष्क्रिय दिसला रे दिसला की आपण विचारतोच काय आराम चाललाय? एखाद्याची वृत्ती खोचक आणि उथळ असेल तर हाच प्रश्न- काय, काही काम नाही का? किंवा काय रिकामेच? अशा शब्दात व्यक्त होतो. कारण कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण; अशा गोष्टी म्हणजे काम असतं हेच आपण मानत नाही. इतक्या ढोबळ, व्यावहारिक स्तरावर ही स्थिती असते, तर प्रतिभावंत कवी, लेखक, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, चिंतक; हे सारे बिनाकामाचे वाटावेत यात नवल करण्याचे कारण नाही. मन आणि बुद्धी दिसत नाही. त्यामुळेच मन, बुद्धीच्या स्तरावर या प्रतिभावंतांचे जे प्रचंड काम सुरु असते ते सामान्य व्यक्तीला आकलन होऊच शकत नाही. त्या अमूर्त कामाचा काही प्रत्यक्ष मूर्त परिणाम पुढे आला तर हे धुके थोडे दूर होऊ शकते. परंतु पोळ्या लाटण्यापूर्वी केले जाणारे कणिक मळण्याचे काम जसे दिसते तसे मूर्त अभिव्यक्तीच्या आधीचे मन-बुद्धीचे मळणे दिसू शकत नसल्याने आणि प्रत्यक्ष ते काम करणारी व्यक्तीही त्याचे वर्णन करण्यास असमर्थ असल्याने त्यांच्याबद्दल असलेला `रिकामटेकडे' हा भाव बहुश: कायम राहतो. मन-बुद्धीच्या पलीकडील असे आणखीन एक क्षेत्र आहे जेथून प्रतिभेचा उगम होतो, त्या क्षेत्रातील निष्क्रियता, शांतता, तरंगशून्यता, विकल्पहीनता, शरीराची- मनाची- बुद्धीची- आंदोलने नसण्याची स्थिती ही जाणीवेतून आणि प्रयत्नपूर्वक येणारी स्थिती आहे. ती स्वनियंत्रित स्थिती आहे. प्रतिभावंताची सहज निष्क्रियता आणि ही स्वनियंत्रित निष्क्रियता यात थोडा भेद आहे. मात्र प्रतिभावंताला या स्वनियंत्रित निष्क्रियतेची कल्पना येऊ शकते कारण त्याने स्वत: अशा प्रकारच्या निष्क्रियतेचा अंशत: का होईना अनुभव घेतलेला असतो. सर्वसामान्य व्यक्तीसाठी मात्र या साऱ्यासाठी एकच शब्द असतो- `रिकामटेकडे'. आपलं जग आणि जगणं अशा रिकामटेकड्या लोकांच्याच उपकाराखाली दबलेलं आहे हे मात्र सत्य आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, १३ नोव्हेंबर २०१४

आंबेडकरांचा अर्थविचार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दलितांचे मसीहा ही प्रतिमा प्रकर्षाने पुढे आल्याने त्यांच्या विचारांचे, कार्याचे अन्य पैलू काहीसे दुर्लक्षित राहिले. त्यातील एक पैलू आहे- अर्थतज्ञ डॉ. आंबेडकर. मुळात अर्थशास्त्र, अर्थकारण हेच त्यांचे विषय. त्यांचा डॉक्टरेटचा प्रबंधही अर्थ विषयाचाच. अर्थशास्त्र आणि अर्थकारण याच्या विविध पैलूंवरही त्यांनी चिंतन, लेखन केलेले आहे. एवढेच नव्हे तर आंदोलनात्मक आणि भरीव कायदेशीर तरतुदी इत्यादीही कार्य केलेले आहे. कृषी हा त्यापैकीच एक विषय. कृषी हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा आणि अर्थकारणाचा महत्वाचा आधारस्तंभ असतो. भारतात तर त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. केवळ अर्थकारण आणि अर्थव्यवस्थाच नव्हे, तर संपूर्ण समाजजीवन, संस्कृती यांचाही आधार मूलतः कृषी हाच राहिला आहे. आज त्यात काही बदल होत असले तरीही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकाळात, कार्यकाळात कृषी हा सर्वाधिक महत्वाचा आर्थिक, सामाजिक घटक होता. भूक ही मानवाची मुलभूत गरज होती, आहे व राहील. अन भुकेची गरज भागवण्यासाठी शेतीला पर्याय नाही. माणूस आणि कृषी यांचा हा अन्योन्य संबंध नेहमीच ध्यानात ठेवला पाहिजे. तो विसरून चालणार नाही, असे डॉ. आंबेडकर यांचे मत होते.

इ.स. १९२८ पासून डॉ. आंबेडकरांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले. त्याकाळी कोकणात खोत पद्धत होती. सरकारला शेतसारा वसूल करून देण्यासाठी या मधल्या खोतांची गरज नाही. हे खोत अन्याय्य पद्धतीने सारावसुली करतात आणि शेतकऱ्यांचे शोषण करतात; तसेच त्यांची नाडवणूक आणि पिळवणूक करतात. त्यासाठी खोत पद्धत बंद व्हायला हवी अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी चिपळूण येथे १४ एप्रिल १९२९ रोजी आयोजित रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते. १० जानेवारी १९३८ रोजी २५,००० शेतकर्‍यांचा विराट मोर्चा त्यांच्याच नेतृत्वात विधिमंडळावर काढण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात १९२८ ते १९३४ असा शेतकऱ्यांचा प्रदीर्घ संप घडवून त्यांची खोत पद्धतीतून बाबासाहेबांनी सुटका केली होती. हा संप एवढा परिणामकारक होता की, तत्कालीन महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी संप करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चरी या गावाला स्वत: भेट दिली होती.

विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात ब्रिटिशांनी भारताचे शोषण करण्याला सुमारे शंभर वर्षे झाली होती. भारतातील कच्चा माल कमी भावात घेऊन इंग्लंडला न्यायचा. तेथील कारखान्यांमध्ये पक्का माल तयार करून भारतासह जगभरात व्यापार करायचा आणि नफा कमवायचा. ब्रिटीशांच्या या धोरणाने भारतातील सामान्य माणूस, जो मुख्यत: शेतकरी होता तो हळूहळू कंगाल होत गेला. त्याची क्रयशक्ती घटली. कमी भावात माल विकायचा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त भाव देऊन वस्तू विकत घ्यायच्या. शिवाय देशी उद्योग, ग्रामीण व्यवसाय डबघाईला येऊ लागले. परिणामी शेतीचे उत्पादन कसे वाढवावे यावर विचार सुरु झाला. कुटुंबातील भावंडांच्या संख्येनुसार होणारे शेतीचे विभाजन आणि लहान होत जाणारा शेतीचा आकार हे शेती उत्पादन कमी असण्याचे कारण ब्रिटीश सरकारने निश्चित केले आणि मग, शेतीचा आकार मोठा कसा करता येईल याचे प्रयत्न सुरु झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सगळ्या विषयाचा सखोल अभ्यास केला आणि ब्रिटीश धोरणाचे वाभाडे काढले. या विषयाच्या आर्थिक व सामाजिक अशा दोन्हीही अंगांचा त्यांनी परामर्श घेतला. शेतीचा लहान आकार हे उत्पादकता घटण्याचे कारण नाही हे त्यांनी ठणकावून सांगितले. शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध नसणे, शेतीच्या कामासाठी पुरेशी जनावरे नसणे, शेती करण्यासाठी आवश्यक भांडवलाची कमतरता या कारणांनी उत्पादन कमी होत असल्याचे त्यांचे मत होते. लहान आकाराच्या शेतीतही अधिक उत्पादन होऊ शकते. मात्र त्यासाठी त्याला उद्योग समजून त्याकडे लक्ष द्यायला हवे हे त्यांनी उपलब्ध आकडेवारीच्या आणि सुस्पष्ट तर्काच्या आधारे निदर्शनास आणून दिले. एवढेच नव्हे तर, अमेरिकेतील शेती उत्पादन आणि भारतातील शेती उत्पादन यांची तुलना गैर आणि अनाठायी आहे हे सांगताना ते म्हणतात- `हमे यह तथ्य भी ध्यान मे रखना होगा की हमारा देश कृषीप्रधान देश है और हमारी जमीन उसर हो चुकी है. हम हजारो वर्षो से इस पर खेती कर रहे है और चाहे हम जो भी प्रयास कर ले, हम अपनी जमीन की उत्पादकता को ऊस स्तर तक, उदाहरण के लिए अमरिका की जमीन के स्तर तक - जहां की जमीन अब तक जोती भी नही गई है; नही ले जा सकते.' (डॉ. आंबेडकर समग्र साहित्य, खंड ३, पृष्ठ १४७- मुंबई विधिमंडळात १० ऑक्टोबर १९२७ रोजी `छोटे किसान राहत विधेयक' यावर केलेले भाषण) किती सूक्ष्मतेने ते विचार करीत असत याचा हा नमूना आहे. ओघाओघात भारतीय सभ्यता आणि अमेरिकी सभ्यता यांच्या प्राचीनत्वावरही त्यांनी सहज प्रकाश टाकला आहे. 

शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन त्याचे नियोजन, प्राधान्यक्रम निश्चित करावा; यासोबतच अन्य उद्योग शेतीच्या जवळ असावेत हा मुद्दाही त्यांनी मांडला. जेथे उद्योग शेतीच्या जवळ आहेत तेथील आर्थिक स्तर आणि जमिनीचे भाव यांची तुलनात्मक आकडेवारीही त्यांनी सादर केली होती. शेती हा उद्योग म्हणून विकसित करायचा तर त्यातील अतिरिक्त श्रम (कामापेक्षा अधिक माणसे) कमी करायला हवेत. लागत आणि उत्पादन असा विचार करावाच लागेल. त्यामुळे आवश्यक तेवढे श्रमबळ ठेवून शेतीवरील बोजा कमी केल्यास शेती फायद्याची होईल असेही त्यांचे म्हणणे होते. परंतु या surplus मनुष्यबळाला सामावून घेण्यासाठी उद्योग हवेत असाही त्यांचा आग्रह होता. तसे न झाल्यास राष्ट्रीय उत्पन्नात कोणतेही योगदान न देता त्याचा उपभोग घेणारे वाढतील आणि राष्ट्राची हानी होईल, असा त्यांचा सिद्धांत होता. त्यामुळे कृषीचे उद्योगात रुपांतर आणि देशाचे औद्योगिकरण असे त्यांचे सूत्र सांगता येईल.

या विषयाच्या अनुषंगाने मुंबई विधिमंडळात जे `छोटे किसान राहत विधेयक' प्रस्तुत झाले होते त्यात शेतांचा आकार लहान होऊ नये यासाठी शेतीच्या वाटण्या करण्यावर बंदी घालण्याची सूचना होती. त्याला डॉ. आंबेडकर यांनी विरोध केला होता. त्याबद्दल बोलताना त्यांनी जो व्यापक सामाजिक दृष्टीकोन मांडला तो लक्षणीय आहे. त्याचबरोबर उत्तराधिकाराच्या प्रचलित हिंदू कायद्याबाबत जे मत व्यक्त केले त्यातून त्यांच्या मनाचे स्थैर्य आणि त्यांचा नीरक्षीरविवेक दिसून येतो. या विधेयकावर बोलताना ते म्हणाले होते-  `मै मानता हूँ की, इस मुद्दे पर कोई विवाद नहीं हो सकता है की, अचल संपत्ति के बंटवारे पर नियंत्रण अपनाया जाता है तो, हमारी कृषि पर आधारित जनसंख्या का बड़ा हिस्सा भूमिहीन हो जायेगा. यह देश के सर्वाधिक हित में नहीं है की, गरीब तबकों को इस ढंग से और गरीब कर दिया जाए. महोदय, मै यह बताना चाहता हूँ की, यद्यपि हिन्दू कानून कई तरह से बहुत त्रुटीपूर्ण है, तथापि उत्तराधिकार का हिन्दू कानून लोगों का बहुत बड़ा रक्षक रहा है. हिन्दू धर्म द्वारा स्थापित सामाजिक और धार्मिक एकछत्रवाद ने लोगों के एक बहुत बड़े वर्ग को निरंतर दासता में जकड़े रखा है. यदि इस दासता में भी उनकी दशा सहनीय है तो इस कारण से की, उत्तराधिकार के हिन्दू कानून ने कुबेरपतियों के निर्माण को रोका है. महोदय, हम सामाजिक दासता को आर्थिक गुलामी से नहीं जोड़ना चाहते. यदि आदमी सामाजिक रूप से स्वतंत्र नहीं है, तो उसे आर्थिक रूप से स्वतंत्र होने दीजिए. इसलिए मै उस न्यायपूर्ण और उत्तराधिकार की समतामूलक व्यवस्था को समाप्त करने के पूर्णतया खिलाफ हूँ.' (डॉ. आंबेडकर समग्र साहित्य, खंड ३, पृष्ठ १४८- मुंबई विधिमंडळात १० ऑक्टोबर १९२७ रोजी `छोटे किसान राहत विधेयक' यावर केलेले भाषण)

जमिनीच्या उत्तराधिकार कायद्यात बदल करून मोठ्या लोकसंख्येला अधिकच गरिबीच्या खाईत लोटू नये, अशी भूमिका मांडतानाच, छोटी शेती फायदेशीर कशी होईल याचीही त्यांनी चर्चा केली होती. शेतीचा लहान आकार आणि पशुबळ, मनुष्यबळ आणि भांडवल यांची अपुरी उपलब्धता लक्षात घेऊन `सहकारी शेती'चा आग्रह धरून शेतकऱ्यांना त्यात सहभागी करून घ्यावे अशी सूचना त्यांनी केली होती. शेतकऱ्याची मालकी कायम राहिल्याने शेती करताना त्याची बांधिलकी कायम राहील, तो मनापासून काम करेल. तसेच सहकारी शेती केल्याने कमी उपलब्ध अवजारे, पशु आणि भांडवल यांचा अधिक परिणामकारक वापर होईल; असाही त्यांचा आशय होता. त्यांनी वापरलेला सहकारी शेती हा शब्दही महत्वाचा आहे. त्यांनी सामूहिक शेती असा शब्दप्रयोग केला नाही. `समूह' आणि `सहकार' या दोन शब्दातील भावना खूप वेगळ्या आहेत. सहकार हा मनापासून आणि सकारात्मक काम करण्याचा निदर्शक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या विचार पद्धतीला आणि मांडणीला अनुसरून, अशी सहकारी शेती फ्रान्स, इटली आणि इंग्लंडमध्ये होते आणि ती फायदेशीर ठरते, याचा दाखलाही त्यांनी दिला होता. त्या विधेयकावर बाबासाहेबांनी dissent note जोडून सही केली होती.

फायदेशीर शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. शेतीला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यानेच उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. यासाठी नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हायला हवे. त्याची योजनाही डॉ. आंबेडकर यांनी ब्रिटीश सरकारला सादर केली होती. शेतीचा विचार राष्ट्रीय स्तरावर आणि समग्रपणे करण्याचा त्यांचा आग्रह होता. शेतीचे उत्पादन वाढवणे, पिकपद्धती, साठवण, विक्री, भाव या सगळ्याचा मुळातून विचार आणि नियोजन आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते. अर्थशास्त्राच्या मागणी पुरवठा सिद्धांताचा विचार शेतीच्या संदर्भातही व्हायला हवा असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एकाच पिकाखाली अधिक जमीन येणे, अतिरिक्त पिक आल्यास पडणारे भाव आणि होणारे शेतकऱ्याचे नुकसान, अतिरिक्त शेतमालाचे नुकसान हे टाळून; शेतमालाला रास्त भाव देणे आणि त्यात स्थिरता राखणे साधले पाहिजे यावर त्यांचा आग्रह होता.

कृषीवरील कर आकारणी हाही एक मोठा मुद्दा आहे. जमीन महसूल पद्धतीत बदल करावा. अल्पभूधारक आणि मोठी जमीन बाळगणारे असा भेद त्यासाठी करावा, या मताचे डॉ. आंबेडकर होते. परंतु कृषी उत्पादनावर औद्योगिक उत्पादनाप्रमाणेच करआकारणी करावी असे त्यांचे मत होते. अर्थात हे करताना विशिष्ट उत्पन्नापर्यंत कर सवलत मिळावी या मताचे ते होते. अन्य उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच उत्पन्नावर आधारित करसूट, करसवलत किंवा करआकारणी शेती बाबतही असावी असा त्यांचा विचार होता. परंतु कृषी क्षेत्रावर कर आकारणीचा मुद्दा गुंतागुंतीचा आहे कारण शेती हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. तो विषय केंद्राने ताब्यात घ्यायचा असल्यास घटनादुरुस्ती आवश्यक ठरते. घटनादुरुस्ती ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्याची जशी एक राजकीय बाजू आहे तसेच या विषयावर देशात एकमत होणेही गरजेचे आहे.

भारताचे अर्थकारण, अर्थव्यवस्था, अर्थनीती आता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. यातील कृषी क्षेत्राचे स्थान, योगदान यातही मोठा बदल झाला आहे. तरीदेखील कृषीक्षेत्राची मानवी जीवनातील मुलभूतता, त्याचे स्वरूप, त्यातील अडचणी, ती फायद्यात आणण्याची गरज, त्याचे अर्थकारणातील न्याय्य स्थान, त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्याचे नियोजन, त्याची सामाजिकता इत्यादी गोष्टी लक्षात घेता; कृषी क्षेत्राचा विचार करताना डॉ. आंबेडकर यांचे योगदान आणि चिंतन यांचा मागोवा न घेता पुढे जाता येत नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

कलाचिंतन

'भारतीय संगीताची लोकप्रियता वाढविण्यासाठी ते गतिमान आणि rhythmic करावे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. ते अकारण गतिमान करून गोंधळ करू नये.'

प्रसिद्ध मोहनवीणा वादक पंडित विश्वमोहन भट्ट यांनी नागपूरला हे मत व्यक्त केलं. यासाठी पंडितजींचे आभार आणि त्यांना धन्यवाद.

खरं तर आज संगीत किंवा कला एवढेच नाही तर सगळ्या क्षेत्रात असं मूलभूत आणि स्पष्ट बोललं, सांगितलं आणि ऐकलं जाण्याची गरज आहे. परिस्थितीचा रेटा, लोकांची आवड, बदललेली मूल्य, आधुनिकता या किंवा अशा labels नी विचारांचा, व्यवहाराचा जो भोंगळपणा सुरू आहे तो थांबायलाच हवा. परिस्थितीनुसार बदलायला हवे वगैरे जी भंपकगिरी तोंडावर फेकण्याची आणि झेलण्याची सवय झालेली आहे तीही बदलायला हवी. सखोल, साधकबाधक, निरक्षिर विचारांची सवय लागायलाच हवी. आमच्या समजुती, गोंजारावे वाटणाऱ्या अनेक गोष्टी यांना धक्के बसले; त्या गोष्टी मोडल्या, कोसळल्या तरी हरकत नाही.

समग्र विचार न केल्याने सगळेच कसे चुकत जाते आणि किती विविध बाजू असतात हेही पं. भट्ट यांनी सांगितलेल्या एका किस्यातून स्पष्ट होते. किस्सा असा - अमिताभ बच्चन यांनी रेकॉर्ड केलेली रवींद्रनाथांची रचना पं. भट्ट यांनी ऐकली. तेव्हा ते बच्चन यांना म्हणाले की, अमितजी तुम्ही अगदी सुरात गायलात. त्यावर अमिताभ यांनी उत्तर दिले की, मी बेसुरा आहे पण ट्यून तंत्रज्ञानाने ते सुरात केले आहे.

हा किस्सा कलेचे कमअस्सलपण, उथळपण, पैशाचे अयोग्य वितरण, अस्सल कला आणि कलाकार अडगळीत जाण्याची प्रक्रिया, व्यक्ती आणि समाज यांची घसरण आणि दुर्गती, वेडपट वृत्ती या सगळ्या बाबींवर प्रखर प्रकाश टाकतो. आम्हाला ते समजतं का हा कळीचा प्रश्न आहे. आज मनोरंजन उद्योग म्हणून जे काही सुरू आहे त्याचाही उल्लेख जाताजाता करायलाच हवा. मनोरंजनाच्या विविध माध्यमातून जे अर्थकारण चालतं, त्याने एकूणच किती नुकसान आणि अन्याय होतो आहे यावर आपण कधीतरी बोलणार की नाही; की फक्त 'परस्परं प्रशंसंती अहो रुपम अहो ध्वनिम' असंच चालणार आहे?

- २१ नोव्हेंबर २०२१

black money phenomenon - 1

काळा पैसा'. सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय. काल टीव्हीवर एक प्रहसन पाहिलं. नवरा बँकेत जायला निघतो तेव्हा बायको एक डबा घेऊन येते आणि त्याच्या हाती ५०० व हजार रुपयांच्या नोटा देऊन म्हणते- या खात्यात भरून टाका. त्यावर नवरा घाबरतो. तो म्हणतो, असे नाही करता येणार. कुठून आणले हे पैसे? ती म्हणते- तुम्ही घरखर्चाला जे देता त्यातूनच जमवले आहेत. नवरा म्हणतो- अगं हा काळा पैसा आहे. असा पैसा जवळ ठेवता येत नाही. इत्यादी इत्यादी. मुद्दा आहे असा जमवलेला पैसा काळा पैसा म्हणता येईल का? त्याचे नि:संदिग्ध उत्तर असायला हवे- नाही. हा काळा पैसा नाही. कर भरल्यानंतर जो पैसा उरतो त्यातून साठवलेला पैसा हा नक्कीच काळा पैसा नाही. परंतु आज सगळीकडे गोंधळ दिसतो. मुळात आपल्या देशातच नव्हे तर जगभरात सुद्धा `काळा पैसा' कशाला म्हणायचे यावर एकमत नाही. दुसरी गंमत म्हणजे- ज्या पैशावर कर भरलेला नाही तो काळा पैसा असे साधारण समजले जाते. दुसरीकडे अमली पदार्थ, दारू, सिगारेट यासारखे पदार्थ, सट्टेबाजी (काही देशात याला अधिकृत मान्यता आहे), शस्त्रास्त्रांचा व्यापार, दलाली (यालाही काही देशात मान्यता आहे) यातील पैसा कर भरलेला असेल तर काळा पैसा समजण्यात येत नाही. म्हणजे जो पैसा वाईट गोष्टींना प्रोत्साहन देतो, समाजाला व्यसनाधीन करतो असा पैसा काळा पैसा नसून कर न भरलेला पैसा काळा पैसा म्हटला जातो. थोडक्यात - भाजीविक्री, किराणा विक्री, शैक्षणिक वर्ग, वैद्यकीय सेवा इत्यादी गोष्टीतून मिळवलेला पण कर न भरलेला पैसा हा काळा पैसा; परंतु अमाप दारू विकून आणि कर चुकता करून मिळवलेला पैसा हा काळा पैसा नाही. हे जरा गमतीचं वाटेल पण ते तसंच आहे. यासाठी black money phenomenon चा थोडा विचार करावा लागतो. एक नोंद लक्षात ठेवून विचार केल्यास सोपे जाईल. नोंद अशी की, भारतातील काळा पैसा हुडकून काढण्यासाठी पहिली समिती नेमण्यात आली ती १९३६ साली. म्हणजे भारत इंग्रजांच्या सत्तेखाली असताना. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ११ वर्षे. त्यावेळी ना निवडणुका होत्या, ना उद्योगधंद्यांचे आताचे स्वरूप. मग काळा पैसा कुठून आला होता? उघड आहे की, इंग्रज सरकारजवळ ज्या पैशाची नोंद नव्हती तो काळा पैसा. या देशात पैसा होताच. त्याचे व्यवहार पण होत होते. मात्र तो पैसा सरकारच्या ताब्यात नव्हता. तो ताब्यात असण्यासाठी त्याची माहिती हवी, नोंद हवी. त्यामुळे सरकारकडे नोंद असलेला पैसा हा पांढरा (वैध) पैसा आणि नोंद नसेल तो काळा पैसा. देश, देशातील पैसा, त्याचे व्यवहार, परदेशाशी व्यापारी व अन्य संबंध, सुरक्षा या बाबी ताब्यात असण्यासाठी काळा व पांढरा पैसा असा भेद करण्यात येतो.

अगदी फार मागे न जाताही काही गोष्टींचा विचार करता येईल. दोन जागतिक महायुद्धांच्या आधीचा मानव समाज आणि दोन महायुद्धांच्या नंतरचा मानव समाज. या युद्धांच्या आधीही जनता, समाज, देश, राजे, महाराजे, सत्ता इत्यादी होतेच. परंतु सत्ता सत्तांचे संबंध, सत्ता व समाज यांचे संबंध वेगळे होते. दोघांचे परीघ एकमेकांना छेदत असले तरीही त्यांचा त्यांचा स्वतंत्र अवकाश होता. सत्ता समाजाची किंवा समाज सत्तेचा बटीक नव्हते. परस्परांना गरजेपुरती मदत करणे एवढाच भाग होता. स्वभाव, गुणदोष यांच्यानुसार चांगली, वाईट परिस्थिती राहत असे. नैसर्गिक वा मानवी संकटे यात एकमेकांशी हिशेबी देवाणघेवाण होत असे. परंतु दोन्हीचे स्वतंत्र अस्तित्व ठळक होते. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची चरित्रे वाचताना लक्षात येतं की; त्यांचे विदेशात जाणे, तेथील निवास, त्यांचे आर्थिक व्यवहार इत्यादी गोष्टींमध्ये त्या त्या सरकारांची दखल नव्हती. साधे पासपोर्ट वा व्हीसा यांचेही उल्लेख कुठे नाहीत. स्वामी विवेकानंद सरळ अमेरिकेत गेले. पहिल्याच प्रवासात त्यांना भेटलेल्या अनोळखी महिलेने त्यांना मदतीचे आश्वासन दिले, घरी बोलावले अन नंतर अडचणीत त्यांना स्वत:च्या घरी ठेवून मदतही केली. त्यासाठी त्या महिलेला पोलीस चौकीत वगैरे जावे लागले नाही. अमेरिकेत मिळालेल्या व्याख्यानांचे पैसे स्वामीजी सहजपणे भारतात पाठवू शकत. गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले तेव्हा दुसऱ्या वेळी प्लेगच्या तपासणीसाठी त्यांना थांबवण्यात आले होते. अन्यथा कुठे आडकाठी नव्हती. एकूणच वातावरण, समाजाची घडी, व्यवस्था अधिक मोकळ्या होत्या.

मात्र, सत्ताकांक्षेतून जगावर लादल्या गेलेल्या महायुद्धांनी संपूर्ण मानवजातीला भयाक्रांत केले. या महायुद्धांनी घडवलेल्या सामुहिक संघटीत विनाशाने संपूर्ण मानवता भयग्रस्त झाली. त्यातूनच माणूस अधिकाधिक सत्तोन्मुखी होत गेला. सुरक्षिततेसाठी एखाद्या प्रबळ सत्तेची मानवाची गरज वाढत गेली. जगभरातले विविध मानव समूह अधिकाधिक संघटीत होऊ लागले. आपापल्या अस्तित्वाच्या चिंतेतच त्यांचे जीवन व्यतीत होऊ लागले. आपले अस्तित्व याचा अर्थ आपले शारीरिक अस्तित्व, आपला पैसा, आपली भाषा, आपले रीतीरिवाज, आपले उपासना पंथ, आपली जीवनशैली असे सगळेच. यावर आघात होऊ नयेत, हे सुरक्षित राहावे यासाठी प्रत्येक गोष्टीत सत्तेची मदत, सत्तेचे sanction, सत्तेचे कवच मिळवण्याचा प्रयत्न होऊ लागला. सुरक्षेच्या संदर्भातील भयग्रस्तता आणि गरज यांचे स्वरूप बदलून सत्ताकांक्षेने संपूर्ण मानवी जीवन कधी व्यापून टाकले ते कळलेही नाही. परस्पर विश्वास या गोष्टीला तडा जाऊन सगळ्या गोष्टींकडे संशयाने पाहणे सुरु झाले. मार्क्स आणि विज्ञान यांनी मानवाच्या संघर्ष आणि संशयाला बळ पुरवले तरीही त्याचा व्यापक आविष्कार होण्याला आणि त्याचे सिद्धांत होण्याला जागतिक महायुद्धे कारणीभूत झालीत. यातून सत्ता अधिकाधिक पुष्ट, अधिकारसंपन्न, शक्तिशाली होत गेल्या आणि समाज अधिकाधिक दुबळे, अधिकारविहीन आणि निर्बल होत गेले. यानंतर सत्ता समाजाला वेठीला धरू लागल्या आणि समाज सत्तेला नाचवू लागले. अगदी वर्तमानातील जगभरातील अनेक उदाहरणे यासाठी देता येतील.

समाजाने कोणाला तरी सत्ता सोपवायची आणि सत्तेने त्याबदल्यात समाज चालवायचा असे सुरु झाले. मग समाज चालवायचा तर त्याची सगळी मालकी सत्तेकडे हवी. सगळी माहिती, सगळ्या कामांची माहिती, कामांना परवानग्या, जमिनी असं जे जे काही असेल त्याची मालक सत्ता झाली. नाही म्हणायला समाज हाच मालक अशी भाषा वापरण्यात येते. पण समाजाची मालकी indirect असते. या मालकी हक्काच्या संघर्षातून खूप सारे bargaining होते. या सगळ्या सव्यापसव्यात माणूस, त्याचं जगणं, त्याचं स्वरूप या साऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं. याचा आणि black money phenomenon चा काय संबंध? ते पुढच्या भागात.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २८ नोव्हेंबर २०१६


संपूर्ण समाज सत्तेच्या आणि राजकारणाच्या दावणीला किती बांधला जातो आहे हे कुणालाही कळत नाही की कळूनही वळत नाही. राजकारणाकडे दुर्लक्ष हाही यावरील उपाय नाही. उलट त्याने सत्ता आणि राजकारणाची पकड घट्टच होत जाईल. पंथ-संप्रदायांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आदी जन्मास आले. यानंतर सत्ता आणि राजकारणाचा विळखा सोडवायला अशाच एखाद्या युगांतराची गरज नक्कीच भासणार आहे.

ध्यास

असाच मनाने ध्यास घेतला, मीठ आणि साखर एकत्र करण्याचा. एका वाटीत मीठ आणि साखर सारख्या प्रमाणात काढून ठेवले. वाट पाहिली आठवडाभर. काहीच झाले नाही. मन म्हणालं- ते आपोआप एकत्र होत नाहीत. काहीतरी करावं लागेल. मग विड्याचे पान कुटण्याच्या खलबत्त्यात टाकून दोन्ही कुटले एकत्र. ते मिश्रण ठेवलं पुन्हा वाटीत काढून. आठवडाभरासाठी. तरीही नाहीच झाले दोघे एक. मग ती वाटी ठेवली देवापुढे. बाबा रे, आता तू तरी काहीतरी कर. माझी एवढी इच्छा पूर्ण कर. आठवडा लोटला. काहीच घडलं नाही. एक दिवस सचिंत बसलेले असताना एक कुणी आला. सचिंत पाहून विचारता झाला- काय झाले. मनाने सगळा प्रकार सांगितला. एक कुणी म्हणाला- वाटी आण. वाटी आणली. मग एक कुणी म्हणाला, पेलाभर पाणी मिळेल का? पाणी आणले. एका कुणाने ते पाणी वाटीत टाकले. अन म्हणाला- राहू दे असेच. मिसळून जातील दोघेही. मन पाहत राहिलं वाटीकडे. काही वेळ गेला अन मन हसू लागलं- वाटीतील साखर आणि मीठ मिसळून गेले होते. एक झाले होते.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

असेच दिवस जात होते. मनाने पुन्हा ध्यास घेतला. यावेळी ध्यास होता- साखर आणि वाळू एक करण्याचा. देव, दैव, स्वप्रयत्न हे सगळं बाजूला सारून; मनाने ठरवलं- कुणी एकाने सांगितलेला उपाय चांगला आहे. रामबाण आहे. तोच करायचा. वाटीत साखर आणि वाळू सारख्या प्रमाणात घेतले. त्यात पाणी टाकले अन वाट पाहू लागलं मन, त्यांच्या एक होण्याची, मिसळून जाण्याची. दिवस गेले, आठवडे उलटले. काहीच झाले नाही. मन सचिंत बसले होते. पुन्हा एकदा मागचाच कुणी एक आला. सचिंत पाहून कारण पुसले. मनाने वृत्तांत सांगितला. कुणी एक फक्त हसला. अन निघून गेला.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मनाला एवढंच कळलं- वाळू अन साखर एक होऊ शकत नसतील किंवा कुणा एकाला त्यांना एक करण्याचा उपाय माहीत नसेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, २९ नोव्हेंबर २०१५

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

ब्रेक, वेग आणि नियंत्रण

लहानपणी सायकल शिकताना `ब्रेक हातात ठेवावा' हे वाक्य आपण किती तरी वेळा ऐकलेलं असतं. तसा तो ब्रेक हातात ठेवून सायकल शिकलेलीही असते. कालौघात ते सारे आपण विसरूनही जातो. `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व सत्य आहे आणि जीवनव्यापी आहे हे मात्र लक्षात येत नाही. आज सर्वत्र जे काही सुरू आहे, ऐकायला येते आहे, पाहायला मिळते आहे ते पाहिले की `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व वारंवार आठवते. विशेषत: अर्थकारणावरून आज जगभर जो हैदोस सुरू आहे तो पाहिला की, हे तत्व जीवनव्यापी सूत्र म्हणून पटू लागते.

१९१७ साली रशियात सुरू झालेला कम्युनिझमचा प्रवास ग्लासनोस्त, पेरेस्रोइकाच्या खडकावर आपटून फुटला आणि अमेरिकेत व्याप्त अर्थप्रधान, व्यक्तिवादी कल्पना जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या माध्यमातून जगभर पसरल्या. त्यांचा जोर आणि प्रभाव एवढा होता की, कम्युनिझमचा आणखीन एक गढ असलेला चीनदेखील जुनी खोळ टाकून नव्याने वाटचाल करू लागला. चीनमध्येही कम्युनिझमचे थडगे बांधले गेले. तेव्हापासून अमेरिकन भांडवलशाहीचा रथ चौखूर उधळला. भांडवलशाहीच्या या tytanic ला २००८ साली मोट्ठे छिद्र पडले आणि त्यात पाणी घुसायला लागले. हे अवाढव्य tytanic आता कधी बुडेल याचा काहीही भरवसा राहिलेला नाही.

बुडणार्या जहाजाच्या बावरलेल्या कप्तानासारखे सारे तज्ञ, धोरणकर्ते बावरुन इकडे तिकडे धावाधाव करत आहेत. हाती काहीही लागत नाही, मार्ग सापडत नाही, जहाजातील पाणी कितीही काढले तरीही काही उपयोग होत नाही. देशचे देश बुडू लागले आहेत. package देण्यासाठी अवास्तव नोटा छापल्याने मुद्रास्फीति आणि महागाई वाढली. देशोदेशीच्या केंद्रीय बैंक्सनी योजलेले उपाय पालापाचोळ्यासारखे उडून गेले. गमतीचा भाग म्हणजे अजूनही तथाकथित अर्थतज्ञ आर्थिक सुधारणा वगैरे वेडपट गोष्टीच करीत आहेत. ज्या विकसित वगैरे देशांनी कथित आर्थिक सुधारणा वगैरे केल्या ते देश दिवाळखोरीत निघत आहेत हे सुद्धा कोणी लक्षात घेत नाही. आजुबाजूला घडणार्या गोष्टी मनापर्यंत, बुद्धीपर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत एवढी हतबुद्धता, भाम्बावलेपण सारीकडे पसरले आहे.

कम्युनिझमने गाडीचे ब्रेक एवढे दाबून ठेवले होते की, गाडी पुढेच सरकत नव्हती आणि भांडवलशाहीच्या गाडीला तर ब्रेकच नाहीत. तिचा वेगही सुस्त आहे. आता या गाडीचे भवितव्य काय हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. क़पाळमोक्ष ठरलेलाच आहे. पाहायचे फक्त एवढेच आहे की, या भीषण अपघातातून कोण वाचते आणि कोणाकोणाची आहुती पडते. जखमी तर बहुतेक सार्यांनाच व्हावे लागेल. गाडीला ब्रेक अत्यावश्यक असतो आणि योग्य वेळी तो वापरायचाही असतो; हा सुवर्णमध्य, हा व्यवहार, हे त्रिकालाबाधित सत्य कम्युनिझम आणि भांडवलशाही या दोन्हीने नजरेआड केले.

परंतु ब्रेक आणि त्याचा योग्य वापर हे सत्य प्रत्यक्षात येण्यासाठी एक आणखीन गोष्ट अत्यावश्यक असते आणि ती म्हणजे, `नियंत्रण'. हे नियंत्रण असते मनाचे, विचारांचे. नियंत्रण कधीही बाह्य असू शकत नाही. गाडीचा वेग वाढू लागला की, मन सांगते वेग कमी कर आणि आपण ब्रेक लावतो. वळण आले की मन सांगते, वेग कमी कर, अमुक दिशेला गाडी वळव आणि मग तशी कृती केली जाते. मानवी सभ्यतेने आज हे नियंत्रणच गमावले आहे. अर्थकारणापुरते बोलायचे तर, हे संपूर्ण अर्थकारण पैसा मिळवण्याचे अर्थकारण आहे. ही दिशाच चुकीची आहे. ही दिशा वळवून अर्थकारणाचे तोंड माणसाचे सुख, समाधान, शांती, सुरक्षा, सुव्यवस्था, सहजीवन याकडे वळवले जात नाही तोवर आपल्या नशिबी केवळ जंगलात भटकणेच राहील.

- श्रीपाद कोठे, नागपूर

मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११

शेतीबद्दलची कृतघ्नता

दोन वाक्ये अनेकदा कानी पडतात.

१) आपला देश शेतीप्रधान आहे, तरीही शेतीकडे दुर्लक्ष केले जाते.

२) शेतीवरील भार कमी करायला हवा.

प्रश्न असे निर्माण होतात की-

१) देश शेतीप्रधान आहे म्हणून शेतीकडे लक्ष द्यायला हवे का?

२) शेतीवरील भार कमी करायचा म्हणजे शेती कमी करायची का?

३) शेतीकडे केवळ रोजगार निर्मितीची क्षमता याच दृष्टीने पाहणे योग्य आहे का?

४) सेवा आणि उत्पादन क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करून शेतीवरील सगळा रोजगार त्यात सामावून घेतला तर ते किती योग्य ठरेल?

५) मुळात शेतीकडे पाहण्याची दृष्टी काय असावी?

खरे तर देश शेतीप्रधान असो की नसो, माणसांना खायला लागणारच आणि खाण्याची व्यवस्था शेतीशिवाय होऊच शकत नाही. आज जगात डझनावारी देश असे आहेत ज्यांच्याकडे स्वत:ची शेती नाही. त्यांना पूर्णत: दुसऱ्या शेती उत्पादकांवर अवलंबून राहावे लागते. प्रगती, तंत्रज्ञान, आधुनिकीकरण कितीही झाले तरी पोट सुटत नाही आणि निसर्गावर मात करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही पोटाला लागणारी भूक संपत नाही. त्यामुळेच चंद्र-मंगळावर वसाहती वसवल्या तरी शेतीला पर्याय नाही. शेतीची ही मुलभूतता लक्षात घेऊन शेतीचा विचार व्हायला हवा. ती अन्य गोष्टींपैकी एक नाही. अन्य गोष्टी असल्या वा नसल्या तरी चालू शकणारे आहे. शेतीशिवाय चालूच शकणार नाही. आपण सगळ्यांनीच शेतीबद्दलची कृतघ्नता टाकून देण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२३ नोव्हेंबर २०१४

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

रियांग



२२ नोव्हेंबर २०१८

येत्या आठ पंधरा दिवसात होणाऱ्या मिझोराम विधानसभा निवडणुकीत ब्रू निर्वासितांना मतदानाचा अधिकार देण्यात आला असून त्याची सगळी तयारी झाल्याची बातमी आज वाचली. खूप बरं वाटलं. ब्रू म्हणजे रियांग जमातीचे वनवासी. गेल्या शतकाच्या नव्वदीच्या दशकात मिझोराम आणि त्रिपुरा यांच्या सीमावर्ती भागात वास्तव्य असलेल्या रियांग लोकांवर त्या भागात सक्रिय असणाऱ्या ख्रिश्चन शक्तींनी अनन्वित अत्याचार केले. अन मिझोराममधील सगळ्या रियांग लोकांना पळवून लावले. रात्रीच्या रात्री गावेच्या गावे पेटवून दिली. मिझोराममधील हे रियांग लोक त्रिपुरात निर्वासित म्हणून आले. सहा निर्वासित शिबिरात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्रिपुरातील कांचनपूर येथे साधारण आठवडाभर मुक्काम करून त्यातील चार शिबिरांना भेटी देऊन त्यांच्यावरील विपदा आणि तो प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. तो सगळाच प्रकार फार भयानक होता. ख्रिश्चनांच्या क्रूर विकृतीचं एक उदाहरण एका म्हाताऱ्या व्यक्तीने सांगितलं होतं. जीवाने मारून टाकणे ही काही फार मोठी गोष्ट नव्हतीच. पण कोणाच्या तरी मनात राक्षसी वृत्ती जागी झाली आणि त्यांनी त्या म्हाताऱ्याला त्याच्या चार-पाच वर्षांच्या नातवाचे शव हातावर घेऊन अख्खी रात्र जंगलातून चालायला लावले होते.

त्यावेळी लोकसत्तात होतो. परंतु लोकसत्तेचा एकही पैसा न घेता, स्वत:चे पैसे खर्च करून गेलो होतो. जाताना बोलून गेलो होतो की, मला काहीही नको. फक्त सुट्टी द्या आणि आल्यावर त्यावर लिहीन ते योग्य वाटल्यास प्रसिद्ध करा. अर्थात योग्य याचा अर्थ लोकसत्ताच्या भूमिकेशी जुळणारं. मी नेहमीच माझ्या पद्धतीने लिहित आलो आहे. ते लोकसत्तेला पसंत पडलं नाही. कारण त्यात ख्रिश्चन आतंक, बांगलादेशातील धागेदोरे इत्यादी विषय होते. त्यामुळे ते सगळे अप्रसिद्ध राहिले. पण सुमारे दोन-अडीच दशकांनी आज रियांग लोकांना पुन्हा मतदानाचा अधिकार मिळाल्याचे वाचले तेव्हा बरं वाटलं.

(टीप- अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी मुद्दे हे वाचताना मनात येऊ देऊ नयेत. कारण संघ स्वयंसेवकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याची पद्धत आपल्या देशात पूर्वी नव्हती.)

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

विनोबांचे गांधी - २

विनोबांनी गांधीजींच्या विभूतीकरणाचा स्पष्ट विरोध केलेला आहे. याविषयी ते म्हणतात - 'पुष्कळ लोक त्यांना राम व कृष्ण यांच्या कोटीत नेऊन बसवतात. हे बरोबर नाही. पुराण काळापासून अनेक कवी कल्पनांनी समृद्ध बनलेल्या राम कृष्णांच्या चरित्र कोटीत ते टिकू शकणार नाहीत. त्यांच्या तुलनेत हे फिक्के पडतील. शिवाय विज्ञानाच्या युगात असा प्रयत्न हास्यास्पदही होईल. भारताला स्वतंत्र करण्यासाठी भगवंताचा जन्म झाला, अशा दृष्टीने आपण गांधीजींचे चरित्र लिहायला बसू तर ती भागवताची हास्यास्पद नक्कल करण्यासारखे होईल. तो एक विनोद ठरेल.'

गांधीजी मानव होते आणि मानवच राहिले पाहिजेत, असे मत मांडून ते म्हणतात, त्याने आपलाच लाभ आहे. त्यामुळे जगाला गरज असलेला एक नैतिक आदर्श आपल्याला मिळेल. त्यांना देव बनवल्यास आपण मानवतेचा एक आदर्श गमावून बसू, असा इशाराही विनोबा देतात. आज आपल्याला नव्या देवाची नव्हे तर जीवनशुद्धीच्या एका पवित्र दृष्टांताची गरज आहे असे मतही ते ओघात व्यक्त करतात.

शुकदेव जन्मापासून ज्ञानी होते, कपिल महामुनी जन्म होताक्षणीच मातेला उपदेश करू लागले, शंकराचार्य आठव्या वर्षीच वेदाभ्यास पूर्ण करून भाष्य लिहायला बसले; हे नमूद करून विनोबा म्हणतात - 'गांधीजी अलौकिक पुरुष म्हणून जन्मास आले नाहीत ही कृपाच समजावी. त्यामुळे त्यांचे जीवन आपल्यासाठी जास्त अनुकूल होईल.'

गांधीजी रोजच्या रोज बदलत राहिले. क्षणा क्षणाला विकसत राहिले. आज ते असते तर कसे वळण घेते हे कोणी सांगू शकणार नाही, असा अभिप्राय व्यक्त करताना विनोबा म्हणतात, आपण महापुरुषांच्या वचनांचे चिंतन केले पाहिजे, त्यांच्या स्थूल चरित्राचे नाही. हेच विवेचन पुढे नेताना त्यांनी अतिशय परखड शब्दात मत व्यक्त केले आहे. विनोबा म्हणतात - 'आजच्या विज्ञान युगात पुराण काळचा मनू आणि जुना मार्क्स चालणार नाही. आणि मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की, गांधीही आज जसाच्या तसा चालणार नाही.'

या विवेचनानंतर अनेकांच्या मनात उद्भवणारा प्रश्न विनोबा स्वतःच उपस्थित करतात आणि त्याचे उत्तरही देतात. ते विचारतात - तुम्ही म्हणाल तुम्ही गांधींपेक्षाही पुढे गेलात काय? अन उत्तर देतात - आपल्यात नम्रता पूर्वक असे सांगण्याची शक्ती असली पाहिजे की, गांधीजींच्या काळाहून आपण पुढेच आहोत. यात गांधीजींपेक्षा मोठे होण्याचा प्रश्न नाही पण आपल्यासमोर नवी नवी क्षितिजे उभी राहिली आहेत हे आपल्याला समजले पाहिजे.

गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मारकाची चर्चा सुरू झाली. त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना विनोबा म्हणतात - 'या सगळ्या स्थूल स्मारकांनी त्यांच्या खऱ्या स्मृतीचे काम साधणार नाही. उलट अशा स्मारकांमुळे मुख्य गोष्ट नजरेआड होण्याची भीती आहे. लोक विटा चुना दगडाने सामान्य घरे बनवतात आणि त्यावर लिहितात 'गांधीघर'. पण खरे गांधीघर असे बनत नाही. ते सत्य, प्रेम, करुणेने बनते; असा विनोबांचा अभिप्राय आहे.

गांधीजी क्रांतदर्शी होते असे मत व्यक्त करून विनोबा म्हणतात - 'स्वराज्य मिळाल्यानंतर स्वराज्य हा शब्द लोकांना पुन्हा प्रेरणा देऊ शकणार नाही, उत्साहित करू शकणार नाही. त्यांच्यासमोर दुसरा संकल्प नसेल तर त्यांची शक्ती क्षीण होईल हे गांधीजी जाणत होते. म्हणून त्यांनी स्वराज्यानंतरचे ध्येय लोकांसमोर ठेवले आणि त्यासाठी शब्द दिला सर्वोदय. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय.' हा सर्वोदयाचा संकल्प देशव्यापी होईल तेव्हाच बापूंचे खरे स्मारक उभे केले असे म्हणता येईल, असाही विनोबांचा अभिप्राय आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २० नोव्हेंबर २०१९

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

प्रश्नसंस्कृती

आज प्रबोधिनी एकादशी. प्रबोधन करण्यासाठी नाही (कारण ती माझी औकात नाही), तर स्वत:च्या प्रबोधनासाठी काही मुद्दे. फक्त सगळ्यांसोबत शेअर करतो आहे.

- सगळं जग नवीन युगात प्रवेश करतं आहे. त्यात आपणही आहोत.

- या नवयुगासाठी विचारक्रांती अपरिहार्य आहे.

- आपल्या हाती फक्त त्याला प्रतिसाद देणे आहे.

- त्या विचारक्रांतीसाठी उपनिषदांच्या प्रश्न संस्कृतीचं पुनरुज्जीवन हवं.

- पत्रकारी, वकिली, पोलिसी, बुद्धिवादी, राजकीय, विज्ञानी, साम्यवादी प्रश्न संस्कृतीचं मात्र नको.

- आजच्या विविध प्रश्न संस्कृती तयार उत्तरे सिद्ध करण्यासाठी प्रश्न करतात. त्यांची उत्तरे तयारच असतात. फक्त ती सिद्ध करणे हा हेतू असतो.

- किंवा उत्तर मिळालं नाही की चूक वा बरोबर ठरवतात. उत्तर न मिळणे म्हणजे चूक नाही.

- तयार उत्तरे, चूक वा बरोबर ठरवणे अथवा वर्चस्व सिद्ध करून काही तरी पदरात पाडून घेणे; या दोषांनी आजच्या प्रश्न संस्कृती बाधित आहेत.

- उपनिषदांची प्रश्न संस्कृती या सगळ्या दोषांपासून दूर आणि तरीही यांच्यापेक्षा अधिक थेट, अधिक प्रखर, अधिक तेजस्वी आहे. ती प्रश्नकर्त्याला स्वत:लाही प्रश्न करण्याचं बळ देते. ती तत्त्वदर्शनी, सत्यान्वेषी आहे.

- अमुक एखाद्या गोष्टीला, व्यक्तीला, तत्त्वाला, विचाराला, कृतीला, गटाला, जातीला, स्त्रीला, पुरुषाला; ती प्रश्नापासून दूर राहण्याचा विशेषाधिकार देत नाही. तरीही ती आजच्या प्रश्न संस्कृतीहून आगळी आहे. ती प्रश्नाच्या यादीत प्रश्नकर्त्याला पहिल्या स्थानावर ठेवते. त्यामुळेच ती आगळी असूनही अतिशय कठीण आहे.

- ही उपनिषदी प्रश्न संस्कृती पुनरुज्जीवित व्हायला हवी. ती युगांतराची गरज आहे.

- १९ नोव्हेंबर २०१८

शेतकऱ्यांसाठी कार्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांसाठी नव्हे तर या देशातील तमाम वंचित व शोषितांसाठी कार्य केले. खासकरून शेतकरी, शेतमजूर व महिलांच्या प्रश्नांची विशेष चिकित्सा करून त्यांनी त्यावर उपाय सुचविले. परंतु त्यांच्या "कृषीविषयक" विचारांची दखल तत्कालीन राजकीय धुरीणांनी घेतली नाही.

शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण करणारी खोती पद्धती त्या काळी कोकणात अस्तित्वात होती. डॉ. आंबेडकरांनी खोती पद्धतीचे प्राबल्य नष्ट करण्यासाठी लढा दिला. इ.स. १९०५ ते इ.स. १९३१ या काळात पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा झाल्या. त्यानंतर खोतांना जबर हादरा देण्यासाठी कोकणातील शेतकर्‍यांनी इ.स. १९३३ ते इ,स. १९३९ पर्यंत संप पुकारला व या संपात १४ गावचे शेतकरी सहभागी झाले.

त्या काळीसुद्धा शेतकरी वर्गाला दुष्काळास तोंड द्यावे लागत असे. अशा प्रसंगी शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या विविध योजना सुचविल्या त्यापैकी ‘पीक विमा योजना’ ही एक महत्त्वाची योजना होती. शेतजमिनीचे निरंतर होणारे तुकडेकरण हे शेती व्यवसायाच्या अधोगतीचे एक महत्त्वाचे कारण होते. सप्टेंबर १९१८ रोजी शेतजमिनीच्या तुकडेकरणाच्या समस्येवर ‘स्मॉल होल्डिंग इन इंडिया अ‍ॅण्ड देअर रेमडीज’ अशा आशयाचा एक शोधनिबंध डॉ.आंबेडकरांनी ‘जर्नल आॅफ इंडियन इकॉनॉमिक सोसायटी’ या मासिकात प्रकाशित केला.शेतीवरील श्रमशक्ती उद्योगधंद्यात वळवली पाहिजे, त्यातूनच शेती व्यवसायातील दरडोई उत्पन्न वाढेल. त्यांनी शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की, गावातील शेती सर्व शेतकर्‍यांनी मिळून पिकवावी. तिच्यासाठी भांडवली खर्च राज्य सरकारने करावा आणि शेतीतला माल निघाल्यावर त्याची वाटणी करारातील अटीनुसार शेतकरी व सरकारमध्ये व्हावी. पण त्या वेळच्या सरकारांनी शेतीच्या या समाजवादाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले.[१९]

शेतकऱ्यांची चळवळ

गरीब, दरिद्री शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १९२८ पासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकर्‍यांचे प्रश्न हाती घेतले होते. १९२७ मध्ये देशात समता प्रस्थापित व्हावी म्हणून महाडचे आंदोलन त्यांनी केले होते. तर त्यानंतर लगेच दुसर्‍या वर्षी म्हणजे १९२८ पासून त्यांनी कोकणातील शेतकर्‍यांची खोतांच्या दास्यातून मुक्तता व्हावी म्हणून फार मोठी चळवळ सुरू केली होती. १४ एप्रिल १९२९ रोजी रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. या शेतकरी परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकर्‍यांचे आंदोलन उभारले. १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणार्‍या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले होते. १० जानेवारी १९३८ रोजी २५,००० शेतकर्‍यांचा विराट मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला. शेतक-यांच्या यशस्वी मोर्च्यानंतर, शेतकर्‍यांची चळवळ अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने; त्यांनी शेतकर्‍यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोकणचा दौरा केला. शेतकर्‍यांच्या अनेक सभांमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विशेष म्हणजे हे शेतकरी कुणबी, मराठा आणि मुस्लिम होते. बाबासाहेबांनी शेतकर्‍यांच्या जातींचा विचार न करता सर्व जातिधर्माच्या शेतकऱ्र्‍यांठी चळवळ उभारली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती. सामूहीक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पाणी आणि वीज यांचा समानरीत्या पुरवठा झाला, तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही असे त्यांचे मत होते. खोती पद्धतीमुळे शेतकरी वर्गावर खूप अन्याय होत असे. ती एक प्रकारची आर्थिक शोषण करणारी व्यवस्थाच होती. ही खोती पद्धत नष्ट करणारे कायदे डॉ. आंबेडकरांनी केले. ज्याप्रमाणे रेल्वेमार्गावर पूर्णपणे केंद्र शासनाची मालकी असते, त्याप्रमाणे जलमार्गावरदेखील केंद्र शासनाचीच मालकी असावी असे मत त्यांनी मांडले. पण हे मत कोणी फारसे विचारात घेतले नाही. त्यामुळे त्याचे आज काय परिणाम झालेले आहेत ते सर्वश्रुत आहे. आज भारतात जी नदीजोड प्रकल्पाविषयी चर्चा चालू आहे, त्या नदीजोड प्रकल्पाची संकल्पना भारतामध्ये सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनीच मांडली होती. 

शेतकर्‍यांचा पहिला संप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चरी या गावी रायगड जिल्ह्यात शेतकर्‍यांचा पहिला संप घडवून आणला गेला. तो संप इ.स. १९२८-१९३४ या दरम्यान रायगड जिल्ह्यातल्या 'चरी' या गावात झाला. हा संप तब्बल सात वर्ष चालला.

'खोती'ला तिलांजली

खोती पद्धतीमुळे कोकणातील शेतकरी गांजले होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, ही अन्यायकारक पद्धत इथं सुरू होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्‍यांनी याविरुद्ध संप पुकारला.

डॉ. आंबेडकरांची साथ

शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या कुळांनी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साथ लाभली. त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकर्‍यांच्या वतीने कोर्टात उभे राहिले.

...आणि कूळ कायदा अस्तित्वात आला!

तत्कालीन महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी चरीला भेट देऊन चर्चा केली. शेतकर्‍यांच्या लढ्यामुळे त्यावेळी अनेक कुटुंबांची ससेहोलपट झाली असली तरी पुढच्या पिढीला या आंदोलनामुळे अच्छे दिन आले. चरी कोपरच्या लढ्यामुळे कसेल त्याची जमीन हे धोरण अमलात आले. कूळ कायदा तयार करण्यात आला. [२०]

शेतकर्‍यांचे कैवारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकर्‍यांचे कैवारी होते.[२१] भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी म्हणून सर्वपरिचित आहेत. तथापि, ग्रामीण भागाचे हितरक्षक आणि शेतकर्‍यांच्या परिवर्तनासाठी त्यांनी मांडलेले विचार, समोर आले नाहीत. त्यामुळे शेतीची हानी झाली. त्यांचे ग्रामीण समाज आणि शेतीबाबतचे विचार आजही राज्यकर्ते, नियोजकार आणि शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकंच शेतीबद्दलही भान होतं. ग्रामीण भागात विखुरलेला समाज एकसंध करायचा, तर शेतीचं चित्र बदललं पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. शेतीबाबत आपल्या देशातील शेतकरी आणि राज्यकर्ते यांचा उदरनिर्वाहाचे साधन अशी मानसिकता आहे. डॉ. आंबेडकर यांचा या मानसिकतेला आक्षेप होता. शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून, राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेतकर्‍यांसह अनेक शेतमजुरांना रोजगार देण्याचे माध्यम आहे. त्यामुळे शेतीकडे उद्योग म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. शेती विकसित होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला, तर ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडेल. राष्ट्राची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. रोजगारासाठीची स्थलांतरे टळतील. इतक्या दूरदृष्टीने व सखोलतेने त्यांनी शेतीकडे बघितले.

शेतकर्‍यांच्या शोषणाबाबतदेखील त्यांनी परखड विचार मांडले आहेत. शासनाकडून पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने, शेतकरी सावकारांचा आधार घेतात. सावकारांच्या पाशातून त्यांची अंतापर्यंत सुटका होत नाही. शेतीतल्या ‘खोती’ पद्धतीबद्दलही त्यांनी कडक शब्दांत भाष्य केले. कष्ट शेतकर्‍याने करायचे आणि खोतकर्‍यांनी फुकटचे खायचे, त्यांना मान्य नव्हते. सावकार आणि खोतांना ते ‘आयत्या बिळावरचे नागोबा’ असे संबोधित. इतक्या मोजक्या आणि शेलक्या शब्दांत त्यांनी सावकारी व्यवस्थेचे वाभाडे काढले. या व्यवस्थेला हद्दपार करण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांना बियाणे, खते, पाणी आणि पीक जोपासना खर्च दिला पाहिजे. शासनाला महसूल देणार्‍या शेतीचे आर्थिक उत्तरदायित्व शासनाने उचलावे. ‘उत्तरदायित्व या शब्दातून शासनाने शेतकर्‍यांयाचे पोशिंदा म्हणून असलेले ऋण फेडावे असे त्यांना अपेक्षित होते. यातून शेतकर्‍यांचे कैवारी म्हणणार्‍या शासनाने बोध घेण्याची गरज आहे.

शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावं लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकर्‍यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.

शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकर्‍याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटीश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोर्‍यांची विभागणी केली. यावरून डॉ. बाबासाहेब यांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकर्‍यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकर्‍यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकर्‍यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोर्‍यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचाच प्रभाव दिसून येतो. डॉ. बाबासाहेब यांचे शेतीबाबतचे विचारधन राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत. दुर्दैवाने अनेकांना डॉ. बाबासाहेब हे शेतकर्‍यांचे कैवारीदेखील होते, हे अजूनही ठाऊक नाही. त्यांच्या विचारांच्या उपेक्षेतून शासनकर्त्यांची उदासीनताच प्रकर्षाने दिसते. डॉ. बाबासाहेब यांच्या शेतीविषयक सूचनांची अंमलबजावणी केली, तर शेती व ग्रामीण भागाचे परिवर्तन घडेल.

‘डॉ. आंबेडकरांकडून पाणी, वीज व शेतीचा सूक्ष्म विचार’

डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु डॉ. आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून उपाययोजना करण्यासाठी पाणी, वीज आणि शेतीचा सूक्ष्म विचार केल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागामार्फत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी सभागृहात आयोजित राजपत्रित अधिकारी यांच्या कार्यशाळेत डॉ. लुलेकर बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सुनील यादव, प्रदीप मरवाळे, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, विजय कबाडे यांची उपस्थिती होती.

डॉ. लुलेकर म्हणाले, की डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. देशात शेती, शेतकरी आणि शेतीशी संबंधित समूहाचा विचार छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, शाहूमहाराज आणि डॉ. आंबेडकर यांनीच केला. अवघे २७ वष्रे वयात डॉ. आंबेडकरांनी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करून ‘लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय’ हा शोधनिबंध लिहिला. शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आíथक स्तर उंचावणे शक्य नाही हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आíथक विकास झाला पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला तरच शेतीशी निगडित सर्व घटकाला या आíथक सक्षमतेचा फायदा होईल, असे त्यांचे मत होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंतन करणाऱ्या, विचार मांडणाऱ्या आणि त्यांच्यासाठी चळवळी उभ्या करून या देशातील शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न डॉ. आंबेडकरांना संपवायचे होते. यासाठी त्यांनी २५ हजार शेतकऱ्यांचा देशातील पहिला मोर्चा काढला. एवढेच नाहीतर त्यांच्या नेतृत्वात ७ वर्षे दीर्घकाळ शेतकऱ्यांचा संप झाला. जाती विसरून सर्व जण एकत्र आल्यास देश तुमच्या हातात येईल, असे ते सांगत. खोती पद्धतीच्या विरोधात त्यांनी लढा दिला. देशाचे पहिले पाटबंधारेमंत्री झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी शेती आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, तसेच देशाचे पहिले ऊर्जामंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला ऊर्जा आयोग स्थापन करीत वीज आणि पाण्याचे नियोजन केले. उद्योगांना वीज देताना कृषी उद्योगांना प्राधान्य दिले. डॉ. आंबेडकरांमुळे देशातील स्त्रियांना मताचा व समतेचा अधिकार मिळाला. कामगारांना न्याय मिळवून देऊन त्यांना सशक्त बनवले. डॉ. आंबेडकर सर्व देशाचे नेते होते. त्यांच्या विचारानुसार अनुकरण करणे महत्त्वाचे आहे, असे लुलेकर म्हणाले. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त संजय दाणे यांनी प्रास्ताविक केले. योगिराज माने यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हय़ातील राजपत्रित अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

#श्रीपादचीलेखणी

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

विनोबांचे गांधी

गेल्या २ ऑक्टोबर रोजी गांधीजींच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण झाली. योगायोग म्हणजे, त्यांचे वारसदार म्हणून ओळखले जाणारे आचार्य विनोबा भावे यांच्या जन्माचे हे १२५ वे वर्ष सुरू आहे. ही दोन्ही व्यक्तिमत्वे वेगळी असली, त्यांचा कार्यकाळ स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा असला, त्यांच्या कामाचे स्वरूप आणि धाटणी वेगळी असली; तरी जनमानसात ही दोन नावे एकत्रितपणे नांदतात.

विनोबांनी गांधीजींबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल, गांधीजींच्या नावे चालणाऱ्या कामांबद्दल; आपली मते, विचार, निरीक्षणे नोंदवलेली आहेत. ती समजून घेणे हा मानसिक आणि बौद्धिक असा दोन्ही खुराक आहे.

गांधीजी हे देशाचे राजकीय स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक विकास दोन्ही बरोबरच साधू पाहणारे महापुरुष होते, असे विनोबांचे मत होते. ७ जून १९१६ रोजी कोचरब आश्रमात त्यांनी सर्वप्रथम गांधीजींना पाहिले. आपण गांधीजींची पुष्कळ परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत ते कमी पडले नाहीत म्हणून आपण त्यांच्याजवळ टिकलो, असेही त्यांनी स्वच्छपणे सांगितले आहे. 'मी अपूर्ण आहे पूर्ण नाही असे गांधीजी नेहमी म्हणत. त्यांचे हे म्हणणे खरे होते,' असा विनोबांचा अभिप्राय आहे. विनोबांनी गांधींचे विभूतीकरण केलेले नाही हे विशेष.

गांधीजींबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणतात - '१९१६ मध्ये जेव्हा मी त्यांच्याजवळ पोहोचलो तेव्हा २१ वर्षाचा पोर होतो. जिज्ञासू मुलाची वृत्ती घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. सभ्यता, शिष्टता माझ्यात फारच कमी होती. मी जंगली प्राण्याप्रमाणे राहिलो आहे. माझ्यातील क्रोधाच्या ज्वालामुखीला आणि दुसऱ्या अनेक वासनांच्या वडवाग्निला शांत करणारे बापूच होते. आज मी जो काही आहे तो बापूंच्या आशीर्वादाचा चमत्कार आहे. त्यांनी माझ्यासारख्या असभ्य माणसाला सेवक बनवले.'

गांधीजींकडे आल्यानंतरची ३२ वर्षे व्यक्तिगत साधनेत गेली आणि त्या काळातील सर्व चिंतन मनन आध्यात्मिक होते, असेही विनोबांनी सांगितले आहे.

गांधीजींबद्दल अतीव श्रद्धा असली तरीही ते त्यांना भारताच्या महापुरुष मालिकेतून वेगळे काढत नाहीत. अनादि काळापासून आजवर झालेल्या महापुरुषांच्या मालिकेतील गांधीजी आहेत असाच त्यांचा अभिप्राय आहे. गांधीजी हा भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा आहे असे मत व्यक्त करताना विनोबा म्हणतात - प्राचीन परंपरेचे फळ आणि नवीन परंपरेचे बीज एकत्र घेऊन येणाऱ्या विरळा महापुरुषांपैकी गांधीजी होते.

धर्माचा प्रचार ही निराळी गोष्ट आहे आणि काळाची गरज ओळखून त्याच्याशी धर्मविचार जोडून देणे ही अगदी निराळी गोष्ट आहे. आंतरिक धर्मविचाराचे बळ आणि बाह्य परिस्थितीचे बळ या दोहोंना जोडून दाखवतो तो फक्त धर्मपुरुष किंवा सत्पुरुष राहत नाही तर युगपुरुष बनतो. गांधीजी तसे युगपुरुष होते, असे विनोबा म्हणतात. मनू आणि याज्ञवल्क्य या स्मृतिकारांच्या रांगेत त्यांनी गांधीजींना बसवले आहे. परंतु गांधीजी कर्मप्रधान होते हा त्यांच्यातील फरक असल्याचेही ते म्हणतात. शेक्सपिअर आणि मिल्टन यांचे जीवन त्यांच्या ग्रंथापेक्षा खुजे वाटते, तर गांधीजींचे जीवन मात्र त्यांच्या ग्रंथांपेक्षा अधिक उच्च व उन्नत वाटते, असाही विनोबांचा अभिप्राय आहे.

आपल्याला गांधीजी कसे दिसले हे सांगताना विनोबा म्हणतात - 'प्रत्येक जण त्यांना आपला जिवलग मानीत होता.  ते सामान्य माणसाबरोबर त्याच्या भूमिकेवर राहून बोलत. एखाद्याच्या पोटात दुखत असले तर गांधीजी इलाज सांगत. एखाद्या पती पत्नीमध्ये बेबनाव झाल्यास ती दोघे गांधीजींकडे सल्ला घ्यायला येत. आपल्या कामातून ते यासाठी वेळ काढत असत. मुलांना ते मुलांसारखेच वाटत. प्रत्येकाला हा आपल्या कुटुंबातील मनुष्य आहे असेच वाटत असे. त्यांच्यामध्ये पितृत्वाप्रमाणे मातृत्वही प्रकट होत असे. त्यांच्या सर्व गुणात त्यांची वत्सलता आणि करुणा मुख्य होती.' (क्रमशः)

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०१९

पं. नेहरूंचे गांधीजी- २

अलीपूर कारागृहात असतानाच्या आपल्या मनस्थितीचे वर्णन पं. नेहरूंनी आत्मकथेच्या अखेरी अखेरी केले आहे. ते लिहितात- `एप्रिल महिना उजाडला अलीपूर जेलमध्ये माझ्या कानावर आलेल्या अप्रिय बातम्यांमुळे माझे मनस्वास्थ्य बिघडून गेले होते. एके दिवशी तुरुंगाच्या सुपरींटेंडन्टनी सहजगत्या मला सांगितले की, गांधीजींनी कायदेभंग परत घेतला. इतकी वर्षे महत्वाची मानलेली चळवळ संपुष्टात आली हे ऐकून मनाला दु:ख झाले. तथापि, असा शेवट व्हावयाचा हे ठरलेलेच होते, अशी माझी मी समजूत काढली. त्यानंतर माझ्या हाती `स्टेट्समन' पडला व कायदेभंग थांबवताना गांधीजींनी केलेला खुलासा पाहिल्यावर माझे अंत:करण अंधारात खचत चालले आहे असे मला वाटले. कायदेभंग करण्यात गांधीजींनी यथोचित वर्तन केले असेच मला वाटले. पण त्यांनी जी कारणमीमांसा मांडली होती ती मात्र बुद्धीची अवहेलना करणारी होती. राष्ट्रीय चळवळीच्या पुढाऱ्यांनी असल्या तर्कशास्त्राचा अवलंब करावा ही विलक्षण गोष्ट होय.'

पुढे ते लिहितात- `गांधीजींच्या व माझ्यामध्ये अफाट दर्या पसरला आहे, असे मला वाटते. गेली कित्येक वर्षे ज्या स्नेहबंधनांनी मी त्यांच्याशी निगडीत होऊन गेलो होतो, ती तुटून जात आहेत असे वाटून अंत:करणात सुरी खुपसल्याप्रमाणे मला वेदना झाल्या. कित्येक वेळपर्यंत माझ्या मनात तुफान माजून राहिले होते. गेल्या एक-दोन वर्षात गांधीजींनी केलेल्या गोष्टी मला फारशा पसंत नव्हत्या. कायदेभंगाच्या चळवळीत आपले सहकारी गुंतले असता त्यांनी चालू केलेले उपवास व उत्पन्न केलेले नवे नवे प्रश्न, त्यांनी स्वत:च उपस्थित केलेल्या अनेक भानगडी व त्यामुळे त्यांच्यापुढे पडलेले विलक्षण पेच या सर्व गोष्टींच्या मी विरुद्ध होतो. मी थोडावेळ तुरुंगाबाहेर होतो. तेवढ्या वेळात हे सर्व भेद माझ्या पूर्णपणे लक्षात आले होते.'

`एकदम मनात विचार आला की, अलीपूरच्या तुरुंगात आपण एकाकी कोंडलेलो आहोत. मला सर्व जीवन असार व अरण्यवत भासू लागले. आतापर्यंत अनेक बिकट धडे मी गिरवले असतील; परंतु सर्वात बिकट व दु:खदायक असा धडा मला आता गिरवावयाचा होता. तो असा की, आपण दुसऱ्या कोणावरही विसंबून राहता कामा नये. आयुष्याच्या मार्गावर सोबतीची पर्वा न करता चालत राहिले पाहिजे. दुसऱ्यावर विसंबून राहिले म्हणजे निराशा व्हावयाचीच.'

`माझ्या अंत:करणातील हे वादळ ज्यांनी माजविले त्या गांधींची मला पुन्हा आठवण आली. गांधीजी म्हणजे किती असामान्य माणूस ! त्यांच्या स्वभावातील गोडी किती अनुपम, किती अनिवार्य, आणि जनमनावरील त्यांचे प्रभुत्व तरी किती सूक्ष्म पण गाढ ! त्यांच्या केवळ लेखांवरून आणि उक्तींवरून गांधीजींची खरी कल्पना येणार नाही. त्यापेक्षा कितीतरी पटींनी त्यांचे व्यक्तित्व मोठे आहे. त्यांनी केलेली हिंदुस्थानची सेवा तरी किती विशाल आहे बरे ! हिंदी जनतेत त्यांनी मनुष्यपणा निर्माण केला. धैर्याचा स्फुल्लिंग चेतवला. शिस्त व सहनशक्ती यांचे बीजारोपण केले आणि ध्येयासाठी हसतमुखाने त्याग करावयास आणि त्या त्यागाला अनुरूप असा विनय अंगी धारण करण्यासही त्यांनीच ना शिकविले? धैर्याच्या खंबीर पायावरच शीलसंवर्धन करता येईल असे ते म्हणत असत. ज्याच्यापाशी धैर्य नाही; त्याच्यापाशी नीती, धर्म, प्रेम- काहीही असणे शक्य नाही. मनावर भीतीचे दडपण असेल तर सत्य अथवा प्रेम यांची साथ फार काळपर्यंत करता येणार नाही. हिंसेबद्दल मनात आत्यंतिक तिटकारा असूनही `भ्याडपणा हा हिंसेपेक्षा देखील तिरस्करणीय आहे' असे ते म्हणत असत.'

`गांधीजी हिंदुस्थानचे अनन्यसाधारण असे प्रतिनिधी बनले. या पुरातन आणि हतदैवी देशाचे अंत:करणच त्यांच्या शब्दांवाटे प्रकट होत होते. गांधीजी म्हणजेच जणू काही हिंदुस्थान असे वाटावे. त्यांच्यातील उणीवादेखील हिंदुस्थानच्या राष्ट्रदेहातील उणीवा होत्या. त्यांचा अपमान झाला तर तो, गांधीजी या व्यक्तीचा नसून सर्व राष्ट्राचा झाला असे वाटत असे. व्हाईसरॉय वगैरेसारखे जे सद्गृहस्थ गांधीजींची नालस्ती करीत, त्यांना आपण सर्व राष्ट्राच्या हृदयाला सुया बोचीत आहोत याची जाणीव नसावी. परंतु आज गांधीजींचे धोरण, त्यांची देशसेवा, त्यांचे माझ्यावर झालेले अनंत उपकार याविषयी प्रश्नच नव्हता. या सर्व गोष्टी मान्य असल्या, तरीही इतर बाबतीत माणूस घोडचुका करणार नाही असे थोडेच आहे? त्यांचे ध्येय तरी कोणते? इतक्या वर्षांचा सहवास घडूनसुद्धा मला त्यांचे ध्येय स्पष्टपणे कळलेले नव्हते. त्यांना तरी स्वत:च्या ध्येयाची स्पष्ट कल्पना आलेली आहे की नाही, याची मला शंकाच वाटत होती.'

गांधीजी म्हणजे एक कोडे आहे, विसंगतीचे एक उदाहरण आहे. सर्वच असामान्य माणसे, मला वाटते अशी असतात. कित्येक वर्षे मला एक गूढ पडले आहे की, पददलित माणसांविषयी ज्याला इतके गाढ प्रेम व आस्था वाटते, त्याने पददलित वर्ग हमखास उत्पन्न करणाऱ्या व त्याला पिसून काढणाऱ्या समाजरचनेला पाठिंबा द्यावा हे कसे? अहिंसेचा जो एवढा मोठा कैवारी, त्यानेच निर्भेळ हिंसा व दडपशाही यावर आधारलेल्या सामाजिक व राजकीय संस्थांना मान्यता द्यावी, हा काय न्याय? स्वत:ला ते कधीकधी समाजवादी म्हणवतात. पण त्या शब्दाला त्यांच्या कोशात विशिष्ट अर्थ आहे. व्यवहारात समाजवाद या शब्दामुळे ज्या आर्थिक घटनेचा बोध होतो, तो त्यांच्या व्याख्येत बसत नाही. त्याच्या मागोमाग बऱ्याच प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्या शब्दाचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांच्या तोंडी असणाऱ्या समाजवादाचा `भूतदयावादाचे कडबोळे' एवढाच अर्थ करता येईल.'

`दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींच्या मनात कल्पनातीत स्थित्यंतरे घडून आली व त्या योगाने प्रचंड विचारमंथन होऊन त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन पार पालटून गेला. तेव्हापासून एका ठाम विचारसरणीच्या स्थिर पायावर त्यांच्या कल्पनांना अधिष्ठान सापडले असून गांधीजींच्या विचारात आता स्थित्यंतराला वाव उरलेला नाही. हिंसाकर्माशी निगडीत झालेल्या समाजवादाविषयी व विशेषत: मार्क्सवादाविषयी त्यांचे मन साफ नाही. कलह व हिंसा यांचा भपकारा वर्गकलह या शब्दातून येत असल्याने त्यांना तो शब्ददेखील त्याज्य वाटतो. जनतेच्या राहणीचे मान काही एका किमान दर्जापलीकडे जावे अशी त्यांची मुळीच इच्छा नाही. काही मूठभर सुखासीन लोक विषयकर्दमात लोळत आहेत तेवढे पुरे; त्यांची संख्या वाढवून परिस्थिती अधिकच बिघडविण्यात काय हशील? विशिष्ट मर्यादेपलीकडे सुखसाधनांची वाढ व्हावी याविषयी ते उत्सुक नसल्याने समाजवाद जे चित्र रेखाटतो, ते त्यांना यत्किंचितही विलोभनीय वाटत नाही. मग भांडवलशाही अंशत: तरी का मान्य करावयाची? वास्तविक त्यांना दोन्ही पद्धतींबद्दल तिटकाराच आहे. परंतु भांडवलशाही सध्या प्रत्यक्ष विद्यमान आहे म्हणून, तिच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही म्हणून व सपशेल उपासमारीपेक्षा ती जरा बरी म्हणून, ते भांडवलशाहीला मान्यता देतात इतकेच.'

`आत्यंतिक सुख व स्वास्थ्य मिळविणे हे ध्येय न मानता, लोकांनी जीवन अधिक नीतीमय करावे, दुराचरणाचा त्याग करावा, चैन सोडावी आणि अशा रीतीने स्वत:ची आत्मोन्नती साधित जावे, अशी त्यांची इच्छा आहे. ज्या कोणाला जनतेची सेवा करावी असे वाटत असेल त्याने जनतेची आर्थिक उन्नती साधणे हेच आपले मुख्य काम आहे असे न समजता स्वत:च्या राहणीचे मान कमी करून सामान्य जनांच्या पायरीवर यावे व त्यांच्याशी मिसळावे. खरी लोकशाही ती हीच, असे त्यांचे मत असल्याचे १७ सप्टेंबर १९३४ रोजी गांधीजींनी काढलेल्या जाहीर पत्रकावरून दिसून येईल.'

`ही दृष्टी बहुधा पुरातन काळाशी संलग्न झालेली आढळते. त्या काळाची परिस्थिती बदलून स्वप्नातही कधी कल्पना आली नसेल इतकी साधनसंपत्ती मानवजातीच्या हाती आता जमा झाली असली, तरी आमच्या मनाभोवती पडलेले भूतकाळाचे पाश अद्यापि ढिले झालेले नाहीत. दुसरे ज्याला `तमोयुग' म्हणतात तेच आपले `कृतयुग' अशी समजूत करून घेऊन कॅथॉलिक लोक मध्ययुगीन काळाकडे माना मुरडून पाहत आहेत. `इस्लामी लोकशाही'चे युग पहिल्या खलिफाच्या सदा विजयी राजवटीत होऊन गेले म्हणून मुसलमानांची दृष्टी त्या जमान्यावर खिळून राहिली आहे व वैदिक काळ आणि रामराज्य यांची स्वप्ने हिंदू लोक या घडीला पाहत आहेत. इतिहास मात्र कानाशी ओरडून सांगतो आहे की, त्या सुवर्णयुगात अन्नवस्त्रादी अत्यावश्यक गोष्टीदेखील जनतेला मिळत नसत. लोकांना फाके मारावे लागत. शिखरावरच्या मूठभर लोकांनी अत्यानंद चाखला असेल; कारण आत्मिक विलास उपभोगण्यासाठी आवश्यक ती साधने व स्वास्थ्य त्यांना लाभत होते. पण इतरांची दशा पुसाल तर उदरभरणासाठी घाम शिंपित राहण्यापलीकडे त्यांनी काही केले असेल अशी कल्पनासुद्धा करवत नाही. उपाशी पोटाला संस्कृती कसली आणि वेदांत कसला? पोटाला गोळाभर अन्न कसे मिळवायचे या विवंचनेतच ते निमग्न असणार.'

व्यक्तीची मानसिक, नैतिक व आध्यात्मिक उन्नती करून त्याद्वारे परिस्थितीत बदल करावा, असे गांधीजींना वाटते. दुराचरणाचा व भोगलोलुपतेचा मार्ग वर्जून लोकांनी शुद्ध व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. मद्यपान, धुम्रपान इत्यादी व्यसने सोडा, कामवासनेचे दमन करा, असा त्यांचा आग्रहाचा उपदेश आहे. पण माणसाची लुटारू वृत्ती उतावी, मातावी आणि ती स्वैर सुटावी अशीच सध्याची समाजव्यवस्था आहे. त्यात मनुष्याच्या अधम वृत्ती `गवता ऐशा उदंड' पोसतात हेही तितकेच खरे आहे. दुसऱ्याला जमिनीवर लोळवून जो त्या मुडद्यांच्या उंच राशीवर उभा राहील तो यशवंत ठरतो. असल्या आकांक्षा व असल्या भावना समाजात जोपासल्या जात असता व शिखरावरची माणसे त्यांच्या संमोहनाला बळी पडत असता, नीतिमान मानव निर्माण करण्याचे आपले ध्येय जयास जाईल असे गांधीजींना वाटते तरी कसे?'

अलीपूर कारागृहातील मनस्थितीचे हे लांबलचक विवरण खूप गोष्टी स्पष्ट करणारे आहे. गांधीजींच्या संबंधात नेहरूंचे मत जसे यातून स्पष्ट होते; त्याप्रमाणेच- भारतीय संस्कृती, समाजव्यवस्था, चिंतन याबद्दलची त्यांची प्रतिकूल मते; पाश्चात्य धार्जीणेपणा; मार्क्सवादी हिंसेला नसलेला विरोध; मात्र भारतीय आत्मरक्षेसाठी बळाच्या वापरला असलेला विरोध; गांधीजींना वर्गसंघर्ष शब्द चालत नाही यावर तक्रार पण आपल्याला रामराज्य शब्द चालत नाही यातील विसंगती; या साऱ्याचेही दर्शन होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे समाजात वाईट गोष्टींची चलती आहे म्हणूनच माणूस घडवण्याची गरज आहे, समाजात वाईट गोष्टींची चलती नसती तर माणूस घडवण्याची गरजच पडली नसती; या अतिशय साध्या आणि मुलभूत मुद्याविषयीची नेहरूंची भोंगळ संभ्रमावस्था; या साऱ्यावर पं. नेहरूंचे हे गांधीजी विषयक कथन प्रखर प्रकाश टाकते.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, १५ नोव्हेंबर २०१४

थोडे वेगळे

झोपेतून उठलो. किती वाजले म्हणून फोन पाहिला तर ३-४ मेसेजेस. आश्चर्य वाटलं. पाहिलं तर मेसेजेस india mart चे. मी काहीही न करताच माझा पासवर्ड इत्यादी आलेले. दिवसाची सुरुवात झाली तेवढ्यात एक फोन- `सर आपने फर्निचर का ऑर्डर दिया था.' त्याला तोडत म्हटले- `नाही, मी ऑर्डर दिली नाही.' फोन बंद केला. त्यानंतरही दोन फोन. अखेर खडसावलं. तेव्हा ब्याद गेली. ज्या कंपनीचे सीम आहे त्या कंपनीचे तीन चार मेसेजेस - why worry about cash. use this and that. pls download.

cashless economy चा विचार करताना याचाही विचार व्हायला हवा. प्रगती हवी तर हा त्रास सहन करायलाच हवा किंवा या त्रासावर हे १० उपाय आहेत, अशासारखे सल्ले `शहाणपण' या सदरात मोडणार नाहीत. हां ज्यांना त्यात आनंद वाटतो त्यांनी जरूर ते करावे, पण आमच्या कल्पनाचित्रातील जग साकारायचे असल्याने तुम्ही त्रास सहन करायलाच हवा हे म्हणणे योग्य नाही. पैसा, खरेदी-विक्री, वादावादी, भांडणे अन ती सोडवणे, कायदा अन त्याची कलमे तोंडी लावत जगणे, भौतिक आणि लौकिक गोष्टीतच ज्यांना जीवन घालवायचे त्यांनी घालवावे पण सगळ्यांनी तसेच जगावे हा दुराग्रह चुकीचा.

@@@@@@@@@@@@@@@

थोडे unaccounted money बद्दल...

कालच गुरु नानक जयंती झाली. त्यांच्याबद्दल असं सांगतात की, आपल्या उदासीन मुलाने व्यापार करावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना काही पैसे दिले आणि व्यापार करण्यास सांगितले. नानकदेवांनी ते पैसे गोरगरिबांना वाटून टाकले. एका अर्थी हा आर्थिक गुन्हाच म्हणायला हवा. मात्र त्याने नुकसान झाले नाही. उलट गरीबांचा तर फायदा झालाच पण जगाला नानक देव लाभले. गेल्या अनेक दशकात गोळा झालेल्या काळ्या पैशाने आतंक, दहशतवाद, अमली पदार्थांचा विळखा, नक्षलवाद इत्यादी समस्या अक्राळविक्राळ झाल्या यात वादच नाही. परंतु त्याच्या नावावर काही सकारात्मक गोष्टीही आहेत हे विसरायला नको. राजकारणात अमाप काळा पैसा आहे. त्याचे असंख्य दुष्परिणाम आहेतच. पण, त्या काळ्या पैशाने लाखो लोकांचे भरणपोषण केले आहे, लाखो लोकांना दहा-वीस रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत मदतही केली आहे. अनेकांची आजारपणे, अनेकांची महागडी ऑपरेशन्स या unaccounted money तून झाली आहेत. अनेक मुलींचे संसार सुरु झाले आहेत. अनेकांची शिक्षणे झाली आहेत. असंख्य सामाजिक, सांस्कृतिक संस्था उभ्या झाल्या आणि चालल्या आहेत. देवस्थानांजवळ असलेल्या unaccounted money तून लाखो लोकांची पोटे भरत असतात. त्यात अनेक गरजूही असतात. या गरजूंची पोटे भरायची म्हटल्यास सरकारला किती अन काय काय करावे लागेल? या अन्नछ्त्रांसाठी लागणारे सामान आणि माणसे यांचे केवढे अर्थकारण चालते. गृहिणींच्या हाती असलेल्या, डब्यात लपवलेल्या पैशातून घरात आलेली अडचण कळतही नाही आणि सुटून जाते. आपल्या समाजाच्या या सवयीमुळेच जागतिक मंदी आमच्यासाठी फार महत्वाची ठरली नाही. parallel economy मुळेच समाजाला फार प्रश्न पडलेही नाहीत. unaccounted money, parallel economy ही पूर्णत: वाईट, कुचकामाची आणि चिरडून टाकण्याच्या लायकीची हा विचार एका टोकाचा आहे.

मात्र, या unaccounted money चा अतिरेक झाला आणि अधूनमधून त्याच्या नाड्या आवळल्या नाहीत तर ते सगळ्याच दृष्टीने घातक ठरते. त्यासाठी cautious and prudent अप्रोच हवा. अर्थव्यवस्था cashless असो की रोखीची, मोठ्या नोटा असोत वा लहान, unaccounted money जनरेट होतच असतो. कारण ती समाजाची गरजही असते. अर्थव्यवस्थेचीही गरज असते. वेळोवेळी आढावा आणि छोटेमोठे उपाय करून त्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते, करायला हवे. रिझर्व्ह बँक करीत असलेले cash reserve ratio सारखे उपाय याचाच भाग असतात. मोठ्या नोटा रद्द करण्याचा ताजा निर्णय असाच एक उपाय आहे. ती जादूची कांडी नाही. अर्थात हा उपाय वेगळ्या पद्धतीने करता आला असता. तो perception चा भाग आहे. मात्र हा उपाय वेगळ्या पद्धतीने करता आला असता असे कोणी म्हटले तर त्याकडे संशयाने पाहण्याचे कारण नाही. खुद्द स्टेट बँक ऑफ इंडिया या सगळ्यात मोठ्या बँकेने याच वर्षी एप्रिल महिन्यात सादर केलेल्या एका अहवालात याची चर्चा केली होती.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

आज एका अर्थवाहिनीचा एक कार्यक्रम झाला. `अर्थकारणात महिलांचे स्थान' हा त्याचा विषय. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या त्याला उपस्थित होत्या. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी भारतीय कुटुंब व्यवस्थेचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या- आपल्या आजी पणजी कोणाला न कळता पैसा वाचवून ठेवत. कशासाठी? कोणाची तब्येत बिघडली, धान्य किराणा आणायला पैसा नसला इत्यादी कारणांसाठी. त्या स्वत:साठी पैसा जमवत नसत. येथपर्यंत सगळे ठीक होते पण नंतरचे वाक्य जे स्मृती इराणी बोलल्या ते योग्य म्हणता येणार नाही. त्या म्हणाल्या- आता महिलांनी आपल्यासाठी पैशाचा विचार केला पाहिजे. ज्या भारतीय कौटुंबिक मूल्यांचा आपण गौरवाने उल्लेख करतो आणि सगळे जग ज्या कौटुंबिक मूल्यांसाठी भारताचे उदाहरण देतात त्या कौटुंबिक मूल्यांनाच हे छेद देणे आहे. स्वत:चा विचार न केल्यामुळे आपल्या महिलावर्गाला त्रास सोसावा लागला यात वाद नाही. पण त्यावरचा उपाय त्यांनी स्वार्थाचा विचार करणे हा नसून बाकीच्यांनी त्यांचा विचार करणे हा आहे. प्रत्येकाला स्वत:चा विचार करायला शिकवून जगाचं सोडा स्वत:चं देखील भलं होणं कठीण. आज जबाबदार म्हणवणारे लोक आणि एकूणच विचारप्रवाह अधिकृतपणे स्वार्थी होण्याचा उपदेश देत असतील तर पुढील ५० वर्षात जगाचं वाटोळं झालेलं असेल.

कुटुंब कसं असतं? जिथे कायदे आणि नियम नाहीत, पण जबाबदारी आहे. जिथे शिक्षा वगैरे नाही स्नेहाचं बंधन आहे. जिथे वागणे, बोलणे, खाणे, पिणे, सवयी कशाचेही साचे नाहीत आणि तरीही कुटुंब एक युनिट आहे. तिथे किती जवळ यायचं यालाही बंधन नाही, किती दूर जायचं यालाही बंधन नाही. तरीही ते तुटत नाही. कुटुंब हे समाजाचं प्राथमिक स्वरूप आहे आणि `वसुधैव कुटुंबकम' ही आमची आकांक्षा आहे. आजच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी, किरकोळ गोष्टी, आधुनिक म्हणून स्वीकारल्या जाणाऱ्या गोष्टी यांचा विचार, यांची चिकित्सा, यांचे विश्लेषण या भूमिकेतून व्हायला हवं. तरंच काही आशा बाळगता येईल.

@@@@@@@@@@@@@

पुराणमित्येव् न साधु सर्वम्

नचापि काव्यम् नवमेतवद्यम

सन्त: परिक्षान्यतरद भजन्ति

मूढ: परप्रत्ययनेन बुद्धिः ......... (कालिदास)

जुनं ते सगळं योग्य असं नाही. नवीन ते सर्व कल्याणकारी असंही नाही. संत सारासार विचार करतात. मूर्ख लोक दुसऱ्याचे अनुकरण करतात.

सध्या इतकंच.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १५ नोव्हेंबर २०१६

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

पं. नेहरूंचे गांधीजी- १

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अल्मोड्याच्या जिल्हा कारागृहात आपली आत्मकथा १४ फेब्रुवारी १९३५ रोजी लिहून पूर्ण केली. त्यावेळी ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्या या आत्मकथेत महात्मा गांधी यांच्याबद्दल देखील त्यांनी स्वाभाविकपणेच लिहिले आहे. १९१९ साली काँग्रेसचे अधिवेशन अमृतसर शहरात भरले होते. त्याचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते. १९१९ काँग्रेस ही पहिली गांधी-काँग्रेस होती, असे मत नेहरूंनी आत्मकथेत मांडले आहे. त्या अधिवेशनाला लोकमान्य उपस्थित होते तरीही लोकांचा ओढा आणि कल गांधीजींकडे होता. त्यानंतर १९२० च्या १ ऑगस्टला लोकमान्यांचे निधन झाल्यावर गांधीजींसोबत आपणही मुंबईला गेलो होतो असे नेहरूंनी लिहिले आहे.

आपले वडील मोतीलाल नेहरू आणि गांधीजी यांच्या संबंधांबद्दल नेहरूंनी लिहिले आहे- `गांधीजींबद्दल त्यांना (वडिलांना) वैयक्तिक आकर्षणही वाटत होते. परंतु ही जोडी पाहून नवल वाटण्यासारखे होते. एक संत, विलास परान्मुख, धर्मनिष्ठ, आयुष्यातील शारीरिक व इंद्रीयजन्य सुखांचा त्याग करणारा; तर दुसरा विलासी, जीवनातील अनेकविध सुखांचा आस्वाद घेण्यात तत्पर व इहलोकीच्या अस्तित्वानंतरच्या गोष्टींबद्दल बेफिकीर ! मानस पृथक्करणाच्या भाषेत सांगायचे तर अंतर्मुख व बहिर्मुख व्यक्तींची ही युती झालेली होती. भेद असूनही सामान्य आशाबंधांनी दोघेही निगडीत झाले होते. दोघांचे राजकीय पंथ भिन्न झाल्यावरदेखील त्यांच्यातील स्नेहबंध दृढ राहिला.' गांधीजी व मोतीलाल नेहरू यांचे राजकीय पंथ भिन्न झाल्याचे जवाहरलाल यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

काँग्रेसमध्ये गांधीयुग सुरु झाल्याने काय फरक पडला याचे सुंदर वर्णनही या आत्मकथेत करण्यात आले आहे. जवाहरलालजी म्हणतात- `कोलकाताच्या अधिवेशनापासून काँग्रेसच्या राजकारणात गांधीयुगाला प्रारंभ झाला व ते युग अद्यापि चालू आहे. गांधीयुगापासून काँग्रेसचे स्वरूप अजिबात पालटले. युरोपियन पोशाख गेला व त्याच्या जागी खादीची वस्त्रे आली. काँग्रेसमध्ये कनिष्ठ, मध्यमवर्गीय प्रतिनिधींचा भरणा झाला. अधिवेशनात हिंदुस्थानी भाषा अधिकाधिक प्रचारात येउन काँग्रेस अधिवेशनात नवे चैतन्य, नवा उत्साह व नवी कळकळ दृष्टीस पडू लागली.'

काल काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या नेहरू जयंती कार्यक्रमात पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी इंग्रजीला दुय्यम स्थान देत असल्याची तक्रार केली. त्या संदर्भात पं. नेहरू यांच्या वरील लिखाणाचा संदर्भ महत्वाचा ठरावा. पूर्वी गांधीजी व नेहरू असा संघर्ष होता आणि आता मोदी व राहुल असा संघर्ष आहे. महात्मा गांधीजींच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे सहज लक्षात येणारे आहे. तरीही `गांधी-नेहरू विचारधारा' असाच शब्दप्रयोग होत राहणार असेल तर कठीण आहे.

गांधीजींनी सुरु केलेल्या खिलाफत चळवळीच्या संदर्भात आपल्या आत्मकथेत लिहिताना पं. नेहरू म्हणतात- `खिलाफतीच्या चळवळीला प्रामुख्य देण्यात आल्यामुळे पुष्कळ मौलवींनी व मुसलमानांच्या धार्मिक पुढाऱ्यांनी चळवळीत भाग घेतला होता. त्यामुळे चळवळीला थोडेसे धार्मिक वळण लागले. चळवळीच्या धार्मिक व आध्यात्मिक बाजूवर गांधीजी नेहमीच भर देत असत. त्यांच्या धर्मात कडवेपणा अथवा असहिष्णुता नव्हती, परंतु जीवनाकडे धार्मिक दृष्टीने पाहण्याची शिकवणूक त्यापासून मिळत असे. त्याचा परिणाम चळवळीवर फार झाला. जनसमुदायात तरी निदान, चळवळीला धार्मिक पुनरुज्जीवनाच्या चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. बहुतेक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या नेतृत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत व ते गांधीजी बोलतील तसे बोलत असत.'

यासंबंधात आपल्याला काय वाटत होते हेदेखील पं. नेहरूंनी अतिशय स्पष्ट शब्दात नमूद केले आहे. ते लिहितात- `हिंदू व मुसलमान समाजात वाढीस लागलेल्या या भावनांकडे पाहून मला थोडीशी काळजीच वाटत असे. मला ही गोष्ट बिलकुल पसंत नव्हती. जाहीर सभातून हे मौलवी, मौलाना आणि स्वामी जे विचार प्रदर्शित करीत ते फार प्रतिगामी स्वरूपाचे असत. समाजशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास याबद्दलच त्यांचे ज्ञान इथून तिथून चुकीचे वाटत होते. प्रत्येक गोष्टीला धर्माची फोडणी दिल्यामुळे स्पष्टपणे विचार करणे अशक्य होऊन बसे. गांधीजींचे काही काही शब्दही कर्णकटू वाटत. उदा.- `रामराज्य' हा त्यांचा नेहमी येणारा शब्द घ्या. पण त्यांना थोपवण्याची शक्ती माझ्यात नव्हती. शब्द रूढ आणि जनतेला ज्ञात आहेत म्हणून गांधीजी ते वापरीत असतील, असे स्वत:चे समाधान मी करून घेत होतो. कारण लोकांची अंत:करणे काबीज करण्याची कला त्यांना पूर्णपणे अवगत होती. त्यांची भाषा उलगडणे मुष्किलीचे होई. पण ते थोर असामान्य पुरुष आहेत, विजयी सेनानी आहेत, एवढी गोष्ट आम्हाला समजण्याइतके त्यांच्याविषयीचे ज्ञान आम्हाला होऊन चुकले होते. त्या काळापुरता तरी आम्ही त्यांच्या हाती कोरा चेक दिला होता. त्यांच्या लहरी व त्यांचे छंद याबद्दल आपसात चर्चा सुरु झाली की आम्ही अर्धवट थट्टेने म्हणत असू की, स्वराज्य मिळाल्यावर मात्र या प्रकारांना पायबंद घातलाच पाहिजे !' स्वत: पं. नेहरूंच्या या लिखाणावर वेगळी टिप्पणी करण्याची गरज नाही. `रामराज्य' हा शब्दही कर्णकटू वाटणारे पं. नेहरू सगळ्यांबद्दल सहानुभूती ठेवणारे कसे काय असू शकतील?

गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. त्याबद्दल पं. नेहरू लिहितात- `१९२२ च्या सुरुवातीला यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणे सर्वच देखावा पालटला. तुरुंगात आम्हाला कळले की, गांधीजींनी चळवळीचे सर्व चढाऊ कार्यक्रम बंद केले असून कायदेभंगाची चळवळ थांबविली आहे. ती बातमी ऐकून आम्ही थक्क झालो, गोंधळून गेलो. वृत्तपत्रात बातमी वाचली की, चौरीचौरा नावाच्या गावी खेडुतांच्या जमावाने पोलिसांचा प्रतिकार करण्याच्या उदेशाने पोलिसांसकट चौकीला आग लावून दिली आणि त्यामुळे सहासात पोलिस जळून मेले. काही आठवडे गेल्यावर सरकारने गांधीजींना पकडून त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावली. १९२२ मध्ये कायदेभंग बंद केला ही गोष्ट योग्य झाली असली, तरी फार मोठ्या चळवळीचा कासरा ताणून ती एकाएकी थांबविल्यामुळे देशात घातुक मनोवृत्तींची वाढ झाली असण्याचा संभव आहे. राजकीय क्षेत्रात व्यक्त होणारी निष्फळ व पांगलेली हिंसावृत्ती मावळली, पण व्यक्त होण्यासाठी कोठे तरी ती अवकाश शोधीत होतीच. त्यामुळे नंतरच्या काळात जातीय तंटे विकोपास गेले असावेत.'

आपल्या आत्मकथेत एका ठिकाणी गांधीजींबद्दल ते लिहितात- `मनुष्यनिर्मित वस्तूंमधील सौंदर्य अथवा कला पारखण्याची शक्ती गांधीजींच्या अंगी फारच थोडी होती. नैसर्गिक सौंदर्याचे मात्र ते कौतुक करीत. ताजमहाल म्हणजे जबरदस्तीने राबविण्यात आलेल्या मजुरांच्या घामाचे घनीभूत स्वरूप. याहून त्याची मातब्बरी नाही, असे त्यांना वाटे. त्यांची सुवासाबद्दलची अभिरुचीही माफक असे. तथापि जीवनकलेचे तंत्र त्यांनी आपल्या परीने हुडकून काढले होते व आपल्या जीवनाला एखाद्या कलाकृतीची प्रमाणबद्धताही प्राप्त करून दिली होती. त्यांची प्रत्येक हालचाल अर्थपूर्ण व निर्दोष अशी असे. त्यात एक विशिष्ट चारुता प्रत्ययास येई. खडबडीतपणाचा, तीक्ष्णपणाचा, लवलेशही त्यांच्यापाशी नव्हता. मध्यमवर्गात भरपेट सापडणाऱ्या हीन व सवंग अभिरुचीचा मागमूसही त्यांच्या अंगी दिसत नसे. मन:शांतीचा जो दिवा त्यांना गवसला, त्याच्या दिव्य तेजाची पखरण त्यांनी इतरांवर केली व त्याच्या उजेडाने उजळलेल्या आयुष्याच्या नागमोडी मार्गावर मोठ्या निश्चयाने व निर्भयतेने ते आपली पावले टाकीत राहिले.'

१९२४ साली गांधीजी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याबद्दल नेहरू लिहितात- `१९२४ च्या डिसेंबरात बेळगाव येथे जे काँग्रेस अधिवेशन भरले त्याचे गांधीजी अध्यक्ष होते. गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे महाध्यक्ष बनून राहिलेल्या गांधीजींना काँग्रेसचे अध्यक्ष करणे म्हणजे थोडा विडंबनाचाच प्रकार होता ! त्यांचे अध्यक्षीय भाषण मला आवडले नाही. मला ते मुळीच स्फूर्तीदायक वाटले नाही. गांधीजींनी सांगितल्यावरून नव्या वर्षासाठी काँग्रेस कमिटीच्या चिटणीसाच्या जागी माझी निवड झाली. मी म्हणजे काँग्रेसचा मिराशी चिटणीस बनत चाललो होतो ! माझ्या इच्छेची कोणी पर्वाच करीत नसे !'

१९३३ च्या राजकारणाबद्दल लिहिताना पं. नेहरू लिहितात- `मुंबईमध्ये तुरुंगातून नुकतेच सुटून आलेले काही मित्र व सहकारी मला भेटले. समाजवादी तत्वांचा प्रभाव येथे बऱ्याच प्रमाणात दिसून आला. काँग्रेसमधील पुढाऱ्यांच्या काही कृत्यांबद्दल त्यांच्यामध्ये बराचसा असंतोषही पसरलेला दिसत होता. राजकारणाकडे पाहण्याच्या गांधीजींच्या आध्यात्मिक दृष्टीकोनावरही त्यांनी सडेतोड टीका केली. टिकेपैकी बराचसा भाग मलासुद्धा मान्य होता.'

आपल्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका गांधीजींना आवडल्या नव्हत्या हे सांगताना पं. नेहरू आत्मकथेत लिहितात- `विवाहाच्या छोट्या निमंत्रण पत्रिका हिंदुस्थानी भाषेत छापून घेतल्या होत्या. पण लिपी मात्र रोमन होती. ही एक नवलपरीचीच गोष्ट झाली. हिंदी भाषा रोमन लिपीत लिहिण्याची पद्धत सैन्यात व मिशनच्या संस्थांमधून तेवढी प्रचलित आहे. मी हा प्रयोग म्हणून करून पाहिला. अनुकूल- प्रतिकूल दोन्ही प्रकारची मते मला ऐकावयाला मिळाली. पण बहुसंख्य लोक प्रतिकूलच दिसले. माझी कल्पना गांधीजींना पसंत पडली नाही. संपन्न परंपरेच्या कोणत्याही भाषेची लिपी बदलणे म्हणजे मर्मस्थानाची शस्त्रक्रिया करण्यासारखे आहे. साहित्यात लिपीला अत्यंत जिव्हाळ्याचे स्थान प्राप्त झालेले असते. लिपी बदलली की शब्दांचे निराळेच स्वरूप आपल्यापुढे उभे राहून त्यातून निराळ्याच ध्वनींची व कल्पनांची निर्मिती होऊ लागते. अशा परिस्थितीत जुनी लिपी काढून टाकणे हे अंगावरील कातडी सोलून काढण्यासारखे मोठे क्रूर कर्म होईल. नव्या लिपीमुळे देशातील शैक्षणिक प्रगतीलासुद्धा पायबंद बसण्याचा संभव आहे.' नेहरूंच्या या कथनाला अनुसरून असे म्हणण्यास वाव आहे की, श्रीमती सोनिया गांधी यांची रोमन लिपीत लिहिली जाणारी हिंदी भाषणे गांधीजींना खचितच आवडली नसती.

१९३० च्या दशकाच्या सुरुवातीला आपण समाजवादाकडे वळू लागलो होतो आणि काँग्रेसमधील पुष्कळ सहकाऱ्यांना समाजवाद मान्य नव्हता, असे सांगून नेहरू लिहितात- `डिसेंबरअखेर गांधीजींनी मद्रासहून मला पत्र पाठवले. तेव्हादेखील हीच अडचण पुन्हा उपस्थित झाली. `मद्रास मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या मुलाखतीचे कात्रण त्यांनी मजकडे पाठविले होते. बातमीदाराने मजविषयी प्रश्न टाकला असता त्यांनी माझ्या कार्याबद्दल जवळजवळ दिलगिरी व्यक्त करणारे उद्गार काढले होते व काँग्रेसच्या नावाने मी या नव्या विचारसरणीचा प्रचार करणार नाही, असा माझ्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वासही प्रकट केला होता. माझ्याबद्दलचा हा उल्लेख तर मला पसंत पडला नाहीच पण जमीनदारी पद्धतीचे त्यांनी जे समर्थन पुढे मांडले होते, ते वाचून माझे डोके बरेच गरम झाले. ती पद्धती म्हणजे राष्ट्राच्या व शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचे एक इष्ट अंग आहे, असे त्यांना वाटत असल्याचे पाहून मी थक्कच झालो. कारण पुरेसा मोबदला मिळून या पद्धतीची इतिश्री झाली तर ती खुद्द जमीनदार- तालुकदारांनाही हवी आहे. तथापि गांधीजींना मात्र ती पद्धती इष्टच वाटत होती आणि निधीधारकत्व वगैरेसंबंधी आपले विचार ते अद्यापि बोलून दाखवीतच होते. माझ्या-त्यांच्या दृष्टीकोनात केवढा हा मतभेद? भविष्यकाळी त्यांच्याबरोबर आपण कसे सहकार्य करणार, असे विचार माझ्या मनात आले.' श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात राज्यघटनेत समाविष्ट केलेला समाजवाद नेहरूंच्या विचारांशी जुळणारा नक्कीच आहे, पण मग गांधीजींचे काय? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसने देणे आवश्यक आहे.

बिहारमध्ये झालेला मोठा भूकंप म्हणजे अस्पृश्यतेच्या पापाबद्दल ईश्वराने दिलेली शिक्षा आहे, असे उद्गार गांधीजींनी काढले होते. त्यांचे हे विधान आपल्याला मुळीच पटले नव्हते व ते वाचून आपली मती गुंग होऊन गेली होती, असेही नेहरूंनी आत्मकथेत नमूद केले आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०१४

सहिष्णुता अन रा. स्व. संघ - १

सहिष्णुता...! व्यक्तीजीवनात किंवा सामाजिक जीवनात आवश्यक असलेली मुलभूत अशी बाब. पण तिचेही राजकारण होऊ शकते हे भारतीय जनतेने आणि जगानेही नुकतेच अनुभवले. अपघात, वादळ, भूकंप हे जसे संबंधित आणि संबंधित नसलेले दोघांनाही फटका देतात, तसेच राजकारणाचे असल्याने त्यात संबंधित असलेले अन नसलेले सगळे भरडले जातात. सहिष्णुतेचे जे राजकारण नुकतेच झाले त्यात रा.स्व. संघाला उगाचच सोसावे लागले. अर्थात रा.स्व. संघाला यात नवीन काही नाही. असे सोसणे त्याच्या जणू पाचवीलाच पूजले आहे. तो स्वतंत्र विषय आहे. पण सहिष्णुतेच्या संदर्भात संघाचा इतिहास काय सांगतो?

१९२५ च्या विजयादशमीला रा.स्व. संघाची स्थापना करतानाच संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी सांगितले होते- `सर्वेषां अविरोधेन' असे संघाचे काम आहे. ते कोणाच्याही विरोधातले काम नाही. अमुक समस्या आहे, तमुक समस्या आहे म्हणून संघाचे काम नाही. किंवा अमक्याचा किंवा तमक्याचा विरोध करण्यासाठी संघाचे काम नाही. तर आपले दोष दूर करणे, आपल्या त्रुटी दूर करणे, आपला दुबळेपणा दूर करणे, लाचारी दूर करणे, पुरुषार्थी बनणे; अन हे करून स्वत: चांगले जीवन जगून जगाला आदर्श जीवन जगण्यासाठी जी करता येईल ती मदत करणे. जगासाठी स्वत:ला संपवून टाकणे किंवा स्वत:साठी जगाला संपवून टाकणे हे दोन्हीही त्या विचारात न बसणारे. अशा रीतीने संघाच्या स्थापनेपासूनच संघाचा सहिष्णुतेचा इतिहास सुरु झाला. तो आजतागायत सुरु आहे.

रा. स्व. संघावर पहिला मोठा आघात झाला तो स्वातंत्र्यानंतर काहीच महिन्यात. महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा. त्या सबंध पर्वत संघाने जी सहिष्णुता दाखविली त्याला तोड नाही. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली. ३१ जानेवारीला त्यांचा अंत्यसंस्कार झाला अन त्याच दिवशी रात्रीपासून संघाला चिरडून टाकण्याचे उपद्व्याप सुरु झाले. नागपुरात रा. स्व. संघाचे महाल भागातील मुख्यालय, रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार यांची समाधी आणि सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे नागोबा गल्लीतील निवासस्थान यांच्यावर शेकडो लोक चालून आले. गुरुजींच्या घराच्या संरक्षणाची व्यवस्था बाळासाहेब देवरस जातीने पाहत होते. मुख्यालयाची सुरक्षा पंडित बच्छराजजी व्यास यांच्याकडे होती. डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांकडे होती. जमावाच्या हल्ल्यात समाधी उद्ध्वस्त झाली. तिथे मोकळे मैदान असल्याने हल्लेखोरांना फारसे कठीण गेले नाही. गुरुजींचे घर त्याच्या अडचणीच्या जागेमुळे हल्लेखोरांच्या तडाख्यातून वाचले. मुख्यालयात थोडी हाणामारी झाली. काही जणांना जखमाही झाल्या. पण सुदैवाने पोलीस आले. त्यांनी मुख्यालयाला वेढा घातला आणि फार मोठा अनर्थ टळला.

१ फेब्रुवारी १९४८ तणावात गेला. संध्याकाळी गुरुजींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिटणीस पार्कमध्ये जंगी सभा भरली. त्यात संघावर गरळ ओकणारी आणि चिथावणीखोर भाषणे झाली. तेथे असलेला हजारोंचा जमाव त्याने बिथरला. तरीही घराची रचना आणि पोलिसांचा घरावरील पहारा यामुळे अनुचित काही घडले नाही. त्याच दिवशी रात्री, म्हणजे २ फेब्रुवारीच्या पहाटे २ वाजता गुरुजींना अटक करण्यात आली. कलम लावले होते ३०२ म्हणजे खुनाचे. जणू त्यांनीच सुरा हाती घेऊन गांधीजींना मारले होते. चारच दिवसांनी हे कलम मागे घेतले गेले, हा भाग वेगळा. परंतु एखाद्या अट्टल गुंडाला द्यावी तशी वागणूक गुरुजींना देण्यात आली. त्या वेळपर्यंत संघावर बंदीही घालण्यात आलेली नव्हती. संघावर ४ फेब्रुवारी रोजी बंदी घालण्यात आली. गुरुजींनी लगेच कारागृहातून पत्रक काढून संघाच्या शाखा बंद करण्याच्या सूचना दिल्या. संघाच्या व्यवस्थेतून त्या देशभर पोहोचल्या. पण संघाने पाठवलेले ते पत्रक नागपूरचे दैनिक `हितवाद' वगळता कोणीही छापले नाही. त्यानंतर `हितवाद'लाही पत्रक का छापले म्हणून तंबी मिळाली.

या काळात गुरुजींची, संघाची भूमिका, वर्तणूक कशी होती? गुरुजींनी स्वयंसेवकांना सांगितले - `मी ज्या समाजासाठी काम करतो, त्या समाजबांधवांचे रक्त माझ्यासाठी सांडलेले मला आवडणार नाही. शांत राहा. आपलीच जीभ दाताखाली येते तेव्हा आपण जीभ तोडत नाही किंवा दात पाडत नाही.' अन स्वयंसेवकांनीही संयम बाळगला. २० हजार स्वयंसेवकांच्या घराच्या अन संघाच्या कार्यालयांच्या झडत्या घेण्यात आल्या. काहीही मिळाले नाही. ६ ऑगस्ट १९४८ रोजी गुरुजींची सुटका करण्यात आली. तब्बल सहा महिने गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तीला विनाकारण तुरुंगात डांबले होते. सरसंघचालकांची सुटका झाली तरीही संघावर बंदी कायम होती आणि गुरुजींना नागपूर सोडण्यास बंदी होती. त्याला अनुसरून गुरुजींनी पंतप्रधान नेहरू आणि गृहमंत्री सरदार पटेल यांना पत्रे लिहिली. त्याला नेहरूंचे उत्तर आले नाही. पटेलांचे आले. गुरुजी दिल्लीला गेले अन १७ ऑक्टोबर १९४८ आणि २३ ऑक्टोबर १९४८ रोजी त्यांची गृहमंत्री पटेल यांच्याशी भेट झाली. ३० ऑक्टोबरला गुरुजींना गृहमंत्र्यांचा तोंडी निरोप मिळाला की, आपण नागपूरला निघून जावे. गुरुजींनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि २ नोव्हेंबर रोजी दिल्लीत पत्रपरिषद घेऊन संघाची भूमिका स्पष्ट केली. सरकारने संघावर लावलेले आरोप अतिशय हास्यास्पद होते. राज्यघटना तयार व्हायची असूनही; संघ घटनाविरोधी आहे असा केंद्र सरकारचा आरोप होता. या पत्र परिषदेनंतर १३ नोव्हेंबर १९४८ रोजी गुरुजींना पुन्हा अटक करून नागपूरला पाठवण्यात आले. तेथून त्यांची रवानगी शिवनी तुरुंगात करण्यात आली.

गुरुजींना पुन्हा झालेली अटक आणि संघावरील बंदी उठत नाही हे पाहून, संघाने देशव्यापी सत्याग्रहाचा निर्णय घेतला. गुरुजींनी त्या आशयाचे पत्रक काढले आणि तेव्हाचे सरकार्यवाह भय्याजी दाणी यांनी तो निर्णय जाहीर केला. ९ डिसेंबर १९४८ पासून सत्याग्रह सुरु झाला. ८० हजार स्वयंसेवकांनी सत्याग्रह केला. पंजाब आणि तामिळनाडू प्रांतात सत्याग्रहींवर पोलिसांनी अत्याचार केले. याचे वृत्त वाचल्यावर तामिळनाडूचे माजी advocate general टी. आर. व्यंकटराम शास्त्री यांनी सरकारच्या निषेधाचे एक पत्र `हिंदू' दैनिकात प्रसिद्ध केले. सत्याग्रहामुळे अन त्याच्या विशाल अन संयमित स्वरूपामुळे समाजातील विचारी लोक याबद्दल बोलू लागले. यातूनच पुण्याच्या `केसरी' दैनिकाचे तेव्हाचे संपादक ग. वि. केतकर पुढे आले आणि त्यांनी शिवनी कारागृहात गुरुजींची भेट घेऊन सत्याग्रह स्थगित करण्याची विनंती केली. तसे झाल्यास चर्चा सुरु होऊ शकेल असे ते म्हणाले. गुरुजींनी ती विनंती मान्य केली. २२ जानेवारी १९४९ पासून सत्याग्रह थांबविण्यात आला. त्यानंतर व्यंकटराम शास्त्री पुढे आले. त्यांनी गुरुजींची व सरदार पटेल यांची भेट घेतली. संघाची लिखित घटना नाही हा नवाच आरोप सरकारने केला आणि घटनेची मागणी केली. संघावरील बंदी या कारणाने घालण्यात आलेली नाही याकडे गुरुजींनी लक्ष वेधले. तरीही श्री. शास्त्री यांनी केलेली विनंती त्यांनी मान्य केली. त्यानुसार श्री. शास्त्री यांनीच संघाच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून घटना लिखित केली अन सरकारला सादर केली. सरकारने घटना गुरुजींकडून यावी असा आग्रह धरला. त्यानुसार गुरुजींनी घटना पाठवली.

नंतर सरकारने संघाच्या घटनेत त्रुटी काढण्याचा वेळकाढूपणा सुरु केला. त्यालाही गुरुजींनी स्पष्टीकरणाचे उत्तर पाठवले. त्या परखड उत्तराने सरकार चिडले. त्याने उलट पत्र पाठवले. त्यातून सरकारचा आकस आणि भावना स्पष्ट झाली. त्यानंतर गुरुजींनी पत्रव्यवहार बंद केला. महिनाभर काहीच झाले नाही. अचानक पंडित मौलीचंद्र शर्मा या प्रकरणात सहभागी झाले. त्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला. संघाने मात्र शर्मा यांना स्पष्टपणे सांगितले की, गुरुजी सरकारला काहीही लिहून देणार नाहीत. त्यावर असा मार्ग सुचवण्यात आला की, गुरुजींनी श्री. शर्मा यांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट करावी. त्यानुसार १० जुलै १९४९ रोजी गुरुजींनी मौलीचंद्रांना व्यक्तिगत पत्र लिहिले. अन १२ जुलै १९४९ रोजी संघावरील बंदी बिनशर्त उठविण्यात आली. या निर्णयाची घोषणा आकाशवाणीने संध्याकाळी केली. उल्लेखनीय म्हणजे- त्याच दिवशी सकाळच्या वृत्तपत्रात; आपली मध्यस्थी सरकारच्या आडमुठेपणाने अयशस्वी झाल्याचे श्री. व्यंकटराम शास्त्री यांचे निवेदन प्रसिद्ध झाले होते.

संघावरील बंदी उठवण्याच्या संदर्भात १४ ऑक्टोबर १९४९ रोजी मुंबई विधानसभेत प्रश्नोत्तरे झाली. त्यात गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी संघावरील बंदी बिनशर्त उठविण्यात आली असून संघाने त्यासाठी काहीही आश्वासन सरकारला दिले नसल्याचे सांगितले होते. जनसंघ त्यावेळी स्थापन झालेला नव्हता, तसा विचारही झालेला नव्हता. त्यामुळे संघाच्या बाजूने विधानसभेत कोणी असण्याचा प्रश्नच नव्हता. याउपर गृहमंत्र्यांनी दिलेले उत्तर पुरेसे स्पष्ट आणि लक्षणीय आहे. यानंतर श्री. गुरुजींचा संपूर्ण देशभर व्यापक प्रवास झाला. शेकडो सभा, बैठका, चर्चा, प्रश्नोत्तरे, पत्र परिषदा असे सगळे झाले. त्या सगळ्यातून गुरुजींनी सातत्याने एकच विचार मांडला- `वयं पंचाधिकम शतम्'. आपसात आम्ही शंभर व पाच असू, पण देश म्हणून आपण एकशेपाच आहोत. कोणतेही किल्मिष ठेवू नका. जीभ दाताखाली येते तसेच समजा अन भारतमातेच्या सेवेच्या कामाला लागा.

संघाच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न होऊनही; अतिशय अपमानास्पद, अन्यायपूर्ण वागणूक मिळूनही संघाची भूमिका, व्यवहार आणि प्रतिसाद  संयमित होते. पण दुसरी बाजू काय आहे? या साऱ्याचा फायदा घेऊन जाळपोळ, मारहाण, हिंसाचार, शिव्याशाप, अपप्रचार यांचा कळस गाठला गेला. संघ ब्राम्हणांचा म्हणून ब्राम्हणांना तर लक्ष्य केले गेलेच, पण अब्राम्हण स्वयंसेवकांनाही संघाचे म्हणून लक्ष्य केले गेले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अन्य विविध प्रकारे सहनशीलतेची परीक्षा पाहण्यात आली. परिणामी स्वयंसेवकच संघावर रुष्ट झाले. अनेकांनी संघ सोडला. १९२५ पासून जोडलेली माणसे विविध कारणांनी दुरावली. त्यांना पुन्हा जोडण्याचे नवेच आव्हान संघापुढे उभे राहिले. संघाने तेही यशस्वीपणे पेलले. मात्र तरीही संघ महात्मा गांधीजींचा हत्यारा आहे हा आरोप अजूनही उगाळला जातो. मी-मी म्हणणारे विद्वान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवीत तेच आरोप उगाळत राहतात. आपण न्यायव्यवस्थेचा अपमान करीत आहोत हेही त्यांच्या गावी नसते. या सगळ्या प्रकारानंतर अनेक वर्षांनी हाच आरोप करण्यासाठी काँग्रेसचे अ. भा. अध्यक्ष सीताराम केसरी यांना जाहीर माफी मागावी लागली होती. तरीही सोनिया अन राहुल गांधी यांच्यापासून कुमार केतकर यांच्यापर्यंत अनेक लोक हाच आरोप बेछूटपणे करत सुटतात. हे सारे वर्षानुवर्षे, दशकानुदशके शांतपणे ऐकून घेणारा संघ `असहिष्णू' ठरवण्याचा प्रयत्न तथाकथित विद्वान करतात आणि अत्यंत खोटारडेपणाने संघाला चिरडून टाकण्याची प्रतिज्ञा करणारे नेहरू ते राहुल पर्यंतचे सारे छोटेमोठे प्रवाह `सहिष्णू' असल्याचे ढोल पिटले जातात हे आपले सामाजिक दुर्दैव आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, १४ नोव्हेंबर २०१५

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

रिकामटेकडे

आपलं conditioning किती असतं, नाही का? पाहा- एखादी व्यक्ती कामात आहे, एखाद्याला काम आहे, एखादा कोणी काम करत असतो, एखाद्याला काम हवे आहे; अशासारखी वाक्ये कानावर पडली की आपल्या मनात एक चित्र तयार होते. हातापायांची हालचाल, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, वाकणे, बसणे, उभे राहणे, बोलणे, वाचणे, खेळणे, खाणे, पिणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे; असं काही ना काही- क्रियात्मक असं चित्र. पण यातील काहीही न करता, शारीरिक हालचाल न करता, काम केल्या जाऊ शकतं किंवा कोणी तसं काही काम करत असेल ही कल्पनासुद्धा करणं कठीण असतं. मग प्रत्यक्ष तसं काम करणं ही तर दूरचीच गोष्ट. वास्तविक प्रत्येक जण कधी ना कधी, क्षण दोन क्षण का होईना असं काम करतच असतो. काळ, वेळ, स्थळ या गोष्टी महत्वाच्या नसतातच अशा कामासाठी. कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण ही कामे अशीच निष्क्रियतेच्या सदरात मोडतात. प्रत्येक जण यातील काही ना काही, कधी ना कधी करतोच. मात्र तरीही कोणी शांत, निष्क्रिय दिसला रे दिसला की आपण विचारतोच काय आराम चाललाय? एखाद्याची वृत्ती खोचक आणि उथळ असेल तर हाच प्रश्न- काय, काही काम नाही का? किंवा काय रिकामेच? अशा शब्दात व्यक्त होतो. कारण कामाचं नियोजन, भावनांचं विरेचन आणि व्यवस्थापन, व्यक्ती- वृत्ती- प्रसंग- घटना- यांचं विश्लेषण; अशा गोष्टी म्हणजे काम असतं हेच आपण मानत नाही. इतक्या ढोबळ, व्यावहारिक स्तरावर ही स्थिती असते, तर प्रतिभावंत कवी, लेखक, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, चिंतक; हे सारे बिनाकामाचे वाटावेत यात नवल करण्याचे कारण नाही. मन आणि बुद्धी दिसत नाही. त्यामुळेच मन, बुद्धीच्या स्तरावर या प्रतिभावंतांचे जे प्रचंड काम सुरु असते ते सामान्य व्यक्तीला आकलन होऊच शकत नाही. त्या अमूर्त कामाचा काही प्रत्यक्ष मूर्त परिणाम पुढे आला तर हे धुके थोडे दूर होऊ शकते. परंतु पोळ्या लाटण्यापूर्वी केले जाणारे कणिक मळण्याचे काम जसे दिसते तसे मूर्त अभिव्यक्तीच्या आधीचे मन-बुद्धीचे मळणे दिसू शकत नसल्याने आणि प्रत्यक्ष ते काम करणारी व्यक्तीही त्याचे वर्णन करण्यास असमर्थ असल्याने त्यांच्याबद्दल असलेला `रिकामटेकडे' हा भाव बहुश: कायम राहतो. मन-बुद्धीच्या पलीकडील असे आणखीन एक क्षेत्र आहे जेथून प्रतिभेचा उगम होतो, त्या क्षेत्रातील निष्क्रियता, शांतता, तरंगशून्यता, विकल्पहीनता, शरीराची- मनाची- बुद्धीची- आंदोलने नसण्याची स्थिती ही जाणीवेतून आणि प्रयत्नपूर्वक येणारी स्थिती आहे. ती स्वनियंत्रित स्थिती आहे. प्रतिभावंताची सहज निष्क्रियता आणि ही स्वनियंत्रित निष्क्रियता यात थोडा भेद आहे. मात्र प्रतिभावंताला या स्वनियंत्रित निष्क्रियतेची कल्पना येऊ शकते कारण त्याने स्वत: अशा प्रकारच्या निष्क्रियतेचा अंशत: का होईना अनुभव घेतलेला असतो. सर्वसामान्य व्यक्तीसाठी मात्र या साऱ्यासाठी एकच शब्द असतो- `रिकामटेकडे'. आपलं जग आणि जगणं अशा रिकामटेकड्या लोकांच्याच उपकाराखाली दबलेलं आहे हे मात्र सत्य आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, १३ नोव्हेंबर २०१४

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

लाचारांचा सत्तायोग

सप्टेम्बरपासून गायब झालेली राजस्थानातील भंवरीदेवी पुन्हा एकदा राजस्थानच्या राजकारणावर स्वार झाली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ झाला, पण अजूनही  भंवरीदेवीचा पत्ता लागलेला नाही. तिच्या नवर्याने ती गायब झाल्याची तक्रार केली तेव्हापासूनच हे प्रकरण गूढ़ बनलेले आहे. या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, त्या स्वत: राजस्थानच्या राज्यपाल राहिलेल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष महिला आहेत, सत्तारूढ आघाडीच्या प्रमुख महिला आहेत, विरोधी पक्षनेत्या महिला आहेत. तरीही भंवरीदेवीचे अपहरण झाले की नाही, ती सध्या कुठे आहे, ती जिवंत आहे वा तिचे काही बरेवाईट झाले काहीही ठावठिकाणा नाही. राजस्थानच्या एका मंत्र्याचे, महिपाल मदेरणा यांचे भंवरीदेवीशी अंतरंग संबंध होते आणि या प्रकरणात ते गुंतलेले आहेत असा आरोप गेले दोन महीने होत होता. ते मात्र हा आरोप फेटाळत होते. परंतु आता सीबीआयच्या चौकशीत त्यांनी आपण भंवरीदेवीला ओळखत होतो अशी कबूली दिली आणि प्रसार माध्यमांनी तर त्या दोघांच्या संबंधांची सीडीच शोधून काढली आहे. 

हा सारा प्रकार राजस्थानचे मुख्यमंत्री गेहेलोत यांना माहीत होता. परंतु त्यांनी काहीही कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मदेरणा हे ताकतवर जाट नेते आहेत आणि जाट मतांवर राजस्थानची सत्ता समीकरणे अवलंबून असल्याने त्यांना हात लावणे कठीण आहे असे विश्लेषण ऐकू येत आहे. दिल्लीतील कोँग्रेस नेतृत्वाने गेहेलोत यांना कारवाईसाठी बाध्य न करण्यापाठीही हाच तर्क दिला जात आहे. असा तर्क देणारे आणि असे विश्लेषण करणारे कथित विश्लेषक आणि विचारवंत यांचीही लाचारी लपून न राहणारी आहे. सत्य समोर आले आणि त्याची पाठराखण केली तर फार फार तर काय होईल? सत्ता गमवावी लागेल, पण सत्य, मूल्य आणि मानवता यासाठी सत्ताही गमवावी लागली तरी हरकत नाही अशी कणखर वृत्ती आज जिवंत तरी आहे का? जात, सेक्स, गुंडगिरी या सार्याचा वाट्टेल तसा बेधुंद वापर करायचा, कशाबद्दलही काहीही तमा बाळगायची नाही, सत्तेचे लक्ष्य दृष्टीआड होऊ द्यायचे नाही आणि हाती आलेली सत्ता सोडायची नाही हाच आजचा प्रघात झाला आहे. 

सत्तेसाठी वाट्टेल ती लाचारी करायला कोणालाही काहीही वाटेनासे झाले आहे. भंवरीदेवी देखील यासाठी जबाबदार नाही का? एवढ्या मोठ्या नेत्याशी खुलेआम लैंगिक संबंध ठेवणार्या या महिलेच्या राजकीय आकांक्षा लपून राहिलेल्या नव्हत्या. उलट त्या अडचणीच्या ठरल्यामुळेच तिच्या वाट्याला हे भोग आले. दुसर्या बाजूने विचार केला तर सत्तेसाठी आपल्या स्त्रीत्वाचा वापर करण्याची लाचारी तिनेही स्वीकारलीच होती. यातील कोणती लाचारी समर्थनीय ठरेल? खरे तर कोणतीही नाही.

सत्तेसाठी ही लाचारी एवढ्यापुरतीच मर्यादित आहे का? या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर, `नाही' असे आहे. बंगालचे राजकारण करणार्या तृणमूल कोँग्रेसच्या ममता बनर्जी यांनी पेट्रोल दरवाढीवरून नुकताच केलेला तमाशा दुसरे काय आहे? सामान्य माणसासाठी कोलकात्यात मगरीचे अश्रू ढाळणार्या तृणमूल कोँग्रेसचे अश्रू दिल्लीत सुकून गेले. कित्येक महिन्यांपासून पोटची पोर तुरुंगात असूनही द्रविड मुन्नेत्र कळघमचे करूणानिधी दिल्लीतल्या खुर्च्या सोडायला तयार नाहीत. लाचारी लाचारी म्हणजे यापेक्षा दुसरे काय असते? आपले हात दगडाखाली सापडले असले की अशी लाचारी अपरिहार्य ठरते. आज तीच पाहायला मिळत आहे. `कर नाही त्याला डर कशाचा?' अशी एक म्हण आहे. परंतु सर्व प्रकारची मस्ती करण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत, असे वाटणार्याँना मग सत्तेसाठी लाचारी पत्करावीच लागते.

आज महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते काय आहे? सत्तेत सहभागी असलेल्या दोन्ही पक्षातून विस्तव जात नाही. भर मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री दुसर्या पक्षावर थेट आरोप करतात. कोंगेसची राष्ट्रवादीबद्दलची नाराजी उघड आहे. सत्ता मात्र कोणालाही सोडायची नाही. भारतीय जनता पार्टी ही याला अपवाद समजण्याचे कारण नाही. कर्नाटकात येडीयुरप्पांचे उदाहरण ताजे आहे. ही लाचारी तर एवढी की, पक्षाच्या अध्यक्षांनी नैतिकता आणि कायदेशीरपणा असा नवाच वाद जन्माला घातला. असेच असेल तर नैतिकतेला काही स्थान नाही, किमान राजकारणात नैतिकता आणू नये असे एकदाचे जाहीर करून टाकावे. पण सत्तेची लाचारी एवढी की, नैतिकतेचा जप करीत सत्तेवर यायचे आणि अनीतीने ती घट्ट धरून ठेवायची. आघाडी सरकारच्या मर्यादा, आघाडी सरकारच्या मर्यादा असे गळे काढत राहायचे पण सत्तेच्या गुळाला मात्र चिकटून राहायचे. आपल्याला जे बोलायचे त्यापेक्षा वेगळेच बरळून जाणारे परराष्ट्रमंत्री वय उलटून गेल्याचे वास्तव स्वीकारुन सत्ता सोडायला मात्र तयार नाहीत. आपण किती अगतिक आहोत हे रोज सांगत आणि दाखवून देत आपली हतबलता प्रदर्शित करणारे पंतप्रधान लाचार नाही तर दुसरे काय म्हणावे? मनमोहनसिंग असोत, एस. एम्. कृष्णा असोत, शरद पवार असोत, करूणानिधी असोत, की अडवाणी असोत... हे नेते घरी बसले तर काय देश थांबून जाईल? ईश्वराचे अवतार काय की संत काय, मोठमोठे राजे महाराजे काय की योद्धे काय, मी मी म्हणणारे उद्योगपती, संशोधक, वैज्ञानिक, समाजसुधारक... आले आणि गेले, समाज चालतोच आहे. जशी वेळ येईल तसा मार्ग काढत पुढे जातोच आहे. हे नेते, अभिनेते तर `किस झाड की पत्ती'? पण सत्तेचा लोभ सुटत नाही आणि लाचारी कमी होत नाही. म्हटलेच आहे ना, `सत्तातुराणां न भयं न लज्जा'. सत्तेचा आणि भलेपणाचा, नैतिकतेचा, जनतेच्या कल्याणाच्या कळकळीचा संबंध केव्हाच संपुष्टात आलेला आहे हेच खरे.

दिल्लीपासून गावपातळीपर्यंत पसरलेल्या लक्षावधी कार्यकर्ता नामक प्राण्याच्या लाचारीबद्दल तर न बोललेलेच बरे... नाही का?

-श्रीपाद कोठे, नागपूर

गुरुवार, १० नोव्हेंबर २०११