बुधवार, १ डिसेंबर, २०२१

संताप

संतापात प्रतिशोध मिसळतो तेव्हा क्रौर्य जन्माला येतं. संताप ही जीवनातील अपरिहार्य बाब आहे. त्याचा योग्य निचरा व्हायलाच हवा. दुर्दैवाने आम्ही संताप म्हणजे खूप काही वाईट, पाप, घृणास्पद अशा नजरेने पाहतो. संताप व्यक्त होणे चुकीचे समजतो. त्यातच संतत्वाच्या एका गाढव रोगाने समाज म्हणून आपल्याला ग्रासलेले आहे. संतत्व अजिबात चूक नाही. 'चंदनाचे हात, पायही चंदन; परिसा नाही, हीन कोणी अंग' हे एकशे एक टक्के खरे आहे. पण हे घाऊक नसते. ती जन्मोजन्मीच्या प्रदीर्घ साधनेचा (वास्तविक संघर्षाचा) परिणाम असते. ती अनुभूती असते, आदेश नाही. ते फक्त सांगणे असते - 'असं असं असतं बरं'. ही जी प्रदीर्घ प्रक्रिया असते ती आम्हाला नकोही असते आणि समजूनही घ्यायची नसते. संताप व्यक्त न होऊ देणे आणि संताप या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी, हे दोन्हीही त्यामुळेच विकृत झालेले आहे. यावर लगेच आम्ही उपदेशही सुरू करतो - 'संताप ठीक आहे पण तो नीट पद्धतीने व्यक्त करावा' वगैरे. आम्ही किती निर्लज्ज झालो आहोत त्याचा हा पुरावा असतो. संतप्त व्यक्ती, त्याची कारणे, परिस्थिती, त्या बिंदूला येईपर्यंतचा प्रवास, त्याची क्षमता, त्याची पायरी (हो, पायरी... कारण समाधान वाटण्यासाठी मी लिहीत नाही. अन समाधानासाठी लिहून आपण विषय समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे...) अशा सगळ्या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. त्या तशा न घेता जेव्हा संताप दाबून टाकण्याचे प्रयत्न होतात आणि त्याहीपेक्षा त्याकडे दुर्लक्ष जेव्हा होते तेव्हा तो संताप सगळ्यांना त्रासदायक ठरतो. किनाऱ्यावरची लाट त्यापूर्वीच्या असंख्य लाटांचा परिणाम असतो, हे साधं सत्य सुद्धा अजून आपल्याला उमगलेलं नाही. समजून घेण्याची मानवाची प्रक्रिया अजून बालवाडीतच शिकते आहे. संप्रेषणात तर आम्ही ढ आहोत. परिणामी आम्ही खोटे किंवा नाटकी आहोत. प्रतिशोधाच्या बिंदूवर पोहोचण्याआधीचा संताप सात्विक संताप असतो, हे समजून घेतलेच पाहिजे. सात्विक संतापात दुसऱ्यावरील अन्यायाने संतप्त होणे तर येतेच, पण स्वतःच्या संदर्भात सुद्धा तो असू शकतो. आपल्याला हे आवडले वा पटले नाही तरीही. माणसाच्या जगण्याकडे कोणतीही चौकट न करता 'जीवन' म्हणून आम्हाला किती पाहता येते, हाच कळीचा मुद्दा आहे.

- श्रीपाद कोठे

२ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा