गुरुवार, १३ मे, २०२१

मी आणि आध्यात्म (१)

'मी आणि आध्यात्म' असा विषय समोर येतो तेव्हा स्वाभाविकच तीन प्रश्न समोर येतात; मी आध्यात्मिक आहे का? आध्यात्म म्हणजे काय? माझा आणि अध्यात्माचा संबंध काय? आध्यात्म म्हणजे काय यापेक्षाही आध्यात्म शब्द उच्चारताच मनात उमटणाऱ्या प्रतिमा, लक्षणे, समज हे महत्वाचे ठरतात. ईश्वरी प्रतिमा, संत किंवा गुरू यांची प्रतिमा, या प्रतिमांची पूजा, पोथी, जप, ध्यान, स्तोत्र, मंत्र, यज्ञ, विधी, लोकरूढी; अशा अनेक गोष्टींची दाटी आध्यात्म हा शब्द उच्चारल्याबरोबर मनात होते. यातून वाट शोधत माणूस अध्यात्माचा प्रवास करतो. खरं तर, यातून वाट शोधत त्याचा अध्यात्माचा प्रवास होतो, असेच म्हटले पाहिजे. माझ्या या प्रवासाचा, त्यातील चढउतारांचा, त्यातील खाचखळग्यांचा, मनाच्या आंदोलनांचा, मनाच्या स्थितींचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.

माझा जन्म सश्रद्ध कुटुंबात झाला. आई वडील दोघेही आणि त्यांचे पूर्वज देव आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी मानणारे आणि आग्रह न सोडता पण परिस्थितीनुसार किंवा स्वतंत्र विचारानुसार मुरड घालत, बदल करत, पालन आणि आचार करणारे. व्रतवैकल्ये, उपासतापास, रोजची पूजा या गोष्टी तर होत्याच; अन दोन्ही कुटुंबात एक समान गोष्ट होती ती म्हणजे भगवान दत्तात्रेयांची उपासना. दोन्ही कुटुंबात पिढीजात दत्तोपासना आणि दत्त संप्रदायातील श्रीगुरुचरित्र या पोथीचे दरवर्षी नियत वेळी अथवा निमित्ताने वाचन होई. गणपती, जन्माष्टमी ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत सारे साग्रसंगीत होत असे. माझ्या आठवणीनुसार वडील खूप उशिरा प्रत्यक्ष पूजा करू लागले. गणपतीचे नऊ दिवस (कारण आमच्याकडे गणेश चतुर्थीला गणेश स्थापना होऊन वामन द्वादशीला विसर्जन होते.) आणि गुरुचरित्र सप्ताहाचे सात आठ दिवस; हे अपवाद. सकाळी शाखा, ती आटोपून आल्यावर बँकेची घाई; हे कारण. त्यांची घाई, आम्हा मुलांची शाळेची घाई आटोपली की, आईची रोजची पूजा होत असे. वडील रोज आंघोळीनंतर गणपती अथर्वशीर्ष मात्र न चुकता म्हणत असत. तेही मोठ्याने आणि लयीत. घरातील सगळ्यांना त्यामुळे ते पाठ होऊन गेले.
श्रावणात दर सोमवारी सगळ्यांचा उपवास असे. संध्याकाळी दिवाबत्तीला जेवून उपवास सोडायचा. त्याआधी प्रत्येकाने श्री महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान वाहून नमस्कार करायचा. आईने सकाळी पूजेच्या वेळी १०८ बिल्वपत्रे वाहिलेली असत. जेवणापूर्वी एकाने सोमवारची कहाणी वाचायची आणि बाकीच्यांनी ऐकायची. मग जेवण. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री हे तीन दिवस सगळ्यांचा पूर्ण उपवास राहत असे. साबुदाण्याची उसळ, भगर, आमसुलाचे सार, दाण्याचा कूट घातलेली बटाट्याची भाजी, साबुदाणा वडे, संध्याकाळी येताना बाबा आणत ती खोव्याची जिलबी; असं रोजच्यापेक्षा वेगळं खाणं राहत असे. वडील पचमढीच्या यात्रेला जाऊन आल्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी झाडाच्या फांद्यांचा छोटासा मांडव करून त्यात पाच खड्यांची पूजा करीत. आई गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचं व्रत करायची. त्या दिवशी ती देवधानाच्या तांदळाचा भात आणि घरच्या अंगणातील दोन चार भाज्यांची एकत्रित भाजी असं जेवायची. वेटाळातील आणखीनही काही महिला हे व्रत करायच्या. यासाठी तांदूळ, मीठ, भाज्या एकमेकींना मागण्यात आणि देण्यात कोणालाही संकोच होत नसे.
गणपतीचे आठदहा दिवस संध्याकाळची आरती हा मोठा विषय असे. एकत्रितपणे आठ दहा आरत्या, मग मंत्रपुष्पांजली, मग अथर्वशीर्ष, मग काही स्तोत्रे, मग प्रसाद; असा भरगच्च कार्यक्रम असायचा. असाच संध्याकाळच्या आरतीचा कार्यक्रम श्रीगुरुचरित्राच्या सप्ताहात सुद्धा राहत असे. यात श्री दत्तात्रेयांची स्तोत्रे इत्यादी असत. या संध्याकाळच्या आरतीत वडील एक पद म्हणत - 'धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची' ते आजही कानात आहे. फार सुरेख पद.
या सर्वसामान्य गोष्टींशिवाय तीन विशेष गोष्टी होत्या. वडील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीला होते. अगदी सुरुवातीच्या काळात ते नागपूरच्या धंतोली भागात असलेल्या बँकेच्या शाखेत नियुक्त होते. बँकेची ही शाखा धंतोलीतील श्री रामकृष्ण आश्रमाच्या अगदी जवळ होती. आश्रमातील स्वामी बँकेत जात येत असत. आश्रमाचे खाते, आश्रमाच्या जीवन विकास मासिकाचे वर्गणीदार बनवणे, कार्यक्रमांची आमंत्रणे यासाठी स्वामी लोकांचे येणेजाणे असे. शिवाय संघ स्वयंसेवक असलेल्या आणि गोळवलकर गुरुजींविषयी अपार भक्तिभाव असलेल्या वडिलांना श्री रामकृष्ण आश्रमाचे आकर्षण असणे स्वाभाविकच होते. त्यामुळे त्या आश्रमात नियमित दर्शनाला जाणे, तिथल्या छोट्या वा मोठ्या कार्यक्रमांना जाणे, प्रवचने व व्याख्यानांना जाणे; असा त्यांचा क्रम राहत असे. जमेल तसे आईही जात असे. व्याप कमी झाल्यावर, वडील निवृत्त झाल्यावर दोघे मिळून कितीतरी वर्ष श्री रामकृष्ण आणि श्री सारदा माता यांच्या जयंती उत्सवाला न चुकता हजेरी लावत. तिथून येताना आवर्जून माझ्यासाठी तेथील खिचडीचा प्रसाद आणत असत. एकादशीला श्री रामनाम संकीर्तनाला गेले की; तिथे मिळणारा पुष्कळ फळांच्या मिश्रणाचा द्रोण घरी येत असे. आश्रमाचे 'जीवन विकास' हे मासिकही दर महिन्याला येई. ते त्यावेळी वाचणे शक्यच नव्हते पण नजरेखालून जात असे.
दुसरी विशेष गोष्ट म्हणजे - इंदूरचे एक संत श्री माधवनाथ महाराज यांच्या संप्रदायाचे वर्षातून एकदोनदा होणारे भजन. माधवनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील एक सिद्ध पुरुष होते. नागपूरच्या इतवारी भागात ते ज्यांच्या घरी राहत असत त्या ठिकाणी त्यांचे एक मंदिर आहे. नागपूरला ते बरेचदा येत. एकदा डॉ. हेडगेवार यांच्या उपस्थितीत त्यांनी रा. स्व. संघाची पहिली शाखा असलेल्या मोहिते शाखेला भेट दिली होती आणि त्यांचे एक शिष्य श्री. भय्याजी कायंदे यांचे स्वयंसेवकांसमोर भाषण झाले होते; अशी आठवण जुन्या लोकांकडून ऐकली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या आई श्रीमती भानुताई गडकरी यांनी श्री माधवनाथ महाराज यांचा अनुग्रह घेतला होता अशीही माहिती ऐकण्यात आहे. अशा या सिद्ध पुरुषाचे एक भजन मंडळ नागपूरच्या महाल भागात होते. वडील महालात राहत त्यामुळे या मंडळाशी संपर्क झाला. त्यातूनच पुढे घरी भजन होऊ लागले. हे भजन हा एक सोहोळा राहत असे. त्या भजन मंडळात भजने म्हणणारे बहुतेक पट्टीचे शास्त्रीय गायक वादक होते. महालातून त्यांची वाद्ये आणणे, ती परत पोहोचवून देणे; त्यासोबत महाराजांचा फोटो, तो ठेवण्यासाठीच्या गाद्या, तक्के असे सगळे सामान आणणे, पोहोचवणे हे एक कामच राहत असे. संध्याकाळी सुरू होणारे भजन मध्यरात्रीला टेकत असे. मग सगळ्यांचे खाणेपिणे इत्यादी. त्यावेळी स्वयंचलित दुचाकी कमीच होत्या. अनेक जण तेवढ्या रात्रीही सायकलने जात असत. ते त्या संप्रदायाचे भजन असे. त्यात अन्य पदे, भजने राहत नसत. रेडिओवर ऐकली जाणारी देवादिकांची भजने नसत. पण त्या भजनाची गोडी आकर्षित करणारी होती. मनात रुंजी घालणारी होती. त्यावेळी तर ती ऐकायला गोड एवढेच होते पण नंतर लक्षात आले की, ती सगळी पदे विलक्षण अर्थवाही आणि तत्वज्ञानपर आहेत. अतिशय खोल आध्यात्मिकता त्या पदांमध्ये आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे, सामूहिक हरिपाठ. निवृत्तीनंतर वस्तीतील समवयस्क वृद्धांनी एकत्र येऊन साप्ताहिक हरिपाठ कार्यक्रम सुरू केला. २०-२५ लोक दर शनिवारी संध्याकाळी एकत्र जमून सामूहिक हरिपाठ म्हणत. नंतर काही भजने, आरती, प्रसाद वितरण होऊन कार्यक्रम संपत असे. सोयीनुसार एकेकाच्या घरी हरिपाठ होत असे. माधवनाथ महाराजांच्या भजनात असलेली श्रवणीयता, गायनीकळा हरिपाठाच्या भजनात नसे. पण भावपूर्णता राहत असे. घरीही वर्षातून दोनेकदा हरिपाठ होई. याच काळात धार्मिक ग्रंथ विकत घेणे व वाचणे हा वडिलांचा जणू छंद झाला. त्यात ज्ञानेश्वरी, गाथा, रामायण, महाभारत, भागवत; असे सगळे होते.
आजोबा आणि आजी (आईचे आई वडील) होते तोवर त्यांचेही संस्कार होत. आजोबा सकाळी आंघोळीनंतर नियमित संध्यावंदन करीत. आजीची नित्यपूजा, रोजचा नित्यपाठ, काकड आरती, त्रिपुर जाळणे; अशा गोष्टींशी लहान वयातच परिचय झाला. या सगळ्यांचा संस्कार मनावर होत राहिला. धार्मिक, आध्यात्मिक विषयातली माहिती, शब्द, प्रथा यांची माहिती होत राहिली.
वातावरण, शेजारपाजार, शाळा, संघ येथेही धार्मिक वातावरण होतेच. घरी होत तसेच गणपती, नवरात्री, जन्माष्टमी इत्यादी कार्यक्रम सगळ्यांकडे कमीअधिक होत असत. गणपती, नवरात्रीच्या संध्याकाळच्या आरतीला एकमेकांकडे जाणे, त्यासाठी एकमेकांना आवाज देणे, आरती झाल्यावर प्रसाद ग्रहण करून गप्पा मारणे; हा एक कार्यक्रमच राहत असे. जन्माष्टमी, दिवाळीचे लक्ष्मीपूजन, नैमित्तिक सत्यनारायण अशासारख्या कार्यक्रमांना तीर्थप्रसादाची बोलावणी असत आणि बोलावणीचा वगैरे फारसा विचार न करता सगळे एकमेकांकडे जात असत.
अधूनमधून कीर्तने होत. व्रतवैकल्ये चालत. कधी त्यात सहभाग, कधी गप्पागोष्टीतून माहिती; असे होत असे. संघाच्या शाखेत येणारे सगळे बाल, किशोर समवयस्क मित्र दर शनिवारी शाखा आटोपल्यावर जवळच्या मारोती मंदिरात जात असू. कोणी तेलवात घेऊन येत, कोणी नुसतेच दर्शन घेत. शाळेला श्रावण सोमवारी दोन तासिका कमी होत. शाळा लवकर सुटत असे.
('माझा आध्यात्मप्रवास - देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या पुस्तकाच्या 'मागोवा' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा