माझ्या आयुष्यालाही हे लागू होईलच ना? मग एकेका गोष्टीचा विचार सुरू झाला. अगदी तटस्थपणे. स्वतःला अजिबात सवलत न देता किंवा स्वतःचे अजिबात लाड न करता. अगदी कर्कश विश्लेषण सुरू झालं. बेमुर्वतपणे चिरफाड सुरू केली. प्रत्येक वेळी उत्तर मात्र एकच येत गेलं - 'आपल्या हाती काहीही नसतं.' प्रयत्न, बुद्धी, संबंध हे सुद्धा तोकडेच असतात. सगळ्यांच्या बाबतीत हे खरं नसेलही पण काहींच्या बाबतीत खरंही असतं, हे नाकारण्यात हशील नाही. देवाच्या देवळात रांग लावून त्याच्याकडे काही मागणाऱ्यांमधील काही जणांना त्यांचे मागणे मिळत असेल अन काही लोकांना निराश व्हावे लागत असेल. कशी लावणार संगती? डॉक्टरकडे काही लोकांना गुण येतो, काही लोकांना नाही येत गुण, तर काहींना जीवही गमवावा लागतो. कशी लावणार संगती? शिक्षक सगळ्यांना सारखंच शिकवतात. कोणाला अधिक गुण, कोणी अनुत्तीर्ण. कशी लावायची संगती? पूजा अर्चा करणारे काही लोक सज्जन, काही लोक दुर्जन. कशी लावायची संगती?
या सगळ्या मंथनातून एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली की, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्याच्या ठायी उत्पन्न होणारे विचार आणि विकार वेगवेगळे आहेत. त्याच्या वाट्याला येणारे सुख दु:ख केवळ त्याच्या हाती नाही. अन आपल्या आयुष्याला कोणतेही समर्पक विश्लेषण नाही. कोणताही कार्यकारण भाव नाही. तर्काचे काही धागे हाती लागले तरीही लवकरच रस्ते बंद होतात. आयुष्याचा वा घटनांचा कार्यकारण भाव शोधणे हाच एक खुळेपणा आहे. हे जसजसे लक्षात येऊ लागले, तसतशी काही जाणून वगैरे घेण्याची गरज संपू लागली. काही जाणून घेण्याची इच्छा कमी होऊ लागली. जसे माझे आयुष्य माझ्या हाती नाही तसे, माझे आयुष्य आणखी कोणाच्याही हाती नाही. हे जाणवल्यावर कोणाबद्दल आकस बाळगणे हळूहळू संपले. कोणाला दोष देणे संपले. कोणालाही दोष द्यायचा नाही अन स्वतःलाही नाही.
Godfather इत्यादी कोणाला लाभतात, कोणाला नाही लाभत. मला नाही लाभले कोणी Godfather. पण त्याचे काय? कोणाला लाभतो विशिष्ट स्वभाव. गोड बोलण्याचा, लाळघोटेपणाचा, आपल्या लाभावर डोळा ठेवून संबंध आणि व्यवहार हाताळण्याचा. कोणाला नाही लाभत. या साऱ्याचे शास्त्रही बनवले जाते आणि त्याचे शिक्षण दिले, घेतले जाते. पण त्याचे काय? कोणी धावतात त्यापाठी. बाकीच्यांना हे मिळालं, ते मिळालं; आपल्यालाही मिळेल या आशेने. एखाद्याला तेही वाटत नाही. धावणारे तरी सगळे शर्यत जिंकतात का? मग त्याचेही तत्वज्ञान होते - 'धावणे महत्वाचे, जिंकणे हारणे नाही.' अनेकदा ही मनातली निराशा झाकणे असते तर अनेकदा निरर्थकता. मुळात यश, कीर्ती, पैसा, नाव, लौकिक, साधने, घरे, जमिनी, अधिकार; हे सगळं मिळवण्याची धून म्हणजे जगणं हे तरी कोणी ठरवायचं? कोणी ठरवलं? कोणीही ठरवलं तरी ते सगळ्यांनी मान्य का करावं? या सगळ्याची परिणती तर एकच आहे. माझ्याकडे काही असलं काय वा नसलं काय परिणती सारखीच.
हे सगळंच मग खूप गमतीचं वाटू लागलं. आपल्याला काही मिळालं वा मिळालं नाही याकडे तटस्थपणे पाहता यायला लागलं. जे काही मिळालं असेल, जे काही गाठीला असेल त्याचं कौतुक वा त्याची फुशारकी अनावश्यक वाटू लागली. जे नसेल वा नाही त्याची मातब्बरीही संपली. त्याने दु:खी वगैरे होणं थांबलं. माणसाने निर्माण केलेले मापदंड तोकडे आहेत हे मनोमन पटलं, समजलं आणि ते मापदंड भिरकावून देण्याचं बळही लाभलं. मी तुम्हा माणसांचे जगण्याचे मापदंड मानत नाही हे सांगण्याची गरजही संपली. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणेल; याचं दडपण राहिलं नाही. का राहील दडपण? मला जर कुठली अपेक्षाच नाही तर दडपण कसले? मला जर काही मिळवायचंच नाही तर ताण कसला? ही निरपेक्षता, ही निस्पृहता जीवनसत्याच्या दर्शनातून आली.
आपल्या चुकांची बोच अन आपल्या कर्तृत्वाचा अभिमान दोन्ही लोपले. शुभ अशुभ वगैरे काहीच उरले नाही. वाईट वगैरे ज्याला म्हटले जाते ते तसे वाटेनासे झाले. ते वाईट, त्याज्य वगैरे सुद्धा मूळ स्वरूपात 'मी'च आहे, माझ्यातूनच आलेले आहे. चांगले, घेण्यासारखे सुद्धा मूळ स्वरूपात 'मी'च आहे, माझ्यातूनच आलेले आहे. हे सत्य आता तत्वज्ञानाच्या ग्रंथातला सिद्धांत राहिला नाही. ती प्राणांची अनुभूत खात्री झाली. वेगळं काही वाटेनासं झालं. त्यामुळे अभिनिवेश संपत गेला. व्यक्तींचा, विचारांचा, संघटनांचा, चांगल्या वा वाईटाचा; अभिनिवेश सरत गेला. तिरस्कार, घृणा, दुजाभाव उणावत गेले. असामान्य अथवा सामान्य यात मूलतः भेद नाही हे समजले. प्रतिभा, प्रज्ञा, कौशल्य या फारच मोठ्या गोष्टी वाटणे उरले नाही. सगळ्याच गोष्टींच्या मर्यादा असतात हे तर दिसू लागलेच पण त्या मर्यादा स्वीकारताना होणारी मानवी मनाची अस्वस्थता, कुचंबणा विरत गेली.
स्वाभाविकच माणसांच्या अन मानवी संबंधांच्या मर्यादाही ध्यानात येऊ लागल्या. पैसा, ज्ञान, कर्तृत्व हे जसे सोबत घेऊन जाता येत नाही; तसेच माणसेही सोबत घेऊन जाता येत नाहीत. एवढेच नाही तर पैसा, ज्ञान, कर्तृत्व आणि माणसेही जीवनाला पुरत नाहीत. हे वास्तव स्वीकारण्याचा निर्भयपणा आला. भावना स्वीकारूनही त्यात वाहून जाणे नकोसे वाटू लागले. कोरडेपणा आणि ओल हे दोन्ही नसलेली साम्यावस्था येऊ लागली.
आपली जाणीव, आपली समज याहून वरच्या पातळीवर असणारे असतातच आणि आपल्या पातळीच्या खाली असणारेही असतातच. पण म्हणून मी लहान नाही अन मोठाही नाही. मीही कधीतरी खालच्या पातळीवर होतो, कधीतरी वरच्या पातळीवर असेन. कधी या विश्वसागरावरील लहानसा तरंग असेन तर कधी महाकाय सुनामीची लाट असेन. तरंग असणे आणि लाट असणे हे दोन्ही माझे नाही. त्या येणाऱ्या, जाणाऱ्या अवस्था आहेत. जाणाऱ्या गोष्टींची हुरहूर नको तर येणाऱ्या गोष्टींचे अप्रूपही नको. मी माझ्यात स्थित असले पाहिजे ही समज येत गेली. ही समज हा सुद्धा तत्वज्ञानाचा सिद्धांत न राहता, स्वभाव होत गेला.
याच क्रमाने हक्क सांगणं आणि सांगू देणं संपलं. एखादी वस्तू, व्यक्ती, विचार, कृती आपल्या मालकीची नाही, त्यावर आपला हक्क वगैरे नाही; अन त्या गोष्टींचाही आपल्यावर हक्क नाही. हक्क कोणी अन कोणावर सांगायचा? कोणी कशावर सांगायचा? हे सगळं अस्तित्वच एक आहे, एकाचं आहे, एकातून प्रगटलेलं आहे; अन पुन्हा एक होणार आहे, एकात विरून जाणार आहे, एकात सामावलं जाणार आहे; कोणाचा कोणावर अन कशावर हक्क? अगदी आपलं मन, बुद्धी, शरीर यावर सुद्धा आपला हक्क नाही. आपला नाही म्हणजे दुसऱ्या कोणाचा आहे असंही नाही. मुळातच या सगळ्यांकडे बघण्याची दृष्टीच वेगळी झाली. त्या 'एका'चे सतत अनुसंधान राहू लागले, स्मरण राहू लागले. त्याच जाणीवेतून सगळ्या गोष्टी दिसू लागल्या.
जसे हक्क संपले तसेच बांधून घेण्याची अन बांधण्याची गरजही उरली नाही. पूर्ण मुक्त आणि कायमच मुक्त असलेली गोष्ट बांधली कशी जाणार? बांधून कशी घेणार? सगळ्या प्रकारची बांधाबांध गमतीशीर वाटू लागली. अशक्य गोष्ट शक्य करण्याचा आटापिटा व्यर्थ वाटू लागला. बांधणे, बांधिलकी हे काच वाटू लागले. कोणीतरी वा काहीतरी आपल्याला बंधनात टाकत असतं आणि आपणही बांधून घेत असतो, बंधन खुशीने स्वीकारत असतो हे कळू लागले. अन सगळ्याच प्रकारचे बांधणे वा बांधून घेणे हे या दृश्यमान जगाशी बांधून घेणे किंवा बांधले जाणे असते हेही कळू लागले. मात्र या जगाशी कितीही घट्ट बांधून घेतले तरीही ते टिकणारे नाही. सर्व बंधने छिन्नविच्छिन्न होऊन अंती बंधनरहित एक होऊन जाणे हेच प्रत्येक तरंगाचे, प्रत्येक स्पंदनाचे, प्रत्येक कणाचे, प्रत्येक संघाताचे, प्रत्येक व्यक्तीचे प्राक्तन आहे. तीच एकमेव नियती आहे. अगणित भूतकाळापासून या जगाशी बांधण्याचा, बांधून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अन त्यातला प्रत्येक प्रयत्न वाया जात आहे. त्या बंधनशून्य एकाचा अनुभव मिळत नाही तोवर हा बांधण्याचा खेळ मनापासून सुरू असतो. आता त्या खेळातील रस आटून गेला आहे.
हक्क आणि बंधने यासोबतच सिद्ध करण्याची गरज उरली नाही. काहीतरी सिद्ध करणे, आपले म्हणणे सिद्ध करणे, स्वतःला सिद्ध करणे; यांची गरज वाटेनाशी झाली. त्यातला फोलपणा जाणवू लागला. त्यातल्या मर्यादा स्वच्छ दिसू लागल्या. अन सिद्ध करणे अनावश्यक असल्याचेही पटू लागले. मी कर्तृत्ववान आहे, मी कष्टीक आहे, मी साधा आहे, मी ज्ञानी आहे, मी संपन्न आहे, मी हुशार आहे, मी सन्मानित आहे; हे आणि असे किंवा याच्या विपरीत भाव सिद्ध करून काय प्राप्त होईल? समजा मी या गोष्टी सिद्ध केल्या तरीही अन्य लोक ते मान्य करतील का? त्यांना मनापासून पटेल का? त्याहीपेक्षा त्यांनी मान्य का करायचे? त्यांच्या वा माझ्या विकासात त्याचा काय उपयोग?
विचार वा भूमिका सिद्ध करणे हे तर फारच गमतीचे वाटते. ज्याच्या गळी विचार वा भूमिका उतरवायची त्याची क्षमता, त्याच्या भूमिका, त्याच्या गरजा, त्याची जीवनदृष्टी, त्याची गृहीतके, त्याची माहिती, त्याचे विश्वास, या सगळ्याची कारणमीमांसा; अशा असंख्य गोष्टी असतात. या प्रक्रियेतून शक्तीक्षयच अधिक होतो. त्यापेक्षा आपल्याला वाटते ते योग्य प्रकारे सांगावे, लिहावे आणि थांबावे. त्याच एकमेव तत्त्वाने मला व बाकीच्यांना घडवले आहे. मला प्राणोप्राण उमजलेली एखादी गोष्ट अन्य कोणाला तशीच, त्याच वेळी वाटणे अथवा न वाटणे; हे आकलनाच्या पलीकडचे आहे. कदाचित समोरच्याला ती तशी न वाटणे हेच योग्य असू शकेल. मुख्य म्हणजे प्रत्येकाला प्रतीत होणारे सत्य वेगवेगळे असू शकते. एकच गोष्ट एकाच प्रकारे समजेल, आकलन होईल असे असूही शकते वा नसूही शकते. जसजसे त्या तत्वाचे नवनवे उन्मेष पाहू लागलो तसे सिद्ध करण्याची खटपट थांबत गेली.
अपेक्षा ओसरल्याने हक्काची भाषा थांबली, बंधने मावळल्याने आपपर भेद लोपले आणि सगळ्या गोष्टींची सारखी चिकित्सा करणे शक्य झाले, अन सिद्ध करण्याची गरज वाटेनाशी झाल्याने आवेश, आग्रह, आक्रमकता उरले नाहीत.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा