एक प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो की, आध्यात्मिक म्हणजे काय? आध्यात्मिकता म्हणजे काय? शास्त्रीय चर्चा खूप होऊ शकेल. त्या चर्चेने सगळ्यांचे समाधान होईलच असेही नाही. शिवाय शास्त्रीय चर्चा करण्यासाठी आवश्यक अध्ययन देखील हवे. तो पंडितांचा आणि विद्वानांचा विषय. त्यामुळे मी काही शास्त्रीय चर्चा करणार नाही. अध्यात्म म्हणजे, आध्यात्मिकता म्हणजे काय; याबद्दल मला काय वाटते ते मी मांडणार. मुळातच अध्यात्म हा शास्त्रीय चर्चेचा विषय नाही. तो अनुभूतीचा विषय आहे. त्यात विचारांची, अनुभवांची, दृष्टिकोनाची देवाणघेवाण होऊ शकते. पण काटेकोर चौकटीत त्याचे भौतिक, रासायनिक गुणधर्म ठरवता येत नाहीत. कारण हा विषय मोठ्या प्रमाणावर वस्तुनिष्ठ आहे.
अध्यात्म म्हणजे आत डोकावणे. आध्यात्मिकता म्हणजे आत डोकावण्याची वृत्ती. आत्म्याचं अध्ययन म्हणजे अध्यात्म. आत्मा हा शब्ददेखील आत्म शब्दापासून आला असावा. आत्म म्हणजे माझं स्वतःचं. आत्मीय म्हणजे माझे लोक. आत्मनिष्ठ म्हणजे स्वतःवर निष्ठा असलेला. म्हणूनच आत्म्याचं अध्ययन याचा अर्थ आपलं स्वतःचं अध्ययन. स्वतःचं अध्ययन दोन प्रकारे होऊ शकेल. खाणं, पिणं, चालणं, फिरणं, बोलणं, ऐकणं, सांगणं, समजणं, समजावणं, पाहणं, दाखवणं, झोपणं, उठणं; अशा सगळ्या बाह्य क्रियांचं अध्ययन. आपलं शरीर, शरीराचे अवयव, इंद्रिये; यांच्या कृतीचं अध्ययन. कौटुंबिक आणि सामाजिक संबंध, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जगण्याचे नाना विषय; हा सगळा आपल्या बाह्य अध्ययनाचा विषय. हे बाह्य जीवन जगताना; या जगाचा - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध - या माध्यमातून आस्वाद घेताना बहुतेकांना कधीतरी काही ना काही प्रश्न पडतात. अडचणी, अपयश, अभाव, अक्षमता यांचा सामना करावा लागला की, 'असं का?' असा प्रश्न माणूस विचारतो. कधी दुसऱ्या कोणाला विचारतो, कधी स्वतःला विचारतो.
या प्रश्नाची उत्तरे शोधतो. त्यातून निरनिराळी कौशल्ये, तंत्र इत्यादी विकसित होतात. परंतु ही कौशल्ये, तंत्र हेदेखील यशाची हमी देऊ शकत नाहीत. कधीतरी, कोणाचा तरी मार्ग बंद होतो. ज्याचा मार्ग बंद होतो तो पुन्हा प्रश्नांच्या जाळ्यात अडकतो. हे वारंवार उपस्थित होणारे प्रश्न माणसाला विचार करायला शिकवतात. अशाच रीतीने आयुष्य पुढे पुढे जात असते. या प्रवासातच हे हळूहळू कळत जाते की, बाह्य जगण्यासोबत आपली मन नावाची काही गोष्ट आहे. या मनाचा प्रभाव आपल्या जगण्यावर होत असतो. शिवाय या मनाचं म्हणून काही स्वतःचं जगणं असतं. हे मन आपल्याला हुलकावणी देतं, फसवतं. अन कधीतरी हेही लक्षात येतं की; इंद्रियग्राह्य बाह्य जीवन आणि मन या दोन्ही गोष्टींनी समाधान लाभत नाही. शांतता लाभत नाही. या दोन्ही गोष्टी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची, आपल्याला पडणाऱ्या कोड्यांची उत्तरे देऊ शकत नाही. तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने अंतर्मुख होतो. असं अंतर्मुख होणं ही अध्यात्माची सुरुवात म्हणता येईल.
आपलं जगणं, आपल्या इच्छा, आपले छंद, आपली धडपड, आपल्या भावना, आपले विचार; या सगळ्याची कारणे, या सगळ्याचे परिणाम, या सगळ्याचे घडणे वा बिघडणे; यासाठी बाहेरच्या वस्तू, व्यक्ती, घटना यावर अवलंबून राहणे कमी होत जाते. या सगळ्या जीवन व्यापाराचा अर्थ माणूस शोधू लागतो. तोही स्वतःच्या आत. स्वतःच प्रश्न निर्माण करतो, स्वतःच उत्तरे देतो, दिलेली उत्तरे स्वतःच टाकून देतो, या प्रश्नोत्तरांचे अर्थ लावतो. असे करत करत आपलं आतील अवकाश शोधू लागतो. जगण्याचा अर्थ शोधू लागतो. प्रत्येकच यश किंवा अपयश काही वेळच टिकतं. पुन्हा एक अनामिक असमाधान डोकं वर काढतं. जीवाची पुन्हा चुळबूळ सुरू होते. मनाला समाधान वाटेपर्यंत धडपड केली जाते. समाधान मिळतं. माणूस शांत होतो आणि पुन्हा आपोआप काही तरी अभाव, कमी, रिक्तता जाणवते. कदाचित सांगता येत नाही, पण अस्वस्थता वाढते. अन पुन्हा एकदा तेच चक्र. मग कधीतरी हे चक्र भेदून जाण्याची इच्छा होते. अंतर्मुखतेची एक पायरी आणखीन चढली जाते. असे करता करताच माणूस पूर्ण अंतर्मुख होत जातो. बाह्य गोष्टी यंत्रवत होतात. हा अध्यात्माचा प्रवास असतो.
प्रत्येक गोष्टीतील अपूर्णत्व लक्षात येऊ लागतं. आरोग्य, पैसा, सौंदर्य, सत्ता, सोबत, औषधे, संसार, वस्तू, साधने, भाषा, भोजन, भावना, विचार, विज्ञान, व्यवस्था... एकेक गोष्ट पुढे येते अन काही काळ लोटला, काही अनुभव आले, काही निरीक्षणे गाठीशी जमा झाली की; मन आपल्याला सांगू लागतं - हे सगळं ठीक आहे पण पुरेसं नाही. त्यानंतर मनाचा पूर्णतेचा शोध सुरू होतो. वास्तविक शोध सुरू होतो असं म्हणणंही चुकीचंच. कारण हा शोध काही ठरवून होत नाही. आपल्या अंतरातली स्वभावगत अस्वस्थता आपल्याला पूर्णत्वाचा शोध घेण्यासाठी धडपड करायला लावते. प्रत्येक व्यक्ती असा शोध करते. फक्त प्रत्येकाची वेळ, गती वेगवेगळी असते. ज्याला त्याला आतून जे काही वाटतं त्यानुसार हा प्रवास होतो. त्याचे घाऊक आराखडे नसतात. अमक्याला पूर्णतेची ओढ लागली म्हणजे तमक्याला लागलीच पाहिजे असे म्हणता येत नाही. अमुक कोणी पूर्णत्वासाठी प्रयत्नशील आहे म्हणजे मीही त्याच दिशेने प्रयत्नशील झालं पाहिजे असंही नसतं. अनेकदा तर पूर्णत्वाचे प्रवासी दिसत असून, भेटत असूनही; त्यांची मस्करी, टवाळी करण्याची वृत्तीही असते. मात्र याचा अर्थ टवाळी करणारा अध्यात्माची वाट चालणारच नाही असे नाही. व्यक्तीच्या आत जे काही होत असतं, ज्या उलथापालथी होतात त्या त्याच्या आध्यात्मिकतेला पुढे घेऊन जातात, आकार देतात. ही आतली उलथापालथ अन्य कोणाला दिसेल वा जाणवेल असे नाही. कदाचित काही प्रसंग, काही बोलणं, काही व्यवहार यातून ही उलथापालथ कधी दृश्य होऊ शकते. तरीही तिचा थांग लागणे कठीण. बाकीच्यांचे जाऊ द्या, स्वतःचे स्वतःला कळणे देखील सहज नसते. आपण आपल्याला तरी कळतो का हा प्रश्नही कधीतरी डोकावून जातोच.
एकदा एकाने विचारले - 'तू सारखा अध्यात्म अध्यात्म करतो काय होणार आहे? हे जग सगळं भौतिक सुविधांच्या, सुखांच्या मागे धावतं आहे. कोणीही तुझ्या अध्यात्माकडे लक्ष देणार नाही. अध्यात्म म्हणून म्हणतात तेथेही मोठ्या प्रमाणावर धोके असतात. या सगळ्या वातावरणामध्ये, या सगळ्या प्रवाहामध्ये, या सगळ्या आजच्या युगामध्ये; अध्यात्माचं भवितव्य काय? अध्यात्माला काय भविष्य आहे?' मलाही क्षणभर प्रश्न पडला आणि नंतर हसायला आलं. कारण या दोन गोष्टी नाहीत. अध्यात्म आणि ऐहिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू फारतर म्हणता येतील. अस्तित्वाची ही दोन रुपे आहेत. एकमेकांना लगडलेली चिकटलेली. नाण्याच्या दोन बाजू जशा विलग करता येत नाहीत, वेगळ्या करता येत नाहीत; तसं अध्यात्म आणि ऐहिकता हे वेगळे करता येत नाहीत. आज सगळा प्रवाह ऐहिकतेच्या दिशेने चालला आहे. खरं आहे. आज कोणालाही स्वतःकडे, आपल्या आंतरिक अवकाशाकडे, स्वतःच्या आत्म्याकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही. सांगितलं तरीही वाटत नाही. क्षणभर लक्ष दिलं तरीही पुन्हा मन बाहेर जातं. बाहेरच्या सगळ्या व्यवधानांकडे आपण धावत असतो. त्यात गुंततो. त्यात सहभागी होण्याची आपल्याला आवड असते, रुची असते. बाहेरच्या गोष्टींमध्ये आपण रमतो आहे. पण निश्चितपणे या सगळ्याचा कधीतरी saturation point येईल आणि त्यावेळी वाटेल आत वळलं पाहिजे. त्या बिंदूला मानवता कड फेरेल. त्यावेळेला तिचे मुख, तिचं मन, तिचा चेहरा, तिची दृष्टी; हे आपोआप आत्म्याकडे जाईल, आतमध्ये जाईल. मानवजात अंतर्मुख होईल आणि आध्यात्मिकतेकडे वळेल. जगातील सगळी मंदिरे, जगातील सगळी चर्चेस, जगातील सगळ्या मशिदी, जगातील वेगवेगळे पंथ संप्रदाय यांची प्रार्थनास्थळे, त्यांची प्रतीके, त्यांची नावं, त्यांचे प्रचारसाहित्य; एवढेच नव्हे तर त्यांचं तत्वज्ञानाचं साहित्य हेसुद्धा संपूर्ण संपून गेलं, संपवून टाकलं; तरी सुद्धा मानवजात स्वभावतः, नैसर्गिकरित्या अध्यात्माकडे, आपल्या आतल्या आवाजाकडे, आपल्या आत्म्याकडे, आपल्या आंतरिक अवकाशाकडे वळेल आणि आपल्या आंतरिक अवकाशाचा विकास करून घेईल. कारण मुळात आतलं आणि बाहेरचं हे वेगवेगळं नाही. त्या केवळ एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू आहेत.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा