शनिवार, २२ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (१०)

 

अशा प्रकारचा विकास होण्यासाठी, आध्यात्मिक गुणसंपदा अंगी येण्यासाठी स्वीकार महत्वाचा ठरतो. इच्छा, प्रयत्न, ऐहिक जीवन हे सगळं असतंच. परंतु हे सगळे आपल्याला हवे तसेच असेल याची शाश्वती नसते. त्यामुळे जे वाट्याला येते त्याचा स्वीकार करावा लागतो. स्वीकार म्हणजे मजबुरी नाही. खचलेल्या मनाने, नाईलाज म्हणून रखडत राहणे नाही. स्वीकार म्हणजे सोडून देणे, विसरून जाणे नाही. स्वीकार म्हणजे आपल्या भोगांबद्दल मौन बाळगणे नाही. स्वीकार म्हणजे जे काही वाट्याला आले त्याकडे साक्षी भावाने पाहणे. आपले त्रास, अभाव, आपल्यावरील अन्याय, आपल्याशी झालेली प्रतारणा, आपले कटू अनुभव, आपले सुख, आपली संपन्नता, आपले सकारात्मक वा नकारात्मक जीवन; या साऱ्याकडे साक्षी भावाने पाहणे. त्याचे तरंग मनावर न उठता, ओशाळलेपण किंवा न्यूनगंड किंवा श्रेठत्वगंड न येता जीवनाकडे पाहणे.
स्वीकारातून बळ मिळतं, मिळायला हवं. हे बळच जीवनाला सामोरे जाण्यासाठी आणि जीवनाचे सार्थक होण्यासाठी उपयोगी ठरते. आपल्या चांगल्या वा वाईट परिस्थितीला सामोरे जाणे आणि बाकीच्यांना समजून घेणे हे दोन्ही त्यात येतात. मग एकच देव किंवा साधू किंवा संत किंवा अवतार किंवा महापुरुष; एखाद्याची इच्छा पूर्ण करतात आणि एखाद्याची पूर्ण करत नाहीत; हे वास्तव स्वीकारता येते. एखाद्यासाठी आशीर्वाद फळतात आणि एखाद्यासाठी फळत नाहीत हे कळते. कोणाचा नवस पूर्ण होतो आणि कोणाचा होत नाही हे समजून घेता येते. अन हे वास्तव स्वीकारतानाही अभाव आणि नकार ज्यांच्या वाट्याला आले, त्यांच्याविषयी कमीपणाची भावना राहत नाही. अशा लोकांची श्रद्धा कमी पडली वा त्यांची भक्ती कमअस्सल आहे इत्यादी भावना मनात येत नाहीत. आपण श्रेष्ठ भक्त आहोत असा गंड जोपासला जात नाही.
भक्ताचा विकास या दिशेने नसेल तर व्यवहारात सुद्धा त्याचे प्रतिबिंब दिसते. अमुकच फुलांचा दुराग्रह, अमुकच प्रसादाचा दुराग्रह, अमुक पद्धतीनेच पूजा करण्याचा हट्ट ही सारी भक्तीच्या अपरिपक्वतेची लक्षणे. आपल्या पूजेचे, पूजा साहित्याचे प्रदर्शन; आपण सोन्याचांदीची भांडी पूजेला वापरतो याचा गर्व; मंदिरात केलेल्या दानाची जाहिरात; तिकीट खरेदी करून मंदिरात दर्शन घेतल्याचा vip feel; हे सारे भक्ती या शब्दाला न शोभणारे. आपण अमुक इतका जप केला, आपण इतकी पारायणे केली, आपण इतके धर्मग्रंथ वाचले, आपण अशी व्रते केली; याबद्दल विशेष काही वाटणे हे भक्तीशी विसंगत म्हणावे लागेल. भक्तीने नम्रता आणि ईश्वरी भाव निर्माण व्हायला हवा.
ईश्वर हा काही आपण नेमलेला मुनीम नाही की त्याने आपले आदेश मानावे, आपली इच्छा पूर्ण करावी, आपल्या अर्ध्या शब्दात राहावं. भक्त आणि अभक्त दोघांनीही हे जाणलं पाहिजे. ईश्वराने आपल्याला हवं ते नाही केलं किंवा आहे ते हिरावून घेतलं तर भक्त नाराज होतात. अन अभक्त त्यावरून टीका करतात. ईश्वर जर सगळं करतो तर इतकं दु:ख का? इतका अन्याय का? इतकी विषमता का? इतकी अस्वस्थता का? इतकी हिंसा का? इतकी वखवख का? वरवर हे प्रश्न बरोबर वाटतात. नव्हे एका पातळीवर ते बरोबरच असतात. शिवाय अन्याय, अभाव, नकार हे आपल्या बाबतीत असतील त्यावेळी तर हे सारे प्रश्न योग्य आणि स्वाभाविक ठरतात. पण आध्यात्मिक जीवनात पुढे पुढे जाताना हे लक्षात येतं की, ईश्वर हा काही आपला बांधील नाही. या समग्र अस्तित्वाच्या संदर्भात आपण केवढे? या अस्तित्वातील आपलं स्थान काय? जे काही आपल्या वाट्याला येतं ते स्वीकारण्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं. प्रयत्न इत्यादी ठीक असतात. प्रत्येकाने आपल्या शक्ती बुद्धिप्रमाणे, आपल्या प्रेरणेला आणि स्फूर्तीला अनुसरून प्रयत्न करावेतच. मात्र आपण प्रयत्न केले म्हणजे त्याचं फळ मिळणं हा आपला हक्क आहे असं समजू नये. याचा आध्यात्मिक वगैरे काय फायदा तोटा असेल तो असो, पण व्यवहारात मनाचं संतुलन राखायला याची नक्कीच मदत होते.
ईश्वर प्रतिमेच्या भजन पूजनाचा विकास आंतरिक ईश्वरी भावात होत नाही तोवर भक्ती आध्यात्मिक झाली असे म्हणता येणार नाही. असा आंतरिक विकास होतो आहे की नाही, याचा आढावा प्रत्येकाने आपापला घ्यावा लागतो. त्या संबंधात दुसऱ्या कोणी न्यायाधीश होऊन चालत नाही. आपणच आपले न्यायाधीश व्हावे लागते. स्वतःची स्वतःच उलटतपासणी करावी लागते. त्यासाठी धैर्य गोळा करावे लागते. एकटे असताना आपण कसे असतो ही त्याची मोठी कसोटी असते. स्वतः अभ्यासक्रम निश्चित करायचा, स्वतः परीक्षा द्यायची, स्वतः तपासायचं आणि स्वतःच निकाल द्यायचा. हे खरं असलं तरीही एखादी व्यक्ती आध्यात्मिक आहे का? किती प्रगती झाली आहे, याचा कस मात्र बाहेरच्या जगातच लागतो. त्यासाठी बाहेरच्या जगाच्या प्रमाणपत्राची गरज नसते. बाहेरचं जग अकारण, सकारण असं प्रमाणपत्र देते. पण ते निरर्थक असते. बाहेरच्या जगाने दिलेलं गौरवपत्रही निरर्थक आणि शिव्यांची लाखोळीही निरर्थक. बाह्य जगाचे पडसाद पुन्हा आपणच आपले तपासायचे. कस आपला आपणच घासून पाहायचा. फसवलं तरीही आपलीच फसवणूक आणि घडवलं तरी आपलीच घडवणूक. स्वतः स्वतःशी प्रामाणिक असणं जमायला हवं.
मी भक्तीचा विरोधक नाही. भक्तीला माझा मुळीच आक्षेप नाही. आध्यात्मिक विकासातील भक्तीचे स्थान महत्वाचे असते हेही खरे. पुष्कळांना त्याची गरज असते. त्यात आध्यात्मिकता नसते त्यामुळे ती त्याज्य ठरवायला हवी, सोडून द्यायला हवी. सगळ्यांनी तर्ककठोर होऊन आध्यात्मिक व्हावे, इत्यादी मी म्हणत नाही. वास्तविक माणूस कितीही तर्ककठोर झाला तरीही भक्ती त्याच्या पिंडाचा भाग असते हेही मला मान्य आहे. स्वामी विवेकानंद यांनी एका जागी याचा उल्लेख करताना त्यांनी अनुभवलेला एक प्रसंग सांगितला आहे. अमेरिकेत त्यांना भेटायला एकदा दोघे जण आले. आपण तुमची भाषणे ऐकून प्रभावित झाल्याचे त्या अभ्यागतांनी त्यांना सांगितले. थोडीशी चर्चा झाली आणि नंतर विज्ञानाचे उच्च शिक्षण घेतलेल्या त्या दोघांनी विवेकानंदांना विचारले, 'तुमची पद्धत, आचार, कर्मकांड, पूजा इत्यादी काय असतात, कसे असतात?' विवेकानंद हा प्रसंग सांगून म्हणतात, 'त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवले की, शुद्ध वेदांत, अद्वैत तत्वज्ञान हा जगाचा धर्म होण्यात बऱ्याच अडचणी आहेत. किमान त्याला बराच काळ लागेल.'
ही मानवी जीवनाची, मानवी मनाची, मानवी वृत्तीची स्वाभाविकता आहे. त्याला मोठाली तत्वे सुद्धा कशाच्या तरी आधारानेच समजून घेता येतात. म्हणूनच केवळ भारतातच नाही तर जगभरात भक्तीचा प्रवाह पाहायला मिळतो. इस्लाम किंवा ख्रिश्चन पंथातही भक्तीच आढळते. ईश्वरभक्ती, ईश्वराकडे काही तरी मागणे, ईश्वराचे भय, प्रतिके, शास्त्र, आराधनेची पद्धत; हे सगळे त्यातही आहेच. या दोन पंथांच्या आधी जगभरात जे जे पंथ होते, उपासनेच्या पद्धती होत्या त्यांच्यातही हे सगळे आढळते. इतकेच नाही तर ईश्वर नाकारणाऱ्या भारतातील बौद्ध आणि जैन पंथातही पूजा, उपासना, उपासनेची विशिष्ट पद्धत, प्रतिके, शास्त्र; हे आहेतच. या साऱ्याला हरकत असण्याचे किंवा ते टाकून देण्याचे किंवा त्यावर टीकेची झोड उठवण्याचे काहीही कारण नाही. मात्र; ही प्रतिके, या उपासना, ही शास्त्रे, या पूजापद्धती; या गोष्टी अंतिम आहेत असं समजलं आणि तिथेच थांबलं की पंचाईत होते. ही सगळी ईश्वरी भावाच्या परिपूर्ण धारणेची साधने आणि उपकरणे तेवढी आहेत. साधनांनाच साध्य समजणे प्राथमिक अवस्थेत ठीक असते. मनाचा भटकाव, विक्षेप, गोंधळ हे टाळण्यासाठी साधनांचा आग्रह ठीक असतो. परंतु साधने ती साधनेच. त्यांना साध्य समजून घट्ट धरून ठेवण्याने प्रगतीऐवजी अधोगती होऊ शकते. हा धोका अनेक महान व्यक्तींनी सांगितला आहे. त्याचा विवेक सुटायला नको. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत असत - 'पायात काटा गेला असेल तर दुसऱ्या काट्याने तो काढायचा असतो आणि मग दोन्ही टाकून द्यायचे असतात. ठेवून घ्यायचे नसतात.' उपासना, सद्वृत्ती यांना आरशाची उपमाही दिली जाते. आपलं प्रतिबिंब, आत्मबिंब स्पष्ट दिसावं यासाठी आरसा स्वच्छ हवा. उपासना आदींची तीच भूमिका असते. पण दोन बाबी स्पष्ट असायला हव्यात - एक म्हणजे प्रतिबिंब म्हणजे मूळ वस्तू नाही. आत्मबिंब म्हणजे आत्मा नाही. ती केवळ प्रतिकृती. तो केवळ भास. दुसरे म्हणजे भासात, प्रतिकृतीत किंचित काळ रमायचं असतं. कायमचं नाही.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा