शनिवार, १५ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (३)

 

कोणाकोणाशी होता हा संघर्ष? स्वतःशी. स्वतःच्या बुद्धीशी, भावनांशी, गरजांशी, श्रद्धांशी, गृहितकांशी, मान्यतांशी, आप्तांशी. मित्र मैत्रिणींशी, समाजाशी. घरी, दारी, कामाच्या ठिकाणी. अन प्रत्यक्ष ईश्वराशी. मनाची क्षुब्धता जसजशी वाढत गेली तसतसे प्रत्येक गोष्टीला प्रश्नांकित करणे सुरू झाले. विश्वास नावाची गोष्ट उडून गेली. सहिष्णुता लोपली. सुरुवात तर घरातूनच झाली. माझा सरळ सवाल होता आई वडिलांना - तुमचा देव काय झोपला आहे का? की माशा मारतो आहे? का म्हणून मी मानायचं की देव आहे? सगळी त्याची लेकरे आहेत तर मी सावत्र आहे का? मला माझं आयुष्य तो का देत नाही? त्या सरळमार्गी, सज्जन, पापभिरू, श्रद्धाळू जोडप्याकडे काहीही उत्तर नव्हतं. भांडणे वगैरे नाही झालीत. कधीतरी आवाज चढला असेल पण भांडण सुरू आहे, तमाशे झाले; असं नाही. मात्र एक शांत संघर्ष सुरू झाला. घरी काही पूजा, नवरात्र, सप्ताह वगैरे असेल तर मी पूर्ण अलिप्त राहत असे. वरच्या मजल्यावरील माझ्या खोलीत काही तरी करत बसे पण सहभागी होणे बंद. शनिवार, चतुर्थीचे उपवास एका झटक्यात बंद. उपवास बंद करताना विशिष्ट पद्धत असते. संबंधित देवतेची पूजा, अभिषेक; असे काहीतरी. मी काहीही केले तर नाहीच पण धुडकावून लावले. आईला फक्त सांगितले की, आता उपवास नाही. उपवासाच्या दिवशी नेहमीप्रमाणे जेवणार. बस. मंदिरांमध्ये जाणे बंद.

धर्म, अध्यात्म, ईश्वर यांच्याशी संबंधित जे जे असेल ते स्वतःपुरते फेटाळून लावणे. कोणी ते सारे करत असेल तर त्याला विरोध नव्हता. कधीही मी म्हटले नाही की, अमुक करा वा करू नका. का करता असाही प्रश्न केला नाही. अन कधी त्यात अडथळाही ठरलो नाही. पण माझ्या लेखी ते सारे संपले म्हणजे संपले. ते स्वच्छ सांगितलेही होते. आईवडील दोघेही यामुळे दुखावले होते. मात्र आईने प्रयासाने का होईना पण स्वीकारले होते. वडिलांनी मात्र नाही स्वीकारले. ते स्वीकारुच शकले नाहीत. एक वेळ त्यांच्यावर हल्ला त्यांनी स्वीकारला असता पण त्यांच्या देवावरील हल्ल्याने, असहकाराने ते हादरले. त्याचे पडसाद त्यांच्या वागण्यात, व्यवहारात दिसू लागले. माझ्याबद्दलची एक अढी, राग दिसू लागला. प्रत्यक्षात सगळे शांत असले तरीही वागण्यातून नाराजी दिसू लागली. त्यात काही अंश भयाचाही होता. याच्या अशा वागण्याने याला, आपल्याला अन कुटुंबाला काही त्रास होईल ही भीती. कुळाचार, सणवार, पूजा यांचे काय होईल ही भीती. ईश्वराच्या नाराजीने पुढला प्रवास कसा होईल याचे भय. असेही त्या वागण्यात होते. मात्र याचा परिणाम म्हणून माझ्याही मनात त्यांना विरोध, त्यांच्या प्रत्येक सामान्य व्यवहाराबद्दल नाराजी, ईश्वराबद्दल अढी आणि तुच्छता; हे निर्माण होऊ लागले. आई मात्र शांत होती. तिने कोणत्या गोष्टीसाठी आग्रह केला नाही. नाराजीही धरली नाही. नाही तुला पटत तर सोडून दे हीच तिची भूमिका. ती दुखावली तरी तिच्या देवाला मी नाकारतो याचा राग वा भय तिच्या मनात नव्हते.
केव्हातरी पेपर वाचत बसलो असेन किंवा टीव्ही पाहत असेन किंवा जेवायला बसत असेन तेव्हा, आई काहीही न बोलता हातावर काही देई. तेव्हा समजायचे की कसला तरी प्रसाद आहे. मीही चुपचाप घेत असे आणि खात असे. माझा त्या गोष्टीला ना विरोध होता ना पाठिंबा. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती. अतिशय वेगळ्या पातळीवर माझा संघर्ष सुरू होता. तो कोणाला समजणं तर कठीण होतंच पण कोणी त्यात सोबतही करू शकत नव्हतं. असाच एक दिवस काहीतरी काम अडले होते. गाडी पुढेच सरकत नव्हती. अडचणच स्पष्ट होत नव्हती मग उपाय काय करणार? डोकं कामातून गेलं होतं. अखेर बांध फुटला आणि मी संतापाने माझ्याशीच काही बोलत रडू लागलो. पण हे रडणे शक्तीहीन करणारे, दुबळे नव्हते. त्याखाली संतापाचा प्रचंड वन्ही पेटला होता. समोर कोणत्या तरी देवाचे कॅलेंडर लागले होते ते काढून फेकून दिले. आईला लक्षात येताच ती आली. तिने जवळ घेतले आणि शांत करू लागली. थोपटू लागली. दुसऱ्या खोलीतून वडील आले. त्यांनी पाहिले आणि ते कॅलेंडर उचलून पुन्हा जागेवर लावू लागले. जे आईला लक्षात आले, ते त्यांना मात्र कळले नाही. आईने त्यांना खुणेनेच तसे न करण्यास सांगितले. त्यावरही ते म्हणालेच - 'अमुक कॅलेंडर आहे' वगैरे. आईने त्यावरही त्यांना खुणेनेच 'नको' सांगितले. तेव्हा ते निघून गेले. मनात एक गाठ आणखीन पडली. काहीही सबळ कारण नसताना.
याच काळात घरचे सणवार करशील का, असे आईने लहान भावाला विचारले. त्यानेही आनंदाने मान्य केले. नाही तरी मी एकटा काय करणार होतो? ते त्यालाच करावे लागणार होते किंवा सोडून द्यावे लागले असते. पण त्याने जबाबदारी घेतली. त्यामुळे गणपतीसाठी आईवडील त्याच्याकडे जाऊ लागले. असेच एकदा ते गेले असतानाची गोष्ट. टीव्हीवर कुठला तरी गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. हृदयनाथ मंगेशकर गायकांना मार्गदर्शन करत होते. बोलता बोलता ते म्हणाले की, 'प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही. काहीही मिळत नाही.' मुळात अस्वस्थ मन त्यांच्या या वाक्याने भडकून गेलं. कारण हे वाक्य माझ्यावर असंख्य वेळा आदळलं होतं आणि प्रत्येक वेळी त्याची निरर्थकता मी अनुभवली होती. मी मोठ्याने टीव्हीकडे हात करून बोललो - 'वेळ काय मी मरून गेल्यावर येणार आहे का?' तेवढ्यानेही शांत झालो नाही. सरळ उठलो. देवघरात गेलो आणि देवांच्या तसबिरी धडाधड जमिनीवर आदळल्या. सगळ्या तसबिरी फोडून टाकल्या. अन पुन्हा त्याच संतापात जागेवर येऊन बसलो. सगळ्या काचा, फ्रेम वगैरे दुसऱ्या दिवशी आवरले. मनात कोणतीही भीती नव्हती, खंत नव्हती. काहीही नव्हतं. जवळच्या मित्राला हे सांगितले. त्याने सूचना केली की, 'झालं ते झालं. तुला तर काहीच वाटत नाही. अन काही होईल वगैरे आपल्याला माहीत नाही. पण आईवडिलांना हा खूप मोठा धक्का राहील. तेव्हा त्या तसबिरी पुन्हा फ्रेम करून ते येण्याच्या आधी ठेवून दे.' सगळा विचार करून त्याच्या सूचनेनुसार पुन्हा तसबिरी ठेवून दिल्या. परतल्यानंतर 'काही तरी बदलल्यासारखे वाटते' असे वडील स्वतःशीच म्हणाले. मी लक्षच दिले नाही. एखादा नास्तिकही वागणार नाही असा मी वागलो होतो. ईश्वराला अतिशय श्रद्धापूर्वक भजणारा मी ईश्वरभंजक झालो होतो आणि तेही केवळ विचार आणि शब्दाद्वारे नाही तर थेट. त्याबद्दल काही वाटत मात्र नव्हते. जो ईश्वर माझ्याशी शत्रूसारखा वागत होता त्याच्याशी मी तसाच वागत होतो. काय चुकत होते माझे?
कधी मनातल्या मनात तर कधी प्रत्यक्ष मूर्ती वा फोटोसमोर उभा राहून आव्हान देत असे त्या ईश्वराला. 'काय करणार आहेस तू माझं? कर काय करायचं असेल ते. मारायचं असेल मारून टाक. छळायचं असेल छळून घे. त्रास द्यायचा असेल तर त्रास दे. अंगात कीडे टाकायचे असतील तर ते कर. जे करायचं ते कर. नाहीतरी तू वाईट करण्याशिवाय, शिक्षा वगैरे देण्याशिवाय, तळपट करण्याशिवाय काय करू काय शकतो? ये माझ्यापुढे अन दे उत्तरं माझ्या प्रश्नांची. पण तू नाही येणार. पळपुट्या आहेस तू.' कदाचित मनातल्या वाफेचं विरेचन होत असावं. थोडा वेळ असंही वाटे की मस्त फैलावर घेतला बेट्याला. पण पुढे काय? काहीच नाही. एकदा शेगावला जाण्याचा योग आला. बहिणीने आग्रह केला, 'चल जाऊन येऊ.' माझी गजानन महाराजांवर श्रद्धा आहे, दरवर्षी एकदा शेगावला जाऊन मी त्यांच्या पोथीचं पारायण करतो; हे तिला ठाऊक होतं. तिचीही श्रद्धा होतीच. मी म्हटले, 'मी आता त्यापासून दूर गेलो आहे. तुला ठाऊक आहे. काय करू येऊन.' ती म्हणाली, 'दर्शनाला नको. फिरून येऊ.' तिने गळच घातली. मग गेलो. मध्यरात्री पोहोचलो. सकाळी त्या लोकांनी आंघोळी वगैरे तयारी केली दर्शनाला जाण्याची. मी तिला सांगितले. 'मी येणार नाही. तुम्ही जाऊन या.' ते दर्शन घेऊन आले. मी मात्र निवासातच थांबलो. पुन्हा तेच प्रश्नांचे आवर्तन झाले मनातल्या मनात. 'काय हवे काय तुम्हाला? तुमच्याकडे काहीही मागितले नाही म्हणून ही परवड करताय माझी. कसला भाव अन कसले काय? म्हणे देव भावाचा भुकेला. अहो तुम्ही व्यापारी आहात व्यापारी. माऊली बिऊली काही नाही.' प्रत्यक्षात शेगावची कचोरी खाऊन परत आलो.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा