रविवार, १६ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (४)

 

सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडत होता. कोणाच्या कसल्याही बोलण्याला प्रश्न, उपप्रश्न तयार असत. रुक्षपणा येत गेला. कडवटपणाही राहत असे. इतकं होऊन वाममार्गाला कसा लागलो नाही याचं आश्चर्य वाटतं. ना उधळपट्टी करून कर्जबाजारी झालो, ना जबाबदाऱ्या टाळल्या. परिवार, आप्त यांनी सहन मात्र भरपूर केलं. अर्थात मानसिक दृष्टीने. कारण प्रत्यक्षात मी कोणालाही काही त्रास देत नसे. ना कधी मारहाण केली, ना लुबाडले, ना बाकी काही नुकसान केले. फक्त वागण्या बोलण्यात जरा फटकळ झालो होतो आणि माझं अस्वस्थ असणं, उद्ध्वस्त होणं; माझ्यावरच्या मायेपोटी त्यांना अस्वस्थ करत होतं. याच काळात भरपूर समज, गैरसमज पसरवण्यात आले. बदनामी करण्यात आली. चारित्र्यहनन करण्यात आले. संशय पसरवण्यात आले. अन हे सारे एखादी मोहीम चालवावे असे. मी संपूर्ण एकाकी झालो होतो. जवळचेही दूर झाले होते. तटस्थ झाले होते. कोणीही मला ना समजून घेत होते, ना माझ्या वेदनेवर फुंकर घालत होते. एक तर तोवरचा माझा जीवनप्रवास इतका समजूतदार, इतका हिमतीचा आणि शक्तीशाली होता; की याला काही मदत लागू शकते, आधार लागू शकतो; अशी कल्पनाही मनात न येणारेही होते. बरं प्रत्येकाला काय आपली परिस्थिती जाहिरात करून सांगणार का? ते ना शक्य असते, ना योग्य, ना आवश्यक. हे सगळं आतल्या आत जिरत होतं. कधीतरी एखादे वेळेस ज्वालामुखी फुटत असे. पुन्हा सगळे शांत.

दिवस जात होते एवढंच. मी लोकसत्ता दैनिकात काम करायचो. आम्हाला नव्यानेच ltc (देशात कुठेही कुटुंबासोबत फिरून येण्यासाठी सुटी आणि विशिष्ट रक्कम) सुरू झाली होती. मला कुटुंब म्हणजे आईवडील. विचार केला कुठे जावे? काय करावे? की सवलत सोडून द्यावी? सवलत सोडणे वेडेपणा झाला असता. फिरण्याची हौस होतीच. सोबत आईवडिलांना घेऊन कुठे जावे? मनात आले - वडिलांनी रामकृष्ण मिशनची मंत्रदीक्षा घेतली होती. बेलूरला मात्र कधी गेले नव्हते. मग तोच बेत पक्का केला. वास्तविक मी देव धर्मापासून दूर गेलेला. याच विषयावरून घरी एक प्रकारचा तणाव. मात्र बेलूरला जाण्याचा निर्णय करताना काहीही त्रास झाला नाही. मनाची चलबिचल झाली नाही. आता याचा विचार करताना मनात येते, काय कारण असेल यापाठी? एक तर कोणाबद्दल वा कशाबद्दल आकस किंवा दुष्टता नसणे. जे काही होते, ते फक्त सत्यशोधन आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे एवढेच. अन हे केवळ सांगण्यापुरते नाही तर अगदी आतून. त्यामुळे हा निर्णय घेताना चलबिचल झाली नसावी. अर्थात हा माझा कयास. दावा नाही. मग बेलूरला जाण्याच्या कार्यक्रमात श्रीरामकृष्णांचे जन्मस्थान कामारपुकुर आणि सारदा मां यांचे जन्मस्थान जयरामवाटी; तसेच गंगासागर आणि कामाख्या; यांचाही समावेश झाला. ठरल्याप्रमाणे सगळा प्रवास छान पूर्ण करून आलो.
या प्रवासात एक मोठी रोमांचक आणि अतिशय महत्त्वाची घटना घडली. कदाचित त्यासाठीच हे सारे जुळून आले असावे. जयरामवाटी आणि कामारपुकुर आटोपून आम्ही ठरल्यानुसार बेलूरला आलो. तिथे काही दिवस मुक्काम होता. एक दिवस कोलकात्यातील रामकृष्ण मिशनशी संबंधित स्थळे पाहण्यासाठी गेलो. त्या स्थळांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जन्मगृहाचाही समावेश होता. आम्ही तिथे पोहोचलो. माझी त्या घरी जाण्याची ती तिसरी वेळ होती. पहिल्यांदा गेलो तेव्हा ते बंद होते. बाहेरून 'हेच ते घर' असे म्हणून परत आलो होतो. दुसऱ्या वेळी गेलो तेव्हा एक चौकीदार होता. कोणी येईल तेव्हा घर उघडून दाखवणे हे त्याचे काम. मलाही त्याने पूर्ण घर दाखवले होते. जुने जीर्ण घर, हलणारा जिना, झुडुपे; असे असूनही समाधान लाभले होते. ही तिसरी वेळ होती. यावेळी ते घर रामकृष्ण मिशनने ताब्यात घेतले होते. हे घर स्वामीजींच्या वेळी होते तसे पुन्हा उभारण्याची योजना तयार झाली होती. त्यानुसार कामही सुरू झाले होते. घराचा काही भाग पाडून झाला होता. काही उरला होता. तेथे असलेल्या मिशनच्या स्वामींनी त्याबद्दल माहिती सांगितली. आम्ही परतलो.
परंतु का कोणास ठाऊक; राहून राहून वाटत होते की, आपण पूर्वी पाहिलेले घर आणि आज पाहिलेले घर आणि आकारास येणाऱ्या घराची योजना यांचा काही ताळमेळ बसत नाहीय. कारण काहीच नव्हते. शिवाय मी काही तज्ञ नव्हतो त्या विषयातला. आजूबाजूचा परिसर बदललेला असू शकतो. त्यामुळेही वेगळं काहीतरी वाटत असेल. किंवा आपण पूर्वी पाहिले ते पूर्ण नसेल वा ते बरोबर नसेल. किंवा आणखीन काही. पण मनातलं जुनं चित्र आणि नवीन चित्र जुळत मात्र नव्हते. तो दिवस आणि रात्र तसेच गेले. मधूनच स्वामीजींचे घर मनात उसळी मारत असे. आमचा मुक्काम बेलूर मठाच्या निवास व्यवस्थेतच होता. दुसऱ्या दिवशी श्रीरामकृष्णांच्या मंदिरात गेलो. सभामंडपात बसलो. येणारे जाणारे चालूच होते. पुन्हा कालचाच विषय मनात सुरू झाला. अन कोणास ठाऊक कशी तंद्री लागली. आजूबाजूचं भान विसरून गेलो. अचानक पाठीवर थपकी बसल्यासारखं वाटलं. मान वळवून पाहतो तर काय? प्रत्यक्ष खांद्यावर धोतराचा सोगा टाकलेले हसतमुख श्रीरामकृष्ण. माझं लक्ष गेल्याबरोबर म्हणाले, 'अरे कसला विचार करतो आहेस? एका घराचा? इमारतीचा? हे सगळं काळाच्या ओघात बदलणारं, वाहून जाणारं आहे. तू हे जे मंदिर मंदिर करतो आहेस, ठाकूर ठाकूर करतो आहेस, आरती न प्रसाद करतो आहेस, ही बाजूने वाहणारी गंगा पाहतो आहेस; ते सगळंच काळाच्या उदरात गडप होणार आहे कधी ना कधी. हे सगळं जाणारं आहे. त्याचा कसला विचार करतोस? सत्य त्याच्या पलीकडे आहे. त्यावर लक्ष दे. ते धरून ठेव.' अन हसत हसत ते गर्भगृहात निघून गेले. पुन्हा सगळं जसं होतं तसं. लोक येत होते, जात होते. मी सभामंडपात बसलो होतो. काय होतं हे सारं? काय पाहिलं होतं मी? काय अनुभवलं होतं? कोणी म्हणतील साक्षात्कार, कोणी म्हणतील भ्रम, कोणी म्हणतील मनोरुग्ण. मी काहीच म्हणत नाही. तेव्हांही म्हटलं नाही, नंतरही म्हटलं नाही, अन आताही म्हणत नाही. मात्र एक नक्की की, त्यानंतर विचार करण्याची दिशा आणि पद्धतच सगळी बदलत गेली. ठाकुरांचे शब्द आठवत राहतात - 'सत्य त्यापलीकडे आहे. त्यावर लक्ष दे.' त्या सत्य वा कल्पनेतल्या अनुभवानंतर जुना मी जणू शेजारच्या जान्हवीत वाहून गेला. सगळ्या गोष्टींकडे पाहताना, तो अनुभव हा संदर्भबिंदू झाला. स्वामीजींचे घर पाहून आल्यानंतरची चलबिचल पूर्ण थांबून गेली. पण म्हणजे सगळे झाले असे नव्हते. त्या क्षणी जरी मन शांत झाले, तरी या विश्वव्यापाराच्या पल्याड असलेल्या सत्याने मनाला पछाडले. आपल्याला ते कळलं पाहिजे असा ध्यास मनाने घेतला. अर्थात लौकिक जीवनही सुरू होतंच. नोकरी, संघटना, दौरे, लेखन, घर हे सगळं सुरू होतंच. लौकिक आयुष्य, त्यातील अस्वस्थता आणि अपूर्णता, अन दुसरीकडे सत्याचा ध्यास; असे दोन प्रवाह वाहू लागले.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा