सोमवार, १७ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (५)

 

आपण का जन्माला आलो? जन्मभर काय करायचं आहे? काहीच भूमिका नसेल, काहीही करायचं नसेल तर ईश्वराने मुळात जन्मालाच का घातलं? नोकरी करायची, जेवायचं, झोपायचं, समाजासाठी काहीतरी केल्यासारखं दाखवायचं; बस एवढंच जीवन? प्रत्येकाला त्याचं त्याचं छोटं मोठं जीवन आहे. माझं जीवन? कशातच राम वाटत नाही तर सोडून द्यावं सगळं. हाच विचार मग बळावू लागला. काय धरून ठेवायचं अन कशासाठी? धरून ठेवून काहीच उपयोग नाही, स्वस्थता नाही; तर आता सोडून देऊ अन पाहू काय होते ते. आता असं काय आहे की जे गमावल्याने काही फरक पडेल? काहीच नाही नं? मग भीती कसली? उधळून टाकू सारं. हा विचार वाढत गेला आणि दिलं सगळं सोडून. नोकरी, पत्रकारिता, संघटना, कामं; सगळं दिलं सोडून. कुठे जाणं येणं बंद केलं. घरी धावपळ करू शकणारा मीच असल्याने थोडीफार ती जबाबदारी उचलत असे तेवढेच. भाजी आणणे, किराणा सामान आणणे, गॅसचा नंबर लावणे, बिलं भरणे; अशी कामे करत असे. बाकी सगळे बंद. रात्र रात्र झोप लागत नसे. अशा कितीतरी रात्री जागून काढल्या. सगळीकडे अंधार गुडूप. डोळे टक्क उघडे. मन शून्य. कधी तासंतास रडत राही तर कधी गच्चीत येऊन रस्त्यावरच्या दिव्याकडे, आकाशाकडे पाहत बसे. सतत एकच विचार - आयुष्य कशासाठी? काय करायचं आहे? अनेकदा आपण म्हणतो की, मन रमवलं पाहिजे. पण या काळात साक्षात्कार झाला की, स्वाभाविकपणे रमत असेल तरच मन रमवता येतं. मन रमत नसेल तर रमवता येत नाही. उलट रमवायला गेलं तर उद्वेग वाढतो, मनस्ताप वाढतो, चिडचिड होते. त्यापेक्षा रिकामं बसून राहणं चांगलं. शांती तरी भंग होत नाही. नियतीनेही परीक्षा पहायचे ठरवले असेल कदाचित. किती दिवस असं चालणार होतं? मनाला कशाचीही ओढ राहिली नव्हती. काहीही त्याला बांधून ठेवत नव्हतं. मग एका क्षणी जीवन संपवण्याचा प्रयत्नही केला. सगळ्याच प्रयत्नांना नकार देणाऱ्या दैवाने इथेही पाठ फिरवली. मृत्यूही आपल्या हाती नसतो हे प्रत्ययाला आलं.

सकाळी उठणे, काही आवश्यक काम असेल तर तेवढे करणे, आंघोळ, जेवण, पाहिला तर टीव्ही, नाही तर वाचन, अन्यथा लोळत पडलं राहणे. एवढाच दिनक्रम. असाच एकदा दुपारच्या जेवणानंतर गच्चीत झाडाच्या सावलीत वाचत बसलो होतो. हातात विवेकानंद होते अन डोळ्यासमोर त्यांचे ज्ञानयोगाचे विवरण. विषय अद्वैत. अन वाचता वाचता अचानक एका क्षणी मनात आलं - अद्वैत म्हणजे द्वैत नाही असं. म्हणजे फक्त एक. दोन नाही. मग हे कळणार कसं? कळणार कोणाला? जे कळायचं ते कळून घेणारा कोण? कळून घेणाराच कोणी नसेल तर कळणार तरी काय? अन याच विचारांनी मन घेरून टाकले. पुस्तकात बोट ठेवून पुस्तक बंद केले. डोळे आपोआप मिटले गेले. अन त्या 'एक'चा विचार सुरू झाला. दोन नाहीच. पण इथे तर हजारो, लाखो, करोडो आहेत. माणसे, प्राणी, पक्षी, वनस्पती, निसर्ग, भावना, विचार, नाती, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ, सुख, दु:ख, संघर्ष, समन्वय, रंग, रूप, आकार, प्रकार, गंध... किती आणि काय मोजायचं?
मग सुरू झाला एक खेळ. जे जे मनात येई ते ते त्या 'एक'मध्ये टाकणे, शिरवणे, विसर्जित करणे. आईवडील, आप्त, स्नेही, कुटुंब, परिवार, कुळ, कुळाचार, सणवार, उत्सव, वस्तू, इमारती, निसर्ग, प्रकाश, अंधार, विश्वब्रह्मांड, ज्ञान, भावना, विचार, तिन्ही काळ, सुख, दु:ख, संघर्ष, समन्वय, कोमलता, क्रूरता, भूत प्रेत, राक्षस, अगदी देव सुद्धा. जे जे मनात उत्पन्न होईल, जे जे मनात येईल; ते सारं त्या एकात विसर्जित करणे. जे जे विसर्जित केलं ते ते त्यात मिसळून जाऊ लागलं. त्या एकाशी एकरूप होऊ लागलं. जे जे शिरवलं त्याचं वेगळं अस्तित्व संपून गेलं. ते त्या एकाचाच भाग होत गेलं. सगळं संपलं. तरी दोन उरले होते. एक ते सगळ्यांना उदरात घेणारं जे काही होतं ते आणि दुसरा मी. मग मी मलाही त्या एकात विसर्जित केलं. माझं शरीर, माझं रंगरूप, आकार, स्मृती, भावभावना, विचार, जाणिवा... सगळं सगळं लय पावत गेलं त्या एकात. काहीही उरलं नाही पण एक गोष्ट जाणवत होती 'मी आहे'. 'मी नाही' असं क्षणभर देखील वाटलं नाही. सतत जाणीव होती 'मी'ची. माझे भौतिक, रासायनिक गुणधर्म काहीही उरले नव्हते. जे काही होतं त्याचं वर्णन करता येत नव्हतं. त्याला रंगरूप, आकार, गंध, व्याप्ती काहीही नव्हतं. ते पाहता येत नव्हतं, मोजता येत नव्हतं, त्याचं वर्णन शक्य नव्हतं. पण ते होतं. अन जे होतं ते 'मी' होतं. नंतर सगळं शांत. ती जाणीव सुद्धा विरली. किती वेळ गेला ठाऊक नाही. हळूहळू पुन्हा भानावर आलो. क्षणभर काही कळलं नाही. मग लक्षात आलं, आपण गच्चीवर आहोत. अंधार पडला होता. आजूबाजूला दिवे लागले होते. म्हणजे काही तास लोटले होते.
काय अनुभवलं होतं मी? मी स्वतःशी विचार करू लागलो. काहीच सांगता येत नव्हतं. सगळं काही विरून कसं गेलं? अन विरून गेलेलं पुन्हा कसं आलं? असा काही वेळ नक्की होता जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हतं. हे विविधरूपी अस्तित्व आणि अस्तित्वशून्यता हा दोन्ही बाजूंचा प्रवास करून आपण आलो. पण हे कसं झालं माहिती नाही. हे एकाचे अनेक होणं आणि अनेकांचं एक होणं, यांच्या सीमेवर जे काही होतं, जे काही असेल; ते म्हणजे ईश्वर. पण त्याला अस्तित्व नाही. जाताना किंवा येताना कोणीही वा काहीही दिसलं वा जाणवलं नाही. एकच असलेला मीच करोडो झालो. अन हे करोडो असलेलं सारं एकच मी झालो होतो. हे सगळं माझ्यातूनच आलं अन हे सारं माझ्यातच विलीन झालं. ते जे काही अनुभवलं होतं, तो नुसता अनुभव नव्हता. ती अनुभूती होती. म्हणूनच अनुभवासारखं ते धूसर होत गेलं नाही. उलट अधिक सघन, अधिक आशयपूर्ण होत गेलं.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा