बुधवार, २६ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (१४)

 

आणखीन एका विषयाचा या अनुषंगाने विचार करायला हवा. मानवी जीवनाचे बाह्य आणि आंतरिक वैविध्य, त्यातील भेद, त्यातील क्षमतांचे कमीअधिक प्रमाण, त्यांची श्रेष्ठ कनिष्ठता; यांची कारणे आणि स्पष्टीकरण अध्यात्मच देऊ शकतं. विज्ञान फार तर DNA इत्यादी सांगेल, पण ते का हे मात्र विज्ञान स्पष्ट करू शकत नाही. भारतीय अध्यात्म परंपरांनी स्वीकारलेली पुनर्जन्माची कल्पना या निसर्गदत्त भिन्नतेचे स्पष्टीकरण देते. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्या कर्माचा परिणाम असतो. आपल्या वाट्याला येणारे जीवनाचे रंग आपल्या कर्मातून निर्माण होतात, असे कर्मसिद्धांत सांगतो. याचा सरळ अर्थ हा होतो की, कोणाच्या वाट्याला आलेले दुर्दैव, दु:ख, वेदना, अभाव, वंचना, गरिबी, अपमान, कुरुपता, अवगुण; तसेच कोणाच्या वाट्याला आलेले सुदैव, सुख, समाधान, संपन्नता, प्रेम, श्रीमंती, सन्मान, रूप, गुण; हे त्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम असतो. प्रत्येकाला लाभणारे आईवडील, पती वा पत्नी, शेजारी, नातेवाईक, मित्र, शत्रू; हे देखील त्याच्या कर्मचाच परिणाम. या कर्मसिद्धांतावर आक्षेप हा असतो की, याने माणूस दैववादी बनतो. हा आक्षेप संपूर्ण निर्मूल आहे. कर्मसिद्धांत नीट लक्षात न घेतल्याने, त्या सिद्धांताचा पूर्ण विचार न केल्याने असा आक्षेप घेतला जातो. काही गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे, आपले वर्तमान जीवन आपल्या आधीच्या कर्मांचा परिणाम असेल तर आपले भावी जीवन आपल्या वर्तमान कर्मांचा परिणाम असेल. आपण वर्तमान जीवनात संतुष्ट नसू आणि भावी जीवन चांगले हवे असेल तर, आपल्याला वर्तमानात त्यासाठी आवश्यक योग्य असे कर्म करावे लागेल. आपल्याला लाभलेले वर्तमान जीवन हा जीवनाचा पूर्णविराम नाही हे समजून भावी जीवनासाठी कर्म करावे लागेल. दैववादाच्या आक्षेपाचे हे पहिले व्यावहारिक स्पष्टीकरण. दुसरा मुद्दा नीतीच्या संदर्भात आहे. प्रत्येकाचे जीवन हा त्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम असेल तर एखाद्याने दुसऱ्याचा विचार का करायचा? दुसऱ्याबद्दल सहानुभूती, प्रेम, करुणा, सेवा; या भावना का बाळगाव्यात? प्रश्न युक्तिपूर्ण असला तरीही निरर्थक आहे. प्रत्येकाचे जीवन त्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम आहे हे खरेच आहे. त्याचवेळी दुसऱ्यांच्या विचार करणे वा न करणे किंवा दुसऱ्याबद्दल सहानुभूती, प्रेम, करुणा, सेवा इत्यादी भावना बाळगणे वा न बाळगणे; हे आपले कर्म असते. त्यानुसार आपण वागतो तेही आपले कर्म असते. अन त्या कर्मावर आपले भावी जीवन अवलंबून असते. ज्यांना भावी जीवन चांगले असावे असे वाटत नाही, त्यांनी दुसऱ्यांचा विचार न केला तरीही हरकत नाही. कर्मसिद्धांताचे कारण सांगून कोणी बाकीच्यांचा विचार करणार नाही तर त्याच्या त्या अलिप्ततेच्या, दुर्लक्ष करण्याच्या, स्वार्थाच्या, संवेदनशून्यतेच्या कर्माचे फळ त्याला भविष्यात मिळेलच. त्यामुळे व्यक्तिशः किंवा दुसऱ्यांचा विचार करतानाही, कर्मसिद्धांत माणसाला योग्य मार्गावर चालण्याची आणि योग्य दिशेच्या प्रयत्नवादाचीच प्रेरणा देतो. ख्रिश्चन व इस्लाम मात्र हे जीवन जन्मापासून सुरू होते आणि मृत्यूशी संपते असे मानतात. अन त्यानंतर ईश्वरी निर्णयाच्या दिवसापर्यंत वाट पाहायला सांगतात. उलट भारतातील कर्मसिद्धांत आत्यंतिक व्यक्तिवादी असून सगळ्या बऱ्यावाईट जीवनाची जबाबदारी त्या त्या व्यक्तीवर टाकून त्याला प्रयत्नवादी बनवतो. कर्माची ही साखळी म्हणजेच जगणे. अन कर्म थांबवणे म्हणजे अध्यात्म. जगणं आणि अध्यात्म मिळून समग्र जीवन. जगणे कुठून, कधी सुरू होते वा सुरू झाले हे सांगता येत नाही. पण ते थांबवता येते आणि तरीही जीवन मात्र कायम राहते. अध्यात्माचे मानवाला हे आश्वासन आहे. मानवाला संपूर्ण भयशून्य करण्याची शक्ती केवळ यातच आहे. देवादी सारे काही बाजूला सारून होणारे हे आत्मदर्शन, आत्मतत्वाची परिपूर्ण अनुभूती; हीच अध्यात्माची देणगी.
अध्यात्माची समज वाढण्यासाठी आणखी एका विषयाचा विचार क्रमप्राप्त ठरतो. तो म्हणजे मृत्यू. मृत्यू शब्द उच्चारताच माणूस घाबरतो. तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याला अमंगल ठरवतो. तो न बोलण्याचा विषय आहे असे माणसाचे सर्वसाधारण मत असते. याचेही कारण म्हणजे; ऐहिक, इंद्रियगम्य जग म्हणजेच जीवन असा माणसाचा समज. मृत्यू म्हणजे या ऐहिक, इंद्रियगम्य जगाची समाप्ती. मी म्हणून आपण ज्याला समजतो त्या देहाची समाप्ती अन या देहाला आणि मन, बुद्धीला समजू शकणाऱ्या भवतालाची समाप्ती. आपली समाप्ती मात्र नाही. हे जे आपल्याला समजू शकणारं, जाणवणारं जग आहे तेवढंच जीवन नाही, हे कळल्याशिवाय माणूस आध्यात्मिक होऊ शकत नाही. मानवाला ही जाणीव करून देण्यासाठीच नियतीने मृत्यूची योजना केली असावी. आपल्याला आवडो वा न आवडो, मृत्यू अपरिहार्य आहे. त्याचा विचार केल्याशिवाय जीवनाचा विचार अपूर्ण आहे. मृत्यू सोडून केला जाणारा जीवनाचा विचार म्हणजे जगण्याचा विचार. जगणं आणि मरणं दोन्ही मिळून केला जातो तो जीवनाचा विचार. कारण तेव्हाच आपण; हे जीवन कुठून येतं, हे जीवन कुठे जातं, हे जीवन येतं का, हे जीवन जातं का, हे जीवन येतं म्हणजे काय, हे जीवन जातं म्हणजे काय, जीवनाचं स्वरूप काय, माझा आणि जीवनाचा संबंध काय; अशा विविध प्रश्नांचा विचार करू लागतो. हे प्रश्न आम्हाला जीवनाच्या व्यापकतेची, सखोलतेची, सुक्ष्मतेची जाणीव करून देत; आध्यात्मिक करत जातात. मृत्यूचा विचार म्हणजे मरणाचा विचार नाही. मृत्यूच्या स्वरूपाचा विचार. हा इतका मूलभूत आणि महत्वाचा विचार असल्यानेच उपनिषदांनी, भगवद्गीतेने, दासबोधाने त्याची सांगोपांग चर्चा केली आहे. कठोपनिषदातील नचिकेताचे आख्यान तर विश्वसाहित्यातील नितांत सुंदर मृत्यूचिंतन आहे. मृत्यूचा विचार केल्याशिवाय, मृत्यूचे स्वरूप समजून घेतल्याशिवाय; जीवनाचा प्रवाह, जीवनाचे सातत्य, जीवनाचे अमरत्व, जीवनाचा आशय; आकलन होऊ शकत नाही. त्याशिवाय नचिकेतासारखी आत्मश्रद्धा जागी होऊ शकत नाही. अन आत्मश्रद्धा नसेल तर आत्मअध्ययन, अध्यात्म कुठले?
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा