गुरुवार, २० मे, २०२१

मी आणि अध्यात्म (८)

 

वृक्ष जन्माला येतो तेव्हा बीज नष्ट होतं. त्याकडे दोन प्रकारे पाहता येतं. बीजाचा विकास म्हणून आणि बीजाचा विनाश म्हणून. विकास म्हणून पाहिलं तर सार्थकता आणि परिपूर्णता अनुभवास येते. विनाश म्हणून पाहिलं तर निरर्थकता आणि शून्यता अनुभवास येते. `बीज' म्हणून बीजाचा विनाश होतो खरा पण जीवमान चैतन्य म्हणून ते झाडाच्या रुपात कायम असतं. झाड लयाला जाऊन बीज उरतं तेव्हाही असंच घडतं.

गर्भाचं गर्भत्व नष्ट होतं आणि मूल जन्मास येतं. मुलाचं मूलपण नष्ट होऊन युवक जन्म घेतो. युवकाचं युवापण लयास जाऊन प्रौढत्व जन्म घेतं. `काल' नष्ट होऊन आज जन्माला येतो. दृश्य अशा आकाराप्रमाणेच मनही नवीन आकार धारण करतं. कालचं मन आज असणार नाही, आजचं उद्या नसेल. दृश्य वा अदृश्य, आकार वा निराकार, सतत परिवर्तन म्हणजेच जीवन. या परिवर्तनाकडे विनाश म्हणून पाहिलं तर विफलता हाती येते. अन विकास म्हणून पाहिलं तर पूर्णता. फक्त एकच आहे- विकास म्हणून पाहण्यासाठी; लयास न जाणाऱ्या; बीजात आणि वृक्षातही कायम असलेल्या; गर्भावस्थेपासून प्रौढत्वापर्यंत न बदललेल्या; आणि त्यानंतरही कायम राहणाऱ्या; जीवमान चैतन्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.
आध्यात्मिकता हे असं पुन्हा नव्याने जन्माला येणं असतं. न दिसणारा हा पुनर्जन्म इतरेजनांना बेताबेतानेच समजून घ्यावा लागतो. ते स्वाभाविकही असते. जोवर आपल्या अमरत्वाचा अनुभव येत नाही, आपल्या अमरत्वाची प्राणोप्राण खात्री होत नाही, जोवर त्या अमृताचा थेंब मुखी पडत नाही; तोवर आपलं असणं या दृश्यमान, गम्य जगाशी जोडलेलं असणं अगदीच नैसर्गिक आहे. यालाच तर माया म्हणतात. मायेचं हे कवच भेदल्याशिवाय; या दृश्यमान, गम्य जगाशिवाय सुद्धा आपण असतो; हे कसं कळणार?
या जगाची ओढ संपलेली व्यक्ती दोन जगात वावरत असते. दोन प्रतलांवर जगत असते. कधी या नित्य बदलणाऱ्या जगात असते तर, कधी न बदलणाऱ्या जगात. कधीकधी या दोहोंच्या मधल्या मार्गावर. गंमत अशी की, या विश्वजाणिवेत असतानाही त्या अमृताची जाणीव जागी असते. त्यामुळे त्याचे व्यवहार, त्या व्यवहारांचे अर्थ इत्यादी वेगळेही असू शकतात. त्यांची गती आणि पद्धती बदलते. यालाच लहरीपणा असं नाव आहे. माझ्या वागण्यात असा लहरीपणा आहे का? असूही शकेल. त्याचं उत्तर बाकीच्यांनी द्यायचं आहे. मी ते देऊ शकत नाही. कारण माझ्यासाठी ते योग्यच असणार. याचा अर्थ मी वेडा आहे, बेजबाबदार आहे असा नाही. कधीकधी एखादा मित्र किंवा अन्य कोणी सहज विचारतात, 'अंघोळ वगैरे करतो की नाही? जेवतो की नाही?' तर हे सगळं करतो. अंघोळ करतो, दात घासतो, स्वयंपाक करतो, जेवतो, झोपतो, कपडे घालतो, सुसंगत बोलतो... सगळं करतो. पण हे सगळं यांत्रिक पद्धतीने सुरू असतं. एकीकडे दैनंदिन व्यवहार सुरू असतात अन दुसरीकडे मन, प्राण, चित्त, बुद्धी, जाणीव; अन्यत्र कुठेतरी असू शकते. किंवा एक प्रकारची शून्यता असू शकते. वास्तविक शून्यता हा शब्द चुकीचा आहे. त्यात नकारात्मक भाव आहे. त्यात रिक्तता आहे. अशी रिक्तता नसते. नकारात्मकता नसते. मात्र, सांगता येण्यासारखं असं नसलेलं एक भरलेपण, भारलेपण आणि अतिशय शांत अवस्था असते. बारीकसा सुद्धा तरंग नसतो. त्यात जेव्हा बाहेरून काही तरी पडते, उडी घेते, टाकले जाते, फेकले जाते; तेव्हा तरंग उठतात. पण बाह्य गोष्टींपासून विलग झालेलो असल्याने या तरंगांना प्रतिसाद देणे कठीण जाते. म्हणूनच एखाद्या गोष्टीत सामील होण्यासाठी मनाची बरीच पूर्वतयारी करावी लागते. अन मुळात बाह्य गोष्टींची ओढ उरली नसल्याने शक्यतो त्या टाळण्याचा, त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला जातो. एकांत आणि शांतता ही माणुसघाणेपणातून आलेली नसून, ती गरज आहे. माणसे, भवतालचे जग, यातील व्यवहार, यातील भावभावना यांचा द्वेष नाही, तिरस्कार नाही, पण माझ्यासाठी त्याची फारशी उपयुक्तता नाही. माझ्यासाठी दैवाने सत्याचा मार्ग आखलेला आहे. सुखाचा नाही. दोन रस्ते वेगळे आहेत एवढाच याचा अर्थ.
तसेही विवक्षित क्षणी जन्म आणि विवक्षित क्षणी मृत्यू; यांच्यामधील जे जीवन आहे, जगणं आहे; तोच आणि तेवढाच आहे का आपल्या अस्तित्वाचा अर्थ? आपल्याला मान्य असो की नसो, आपल्याला आवडो की नावडो, आपल्याला कळो की न कळो; तेवढाच आपल्या अस्तित्वाचा अर्थ नाही. प्रत्येक व्यक्ती, एवढेच नाही तर प्रत्येक कण, प्रत्येक अणू परमाणू; विकासाच्या विविध अवस्थातून पूर्णतेच्या, अमृतत्त्वाच्या त्या अवस्थेला पोहोचणारच आहे. हा प्रवास कोणीही ठरवलेला नाही अन कोणीही हा प्रवास थांबवू शकत नाही. हे कोणाचं ध्येय नाही, हा कोणाचा हेतू नाही, हे कोणाचे उद्दिष्ट नाही. तीच या अस्तित्वाची स्वाभाविक स्थिती आहे. सगळ्या धडपडी, सगळ्या अस्वस्थता, प्रत्येक अवस्थेचा येणारा उबग आणि ती टाकून नवीन काही तरी प्राप्त करण्याची धडपड; हे सगळे नकळत त्याच अमृतावस्थेकडे घेऊन जात असते. हे विश्व आणि त्यातील प्रवास, त्यातील सोबत, त्यातील धडपडी, त्यातील उसळणे आणि कोसळणे; हे सगळेच त्या एकाच दिशेने जाणारे असते. फक्त एवढेच की, प्रत्येक जीवाचा हा प्रवास वेगवेगळा, स्वतंत्र असतो. एकत्र, एकाच वेळी, एकाच गतीने, एकाच पद्धतीने, घाऊकपणे होणारा नसतो. या अस्तित्वसागरावर कोण कोणाला कधी कसा कुठे भेटेल आणि कधी कुठे कसा बाजूला होईल हे कोणीही सांगू शकत नाही. हे जसं माणसांच्या बाबतीत खरं आहे तसंच जीवनाच्या सगळ्याच गोष्टींबाबत खरं आहे. म्हणूनच हे जग आणि जगणं हीच अंतिम गोष्ट आहे हा समज टाकता आला की बऱ्याच गोष्टी सोप्या आणि सहज होत जातात.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा