गुरुवार, २७ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (१५)

 

दुसरा एक अनुभव मात्र आध्यात्मिक विकासाला दिशा देणारा, मदत करणारा सांगतो. कुळ, कुळाचार, कुळधर्म इत्यादींचं महत्व फार काही राहिलं नसलं तरीही; मी जे काही करतो वा करत नाही त्यावर; कुटुंबात चालणाऱ्या उपासना परंपरेचं मत काय असू शकतं; या परंपरेचा आशीर्वाद असेल की नसेल; असे काही प्रश्नही मनात होते. आशीर्वाद मिळावा अशी सुप्त इच्छाही होती. अशातच सांगली जवळच्या नरसोबावाडीला राहण्याचा योग आला होता. भगवान दत्तात्रेयांचं हे स्थान. विदर्भातील कारंजा येथे जन्म घेतलेले दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचे स्थान. मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. गच्च थंडी पडली होती. धुकं दाटलं होतं. एकूणच गूढरम्य पहाट होती. नदीवर गेलो. तुरळक एक दोन माणसे होती घाटावर. कृष्णा नदीच्या घाटाच्या पायऱ्या उतरून खाली नदीपात्रात खालच्या पायरीवर उभा राहिलो. कृष्णेचं तीर्थ सुखावत होतं. समोर घाटावर श्री नृसिंह सरस्वती स्वामींचं पादुका मंदिर होतं. मनात एक अशब्द संवाद सुरू होताच. त्याच तंद्रीत, ईश्वराला नेहमी विचारतो तसं त्यांना विचारलं - 'महाराज, मी तर काहीच करत नाही. पूजाअर्चा, जपजाप्य, पोथीपारायण, कर्मकांड; काहीही नाही. अगदी मौंजीच्या वेळी घातलेलं यज्ञोपवित सुद्धा सारदा माँ यांच्यापुढे अर्पण केलेलं आहे. या सगळ्यात गोडीही वाटत नाही अन या साऱ्याशी संबंधही जाणवत नाही. माझं लौकिक आणि आध्यात्मिक जीवन काय अडचणीत येईल? मला काही भविष्य नाही? माझं वाटोळं होईल?' अन त्याच तंद्रीत असताना, कृष्णेच्या पात्रातून महाराज समोर आले अन म्हणाले - 'मी म्हटलं आहे का तुला, का हे सगळं करत नाही ते? तू तुला आतून वाटेल तसं करत जा.' अन घाटाच्या पायऱ्या चढून महाराज अदृश्य झाले. असं वाटलं की; आपलं संचित, प्रारब्ध, क्रियमाण सगळं कृष्णेच्या प्रवाहात वाहून चाललं आहे.
*** *** *** *** ***
जीवनाला पुरेल असं ईश्वराने मला काही दिलं नाही. जे काही दिलं ते काढून घेतलं. समाजानेही काही दिलं नाही. माझे कर्तृत्व, बुद्धिमत्ता, शक्ती, कष्ट समाजाला बहुतेक नको होते. कधी तरी या साऱ्याबद्दल काही वाटलं असेल, पण आता कशाचीच गरजही वाटत नाही. उरलेलं आयुष्य कसं जाईल ठाऊक नाही. जाणूनही घ्यायचं नाही. सध्या तरी वाटतं आहे की, लिहीत राहीन. मात्र तसं काहीही ठरवलेलं नाही, ठरवायचंही नाही. आता कोणतेही पिंजरे नकोत. ना सोन्याचे ना लोखंडाचे. का लिहितो आहे हेही माहिती नाही. उद्देश काहीच नाही. जे प्रवाहित होईल ते होऊ द्यायचं. बस्स. सत्याचं दर्शन घडवायलाच ईश्वराने सारं असत्य काढून घेतलं असावं. ही निराशा अजिबात नाही. मग काय आहे? माहिती नाही.
मी फारच दुबळा आहे. लोक केवढाला संघर्ष करतात. मी पळपुटा आहे. माझ्यापेक्षा खराब स्थितीतही लोक राहतात. असे सारे आक्षेप घेतले जाऊ शकतील. गंमत ही की; नाव, पैसा, प्रसिद्धी, यश म्हणजेच जीवन असं गृहीत धरून; असा सिद्धांत मांडून हे आक्षेप घेता येतील. परंतु या जगातील रस राहावा की न राहावा याचं काही गणित असतं का? एक प्रसिद्ध पुस्तक आहे 'The monk who sold his Ferrari'. फेरारी बाळगणाऱ्या यशस्वी माणसाला या जगाचा उबग येऊ शकतो. राजा असलेल्या शुद्धोधनाला या जगाचा विट येऊ शकतो. तसाच तो कोणालाही केव्हाही येऊ शकतो. यश वा अपयश, या जगातील अनुकूलता वा प्रतिकूलता, सुख वा संघर्ष; या कशाचाही विरक्तीशी संबंध नाही. ती येते किंवा येत नाही.
माझ्या इच्छा इत्यादी संपल्या आहेत का? माहिती नाही पण एक गोष्ट निश्चित की, मनात फारशा इच्छाच निर्माण होत नाहीत. अन झालीच एखादी इच्छा तरी ती विरून जाते. तिची आठवण सुद्धा नंतर येत नाही, राहत नाही. त्या इच्छेने अस्वस्थ वगैरे तर होतच नाही. आता होत नसतील इच्छा पण राहून गेलेल्या इच्छांचे काय? शास्त्रे त्याबद्दल काही मते मांडतात. अपूर्ण इच्छा पूर्ण केल्याशिवाय गती नसते. अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्म घ्यावा लागेल. इत्यादी. माझ्या मनात, माझ्या डोक्यात मात्र यातलं काहीही येत नाही.
कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकात एक वाक्य आहे - 'कोणीही कोणाचं नसतं.' खलील जिब्रानच्या प्रॉफेटच्या तोंडीही अशाच आशयाचं एक वाक्य आहे - 'तुमची मुलं तुमची नाहीत. तुमच्यातून आलेली आहेत.' आदि शंकराचार्य त्यांच्या निर्वाण षटकम स्तोत्रात हाच भाव व्यक्त करतात. परंतु तिघांच्याही प्रतिपादनात खूप मूलभूत फरक आहे. कुसुमाग्रज म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असतो, कोणीतरी कोणाचं असलं पाहिजे. मानवी भावनांना अनुसरून व्यक्त केली गेलेली नटसम्राटाची निराशा ही अपेक्षा सुचवते. खलील जिब्रानचा प्रॉफेट जीवनाचं नागडं सत्य तत्वचिंतकाच्या अधिकाराने मानवाला समजावून सांगतो. आदि शंकराचार्य मानवी भावांच्या वर उठून, तत्वचिंतनाच्या सोपानावरून 'मी शिव आहे' हे अंतिम सत्य सांगतात. 'कोणीही कोणाचं नसतं' ही एकच गोष्ट कशी विविध रुपात असू शकते, तिचे अर्थ कसे वेगळाले असू शकतात हे यावरून समजून घेता येतं. माझं प्रतिपादन शंकराचार्यांच्या प्रतिपादनाच्या अंगाने पाहावं लागेल.
लादलेल्या अस्वस्थ एकांताने मी अध्यात्माचा विचार करू लागलो आणि आध्यात्माने मला स्वेच्छेचा सुखमय एकांत दिला. इथून पुढे काय ते काळाच्या उदरात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा