मंगळवार, २५ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (१३)

अर्थात सगळी माणसे सारखी नसतात. सारखी असूही नयेत. सगळी माणसं सारखी झालीत तर सृष्टी ठप्पच होऊन जाईल. सृष्टीचा विकास, मानवाची बाह्य आणि आंतरिक प्रगती ज्या संघर्ष आणि समन्वयातून होते, तो संघर्ष आणि समन्वय राहणारच नाही. त्यावेळी हे विश्व तरी राहील का? कल्पनेपलीकडील प्रश्न म्हणावा लागेल. शिवाय सगळ्यांना सारखं करणं हे काही कोणाच्या हातात नाही. बाह्य लक्षणांवरून माणूस सारखा वाटत असला तरीही त्यांच्यातील विविधता, भिन्नता देवदत्त आहे. म्हणूनच कोणी आध्यात्मिक, कोणी ऐहिक, कोणी दोन्हीचे थोडे थोडे मिश्रण, कोणी ऐहिक असून अध्यात्माकडे झुकलेले, कोणी आध्यात्मिक असून ऐहिकाकडे झुकलेले; असे सगळे प्रकार राहणारच. त्यामुळे कोणी आध्यात्मिक नाही म्हणून वाईट आहे किंवा कोणी ऐहिक नाही म्हणून निरर्थक आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुळात ऐहिक आणि आध्यात्मिक या जीवनाच्या नाण्याच्या फक्त दोन बाजू आहेत. त्या वेगळ्या करता येत नाहीत. एक बाहेरील बाजू आणि दुसरी आतील बाजू. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट दिसतात तशा जीवनाच्या या दोन बाजू स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे माणूस बुचकळ्यात पडतो. मात्र या दोन बाजू आहेत हे समजून घेणे गरजेचे असते. ते समजले की जीवनाचे, मनाचे, बुद्धीचे, भावनांचे, विचारांचे संतुलन होऊ शकते. तसेही नाण्याची एक बाजू गुळगुळीत झालेली असेल, म्हणजेच नाण्याला फक्त एकच बाजू असेल तर ते नाणे चालत नाही. दोन्ही बाजू हव्यात. तशाच जीवनाच्या ऐहिक आणि आध्यात्मिक अशा दोन्हीही बाजू हव्यात. परंतु नाणे म्हणजे पैसा नाही, जोवर त्याला सत्तेची मान्यता नाही. सत्तेने मान्यता काढून घेतली की नाणे निरर्थक होते. नोटबंदीच्या वेळी आपण हे अनुभवले होते. तशीच जीवनाच्या नाण्याला त्याच्या पलीकडील सत्तेची मान्यता महत्वाची असते. ती सत्ता म्हणजेच ईश्वर. कोणालाही निश्चित माहिती नसलेली, विविध स्वरूपात अभिव्यक्त होणारी ही सत्ता. मानवी आकलनाच्या मर्यादांमुळे त्याबद्दल संभ्रम आणि मतभिन्नता भरपूर पाहायला मिळते. ईश्वर म्हणा, निसर्ग म्हणा, नियती म्हणा, माहिती नाही म्हणा; अर्थ आणि आशय एकच. ही जी विविध प्रकारे वर्णन केली जाणारी सत्ता आहे तीच वास्तविक जीवनाच्या नाण्याला मान्यता देत असते. कोणी जीवन म्हणजे जन्म ते मृत्यू या काळातील दृश्य, आकलनकक्षेत येणाऱ्या गोष्टी, असे म्हणतील आणि मानतील. तर अन्य कोणी जीवन म्हणजे जन्ममृत्यूच्या साखळीहून अधिक काही गोष्टी म्हणतील आणि मानतील. परंतु ही दोन्ही मते येतात कुठून? त्या मतांचा प्रवर्तक कोण? कोणाला असे वा कोणाला तसे का वाटते? माणूस या वा अशा मतांवर आपला हक्क सांगतो पण तो हक्क सिद्ध करू शकत नाही. याच सगळ्या भवती न भवतीतून माणसाला जीवनाच्या नाण्यावर जी सत्ता अंकुश ठेवते तिची ओढ लागते. तुम्ही ऐहिक असा की आध्यात्मिक असा, या जीवनावरील सत्तेचा विचार कधी ना कधी मनात डोकावल्याशिवाय राहत नाही.
कोणी या प्रश्नाचाच ध्यास घेतात तर कोणी त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु बहुसंख्य माणसे त्या सत्तेचा ध्यासही घेत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्षही करीत नाहीत. ते प्रत्ययाला येणारी पहिली गोष्ट असणारे हे ऐहिक जीवन धरून ठेवतात आणि जमेल तसा जीवनावरील त्या सत्तेचा अदमास घेतात. बहुसंख्य माणसांचा हा व्यवहार म्हणजेच धर्म. दृश्य, अनुभवगम्य, प्रत्ययाला येणारे जीवन आणि अदृश्य, अनुभवाला न येणारी, प्रत्ययाला न येणारी त्यावरील सत्ता; यांना जोडण्याचा प्रयत्न म्हणजे धर्म. आपापले विचार, वृत्ती, समज, आवाका, अनुभव, जाणिवा, प्रेरणा; यानुसार माणसे जगतात आणि त्यातूनच विविध धर्म, धार्मिक आचार, धार्मिक विचार आकाराला येतात. मूळ धर्म मात्र समान राहतो. तो म्हणजे - प्रत्ययगम्य जीवन आणि प्रत्ययशून्य त्यावरील सत्ता यांचा मेळ घालणे. जगभरात मानवाने यासाठी केलेल्या प्रयत्नांना आजवर यश मिळालेले नाही. ती प्रत्ययशून्य सत्ता प्रत्ययगम्य जीवनातून जाणवते पण हाती लागत नाही. त्या सर्वोच्च सत्तेचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे प्रत्ययगम्य जीवन सुटावे लागते. यासाठीचा जो प्रयत्न असतो त्याला अध्यात्म अशी संज्ञा आहे. त्या प्रयत्नांना साधना म्हटले जाते. ही साधना फलद्रुप झालेले लोक त्या सर्वोच्च सत्तेचे वेगवेगळे वर्णन करतात. त्याचे संपूर्ण वर्णन म्हणजे अद्वैत सिद्धांत. जो सिद्धांत हे सांगतो की, आंतरिक विश्व आणि बाह्य विश्व, आध्यात्मिक जीवन आणि ऐहिक जीवन; हे सगळे एकच आहे; एकाच तत्वाचे आविष्कार आहेत. बाह्य विश्व, ऐहिक जीवन तात्पुरते, क्षणजीवी आहे आणि आंतरिक विश्व, आध्यात्मिक जीवन शाश्वत आहे. हा सिद्धांत जाणून घेतल्याशिवाय सांगणे शक्य नाही. अन कोणाचा तरी म्हणून जेव्हा तो सांगितला जातो तेव्हा तो फक्त शब्दरुपात असतो. त्यात शक्ती नसते, जिवंतपणा नसतो आणि त्याची परिणामशक्ती नसल्याच्या बरोबर असते.
काही लोकांनी अध्यात्माचा ध्यास घेण्याची ईश्वरी योजना ही याचसाठी असते. कारण जोवर कोणीतरी त्या सत्तेचा अनुभव घेत नाही, तिचे दर्शन घेत नाही; तोवर बाकीच्यांना त्या सत्तेची जाणीव होऊ शकत नाही. धर्म हे कार्य करू शकत नाही. धर्मापलीकडे जाणाऱ्यांची त्यासाठी गरज असते. हे धर्मातीत लोकच प्रत्ययगम्य जीवन आणि त्यावरील सत्ता यांची समग्रता जाणू शकतात. अन जीवनाचे हे संपूर्णत्व जाणल्याशिवाय जीवन सार्थक आणि सुसह्य होऊ शकत नाही; तसेच समाधानीही होऊ शकत नाही. ऐहिकतेची अपूर्णता, धार्मिकतेच्या मर्यादा आणि आध्यात्मिकतेची अपरिहार्यता; या तिन्ही बाबी अभिनिवेशशून्य जगण्यासाठी समजून घ्याव्या लागतात.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा