योगमार्ग ज्याला अष्टांग योग किंवा राजयोग म्हटले जाते त्यातही पुष्कळ अडचणी असतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी इत्यादी गोष्टींचा हा मार्ग असतो. ज्या मानवी शरीराच्या द्वारे मोक्षप्राप्ती करून घ्यायची ते शरीर या मार्गात अतिशय महत्वाचे असते. श्वास किंवा शारीरिक क्रिया नियंत्रित करणे; त्याद्वारे शरीर मन स्वतःच्या ताब्यात आणणे याकडे कल असतो. परंतु या सगळ्या गोष्टींचा हेतू मनातून निसटला की या बाह्य क्रियांनाच अति महत्व प्राप्त होते. वेगवेगळ्या अचाट शारीरिक क्रिया करणे, शरीर हवे तसे वाकवणे वा वळवणे; या क्रियांनी लोकांना आकर्षित करणे आणि आपण आध्यात्मिक आहोत असा भास निर्माण करणे होऊ शकते. आसनादींनी शरीर तंदुरुस्त करणे आणि त्या शरीराद्वारे खूप धावपळ, या धावपळीतून खूप अर्थार्जन, अर्थार्जन करून जीवनाचा आकंठ उपभोग; एवढाच योगाचा अर्थ उरतो. आज हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. शिवाय या साधनेत सिद्धी प्राप्त होतात असे म्हणतात. अनेक संत, सत्पुरुषांच्या जीवनकथांमध्ये या सिद्धी ऐकायला, वाचायला मिळतात. त्यांनाच चमत्कार असेही म्हणतात. हे चमत्कार म्हणजे भाकडकथा होत अशी त्यांची संभावना करणे योग्य नाही. असे चमत्कार सहज पाहायला मिळत नाहीत. आजकाल तर चमत्कार ही गोष्ट जवळपास नाहीच. मात्र याचा अर्थ सिद्धी नसतातच असेही नाही. श्री रामकृष्ण परमहंस यांनी त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांना साधनेच्या काळात विचारलेच होते, सिद्धी हव्यात का म्हणून. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरूला त्यावर प्रश्न केला होता की, या सिद्धींनी ईश्वराचे दर्शन होईल का? त्यावर गुरूने उत्तर दिले होते, 'नाही.' अन पुढे उपदेश करताना ते म्हणाले होते, अशा सिद्धी साधनेतून दूर घेऊन जाण्यासाठीच असतात. त्यांच्या नादी लागू नये. आपण स्वतः सिद्धीप्राप्त पुरुष पाहिले आहेत असे स्वतः स्वामी विवेकानंद यांनी नमूद केले आहे. पण त्याच विवेकानंदांनी आपल्या गुरूंच्या चमत्काराच्या कथा सांगण्यात वेळ घालवू नका असेही आपले गुरुबंधू आणि शिष्यांना सांगितले होते. स्वतः विवेकानंदांच्या जीवनात कमी वेळात पुस्तकेच्या पुस्तके वाचणे, वाचलेले तपशीलवार लक्षात ठेवणे, दुसऱ्यांच्या मनातील विचार जाणणे अशा चमत्कारी गोष्टी पाहायला मिळतात. परंतु बहुतेक सगळ्याच आध्यात्मिक व्यक्तींनी सिद्धी हे अध्यात्म साधनेतील अडथळे असल्याचेच मार्गदर्शन केले आहे. साध्या तर्काने सुद्धा हे लक्षात येते की, चमत्कार हे साधारण अनुभवाच्या पातळीवर अनुभवता येत नसले तरीही, त्यांचा विषय आणि आशय ऐहिक गोष्टी हाच असतो. शिवाय ईश्वर म्हणजे काही जादूगार नाही. अन जादूच्या प्रयोगांनी या सृष्टीचे, या अस्तित्वाचे, अन आपले स्वतःचे कोडे सुटणे शक्यही नाही.
ज्ञानमार्गातही अडचणी असतातच. या अडचणी नावापासूनच सुरू होतात. सर्वसामान्यपणे ज्ञान हा शब्द ढोबळ अर्थाने वापरला जातो. या जगातील असंख्य विषयांचे ज्ञान हेदेखील ज्ञानच. या विविध विषयांच्या ज्ञानाचे अर्जन म्हणजे ज्ञानयोग अशीही समजूत असतेच. परंतु आध्यात्मिक साधना या अर्थाने जेव्हा ज्ञानयोग हा शब्द उपयोगात येतो तेव्हा विविध लौकिक विषयांचे ज्ञान ग्रहण करणे असा त्याचा अर्थ नसतो. आत्मज्ञानासाठी केलेले सायास ज्ञानयोग या शब्दात अभिप्रेत असतात. खूप पुस्तकांचे वाचन, खूप विषयांच्या पदव्या, एकाहून अधिक आचार्य पदव्या, डी. लिट. उपाधी, मोठा ग्रंथसंग्रह, भरपूर लेखन; याला ज्ञानयोग म्हटले तरी त्याला आध्यात्मिक म्हणता येणार नाही. आत्मज्ञानाचा उद्योग असेल तेव्हाच त्याला आध्यात्मिक ज्ञानयोग म्हणता येईल. आत्मज्ञानाचा उद्योग करायचा म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ जमवणे, वाचणे, सांगणे वा त्यावर लिहिणे नाही. मानवी जीवनाशी संबंधित अन्य विषयांचे अध्ययन सुद्धा त्यात येऊ शकते. फक्त अन्य विषयांचे अध्ययन आत्मज्ञानाच्या दिशेने घेऊन जाणारे असावे. आत्मशोधाच्या प्रवासाला विविध विषयांच्या अध्ययनाने मदत करावी. ते अध्ययन आत्मशोधाला पूरक व्हावे. तरच त्याला आध्यात्मिक म्हणता येईल. विज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि अन्यही विषय विश्वाच्या मर्यादांची जाणीव करून देत, अनित्यतेची जाणीव करून देत, अपूर्णतेची जाणीव करून देत; आत्मशोधाकडे घेऊन जाऊ शकतात. नव्हे शुद्ध आध्यात्मिक ग्रंथांपेक्षा या विषयांच्या अध्ययनाचा काकणभर अधिकच उपयोग होऊ शकतो. मात्र केवळ बुद्धीची भूक भागवणे, विद्वत्तेची हौस भागवणे, पंडिती सन्मान प्राप्त करणे, लोकांना दिपवून टाकणे, बौद्धिक कसरती; यांनी आध्यात्मिक पोषण होऊ शकत नाही. यातून आत्मनिष्ठेऐवजी आत्मप्रौढी निर्माण होते.
धार्मिक ग्रंथांचे अध्ययन, परिशीलन; पुराणांचा व्यासंग; तत्वज्ञानाचा अभ्यास; धार्मिक कथा करणे; धार्मिक विषयांवर प्रवचने; हीदेखील आध्यात्मिक म्हणता येणार नाही. जसे अन्य विषयांचे ज्ञान असते तसेच धार्मिक आध्यात्मिक विषयांचे ज्ञान असणे, माहिती असणे, खंडन मंडन करणे, चर्चा आणि वादातील विजय; यांचा संबंध आध्यात्माशी जोडता येत नाही. आध्यात्म हा आत्मप्राप्तीचा प्रवास आहे. खूप साऱ्या माहितीचे तेथे प्रयोजन नाही. माहिती असणे वाईट नाही. पण माहिती आहे म्हणजे आत्मप्राप्ती झाली असे नसते. ऐहिक विषयांच्या ज्ञानाप्रमाणेच धार्मिक विषयांच्या ज्ञानानेही; बुद्धीची भूक भागवणे, विद्वत्तेची हौस भागवणे, पंडिती सन्मान प्राप्त करणे, लोकांना दिपवून टाकणे, बौद्धिक कसरती; हे केले जाऊ शकते. अन अन्य ज्ञानाप्रमाणेच त्याने आध्यात्मिक पोषण होऊ शकत नाही. यातूनही आत्मनिष्ठेऐवजी आत्मप्रौढी निर्माण होते. पोटापाण्यासाठी अर्थार्जन करण्यासाठीही लौकिक वा धार्मिक विषयांच्या अध्ययनाचा उपयोग होतो. तेव्हा तो उद्योग निश्चितच आध्यात्मिक नसतो.
खूप आणि छान कथा वा माहिती सांगणे; खूप स्तोत्रे आणि मंत्र पाठ असणे; म्हणजे आध्यात्मिक असणे नाही. सत काय आणि असत काय याचा स्वतःशी विवेक करत; आत्मजाणीव दृढ करीत जाणे; अन या आत्मजाणिवेत सदा स्थित राहण्याचा प्रयत्न करणे; परिणामी लौकिकातील लिप्तता कमी कमी होणे; याला आध्यात्मिक ज्ञानयोग म्हणता येईल. शास्त्र अथवा सिद्ध पुरुषांचे दाखले वा संदर्भ न देता आत्म प्रचितीचे बोलणे म्हणजे आध्यात्मिक प्रवासाची सिद्धी म्हणता येईल.
निरनिराळ्या संप्रदायाच्या परीक्षा, वेदोपनिषदांच्या परीक्षा, संत साहित्य वा धार्मिक साहित्याचा अभ्यासक्रम; हे सारे माहिती आणि तोंडओळख म्हणून योग्यच असते. मात्र हे नेहमी ध्यानात असले पाहिजे की, ईश्वराची माहिती म्हणजे ईश्वराची प्राप्ती नाही. आत्मतत्वाची चर्चा म्हणजे आत्मतत्वाचे ज्ञान नाही. माहिती, चर्चा, अध्ययन या गोष्टी उपयुक्त होऊ शकतात. मात्र साधना स्वतःची स्वतःला करावी लागते.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा