शुक्रवार, १४ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (२)

 

वय वाढत गेले आणि परिस्थिती बदलत गेली तशा या गोष्टी कमी कमी होत गेल्या. मारुती मंदिरात जाणे, घरोघरी संध्याकाळच्या आरतीला जाणे, कीर्तने सगळे मंद होऊन विझले. ते स्वाभाविकही होते. घरच्या आणि बाहेरच्या या सगळ्या गोष्टीत मीही सहभागी राहत असे. फुले तोडणे, हार करणे, दुर्वा तोडणे, पूजा या गोष्टीही करत असे.

लहानपणापासूनच घरच्या आणि आजूबाजूच्या धार्मिक वातावरणात वाढलो. त्यात सहभागीही झालो. हळूहळू माझे असेही एक धार्मिक विश्व आकाराला येऊ लागले. वस्तीतली अनेक मुले संस्कृत शिकण्यासाठी जात असत. संस्कृत भाषा प्रचारिणी सभा परीक्षा आयोजित करीत असे. त्या परीक्षाही दिल्या होत्या. त्या अभ्यासात गंगालहरी आणि शिव मानसपूजा स्तोत्र पाठ करून घेतले होते. त्याची लय इतकी सुंदर होती की ते गुणगुणत राहावेसे वाटे. त्यातील मानसपूजा स्तोत्र मी आंघोळ करताना कधी म्हणू लागलो कळले नाही. अनेक लोक आंघोळ करताना अशी स्तोत्र वगैरे म्हणतात हे माहिती होतच, पण मुद्दाम ठरवून आपण असं म्हणू वगैरे प्रकार नव्हता. अगदी सहज सुरू झालेलं मानसपूजा पठण अजून सुरू आहे. मौंज झाल्यानंतर नानाजींनी (आईचे वडील) संध्यावंदन शिकवले होते. अनेक वर्षे आंघोळीनंतर संध्यावंदन करून गायत्री मंत्राचा जप करत असे.
हळूहळू आयुष्य पुढे सरकत होतं. स्वाभाविकच आईवडील मुलांच्या भविष्याचा विचार करू लागतात. त्यासाठीचे प्रयत्न आणि मार्गदर्शन यात धार्मिक गोष्टींचाही समावेश असतो. त्यानुसार आईने सांगितले की, 'तू शनिवारचा उपवास करत जा.' तिने कोणाला तरी जन्मपत्रिका दाखवली होती. त्यावेळी त्यांनी हे सांगितलं होतं. त्यात अडचण काहीच नव्हती त्यामुळे शनिवारचा उपवास करू लागलो. नागपूरजवळील आदासा या गावचा शमीविघ्नेश म्हणून ओळखला जाणारा श्री गणेश हे कुलदैवत. त्यामुळे हळूच कधीतरी चतुर्थीचा उपवासही सुरू झाला.
शिक्षण, संघाचं काम आणि परिवार असं जगणं सुरू होतं. संघात तर अगदी चालायला लागल्यापासूनच जाऊ लागलो होतो. प्रत्यक्ष जबाबदारी नवव्या वर्गात असताना आली. पहिली जबाबदारी शिशू गणशिक्षक. हळूहळू जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि सहभागही. स्वाभाविकच संघाचा प्रचारक म्हणून जीवन देणे हा विषय आला. त्या अनुषंगाने एक दोन बैठकाही झाल्या. पण प्रचारक नाही झालो. मी माघार घेतली असे नाही. पण काही घडामोडी अशा घडल्या की, प्रचारक नाही झालो. त्याच घडामोडीतून पत्रकारितेत दाखल झालो. आपण पत्रकार होऊ असा विचार केलेला नव्हता. पण पत्रकार झालो. अन १७-१८ वर्षे त्यात घालवली. विचार करून त्या क्षेत्रात आलो नव्हतो तरीही यशस्वी पत्रकारिता केली. नाव मिळालं, सन्मान मिळाले, विश्वास मिळाला, कामापुरता पैसाही मिळाला. हा प्रवास मात्र अडथळ्यांची शर्यत असाच होता. अन ज्यावेळी कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आली त्यावेळी अशा घटना घडल्या की, पत्रकारिता सोडून बाजूला झालो.
प्रचारक म्हणून जाऊ शकलो नाही, पत्रकारितेच्या कष्टाचं फळ मिळू शकलं नाही. अन असंच सगळ्या बाबतीत होत राहिलं. व्यवसाय असो, स्वतंत्र मासिक काढणं असो; एक बिंदू असा येत असे की, गाशा गुंडाळणे. अपयश कुठेच आलं नाही. जिद्द, क्षमता, कष्ट, धडाडी हे सगळं सिद्ध झालं. हे माझंच नाही तर लोकांचंही मत होतं आणि आहे. पण फळ मात्र नाही. ठहराव नाही. प्रत्येक रस्ता कुठल्या तरी dead end ला संपत असे. यासाठी कोणाला जबाबदारसुद्धा ठरवता येत नसे. तसे करता आले तर मार्ग सोपा होता, मनाचं समाधान होतं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे focussed संघर्ष करता येतो. माझा ना मार्ग सोपा झाला, ना मनाला समाधान लाभलं, ना संघर्ष करता आला. संघर्ष करायला प्रत्यक्षात काही तरी लागतं, कोणी तरी लागतं. तसं काहीच नव्हतं. मग संघर्ष कसा करणार?
नोकरी करू लागल्यावर स्वाभाविकपणे आयुष्याचा पुढचा थांबा म्हणजे लग्न, संसार. सगळ्यांची आणि माझीही तीच भावना होती. बाकीच्यांनीही त्यासाठी प्रयत्न केले आणि मीही. परंतु कोणालाही यश मिळालं नाही. अन हे वारंवार घडलं. एक प्रकारचं वैफल्य मनात भरत गेलं. बरं यावर उपाय काय तेही कळत नव्हतं. अनेक सुमार लोकांचे सुद्धा संसार उभे राहतात आणि आपल्या नशिबी का नाही, हा प्रश्न पिच्छा पुरवू लागला. लहानपणी खेळताना गमवावा लागलेला एक डोळा हेही त्यातील एक कारण होतं. पण त्याला मी किंवा कोणी काय करू शकत होतो? कुठे अन कसा न्याय मागणार होतो? कोणाविरुद्ध न्याय मागणार होतो? अन न्याय देणाऱ्याने तरी काय न्याय दिला असता? लग्न ही दोन व्यक्तींच्या मनापासून दिलेल्या होकारातून साकारणारी गोष्ट असते. कोणी मला स्वीकारले पाहिजे असे कसे म्हणता येईल? बुद्धिमत्ता, कर्तृत्व, कष्ट, पैसा मिळवणे, समाजात स्थान तेही तरुण वयात, नाव, प्रतिष्ठा, चारचौघांसारखं रूप, गाडी, परिवार. असं सगळं असून जीवनसाथी मिळू नये याची बोच तर मनाला होतीच पण माणूस म्हणून ती गरजही होतीच. मी काही साधू म्हणून जन्माला आलो नव्हतो.
अन बिघडलेल्या मनात सगळ्या गोष्टी एकत्रितपणे तांडव करू लागल्या. प्रचारक म्हणून जाऊ शकलो नाही, अन संसारही नाही. मग एक दिवस रामकृष्ण आश्रमात गेलो. तिथल्या एका साधू महाराजांशी बोललो. मला आश्रमात दाखल होता येईल का विचारले. पण तोवर आश्रमात प्रवेश मिळण्याची वयोमर्यादा मी ओलांडली होती. वयाच्या तिशीच्या शेवटच्या टप्प्यात मी समाज, संसार वा संन्यास या तिन्हीसाठी नालायक ठरलो होतो. कोण होणार आहे मी? माझ्यासाठी नेमकी कोणती भूमिका नियतीने निश्चित केलेली आहे? कशासाठी आहे माझा जन्म? आयुष्याची स्थिरता कुठे लाभणार? असे प्रश्न भुंगा होऊन मागे लागत. काही सुचत नसे.
या सगळ्यात नोकरी आणि संस्कार भारती ही दोन कामे सुरू होती. मुख्य म्हणजे मनातील खळबळ त्या कामांमध्ये कुठेही अडथळा ठरत नव्हती. मनाचा तेवढा निग्रह होता. याच काळात मन:शांतीसाठी म्हणा की स्वभाव म्हणून म्हणा किंवा अन्य काही, पण नियमितपणे रामकृष्ण आश्रमात जाऊ लागलो. एक तर जातायेता आश्रम रस्त्यात होता. घरी जाऊन तरी काय करायचे हाही प्रश्न होता. त्यापेक्षा एकादशीला आश्रमातील रामनाम संकीर्तन बरं वाटत असे. किंवा दर सोमवारी तेलंगखेडीच्या कल्याणेश्वर मंदिरात संध्याकाळी शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करत बसणे सुखाचे वाटत असे. मनाचे शांतवन या जागांवर होत असे. मनातील खळबळ, मनातील आंदोलने, वैफल्य, संताप; सगळं मंदिराच्या वा आश्रमाच्या पायरीवर बसून मनातल्या मनात चालत असे.
याच साखळीत केव्हा कसे मनात आले ठाऊक नाही पण वाटले की, गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने करावीत. त्याचा काही उपयोग होईल. आयुष्य रुळावर येईल. किती करावी आवर्तने? मनाने उत्तर दिले २१ हजार. सहज हिशेब केला तर, रोज २१ आवर्तने केल्यास तीन वर्षात होतील असा हिशेब झाला. त्यात कठीण काही नव्हतं. मग नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात रोज जाणे आणि २१ आवर्तने सुरू झाली. पाहता पाहता तीन वर्षे झाली. अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत सांगितल्याप्रमाणे, सहस्र मोदकांचा नैवेद्य आणि त्याचे वितरणही केले. परंतु गोडी अशी लागली होती की, आवर्तने पुढेही सुरू राहिली. त्या मंदिरातील पुजारी आणि काही लोकही सांगत की, डोळे मिटून बसलो की, थोड्याच वेळात शरीर डोलू लागत असे इत्यादी. मलाही अनुभव येत असे की, दिवसाच्या अन्य वेळेतही, कधीही कुठूनही अथर्वशीर्ष सुरू होऊन जात असे. सकाळी झोपेतून उठताना मनात अथर्वशीर्ष म्हणतच उठत असे.
एक गोष्ट मात्र निश्चित की; रामकृष्ण आश्रम असो, कल्याणेश्वर मंदिर असो, टेकडी गणेश मंदिर असो; कुठेही हात जोडल्यावर काहीही मागितले नाही. असं काही मनाशी ठरवलं होतं वगैरे नाही म्हणता येणार. मात्र हात जोडले, डोळे मिटले की पूर्ण शून्य होत असे. जप करताना, आवर्तन करताना, पायरीवर टेकलो की; कधीकधी मनाची खळबळ होत असे पण नमस्कारासाठी हात जोडल्यावर नाही. या काळात मनाची अपार अस्वस्थता असूनही व्यसनांकडे मात्र वळलो नाही. तो विचारही मनात आला नाही. आजूबाजूला तसे मोह नव्हते असं नाही. पत्रकारितेत त्यांचं नावीन्यही नाही. पण अपवाद म्हणून सुद्धा कोणत्याही व्यसनाकडे लक्ष गेलं नाही.
दिवस सरत होते. नोकरी, संघटना, घर, देवळे, वाचन सुरू होतं पण सोबतीला मनाची अपार अस्वस्थताही होती. स्वस्थता म्हणून नव्हती. ही अस्वस्थता कोणालाही जाणवत नाही याचं दु:खही होतं. अनेकांना परिस्थिती माहिती होती पण हा आता यातच स्थिर झाला आहे. याच्या आयुष्याची नदी अशीच वाहत राहणार आहे असं जणू त्यांनी गृहीतच धरलं असावं. दुसरंही कारण असावं की, प्रत्येक जण आपापल्या मार्गाला लागला होता. कोणाला फुरसत होती माझ्यासाठी? आयुष्यात ज्यांचं स्थान अन्य कुणीही घेऊ शकत नाही त्या आईवडिलांपर्यंत सुद्धा माझी अस्वस्थता पोहोचत होती का? मला वाटते नव्हती पोहोचत. यातील कोणीही, घरचे वा मित्रमंडळी वाईट होते का? नक्कीच वाईट नव्हते. पण आमच्यातला कनेक्ट खंडित झाला होता. माझं मन त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं अन त्यांचं माझ्यापर्यंत. अन पोहोचलं असतं तरीही काय? काय उपाय होता त्यांच्याकडे तरी? कदाचित काहीच मार्ग नाही म्हणूनही सगळे निमूट असतील. एक मात्र खरं की, मनाची अस्वस्थता वाढतच होती. मनातले गुंते वाढत होते. अधिक गुंतत होते. ईश्वराला प्रार्थना करूनही मागत काही नव्हतो, याचा अर्थ काही नको होते असा नव्हता. पण मागू शकत नव्हतो. तसेच दुसराही विचार होता की, काहीही मागायचे नाही. ईश्वराशी सौदेबाजी करायची नाही. हात पसरायचे नाही. तो सर्वांतर्यामी आहे तर त्यानेच जाणायला हवे आणि त्यानेच आपणहून प्रसाद द्यायला हवा. पण तसे होत नव्हते.
आपण असं काय पाप केलं आहे की, आपली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचू नये? आपण इतकं काय वाईट आहोत की, आपलं मन कोणापर्यंत पोहोचू नये? आपण इतकं काय कोणाचं घोडं मारलंय की, आपल्याला आयुष्य नाकारलं जावं? आईवडिलांचे आशीर्वाद आणि मुलासाठी त्यांनी केलेल्या प्रार्थनाही वाया का जावेत? येता जाता हेच प्रश्न पिंगा घालत. यातूनच एक दीर्घ महासंघर्ष घडून आला.
('माझा आध्यात्मप्रवास - देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या पुस्तकाच्या 'मागोवा' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा