सारं काही कालप्रवाहात विरून जातं, पण हा कालप्रवाहसुद्धा ज्यात लय पावतो असं ते एकमेवाद्वितीय तत्त्व आहे. मग थोडं थोडं लक्षात येऊ लागलं 'ईशावास्यमिदं सर्वम' म्हणजे काय. हळूहळू चिंतन सुरू झालं. मनात आलं, देव कधी अस्तित्वात आले असतील? आजच्या देवता कधी अस्तित्वात आल्या हे प्राचीन काळाचे अभ्यासक सांगत असतात. वेदकालीन देवता आणि आजच्या देवता वेगळ्या आहेत. मंदिरे इत्यादीदेखील त्या मानाने अलीकडची. त्या वेदकाळाच्या आधी काय होते? काही तर असणारच. किमान वेदांच्या आधी माणूस होता. त्यानेच वेद जन्माला घातले. मग ती माणसे, त्यांच्या आजूबाजूचा निसर्ग, या विश्वातील दृश्य आणि अदृश्य गोष्टी, सूर्य चंद्र तारे; हे कुठून आले असतील? हे सारेच त्या एका तत्त्वातून आकारास आले. मग ध्यानी आले की, ते एक तत्त्व आकलन होणे ही जर अध्यात्माची सर्वोच्च अवस्था असेल तर त्याचा लौकिकातील देव आदी गोष्टींशी संबंध नाही. लौकिकातील देव, धर्म, कर्म इत्यादी हे त्याच प्रवासातील थांबे असतात. कोणी थांब्यावर थांबत असतील, विश्रांती घेत असतील; कोणी घेत नसतील. मुळात हा प्रवास इत्यादी सुद्धा समजून घेण्याचा माणूस प्रयत्न करतो आणि जसं समजेल तसं सांगतो. पण ते तसंच असतं का? किंवा सगळ्यांचा प्रवास तसाच असतो का? असेल का? या प्रश्नांना काहीही उत्तर नाही.
मग ज्याला आपण आयुष्य म्हणतो, जीवन म्हणतो; ते तरी कळतं का आपल्याला? जीवनाच्या या संघर्षाचा काय अर्थ आहे? विचार या दिशेने जाऊ लागले. अमुक दिवशी मी जन्माला आलो. खेळलो, बागडलो, जेवलो, झोपलो, शिकलो, नोकरी केली, व्यवसाय केला, उपक्रम केले, हसलो, रडलो, सामाजिक संस्थांमध्ये काम केलं, पुरस्कार मिळाले, धावपळ केली, आराम केला, धडपडलो, आजारी पडलो; काय अर्थ आहे या सगळ्याचा? कधीतरी हे जग सोडून निघून जाईल. कशासाठी हे सगळं? लोक या जीवनात रमत असतात. मी नाही रमत. काय कारण असावं? प्रत्येक टप्प्यावर माझी गाडी अडवली गेली म्हणून माझी रुची संपली का? मुळात आयुष्याची गाडी अडवलीच का गेली? बाकीच्यांना कुठे ना कुठे वाट मिळाली. त्यांना ती त्यांची वाट वाटली. ती वाट चालणे हा त्यांच्या जगण्याचा अर्थ झाला. माझ्या जगण्याचा अर्थ काय? मला माझी वाट का सापडली नाही? जगाची वहिवाट मला आपली का वाटत नाही?
विवेकानंदांचा ज्ञानयोग वाचताना आलेल्या अनुभवानंतर, हे सारे प्रश्न तर होतेच, पण त्यांची बोच कमी झाली होती. कारण या प्रश्नांची उत्तरे मिळाली काय वा न मिळाली काय, माझे आदी आणि अंत समजले होते. त्या आदी आणि अंताच्या मधला प्रवास कसा आहे, जसा आहे तो का; याची उत्तरे माझ्याकडे नाहीत. परंतु त्यांची उत्तरे माहिती होऊनही काय साधणार? ती उत्तरे मिळाल्याने काही बदल होणार आहे का? मुळात या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे असू शकतात का? या अस्तित्वाच्या समुद्रावर उठणाऱ्या असंख्य लाटांपैकी मी एक लाट. खरं तर लाटही नाही. तरंग फक्त. हे तरंग का उठतात, माझा तरंग का उठला, पहिला तरंग कधी कुठे का उठला असेल? काय सांगणार? कुठल्या तरंगाने कोणत्या तरंगाला जन्माला घातले? कोणत्या तरंगाने कोणत्या तरंगाला गिळून टाकले? कसं समजणार? कसं शोधणार? कसं सापडणार? अमुक तरंग आधीचा की तमुक तरंग आधीचा? बी आधी की वृक्ष? कोंबडी आधी की अंडं?
या तात्त्विक प्रश्नांच्या सोबतीने व्यवहाराचं निरीक्षण सुरू झालं. असंख्य व्यावहारिक प्रश्न असतात की ज्यांना काहीही उत्तर नसते. अमुक व्यक्ती आपल्याशी वाईट का वागली किंवा वागते, याला काय उत्तर असू शकते? त्या व्यक्तीचा स्वभाव हे काही उत्तर होऊ शकत नाही. त्याचा तो स्वभाव का? याचे काय उत्तर देणार? बरे; त्या व्यक्तीची परिस्थिती, त्याला आयुष्यात आलेले अनुभव, अन्य काही त्रास वा समस्या; हे उत्तर दिले तरीही, ते का? याला काय उत्तर असू शकेल? त्या व्यक्तीचा स्वभाव याऐवजी, तो दुष्ट आहे असं उत्तर दिलं तरीही, का? हा प्रश्न उरतोच. एखादे वेळी एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तरी, त्या विषयाची दुसरी बाजूही असू शकते हेही लक्षात येऊ लागले. हळूहळू लक्षात येऊ लागले की, पुष्कळदा आपल्या हाती काही नसते. अन त्यापुढे हेही लक्षात येऊ लागले की, आपल्या हाती काहीही नसते. मला आयुष्यात जे काही मिळालं असेल ते किंवा जगात ज्या लोकांना यश, कीर्ती, पैसा, प्रेम इत्यादी गोष्टी प्राप्त झाल्या असतील त्यांनाही; केवळ स्वतःच्या भरवशावर सारे काही मिळत नसते. त्याला मिळणारी परिस्थिती, त्याला मिळणारे सहकार्य इत्यादी त्याच्या हाती नसते. एखादी व्यक्ती काही निर्णय घेते किंवा घेत नाही, ते तरी त्या व्यक्तीच्या हाती असते का? 'निर्णय चुकला' किंवा 'निर्णय बरोबर होता' हे त्या निर्णयाचे परिणाम आल्यावर ठरत असतं. मुद्दाम चुकीचे निर्णय तर कोणीच घेणार नाही ना?
तीच गोष्ट लक्षात येणे, समजणे अशा बाबींचीही. कधी एखाद्याला एखादी गोष्ट लक्षात येऊ शकते, कोणाला नाही. कोणाला एखादी गोष्ट जमू शकते, कोणाला नाही. एकीकडे असे सगळे विचार मनात सुरू होते आणि दुसरीकडे निरीक्षण वाढत होते अन सूक्ष्म होत होते. यात रोजच्या घटनांपासून राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, गुन्हेविषयक; देशी व विदेशी; स्त्रिया व पुरुष; असे सगळे पैलू होते. अन लक्षात येत गेले की, माणूस समजतो तितका स्वतंत्र वगैरे नाही. नियतीच्या हातातील बाहुलंच आहे. त्याच्या हाती काही असेल तरी ते फार थोडं असेल.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा