शनिवार, २९ मे, २०२१

एकात्म मानववाद (१)

 

भारताच्या केंद्रस्थानी आज भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. देशभरात अनेक राज्यांमध्येही भारतीय जनता पार्टी सत्तारूढ आहे. आपल्या पक्षाचा वैचारिक आधार म्हणून भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद' स्वीकारला आहे. त्यामुळे अनेकांच्या कानावर `एकात्म मानववाद' हे शब्द पडले आहेत. सत्तारूढ पक्षाचे वैचारिक दर्शन असल्याने प्रसार माध्यमात तो विषय येतो. लोकसभा टीव्हीसारख्या सरकारी प्रसिद्धी माध्यमात त्यावर कार्यक्रम प्रसारित होतात. हे स्वाभाविकच आहे. परंतु `एकात्म मानववाद' म्हणजे नेमके काय? काय आहे हा `एकात्म मानववाद'? हे मात्र फारसे चर्चेचे विषय नसतात. एकूण `एकात्म मानववाद' याचं आकलन फारसं नाही हे वास्तव आहे. भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद' म्हणजे `अंत्योदय' असं सोपं, सुटसुटीत समीकरण केलं आहे. ते योग्य तर नाहीच, पण घातकही आहे. फारशी साधकबाधक चर्चा आजवर झाली नसल्याने स्वाभाविकच `एकात्म मानववाद' याबद्दल गैरसमज आहेत आणि आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावून त्यावर टीकाटिप्पणीही होत असते. एकात्म मानववादाचा अंत्योदयाला विरोध नाही. पण एकात्म मानववाद म्हणजे अंत्योदय असे म्हणणे, हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विशाल विचारांना मर्यादित करण्यासारखे होईल. एवढेच नव्हे तर त्यातून संभ्रम उत्पन्न होईल. विशेषत: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संदर्भात ते योग्य ठरणार नाही. शब्दांच्या बाबतीत तसाही नेमकेपणा असला पाहिजे. पंडितजी तर याबाबतीत आग्रहीच होते. `सही शब्द, सही अर्थ' या शीर्षकाचा त्यांचा एक लेखच आहे. उदाहरणादाखल त्यांनी धर्म, राष्ट्र, संस्कृती इत्यादी शब्दांची त्यात चर्चा केली आहे. योग्य शब्द न वापरल्याने प्रथम वैचारिक स्तरावर आणि त्याच्या परिणामी सामाजिक स्तरावर गोंधळ निर्माण होऊन त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात. एकात्म मानववादालाही हे सूत्र लागू होते. त्यामुळेच एकात्म मानववाद म्हणजे अंत्योदय असे समीकरण चुकीचे, अयोग्य आणि संभ्रम उत्पन्न करणारे ठरते. त्यामुळेच त्याचा त्याग करायला हवा. एक तर `अंत्योदय' हा शब्द दीनदयाळजींनी वापरलेला नाही. हा शब्द प्रथम वापरला महात्मा गांधींनी. पण तो त्यांचाही मूळ शब्द नाही. रस्किनच्या unto this last या कल्पनेचे त्यांनी केलेले ते भाषांतर आहे. शब्द म्हणून त्याचा हा इतिहास आहे, अन भावना म्हणून अंत्योदय मानवासोबतच जन्माला आला आहे. जगभरातील सगळ्या साधूसंतांनी, अवतारांनी, महापुरुषांनी, चिंतकांनी, विचारवंतांनी, समाज सुधारकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, कलाकारांनी, साहित्यिकांनी अंत्योदय सांगितलाच आहे. नव्हे तीच साऱ्यांची प्रेरणा राहिली आहे. अगदी समाजवाद, साम्यवाद, सर्वोदय यांनीच नव्हे तर भांडवलशाहीने सुद्धा अंत्योदय मानला आहेच. भांडवलशाहीला तो मनापासून मान्य नसला तरीही विचारांची मांडणी करताना trickle down theory हा एक प्रकारचा अंत्योदय विचार म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अंत्योदय ही काही नवीन अन विलक्षण गोष्ट नाही. अंत्योदय हा मानवी सद्भावांचा हुंकार आहे. त्या अर्थाने अन्य महापुरुषांप्रमाणे दीनदयाळजींनाही अंत्योदय मान्य होता. परंतु त्यांनी त्यासाठी एकात्म मानववाद समाजापुढे ठेवला नाही. अंत्योदय हा एकात्म मानववादाचा एक लहान पैलू आहे. लहान याचा अर्थ कमी महत्वाचा असा नाही. अन एक पैलू म्हणजे संपूर्णताही नाही.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पार्टीचे मूळ रूप असलेल्या भारतीय जनसंघाचे नेते होते. इ.स. १९५१ साली भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचे ते संस्थापक महामंत्री होते. इ.स. १९६७ च्या डिसेंबर महिन्यात कालिकत येथे झालेल्या भारतीय जनसंघाच्या अखिल भारतीय अधिवेशनात ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले. दुर्दैवाने दोनच महिन्यात म्हणजे इ.स. १९६८ च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची रेल्वे प्रवासात निर्घृण हत्या झाली. ते जनसंघाचे महामंत्री असतानाच; १९६५ च्या एप्रिल महिन्यात २२, २३, २४ आणि २५ तारखांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची मुंबईत चार भाषणे झालीत. ती भाषणेच एकात्म मानववाद म्हणून ओळखली जातात. त्यातील पहिले भाषण होते- `राष्ट्रवाद की सही कल्पना', दुसरे भाषण होते- `एकात्म मानववाद', तिसरे भाषण होते- `व्यष्टी, समष्टी मे समरसता' आणि चौथे भाषण होते- `राष्ट्रीय जीवन के अनुकूल अर्थरचना'. ही चार भाषणे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे एक भाषण आणि थोर विचारवंत- भारतीय मजदूर संघ आणि अन्य अनेक अखिल भारतीय संस्थांचे संस्थापक व मार्गदर्शक राहिलेले- भारतीय जीवनदर्शन आणि भारतीय विचारदर्शनाचे भाष्यकार स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे एक भाषण यांचे एक पुस्तक, `एकात्म दर्शन’ या नावाने दिल्लीच्या दीनदयाळ शोध संस्थेने प्रकाशित केले. तो एकात्म मानववादाचा मूळ दस्तावेज. दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येनंतरच्या भारतातील राजकीय घडामोडींनी राजकारण, राजकीय पक्ष एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजजीवनाचे चित्रच पालटून टाकले. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली. ती १९७७ साली उठवण्यात आली आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. स्व. इंदिरा गांधी यांना निर्णायक मात देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष एकत्र आले. या पक्षांनी आपापले स्वतंत्र अस्तित्व विसर्जित करून जनता पार्टीची स्थापना केली. या पक्षांमध्ये भारतीय जनसंघही होता. स्वाभाविकच भारतीय जनसंघ त्याच्या एकात्म मानववादासहित संपुष्टात आला. त्याचे अस्तित्व उरले नाही. ती त्यावेळची गरज होती. परंतु राजकीय महत्वाकांक्षा उफाळून आल्या आणि पूर्वीच्या जनसंघाच्या लोकांना जनता पार्टीतून बाहेर पडावे लागले. या लोकांनी मग ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टी नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला. भारतीय जनता पार्टीने आपला वैचारिक आधार म्हणून `गांधीवादी समाजवाद’ हे तत्वज्ञान स्वीकारले. आपला पक्ष सर्वसमावेशक व्हावा, त्याच्यावर बसलेला `हिंदुत्ववादी पक्ष’ किंवा `संघनिष्ठ पक्ष’ हा शिक्का पुसून टाकणे ही त्यामागील भूमिका होती. मात्र यावरून एक वैचारिक वादळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या संघटना यांच्यात निर्माण झाले. भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ भूमिकेपासून, मूळ विचारापासून दूर गेल्याची मोठी चर्चा झाली. यावर सखोल विचारमंथन झाले आणि भारतीय जनता पार्टीने एकात्म मानववादाला पुन्हा एकदा पक्षाचा वैचारिक आधार म्हणून मान्यता दिली. या सगळ्या घडामोडींचा परिणाम असा झाला की, एकात्म मानववाद हा राजकीय पक्षाचा कार्यक्रम किंवा धोरण असल्याचा समज निर्माण झाला. हा समज संघ आणि भाजपा यांच्या बाहेरील लोकांचा तर झालाच, पण खुद्द संघाचे लोक आणि भाजपचे कार्यकर्ते, समर्थक यांचाही झाला. हा गैरसमज दूर करण्याचे काम सर्वप्रथम `पंडित दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन’ या द्विखंडात्मक ग्रंथाने केले. मूळ मराठीतील हा ग्रंथ इ.स. १९८६ च्या महाशिवरात्रीला पुण्याच्या भारतीय विचार साधनेने प्रकाशित केला. यात पाच विचारवंतांनी वेगवेगळ्या अंगाने एकात्म मानववादाचा मागोवा घेतला आहे. शिवाय स्व. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे एक प्रकरणही आहे. या ग्रंथाला स्व. दत्तोपंत ठेंगडी यांची प्रदीर्घ सुमारे १५० पानांची प्रस्तावना आहे. `एकात्म मानववाद’ स्पष्ट करण्यास हा ग्रंथ मोलाचा आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनाला आता तीन दशकांहून अधिक काळ झाला आहे. या काळात सुद्धा एकात्म मानववाद यावर म्हणावे तसे आणि पुरेशा प्रमाणात मंथन झाले नाही. स्व. दीनदयाळ उपाध्याय यांनी नेतृत्व केलेल्या पक्षाचे अपत्य, आज राजकीय जीवनात मध्यवर्ती स्थानावर आहे. त्यांनी प्रतिपादन केलेला विचार मात्र मध्यवर्ती विचार होण्याचे दूर; विचारांच्या क्षेत्रातही अद्याप अपरिचित आहे. नाही म्हणायला स्व. उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने २०१६-२०१७ साली त्याची थोडीबहुत चर्चा झाली. मात्र ती औपचारिक म्हणावी अशीच. समाजावर त्याचा काही ठसा उमटू शकला नाही.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे- एकात्म मानववाद आहे काय? `एकात्म मानववाद' हे एक वैचारिक दर्शन आहे. दर्शन ते असते जे दृष्टी आणि दिशा देते. म्हणूनच `एकात्म मानववाद' सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था आणि मानवी जीवन यांना दिशा देणारा विचार आहे. तो राजकीय किंवा आर्थिक कार्यक्रम नाही. तो राजकीय, आर्थिक नियोजनाचा आराखडा नाही. निवडणुका, राजकीय पक्ष, निरनिराळ्या नियुक्त्या, कार्यक्षेत्रे, कामाचे वाटप, निधीचे वाटप, आर्थिक रचना, उद्योगांचे स्वरूप इत्यादी गोष्टी त्यात नाहीत. तशी अपेक्षा ठेवून `एकात्म मानववाद' पाहिल्यास निराशाच पदरी पडेल. आपलं conditioning इतकं झालं आहे की, स्वयंपाक किंवा बालसंगोपन सुद्धा नेमक्या सूचनांशिवाय आपण करू शकत नाही. आपल्याला सगळे साचे तयार हवेत. त्यात कच्चा माल ओतून मूर्ती घडवणे एवढेच आपल्याला जमते. दृष्टी, कल्पना आणि हात वापरून मूर्ती तयार करणे आम्ही विसरलो आहोत. पण ही समस्या आपली आहे. त्यामुळे `एकात्म मानववाद' अपुरा वा चुकीचा वा निरर्थक ठरत नाही. आपल्या मर्यादांमुळे आम्हाला त्याचं आकलन होत नाही. `एकात्म मानववाद' सर्व प्रकारच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक रचना, व्यवस्था, त्यातील परिवर्तने यांची दिशा काय असावी हे स्पष्ट करणारे एक विचारदर्शन आहे, एखादा नियोजन आराखडा नाही हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. इ.स. १९६५ ची मुंबईतील जी चार भाषणे `एकात्म मानववाद’ म्हणून ओळखली जातात त्या भाषणांमध्ये धोरण, नीती, आकडेवारी इत्यादी नाही. सरकारी वा गैरसरकारी धोरणांची चिरफाड नाही. वर्तमान वा भूतकालीन संदर्भ हे विषयाच्या स्पष्टीकरणासाठी अन विवेचनासाठी आहेत. मग या भाषणांमध्ये एवढे काय आहे? त्यात मानवी जगण्याच्या अन त्यासाठी उभ्या करण्यात येणाऱ्या व्यवस्थांच्या संदर्भात मुलभूत तात्विक चिंतन आहे. राष्ट्र म्हणजे काय? आधुनिक राष्ट्रकल्पना काय आहे अन ती कशी विकसित झाली? भारतीय राष्ट्रकल्पना काय आहे? दोन्हीतील मूलभूत फरक काय? सुख म्हणजे काय? जीवनाची दृष्टी कशी असावी? राज्य म्हणजे काय? समाज म्हणजे काय? पैशाकडे कसे पहावे? आदर्श काय असावेत? व्यक्ती आणि समाज कसा विचार करतात? अनेक राष्ट्रे संपून का गेलीत? धर्म म्हणजे काय? सत्ता आणि संपत्ती यांची बलस्थाने आणि दुर्बलस्थाने कोणती? त्यांच्या मर्यादा काय? चतुर्विध पुरुषार्थ, मानवाचे स्वरूप; इत्यादी गोष्टींची या भाषणांमध्ये चर्चा आहे.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'एकात्म मानववाद काय आहे?' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा