सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

कावेरीचा विवाद

कावेरी प्रश्न पुन्हा पेटला. तो पहिल्यांदाच पेटलाय असं मात्र नाही. हे व्यवस्थांचं अपयश आहे. याचे दोन अर्थ होतात. १) विद्यमान व्यवस्था तोकडी आहे आणि ती बदलायला हवी. २) केवळ व्यवस्था करून प्रश्न सुटत नाहीत.

ज्यावेळी कावेरी पाणीवाटपाची व्यवस्था केली गेली तेव्हा ती पुरेशीच होती. म्हणूनच ती स्वीकारण्यात आली. मग व्यवस्था असूनही प्रश्न का निर्माण होतात? कारण कोणतीही व्यवस्था हा प्रश्न सोडवण्याचा एक भाग आहे. एकमेव भाग नव्हे, हे लक्षात घेतले जात नाही. व्यवस्था, परिस्थिती आणि माणूस हे तीन घटक मुख्यत: असतात. त्यातील व्यवस्था याच घटकाची खूप चर्चा होते. त्यावरच वेळ, पैसा, नियोजन सगळे खर्च होते. कारण ते सोयीचे असते. त्यामुळे खापर फोडण्यासाठी एक हक्काची जागा मिळते. सगळ्या सामाजिक वा अन्य प्रश्नांची हीच गत आहे. कारण परिस्थिती आपल्या हाती नसते आणि `माणूस' घडवणे किचकट, वेळखाऊ आणि काही प्रमाणात बेभरवशाचे व अगम्य काम आहे. ती धीराची व्यामिश्र प्रक्रिया आहे. त्यापेक्षा सोपेसोपे व्यवस्था तयार करणे किंवा तिच्या नावाने बोटे मोडणे, हेच आपण स्वीकारतो.

दीर्घकालीन भल्यासाठी मात्र `केवळ व्यवस्थेने प्रश्न सुटत नाहीत' हा मंत्र वारंवार जपण्याची गरज अशा वेळी जाणवते.

- श्रीपाद कोठे

१३ सप्टेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा