संघाची असहिष्णूता, विरोधी विचारांची गळचेपी यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सहज काही गोष्टी मनात आल्या. नागपूर हे संघाचे मुख्यालय. काहीही झाले की, नागपुरातून आदेश आहे का? अशी विचारणा होते. याच नागपुरात `तरुण भारत' नावाचे एक दैनिक वृत्तपत्र आहे. ते संघाचे मुखपत्र आहे असे लोक समजतात. त्या दैनिकाने लेखक, विचारवंत म्हणून ज्यांना समाजात मान्यता मिळवून दिली; त्यातील तीन नावे- दिवंगत भा. ल. भोळे, श्री. सुरेश द्वादशीवार, डॉ. भाऊ लोखंडे. हे तिघेही ज्येष्ठ लेखक, विचारवंत पूर्वीही कधी आणि आताही संघाचे दुरान्वयेही समर्थक वा हितचिंतक नव्हते, नाहीत. संघाच्या मुखपत्राने मात्र त्यांचे स्तंभ अथवा अन्य लेखन आवर्जून आणि कधीकधी मागून घेऊन प्रसिद्ध केले. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस `तरुण भारत'चे अध्यक्ष असताना संघाशिवाय अन्य लोकांचे लेख, त्यांच्या बातम्या छापायला हव्यात यासाठी किती आग्रही होते हे सर्वपरिचित आहे. बरे, हा फक्त इतिहास आहे का? तर नाही. आजच्या घडीला संघाला पाण्यात पाहणारी आणि सोशल मीडियावर सतत संघाविरुद्ध आघाडीवर असणारी दोन नावे आहेत- अतुल अच्युतराव सोनक आणि अरुणाताई सबाने. तरुण भारतने यांचेही स्तंभ चालवले आहेत आणि आजही त्यांचे लेखन तरुण भारत प्रसिद्ध करीत असते. एवढेच कशाला, आज तरुण भारतचे संपादक असलेले (नेमके designation मला लक्षात नाही. पण पहिल्या तीनमध्ये असलेले) श्री. श्याम पेठकर हे तर तरुण भारतात कार्यरत आहेत आणि सतत लिहित असतात. ते दुरान्वयानेही संघाचे समर्थक वा हितचिंतक नाहीत. त्यांचे मित्रमंडळ, त्यांची उठबस असलेले लोक, त्यांचे विचार आणि त्यांचे लिखाण सगळ्यांना ठाऊक आहे. ही काही नावे फक्त उदाहरण म्हणून आहेत. या नावांशी माझे कोणतेही शत्रुत्व नाही. उलट, सगळ्यांशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. याबाबतीत आणखीन एक मी नक्की सांगू शकतो की, संघाचे समर्थक वा हितचिंतक यांना `तरुण भारत'ची ही भूमिका अनेकदा पटत नाही. आवडत नाही. अनेकदा ते त्यामुळे नाराजही असतात. तरीही `तरुण भारत'च्या सुरुवातीपासून अगदी आजच्या क्षणापर्यंत ही भूमिका सतत राखण्यात आली आहे. कमीअधिक प्रमाणात देशभरातील संघप्रेरणेने चालणाऱ्या प्रसार माध्यमात हेच चित्र आहे. संघाच्या मुख्यालयातून काही संदेश जात असेल तर तो हा आहे.
याउलट- १९९७ साली देश स्वातंत्र्याची सुवर्णजयंती साजरी करीत असताना, मी लोकसत्ता दैनिकात वर्षभर लिहिलेल्या, विदर्भातील स्वातंत्र्य संग्रामावरील स्तंभाचा ३६ वा किंवा ३७ वा लेख थांबवण्यात आला होता. कारण काय? तर तो लेख होता, महात्मा गांधी यांनी वर्धेच्या संघ शिबिराला दिलेल्या भेटीवरील. संघाची गांधीविरोधी प्रतिमा रेटायची असेल तर हे करणे भागच ना? मीही भूमिका घेतली- माझा तो लेख छापाल तरच पुढील मालिका चालवायची. त्याला नकार मिळाल्याने ५२ भागांची मालिका मध्येच मी थांबवली. असे वेगवेगळे खूप अनुभव आहेत. खूप व्यक्तिगत होईल म्हणून ते टाळतो. फक्त एक उल्लेख मात्र करतो. दिवंगत नरेंद्र दाभोळकर या भल्या माणसानेही संघ वा हिंदुत्व यावरील माझा लेख प्रसिद्ध करायला मला व्यक्तिश: स्वच्छ आणि स्पष्ट नकार दिला होता.
यावर वेगळे काही म्हणणे आवश्यक आहे?
- श्रीपाद कोठे
नागपूर
७ सप्टेंबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा