गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

समाज म्हणजे काय?

आपण समाज, समाज म्हणतो तो काय असतो? कसा असतो? काळा की गोरा? लठ्ठ की रोडका? अन हे प्रश्न मी विचारतोय- तुमच्या माझ्यासाठी. आज सगळ्यात जास्त धोकादायक जर काही असेल, सगळ्यात जास्त त्रासदायक जर काही असेल, सगळ्यात जास्त चिंताजनक जर काही असेल; तर ते आहोत तुम्ही आम्ही. दोन वेळ भरपेट जेवण, दोन वेळ नाश्ता, अनेकदा चहा, जायला यायला गाड्या, राहायला घर, घरात पुस्तके, इंटरनेट, शिकले सवरलेले, ग्रंथालये कोळून पिणारे, रोज गळणाऱ्या टीव्हीतून ज्ञानामृत प्राशन करणारे तुम्ही आम्ही हा खरा धोका आहे. ज्यांना हे सारे उपलब्ध नाही ते ना त्रासदायक आहेत ना धोकादायक.

गुडगावच्या शाळेत एका विद्यार्थ्याचा जीव जातो. त्या प्रकरणाचे सत्य समाजापुढे आणण्यासाठी पत्रकार त्याच्या घरी पोहोचतो. डोळ्यात पाणी येणे स्वाभाविकच. त्याच्या आईशीही बोलतो. अन तिथेच उभे राहून, खोलीच्या बाहेरही न येता- सरकारला, मुख्यमंत्र्यांना, शाळा प्रशासनाला प्रश्नांवर प्रश्न विचारत सुटतो. या वा अशासारख्या घटना सरकार, मुख्यमंत्री, शाळा प्रशासन यांच्या भरवशावर सुटू शकतात का; हा प्रश्न तूर्त बाजूला ठेवू. पण त्यांना विचारावयाचे प्रश्न तरी किमान कुठे उभे राहून विचारायचे याचे भान न ठेवणारा पत्रकार म्हणजे समाज? तरुण तेजपाल विमानाने जातो आहे. त्याच्या मागे धावणारी पत्रकार; हवाई सुंदरीने बाजूला करूनही त्याचा पिच्छा सोडायला तयार होत नाही. हा समाज? परंपरानिष्ठ तरुणांनी valentine day ला भेटकार्डाच्या दुकानावर दगडफेक केली किंवा गौरक्षकांनी उत्पात केला तर; तुमचा कायद्यावर विश्वास नाही का? कायदा हातात का घेता? असा रोकडा सवाल करणाऱ्या प्रसार माध्यमांनी कायद्यावर विश्वास नसल्यासारखे वागणे आणि त्यावर काहीही न बोलणे म्हणजे समाज? जबाबदार फक्त शासन, प्रशासन? शालेय विद्यार्थ्यांमध्ये बेजबाबदारपणे वागण्याची इच्छा जागवणाऱ्या जाहिराती आणि त्या करवून घेणारे उत्पादक, तसेच दूरगामी परिणामांचा विचार न करता `गंमत हो' म्हणून त्याचे समर्थन करणारे पालक; या सगळ्यांना काहीच जबाबदारी नसणे म्हणजे समाज?

@@@@@@@

मेधा खोले नावाच्या एका महिलेने जी काही तक्रार केली; त्यासाठी हातची कामे सोडून गोंधळ माजवणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? कायद्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे काय करायचे असते हे न समजणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? व्हायचे ते होईल ना त्याचे. त्यासाठी आपापसात लाथाळी करणारे, भूमिका घेणारे, कधी थेट शिवीगाळ करणारे किंवा ते फार वाईट दिसेल म्हणून विनोदाची शाल पांघरून कुचाळक्या करत, आपल्या मनातील न गेलेली जात दाखवून देणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? प्रथा, परंपरा, रूढी, मान्यता, श्रद्धा, व्यवहार आणि कायदे, नियम आदींचा संबंध, अनुबंध इत्यादीवर पाच मिनिटेही गंभीर विचार करण्याची क्षमता आणि पात्रता नसलेले तुम्ही आम्ही म्हणजे समाज? आदर्श विचार, व्यवहार हा पांढऱ्यावर काळे करण्याचा विषय नाही आणि पांढऱ्यावर काळे करून तो साधताही येत नाही. तो जगण्याचा विषय आहे. मन मोठं, सखोल, व्यापक होणं म्हणजे आदर्श होत जाणं. एखाद्याला शिक्षा देऊन अथवा तो वाईट वागला म्हणून टीका वा टवाळी करून त्याचं मन मोठं आणि शुद्ध होईल का; हा प्रश्नही न पडणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? अन अमुक कोणी असा वागला असं म्हणताना, मागच्या क्षणापेक्षा या क्षणी मी व्यापक, शुद्ध, समजदार झालो आहे हे स्वत:ला सांगणे ही देखील माझी जबाबदारी असते; याचे भानही नसणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? षड्रिपूंमध्ये फक्त काम आणि क्रोध एवढेच नाहीत; लोभ, मोह, मद, मत्सर हेही आहेत. हे सारे कमी करत जाण्याऐवजी वाढवण्यातच आयुष्य घालवणारे आणि झुंडीलाही त्यात काहीही वावगे वाटत नसल्याने त्याचे समर्थन करीत राहणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? मेधा खोले यांच्यापेक्षा आपणही फार वेगळे नाही आहोत हे समजण्याची लायकीही नसणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज?

@@@@@@@@@

गौरी लंकेश यांच्याविषयी हळूहळू जे बाहेर येत आहे त्यावरून त्या बाईंचा वकूब फारच सुमार होता आणि वृत्तीही चांगली नव्हती हे सिद्ध होते. जीएसटीच्या विषयावर चर्चा सुरु असताना वापरलेले sanitary napkins पंतप्रधानांना पाठवण्याची भाषा बोलणारी स्त्री सभ्य म्हणायची का? अशी भाषा उद्या मी वापरली तर?? की भाजप, संघ, हिंदुत्व यांना विरोध करणारे कोणीही फक्त योग्यच असतात? दुर्दैवी हत्याकांडाचे दु:ख मलाही आहे, तुम्हालाही आहे. दुर्दैवी हत्याकांडाची चिंता मलाही आहे, तुम्हालाही आहे. माझा सवाल एवढाच की, दुर्दैवी हत्याकांडामुळे हलकटपणाकडे दुर्लक्ष करायचे का? समाज काय असतो? कोणत्या तरी सोयीच्या घटनेचा आडोसा घेऊन हलकटपणाकडे दुर्लक्ष करणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज?

@@@@@@@@@@

या सगळ्याला थेट भिडल्याशिवाय आणि ते भिडताना स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची खोड टाकून दिल्याशिवाय तुम्हाला मला हवे असलेले चित्र तयार होणार नाही एवढे मात्र निश्चित.

- श्रीपाद कोठे

नागपूर

९ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा