रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

महागाई

दारावर नेहमी येणाऱ्या भाजी विक्रेत्याला आज विचारले, आपल्या वस्तीत भाजी व्यवसाय करणारे किती जण असतील? म्हणाला, पुष्कळ आहेत. पण सध्या दहा असतील. भाज्या महागल्याने कमी झाले. भाज्या उतरल्या की वाढतील पुन्हा. त्याच्या उत्तरावरून स्पष्ट आहे की, महागाईने केवळ ग्राहक कमी होत नाहीत तर व्यवसाय करणारे, म्हणजेच रोजगारही कमी होतात. महागाई वाढत जाणे हे अर्थशास्त्राच्या अंगानेही योग्य नसते. दुर्दैवाने महागाई न वाढवणारा अर्थविचार जग आणि तज्ञ म्हणवणारे करत नाहीत.

- वाढू द्या हो महागाई. गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यालाच चार पैसे मिळतील ना. असा युक्तिवाद करणारे भाबडे असतात असेच म्हटले पाहिजे. भाज्या पाच रुपये, दहा रुपये किलो असण्याचे वास्तव अनेकांच्या गाठीशी असेल. आज भाज्या ८० रुपये किलोला पोहोचल्या आहेत. म्हणजे किमान आठ पट. शेतकऱ्यांचा पैसा आणि जीवनमान, भाजी विक्रेत्यांचा पैसा आणि जीवनमान तसे वाढले आहे का? किती जणांचे वाढले आहे? दलाल ही एकच समस्या आहे का? मुळात ही समस्या आहे की व्यवस्थेतील त्रुटी?

- शेतकऱ्याला पैसा मिळण्याचा विचार करतानाच; भाजी, धान्य, किराणा आदी गोष्टी; समाजातल्या 'आहे रे' आणि 'नाही रे' या दोन्ही वर्गांसाठी असतात; या वास्तवाचा विचारही हवा की नको?

- नीट, सखोल, साधकबाधक विचार न करता वरवर काहीतरी बोलणे, सुचवणे, करणे; असलेल्या नसलेल्या करुणेचे प्रदर्शन; या गोष्टी टाळणे आपल्याला कधी जमणार?

- श्रीपाद कोठे

५ सप्टेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा