युद्धात विजयी होण्याचा पहिला नियम हा की, युद्धाची वेळ, स्थळ आणि पद्धत आपण निश्चित करायची असते. शत्रूने नाही. शत्रूला हवं तेव्हा, तिथे आणि त्या पद्धतीने युद्ध केल्यास यशाची शक्यता फार कमी असते. शिवाजी महाराजांचा आपल्याला सार्थ अभिमान असतो. त्यांनी वापरलेल्या युद्द तंत्राचं भान आणि थोडा अभ्यासही करायला हवा. अफजलखानाने उभ्या महाराष्ट्रात थैमान घातले असताना, अगदी तुळजा भवानीच्या मूर्तीवर घण घातले असतानाही महाराजांनी आपले फासे हातून सुटू दिले नाहीत. कालपासून जो क्षोभ देशभर उसळलेला आहे तो अतिशय योग्य असला तरीही एक प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे- आम्हाला प्रतिक्रिया हवी आहे की शत्रूचा चोख बंदोबस्त? दुसरी गोष्ट हीही ध्यानात घ्यायला हवी की, देशाची सुरक्षा आणि परराष्ट्र संबंध यांच्यात मोदी सरकार आल्यापासून आमुलाग्र बदल झाला आहे. १९६५ च्या चीन युद्धापर्यंत तर पंडित नेहरू आणि त्यांच्या पक्षाला सक्षम लष्कराची गरजच वाटत नव्हती आणि लालभाईंनी तर उघडपणे चीनला समर्थन दिले होते. अशा लोकांनी जी संरक्षण आणि परराष्ट्र नीती सहा दशके राबवली ती पूर्णत: बदलून भारताला अनुकूल असे निर्णय, त्यांची कार्यवाही, त्याचे परिणाम इत्यादी बाबी खूप गुंतागुंतीच्या आणि सगळ्या प्रकारची शक्ती, बुद्धी आणि युक्ती यांची मागणी करणाऱ्या आहेत. याचा अर्थ पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील सहा दशके लागावीत अथवा लागतील असा मुळीच नाही. मात्र, पाकिस्तान जन्माला घालण्यासाठी जगभरातील कोणी कोणी काय काय केले, त्याला किती काळ आणि तयारी लागली हे विसरू नये. अन ते लक्षात ठेवून पाकिस्तानला संपवण्यासाठी काय काय अन कसे करावे लागेल याचा थोडा विचार करावा. बाकी, जनतेत अशा गोष्टींचा आक्रोश असलाच पाहिजे. जोश के साथ होश भी हो... इतनाही.
- श्रीपाद कोठे
१९ सप्टेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा