शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

अहो प्रसन्न जोशी

प्रसन्ना जोशी परवा जोरजोरात ओरडत होता- पितृत्वाचं काय? पितृत्वाचं काय? विषय होता- नथुराम गोडसे संघाचा होता वा नाही.

अहो प्रसन्ना जोशी (आणि कंपनी) काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? नथुराम गोडसे संघात येत असे म्हणून त्याच्या कृतीचं पितृत्व संघाकडे? अहो, महात्मा गांधी हे हरीलाल गांधी यांचे प्रत्यक्ष पिता होते? मग हरीलालच्या कृत्यांचे पितृत्व महात्मा गांधींना द्यायचे का? का नाही देत ते श्रेय? इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे श्रेय जवाहरलाल नेहरूंचे का? तायनानमेन चौकातील शेकडो विद्यार्थ्यांच्या हत्येचे श्रेय कार्ल मार्क्सच्या झोळीतच टाकायचे ना? स्टालिनने केलेला नरसंहार सुद्धा मार्क्सने तयार केलेल्या वातावरणामुळेच ना? जगभरात इस्लामच्या नावाने थैमान घालून अमाप जीवांची हत्या करणाऱ्या, अगदी कराचीतील १२५ बालकांना अल्लाघरी पाठवण्याची जबाबदारी मुहम्मद साहेबांचीच म्हणायची का?

बरे ते जाऊ द्या. संघाने तयार केलेल्या वातावरणावर तुमचा आक्षेप असतो. ठीक. संघाने तयार केलेल्या वातावरणाने गांधीजींची हत्या झाली. मग एकदोन किंवा दहा वीस नव्हे, तब्बल दहा लाख; पुन्हा सांगतो, तब्बल दहा लाख हिंदूंना यमसदनी पाठवण्यासाठी कोणी तयार केलेले वातावरण कारणीभूत होते? कधीतरी करा ना चर्चा? कराल का? तुम्ही नाही करणार याची खात्री आहे. दहा लाख हिंदूंच्या हत्येचं पितृत्व टाका ना कॉंग्रेसच्या पदरात. की ते १० लाख मृत्यू माणसांचे नव्हते? दखल घेण्यासारखे नव्हते?

इंदिरा गांधी, राजीव गांधी, दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, लालबहादूर शास्त्री, बेनझीर भुट्टो, अब्राहम लिंकन, जॉन केनेडी अशा अनेक हत्यांसाठी कोणी तयार केलेले वातावरण जबाबदार होते? अन गांधीजींची हत्या झाली तेव्हा संघ २३ वर्षांचा होता. गोळवलकर गुरुजी सरसंघचालक होऊन फक्त आठ वर्षे झाली होती. त्यानंतर २५ वर्षे गुरुजी सरसंघचालक होते. अन संघ आता ९१ वर्षांचा आहे. या काळात तसे काही वातावरण का नाही तयार झाले?

अन वातावरणाची एवढी चिंता करता, मग आजकालच्या मुलींच्या परिधानामुळे मुलांमधील लैंगिक गुन्ह्यांचे वातावरण तयार होते असे म्हटल्यावर नाकाला मिरच्या का झोंबतात? की वातावरण निर्मिती फक्त हत्येच्या संदर्भातच होत असते? अन तीही फक्त संघाकडूनच?

जरा जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगत जा हो.

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा