गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

बदलाचे साधन व्हावे

सरसंघचालकांच्या आरक्षण विषयक विधानावरील खा. रामदास आठवले यांची प्रतिक्रिया आज वाचण्यात आली. मला मनापासून ती आवडली. आठवले म्हणतात, `जातीव्यवस्था पूर्ण समाप्त केल्यास आम्ही जातीवर आधारित आरक्षण सोडून देऊ.' यावर दुमत होण्यासारखे काहीच नाही. फक्त मुद्दा आहे की, हे साध्य कसे करायचे? अन हे साध्य झाले हे कसे समजायचे? खरे तर आज जातीव्यवस्था आहे असे म्हणणे हा एक विनोद होय. आज कोणी जातीनुसार व्यवसाय करीत नाही. अनेक विविध जातींचे लोक दुसऱ्या जातींचे समजले जाणारे व्यवसाय करीत आहेत. अगदी ब्राम्हण माणूस केशकर्तनालय चालवतो आहे. काही लोक आपापले व्यवसाय करतात पण त्याची कारणे जातीव्यवस्था नसून अन्य आहेत. जसे- आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सवय, सुलभता, आवड; इत्यादी. मग आज जात आहे कुठे? राजकारण, विविध सवलती, सुविधा, कुटुंबातील काही रीती- आचार- इत्यादी, अन भांडणांची खुमखुमी जिरवण्यासाठी. खाणेपिणे या विषयात जात आता जवळपास नसल्यासारखी आहे. काही अपवाद असतील. त्यात व्यक्तिगत संबंध किंवा धार्मिक व्रत आदी गोष्टी आहेत. पण व्यवस्था म्हणून तर तो विषय मोडीतच निघाला आहे. विवाह हा एक विषय आहे जेथे जात अजूनही महत्वाची ठरते. पण त्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तेथे जबरदस्ती उपयोगाची नाही. कारण सवयी, आवडीनिवडी, वातावरण असे अनेक मुद्दे असतात. जसजसे सामाजिक अभिसरण वाढते आहे विवाह या विषयातील जात हा मुद्दा निवळत आहे. तो अजून निवळेल. १०० वर्षांपूर्वीच्या मानाने समाजाने आज तो बदल समाधान वाटावे एवढा स्वीकारलेला आहे.

मग जात आहे कुठे तर राजकारण, सवलती, सोयीसुविधा आणि मनात. राजकारण, सवलती, सोयीसुविधा या गोष्टी अशा आहेत की त्या बाबतीत जात वा अन्य कोणताही आधार सोडायला कोणी कधी तयार होणार नाही. माणूस खूपच, म्हणजे कमालीचा आदर्शवादी झाला तरच ते शक्य होईल. नजीकच्या काही शे वर्षात तरी ते शक्य नाही. त्यामुळे या बाबतीत कधीतरी थोड्या कठोरपणे चिकित्सा व उपचार करावेच लागतील. दुसरी जागा आहे मन. ती बाब तर पूर्णत: वैयक्तिक आहे. खा. आठवले यांच्यासारख्यांनी स्वत:ला अमुक जातीचे वगैरे मानणे सोडून दिले, आपल्या मनातून ते काढून टाकले की, जातीव्यवस्था तेवढ्या प्रमाणात मोडून पडेल. असे मनातून जात काढून टाकणारे जितके असतील तितकी या प्रक्रियेला गती मिळेल. आज मराठा म्हणा, दलित म्हणा, की अन्य नेते स्वत:च्या मनातून ही भावना काढून टाकतात का? पवार किंवा आठवले किंवा मायावती किंवा लालू किंवा मुलायम किंवा नितीश किंवा जयललिता; आपापल्या मनातून स्वत:ची वा दुसऱ्या कुणाची जात पुसून टाकतात का? जगाला दाखवण्यासाठी नव्हे प्रामाणिकपणे. यासाठी व्यक्तिगत संकल्प हवा. फाटे न फोडता मी स्वत:पासून सुरुवात करेन तर होईल, या निश्चयाने चालावे लागेल. कोण काय करते याची फार चर्चा करण्यापेक्षा मी काय करायला हवे याचा विचार केला तर होईल. ते सगळ्यांनी करावे यासाठी ज्याला जसा प्रयत्न करणे शक्य आहे तसा प्रयत्न त्यांनी करावा. आठवलेंनीही करावा. मग त्यांना कोणाला आवाहन करावे लागणार नाही- आधी जातीव्यवस्था संपवा म्हणून. प्रत्येकाने हव्या असलेल्या बदलाचे स्वत: साधन होण्याचा प्रयत्न करायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २३ सप्टेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा