मोदी पंतप्रधान झाल्यावर, अत्यंत व्यथित झाल्याने अनंतमूर्ती जर भारतात राहू शकत नसतील, तर ते कुठे राहू शकतील? जिहाद वा क्रुसेड यांना अधिकृत मान्यता देणाऱ्या समाजाचे मोठे वास्तव्य असणाऱ्या देशांमध्ये? हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकणाऱ्या देशामध्ये? क्रांतीच्या नावाखाली लाखो लोक मारणाऱ्या स्टालिन, ख्रुश्चेव्ह्च्या देशात? तायनानमेन चौकाची युद्धभूमी करणाऱ्या देशात? अब्जावधी लोकांना ठार मारून टाकणे हाच पुरुषार्थ मानणाऱ्या समाजांसोबत? लोकशाहीचा हवाला देत तेलाचे राजकारण करणाऱ्या देशात? कुठे राहू शकतील ते? गोध्रा आणि गुजरात दंगली ही चांगली गोष्ट नाहीच. पण भारताच्या फाळणीचे काय? केवळ ६५ वर्षांपूर्वी आपलेच १० लाख बंधू भगिनी क्रूरपणे मारल्या गेले होते. ज्या नेहरूंचे गुणगान अनंतमूर्ती करतात त्या नेहरूंच्या नाकर्तेपणामुळे १९४७, १९६२, १९६५ मध्ये जे भारतीय सैनिक प्राणास मुकले, त्याचे काय? हे जग, त्यातील व्यवहार, त्याचे व्यामिश्र स्वरूप, हिंसा-अहिंसा, न्याय-अन्याय, स्वातंत्र्य-समानता, बंधुत्व वगैरे वगैरे बद्दल जे प्रचंड अपुरं, उथळ, पोरकट आकलन बुद्धिवंत म्हणवणार्यांमध्ये आहे ते याचं कारण आहे. युरोपीय विचारांचा पगडा याच्या मुळाशी आहे. क्रिया-प्रतिक्रिया याचा वैज्ञानिक सिद्धांत प्रतिपादन करताना व्यवहारातील त्याचे स्वरूप मात्र समजण्याची यांची तयारीही नसते आणि ताकदही. शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी हा क्रिया-प्रतिक्रिया सिद्धांत खोटा ठरवून उभं राहावं लागतं. त्यासाठी बुद्धीपलीकडील बाबींचं आकलन आणि समज हवी, म्हणजेच आध्यात्म हवं. इहवादी, बुद्धिवादी यांना ते मान्य नाही. त्यामुळे त्यांचं विवेचनही अपुरं राहतं आणि व्यवहार भरकटलेला.
- श्रीपाद कोठे
२२ सप्टेंबर २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा