हिंदुत्व, गुरुजींचं हिंदुत्व, संघाचं वर्तमान हिंदुत्व, हिंदुत्व दुर्बल होऊ नये आदी आदी चर्चा तेजीत आहेत. श्री गुरुजी, विचारधन, (मास मिडिया वाचून चर्चा आणि विचार करणाऱ्यांना हे नाव माहिती नसेल... bunch of thought याचं मराठी नाव आहे `विचारधन'.) श्री गुरुजींची मुस्लिम विषयक भूमिका इत्यादी मोठे विषय आहेत. प्रसंगोपात्त त्यावर लिहीनच. पण श्री गुरुजींची भूमिका चूक होती येथपासून तर संघाने घेतलेली ताजी भूमिका बोटचेपी आणि लांगूलचालन करणारी आहे, निवडणूक समोर ठेवून घेण्यात आलेली आहे; येथवर मते मांडली जात आहेत. या मंथनाला दिशा म्हणून स्वा. सावरकर यांच्या `हिंदुत्व' ग्रंथातील अगदी शेवटला परिच्छेद वाचावा. या परिच्छेदात एका पुस्तकाची असेल नसेल पण एका प्रबंधाची शक्ती नक्कीच आहे. तो परिच्छेद असा-
`हेही तितकेच निश्चित आहे की जेव्हा केव्हाही अशी वेळ येईल तेव्हा हिंदुलोक सर्व जगाला दुसरे तिसरे काही सांगणार नाहीत तर तेच जगाला करावयास सांगतील की जे गीतेने सांगितले, जे बुद्धाने उपदेशिले. ज्यावेळी हिंदू मनुष्य हा हिंदुत्वातीत होतो त्यावेळेला तो शंकराचार्यांप्रमाणे ‘वाराणसी मेदिनी’ म्हणून गावयाला लागतो नि तुकाराम महाराजांप्रमाणे ‘आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास’ असे गर्जून उठतो. काय म्हणता? माझा स्वदेश? ऐका तर, बंधूंनो! माझ्या देशाच्या मर्यादा म्हणजे, त्रैलोक्याच्या मर्यादा. तीच माझ्या देशाची सीमा!'
(स्वा. सावरकर, `हिंदुत्व' या पुस्तकाचा शेवटला परिच्छेद.)
विरोधक, समर्थक हे दोन्ही बाजूला ठेवून एक विनंती करावीशी वाटते; चर्चा आणि वादविवाद किंचित कमी करून वाचन, व्यासंग आणि चिंतन थोडे वाढवले तर समाजाच्या हिताचे होईल. फुकटच्या सल्ल्याबद्दल रागावू नये.
- श्रीपाद कोठे
२५ सप्टेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा