आमच्याकडे दारावर इडली, सांबारवडा विकणारा एक जण येत असे. एवढ्यात दिसत नाही. एक भोपु वाजवत तो फिरायचा. एक जुनी लुना किंवा तसलीच गाडी. त्यावर तीन चार डबे लावून तो फिरायचा. ते ठेवण्याची व्यवस्थाही त्याने केली होती. एकदा तो सायकल घेऊन आला. त्याला विचारलं तर म्हणाला, वो हेल्मेट की झंझट है ना.
आज देशभर असे लाखो लोक आहेत, जे अशी कामे करून जगतात. गाडी outdated झाली वगैरे त्यांना कळत नाही. ते आहे त्या स्थितीतून पुढे जात असतात. बरं त्यांनी प्रत्येक ठिकाणी, चार चार पावलांवर हेल्मेट घाल काढ करावी का? विम्याच्या बाबतीतही तो टाळण्याचा विचार करतो. कारण कमाई तेवढी नसते. मग कपात कुठे कुठे करता येईल याचा तो विचार करतो. काय पुढे ढकलता येईल याचा तो विचार करतो. जुन्या गाड्यांना तर विमा काढणाऱ्यांनीच नकार दिल्याची उदाहरणे आहेत. अन हे सगळं चूक, अयोग्य, अनैतिक नाही.
भाजी वगैरे व्यवसाय करणारे सकाळी भाजी आणायला गाडी (दुचाकी) घेऊन जातात आणि मग ठेल्यावर भाजी विकतात. त्यांच्या गाड्या अशाच असतात. शिवाय हेल्मेटचा प्रॉब्लेम असतोच. घरोघरी दूध देणारे याच प्रकारात येतात.
बरे हेल्मेट नियमित घालणारा माणूसही एखादे वेळी अनवधानाने, घाईघाईत किंवा काही अडचणीमुळे त्याविना गाडीवर असू शकतो. त्यावेळी पोलिसांच्या तावडीत न सापडणे हा त्याच्या नशिबाचा भाग समजायचा का?
हे सगळे शहरी भागात. ग्रामीण भागाचे काय? त्याला विमा काढायला, परवाना नवीन करायला किंवा पियुसी करायलाही गाव सोडून जावं लागतं. घर, घरची कामं, वेळ, सवड, शेतीभाती, पाऊसपाणी, पेट्रोल खर्च असं सगळं पाहून तो निर्णय घेतो.
आपण या सगळ्यांना एका झटक्यात बेजबाबदार, गुन्हेगार वगैरे ठरवायचं का? अन तसं ठरवणं हे आपल्याला कोणत्या पातळीवर उभे करते?
बाकी, अपघात कशाने होतात, कसे होतात? त्याची कारणे? यांचा तर विचार करण्याची गरजच नाही. Soft target सामान्य माणूस बरा. त्याला उठसुठ बोल लावता येतो, अक्कल शिकवता येते, अन वेठीलाही धरता येतं. अन आम्ही सर्वज्ञ असल्याने, सगळ्या जगाच्या भल्याचा मक्ता परमेश्वराने आम्हालाच दिला असल्याने, आम्हाला जे वाटते तेच बाकीच्यांना वाटायला हवे. दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी बाजू असू शकते याचा विचार करणे म्हणजे ईश्वराने दिलेल्या मकत्याचा अनादरच नव्हे का?
तेव्हा असो.
- श्रीपाद कोठे
१९ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा