शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

सरसंघचालकांच्या वक्तव्याच्या निमित्ताने

'हिंदूंनी अशास्त्रीय प्रथांचा त्याग करावा,' या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. अशी चर्चा होण्यात गैर काहीही नाही. पण त्यावरून संघ, हिंदू, डॉ. भागवत यांच्यावर टीकाटिप्पणी व्हावी हे मात्र न समजण्यासारखे आहे. उलट संघ, हिंदू यांना प्रतिगामी, मागास म्हणून हिणवणाऱ्या लोकांनी याचे मनापासून स्वागत करायला हवे. पण त्यासाठी मनाची प्रामाणिकता अन उमदेपणा हवा. तसा तो किती आहे हे या निमित्ताने स्पष्ट होते आहे.

सरसंघचालकांच्या या खऱ्याखोट्या (कारण त्यांच्या ज्या भाषणातील हे वाक्यांश आहेत ते काही जाहीर भाषण नव्हते. अन कोणी पत्रकार प्रतिनिधीही त्याला उपस्थित नव्हते.) वक्तव्यानंतर कथित पुरोगामी अन सुधारणावाद्यांनी आपापल्या याद्या सादर केल्या आहेत. त्यांना जे विषय अशास्त्रीय वाटतात त्यावर संघाची काय भूमिका आहे, किंवा त्या मुद्यांवर संघ का बोलत नाही, संघ मोघम का बोलतो; असेही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. एका कार्यकारी संपादकाने तर संघाने आधी गोळवलकर गुरुजींचे विचार जाहीरपणे नाकारावेत आणि मग बोलावे, असा अतिशय आचरट सल्लाही देऊन टाकला आहे. नेहमीप्रमाणेच, संघ यावर काही प्रतिक्रिया देण्याची शक्यता नाही.

वास्तविक बदल, परिवर्तन ही बाब हिंदू समाजासाठी मुळीच नवीन नाही. हजारो वर्षातील पाचपन्नास वर्षांचा कोणताही कालखंड असा नाही ज्यात हिंदू समाज, रूढी, प्रथा, परंपरा बदलल्या नाहीत. अन असाही कालखंड नाही जेव्हा समाज नेतृत्वाने या बदलांचे स्वागत केले नाही किंवा त्यांना उचलून धरले नाही. हां, एक गोष्ट मात्र निश्चित की, केवळ बदलासाठी बदल, कोणाला वाटतं म्हणून बदल, कोणाला संतुष्ट करण्यासाठी बदल, कायदे वा अन्य दबावाने बदल, बदलांचा गाजावाजा, बदल करताना आवेश अन आक्रस्ताळेपणा करणे, असा आक्रस्ताळेपणा करून बदलाची प्रक्रिया सुकर करण्याऐवजी संघर्ष निर्माण करणे अन कडव्या गटांना जन्म देणे; यासारख्या गोष्टी हिंदूंनी आणि संघानेही टाळल्या आहेत.

ज्ञान विज्ञानाचे वावडे ना संघाला आहे ना हिंदूंना. पण आपल्याला जे अन जसे वाटते, ते अन तसेच प्रत्येकाला वाटते किंवा वाटायला हवे, त्यानुसारच सगळ्यांनी वागायला हवे, तसे वागत नसतील तर ते कुचकामी, अशांचे जगणे अशक्य करून टाकावे; वगैरे परिवर्तनाच्या कल्पना ना संघाच्या आहेत ना हिंदूंच्या. मुळात अशा कल्पना अशास्त्रीय आहेत. अस्पृश्यता वा जातिभेदाच्या संदर्भात संघाने जेवढे काम केले आहे, तेवढे अन्य कोणीही केलेले नाही. पण संघाची स्वत:ची अशी एक शैली आहे अन ती काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली आहे. बाकीच्यांनीही तिचे अनुकरण करावे अशी ती शैली आहे. पण रा.स्व. संघ हे आपल्या देशात `नावडतीचे मीठ' असल्याने ते अळणी ठरवले जाते. त्याला काही इलाज नाही.

सामाजिक प्रथा, परंपरा सतत बदलत असतातच. अगदी ज्या गोळवलकर गुरुजींचा कट्टर म्हणून उल्लेख केला जातो त्यांनीही हे स्पष्ट केले होते की, `हिंदू राष्ट्रवृक्षाची अनेक पाने जुनी झाली आहेत. जीर्णशीर्ण झालेली आहेत, पिकली आहेत. ती गळून जातील. ती गळून जाऊ द्यायला हवीत. त्यात वाईट वाटण्यासारखे, दु:ख करण्यासारखे, शोक करण्यासारखे काहीही नाही. या वृक्षाला नवीन पालवी फुटेल अन तो आपल्या अंगभूत जीवनरसाने पुन्हा बहरून येईल.' स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर, योगी अरविंद, महात्मा गांधी, डॉ. हेडगेवार अशी मालिकाच सांगता येईल ज्यांनी नेहमीच हिंदू समाज काळानुरूप राहावा यासाठी प्रयत्न केले. मुद्दा फक्त एवढाच उरतो की- शास्त्रीय काय अन अशास्त्रीय काय? जे जे जुने ते अशास्त्रीय अशी जर धारणा असेल तर कठीण होईल. किंवा प्रयोगशाळा ही एकच शास्त्रीयतेची कसोटी असेल तर कठीण होईल. किंवा उपयुक्तता हाच शास्त्रीयतेचा एकमेव निकष असेल तर कठीण होईल. सरसंघचालकांना आपापल्या याद्या सादर करणाऱ्यांनी याचाही विचार करायला हवा.

शास्त्रीय याचा अर्थ सगळ्या अंगांचा विचार करून, अभिनिवेशरहित राहून, स्थायी- संघर्षरहित वा कमीत कमी संघर्षाच्या मार्गाने- हारजीत याच्या पलीकडे जाऊन शुद्ध विश्व कल्याणाची दृष्टी ठेवून असा जर घेतला; जो सरसंघचालकांना अपेक्षित असावा; तर अनावश्यक आक्रस्ताळा वादविवाद टाळता येऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १८ सप्टेंबर २०१५

@ Charudatta Jichkar अहो जिचकार, हिंदू धर्म authority ने चालत नाही. अन तुम्हाला हवे म्हणून त्याने तसे चालावे हा दहशतवाद झाला. आधी जरा धर्म, हिंदू, समाज, सामाजिक परिवर्तन वगैरे गोष्टी समजून घ्या नीट. त्यासाठी लोक आपली आयुष्यची आयुष्य लावतात. तुम्ही काही वर्षे तरी लावा अन मग बोला. उगाच पानटपरीवरची शेरेबाजी नका करू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा