रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

जावेद अख्तर यांची धूर्तता

एक ज्येष्ठ कार्यकर्ते, संस्कार भारती विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री आणि माझे मित्र अजयजी देशपांडे यांनी एक व्हिडीओ पाठवला. जावेद अख्तर यांचा. कोणत्या तरी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमातील काही मिनिटांचे क्लिपिंग. राजदीप सरदेसाई नावाचे कथित पत्रकार तो कार्यक्रम संचालित करीत आहेत. गोड शब्द, तर्कपूर्ण पद्धती आणि आक्रमकपणे सत्य पण घातक गोष्टी कशा गळी उतरवायच्या याचा उत्तम नमूना. ही क्लिप कधीची माहीत नाही, पण विषय तोच सहिष्णुता. भारताची परंपरा फार महान आहे. आपण ती पुढे चालवणार की महानता सोडून लहान होणार, असा जावेद अख्तर यांचा सवाल. स्वाभाविकच पेचात टाकणारा. मात्र तेवढाच धूर्त. आजवर हीच धूर्तता चालत आली आहे. तुम्ही महान आहात, तुम्ही थोर आहात इत्यादी सांगून; स्वत: कसेही वागायला मोकळे. आम्ही कसेही वागलो तरी चालेल. तुमच्या देवदेवता, धर्म, परंपरा, आचारविचार, तुमची भावधारा, प्रतिके यावर आम्ही कशीही टीकाटिप्पणी करू, कशीही टिंगलटवाळी करू, त्यांना हास्यास्पद ठरवू, त्यांची निन्दानालस्ती करू, त्यांचा अपमान करू, तुम्हाला काय अभिप्रेत आहे त्याला अर्थ नाही आम्हाला काय अर्थ काढायचा आहे तोच आम्ही काढू... तरीही तुम्ही शांतच राहायचे कारण तुम्ही महान आहात. हे आणि असेच जावेद साहेब बोलले. शोले किंवा पिके चित्रपटाचे उदाहरण देऊन बोलले.

जावेद साहेब लाज वाटायला पाहिजे तुम्हाला खरे तर. आमच्या मराठीत एक म्हण आहे. मराठीत असल्याने तुम्ही ती ऐकली नसेल. म्हण आहे- मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये. साधं शहाणपण शिकवणारी ही म्हण आहे. पण तुम्ही अन तुमच्यासारखे कोपराने खणत गेलात अन मग जे व्हायचे ते होतेच. आतून कोणी फणा काढला तर नंतर ओरडता कशाला? सहिष्णू सहिष्णू म्हणत जेव्हा तुम्ही अतिरेक केला, आतल्या नागाला डिवचलं तेव्हा त्याने फणा उगारला. आता त्याचा राग शांत होईपर्यंत वाट पाहावी लागेलच. पण तुम्हाला तो फणा पाहून कमरेचं सावरणं कठीण होतंय. तुमची पंचाईत ही आहे. अन हिंदूंना - तुम्ही महान आहात हे सांगताना; कोणी काही म्हणत नाही याचा अर्थ त्याला काहीही म्हणावे असा होत नाही; तसा अर्थ काढणे असभ्यपणा असतो, ते म्हणजे चांगुलपणाचा गैरफायदा घेणे असते; हे तुमच्यासारख्या संवेदनशील सृजनशील माणसाला कळत नाही? हे म्हणजे carrying coal to new castle असे आहे. मुख्य म्हणजे हिंदूंच्या सहिष्णूतेवर आपापल्या स्वार्थाची आणि विकृतींची पोळी भाजून घेण्याचा कावा ओळखू न शकल्यानेच आजची दुरवस्था आली आहे. अगदी काल जम्मू काश्मीरच्या उरी तळावर झालेला हल्ला सुद्धा या तुमच्या निर्लज्ज काव्याचाच परिणाम आहे. मात्र आता हा कावा ओळखून हिंदू वागू लागला तर तुम्हाला शहाणपण सुचायला लागले आहे.

एक पक्कं लक्षात ठेवा- आमच्या महानतेचं काय करायचं आम्ही पाहून घेऊ. आम्ही महान राहू किंवा लहान होऊन जाऊ. महान काय किंवा लहान काय; कोणत्याही लेबलांचं आम्हाला कौतुक नाही. ज्याला जे म्हणायचं असेल ते म्हणा. पण यापुढे कावेबाजपणा चालणार नाही एवढं नक्की. तेवढी खूणगाठ बांधून ठेवा.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा